Opinion

निर्धाराची भिंत

६२० किलोमीटरवर ३५ लाख महिला खांद्याला खांदा लावून उभ्या ठाकल्या

Credit : My Nation

केरळमध्ये १ जानेवारीला जवळपास ३५ लाख महिलांनी आपल्या अधिकारासाठी, समतेच्या मूल्यासाठी सनातनी धर्मव्यवस्थेला आव्हान देत उभ्या केलेल्या विशाल मानवी साखळीतून, बंडाचं, स्त्री प्रश्नासांठीच्या संघर्षाचं जे विशाल चित्र दिसलं त्या पुरोगामी परंपरेची, संघर्षाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षापासून सुरु होते. आज सावित्रीबाईंची जयंती, त्यानिमित्ताने सावित्रीच्या लेकींचा सनातन धर्मव्यवस्थेविरोधात निरंतर सुरु असलेला संघर्ष लाखो महिलांच्या मानवी साखळीच्या रुपात जगाने ठळकपणे पाहिला.

सावित्रीबाई ज्योतिंबांकडून शिकल्या. लिहित्या – वाचत्या झाल्या. इतकंच नाही तर हजारो वर्ष गुलामीच्या बेड्या पायी असलेल्या स्त्रीचा उद्धार शिक्षणाने, ज्ञानानेच होऊ शकतो, हे जाणून समतेची धुळाक्षरं गिरवून या स्त्रीने पहिलं बंड केलं स्त्रियांना शिकवण्याचं. सनातनी – सरंजामी विचारांचे लोक दगडगोटे मारु लागले, हिणवू लागले, हे बंड मोडून काढण्याचा हरेक प्रयत्न करु लागले. सावित्रीच्या बंडाचा ‘धोका’ ओळखून ते वेगवेगळी षडयंत्र - कारस्थानं रचू लागले. एक बहुजन स्त्री ज्ञानार्जन करते इतकंच नाही तर ते इतर बहुजनांना – दलितांना – स्त्रियांना वाटते, फातिमा शेख या महिलेला धर्म न पाहता आपल्या कामात सामावून घेते, हे तत्कालीन ब्राम्हणी पितृसत्ताक विचारांच्या सामाजिक राजकीय अधिष्ठानाला डळमळीत करणारं केवढं मोठं पाऊल होतं.

आज सावित्रीच्या लेकी अशी अनेक पितृसत्ताक सरंजामी अधिष्ठानं मोठ्या निकराने मोडून काढताहेत, हे करताना त्यांना विरोध करणारा तितकाच मोठा ब्राम्हणी पितृसत्ताक प्रवृत्ती व्यवस्थांचा अडसर त्यांच्या बंडाच्या पावलांना खोडा घालतोय, सावित्रीबाईंच्या शिकवण्याला विरोध करणाऱ्या सरंजामी वृत्ती नष्ट करण्याचं  मोठं आव्हान आजही स्त्रियांपुढे आहे आणि एकमेकींच्या साथीने – संघर्षाने त्या ही आव्हानं भेदत आहेत. या पार्श्वभूमीवर केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व महिलांना भेदभावाशिवाय प्रवेश मिळावा याकरता महिलांनी तयार केलेली मोठी मानवी साखळी ही जगभरातल्या स्त्री प्रश्नांच्या आंदोलनांमधली महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे.

ही अभेद्य मानवी साखळी केवळ केरळमध्येच साकार करण्यात आली असं नाही, तर सर्व महिलाना मंदिरप्रवेश मिळावा, त्यांचा अधिकार सनातनी परंपरांच्या ओझ्याखाली दडपण्यात येऊ नये, य़ाकरता मुंबईतील महिलांनीही या साखळीला पाठिंबा दर्शवणारी महिलांची साखळी चैत्यभूमी – शिवाजी पार्क परिसरात केली होती. दुसऱ्या राज्यातील महिलांच्या आंदोलनाला अशा प्रकारे मानवी साखळी तयार करुन पाठिंबा देणे, कोणत्याही संघर्षात आपण जात – धर्म – प्रदेशांच्या सीमा नाकारुन सोबत आहोत, हे सांगणे व तशी आश्वासक कृती करणे हे एका सच्च्या भगिनीभावाचे द्योतक आहे. मुंबईतील महिलांनीही अतिशय समर्पक पाठिंबा देत हे दाखवून दिलं आहे.

केरळमधल्या या महिला साखळीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती – धर्माच्या महिला, अपंग महिला, ट्रान्सजेंडर महिला, विधवा – परित्यक्ता असोत की विद्यार्थिनी, या सगळ्यांनी रस्त्यावर एकमेकींचे हात हातात घेत ६२० किलोमीटर अंतरापर्यंत एक भव्य महिला साखळी केली होती. केरळमधल्या डाव्या सरकारने या महिला साखळीचं आयोजन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत लाखो महिला रस्त्यावर उतरल्या आणि अतिशय शांततामय मार्गाने साखळी करुन उभ्या राहिल्या. घोषणा देऊ लागल्या. काही ठिकाणी या साखळीतल्या महिलांवर हल्ला करण्याचे प्रयत्नही झाले, तरीही हे प्रयत्न ही साखळी मात्र तोडू शकले नाहीत.

केरळमधल्या कासारगोड जिल्ह्याच्या टोकापासून थिरुअनंतपुरमपर्यंत ही भव्य साखळी उभी राहिली होती ती आपल्या मूलभूत अधिकाराच्या पूर्ततेसाठी – कोणत्याही महिलेला भेदभावाशिवाय शबरीमला मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी. या व्यापक साखळीमागचं उद्दिष्ट् केवळ मंदिरप्रवेश होतं असं नाही तर यातून शांततामय मार्गाने, एकीचं बळ दाखवत ‘ आम्ही साऱ्याजणी आमच्या हक्क – अधिकारांसाठी जागृत आहोत. समताधिष्ठित मूल्यांसाठी कटिबद्ध आहोत, स्त्री प्रश्नांसाठी, लिंगभाव समतेसाठी आम्ही अशीच एकी दाखवत कायम संघर्षरत राहू’ असा ठळक संदेश या कृतीतून सर्व प्रतिगामी – सरंजामी मानसिकतेच्या लोकांना, संस्था, संघटना – राज्यकर्त्यांना दिलेला आहे.

शबरीमला मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरुन जवळपास वर्षभरापासून मोठा संघर्ष सुरु आहे. कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मंदिरात सर्व महिलांना प्रवेश मिळायला हवा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही प्रतिगामी उजव्या विचाराच्या संघटनांनी याला विरोध केला आहे. परंपरेप्रमाणे ज्या स्त्रियांना मासिक पाळी येते, म्हणजेच १० ते ५० वयोगटातील स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाहीच, अशी भूमिका या सनातन परंपरावादी उजव्या विचारसरणी असलेल्या गटांची, संस्थांची आणि भारतीय जनता पार्टीची आहे. भारतीय जनता पक्षानेही उघड-उघड स्त्री हक्काविरोधी – प्रतिगामी आणि सरंजामी परंपरा जोपासणारी भूमिका घेतली आहे.

या मुद्द्याचा वापर केरळमधील माकप सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात करण्यात आला, डाव्यांचं सरकार जनमताविरोधी आहे, त्यांना लोकभावना – प्रथा परंपरांचं महत्व कळत नाही, असा प्रचार तिथल्या भाजप – रा.स्व.संघ धार्जिण्या संस्था – कार्यकर्त्यांनी केला. पुरोगामीपणाचा नेहमी प्रचार करणाऱ्या कॉंग्रेसनंही प्रतिगामीच भूमिका घेतली, माकप सरकार लोकांची दिशाभूल करत आहे, असं वक्तव्य कॉंग्रेसमधल्या नेत्याने केलं तर काही नेत्यांनी या भिंतीला पब्लिसिटी स्टंट म्हणून निकालात काढलं. माकपविरोधातला इतका विखारी प्रचार होऊनही राज्य सरकारने थेट स्त्रियांच्या बाजूने – हक्क अधिकार – समतेच्या बाजूने राजकीय भूमिका घेतली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही.

एका बाजूला या प्रश्नावर थेट आणि सुस्पष्ट भूमिका डाव्या सत्ताधाऱ्यांनी घेतली असताना दुसरीकडे या मुद्द्यावरुन अगदी कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करणं धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी सुरुच ठेवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अनेक महिला मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता त्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं गेलं. या महिलांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारांना मारहाण करण्यात आली, त्यांचे कॅमेरे हिसकावून घेण्यात आले. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आधी ज्या महिलांना संभाव्य परिस्थिती पाहता पोलिस सरंक्षणात दर्शन घेऊ देण्याची व्यवस्था केली होती, त्यांनाही मग चिघळलेलली परिस्थिती पाहता माघार घ्यावी लागली.

एकंदरितच कायदा सुव्यस्थेचा प्रश्न पाहता सर्वोच्च न्यायालयातून या निर्णयावरील पुनर्विचार याचिकांरील सुनावणीचा अंतिम निर्णय येईपर्यंत मंदिरप्रवेश महिलांसाठी अद्यापही सुरु झालेला नाही. तर केरळमधल्याच नव्हे तर देशभरातल्या काही प्रतिगामी संघटनांच्या मते सर्वोच्च न्यायालयापेक्षा, मूलभूत अधिकारांपेक्षा परंपरा महत्वाची. त्यामुळेच या संघटनांनी १० ते ५० वयोगटातल्या महिलांना ‘मंदिरप्रवेश द्यायला नको’ यासाठी मोर्चे काढले. आंदोलनं केली. अगदी मागील आठवड्यातही महिलांना मंदिरप्रवेश नको यासाठी तिथल्या उजव्या संघटनांनी मानवी साखळी तयार केली, उजव्या धार्मिक परंपरा मानणाऱ्या या मानवी साखळीत अयप्पा देवाचा जयघोष केला गेला. यात जवळपास १०० उजव्या संघटना सामील झाल्या होत्या. रा.स्व.संघ आणि विश्व हिंदू परिषद यात अर्थातच आघाडीवर होत्या.

महिलांना मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या हरेक कृतीचा मग ती हिंसाचारापासून मानवी साखळीपर्यंत, निदर्शनांपर्यंत कोणतीही कृती असो, त्याला अधिक व्यापक पातळीवर प्रतिरोध करण्यासाठी केलेल्या या महिलांच्या साखळीचं आयोजन करण्याच्या डाव्या पुरोगामी सरकारच्या या कृतीमागे निश्चितच काही विचारांचा पाया आहे, त्या बाबी समजून घ्यायला हव्यात.

लिंगभावी दृष्टीकोनातून या बाबी समजून घेताना लक्षात येतं, की मंदिर प्रवेश नाकारण्यामागे लैंगिकतेचं राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. अयप्पा ब्रम्हचारी म्हणजेच अविवाहित होते, अशी एक आख्यायिका आहे. त्यामुळे १० ते ५० वयोगटातल्या म्हणजेच पाळी येणाऱ्या महिलांनी जर अयप्पांचे दर्शन घेतले, तर त्यांच्या ब्रम्हचर्याचा भंग होतो, असं विरोध करणाऱ्या उजव्या संघटनांचं म्हणणं आहे. आपल्याकडे पाळी आली की मुलगी शहाणी होते, असा समज प्रचलित आहे. म्हणजेच ती प्रजोत्पादन आणि लैंगिकदृष्टया शहाणी होते, तिचं शरीर सक्रीय होतं. अशा स्त्री ने जर ब्रम्हचारी देवांचं दर्शन घेतलं तर त्या देवांच्या तपस्येचा भंग होतो, असा विचार अनेक मिथकांमधून रुजवलेला आहे.

अहिल्येची शिळा झाल्याची गोष्ट असो, की पुराणकालीन ऋषींची तपस्या भंग करणाऱ्या अप्सरांच्या गोष्टी असो, बिंबवलं हेच जातं की तरुण, सुंदर स्त्रिया या संयमी पुरुषांना भुलवतात. त्यामुळे मग त्या शिक्षेस आणि निंदेस पात्र असतात. यामध्ये स्त्रियांच्या लैंगिक जीवनाचं नियमन, नियंत्रण करण्याचा हेतू आहेच शिवाय संयमी पुरुषाचा पौरुषार्थ भंग करण्यास स्त्री लाच जबाबदार ठरवण्याचा हेतूही आहे. स्त्रियांनी आपले लैंगिक जीवन उपभोगू नये, त्यांच्या वर्तन व्यवहाराला, जगण्याला धर्मव्यवस्थेने ठरवून दिलेली एक सनातनी चौकट असावी, हाही हेतु त्यात आहे.

म्हणूनच ब्रम्हचारी असणाऱ्या राजकारण्यांचेही आजच्या उदारमतवादी – लोकशाही प्रबोधनातून पुढे गेलेल्या काळातही अवास्तव कौतुक केले जाते. चांडाळ, पापी, कुलटा, उठवळ, चंचल या साऱ्या स्त्रियांसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांची निर्मिती झाली ती अशाच स्त्रीविरोधी पुराण – कथा, लोककथा मिथकांमधून. म्हणजे एकीकडे मोठ्या तपस्या करणाऱ्या ऋषी – मुनींची तपस्या वा त्यांचा निर्धार हा त्यांच्या नियंत्रणात नसतो का?  असा प्रश्न जनमानसाला पडू दिला जात नाही, तर दुसरीकडे सर्व लैंगिकतेशी जोडलेल्या कृतींना केवळ स्त्रियांना जबाबदार धरायचं तेही सनातनी धार्मिक आणि स्त्रियांप्रती वैरभावी दृष्टीकोनातून. हे कशातून घडतं तर धर्मव्यवस्थेने घातलेल्या वैवाहिक बंधनात नसलेल्या दोन सज्ञान स्त्री – पुरुषांमध्ये लैंगिक संबंध आले तर ते पापच आणि मग त्याला स्त्रीच जबाबदार अशा बुरसटलेल्या मनुवादी विचारांतून. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना शूद्र ठरवून, त्यांच्या, ब्राम्हणी धर्मव्यवस्थेला मान्य नसलेल्या कृतींसाठी ज्या शिक्षा सांगितल्या आहेत, त्यातूनही हे ध्यानात येतं.

हे सगळं लक्षात घेता आमच्या देवांच्या तपस्या भंग करण्याकरता, त्यांचं ब्रम्हचारी असणं भंग करण्याकरता लैंगिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या, प्रजोत्पादन करु शकणाऱ्या लैंगिक जीवनाचा महत्वाचा कालखंड असलेल्या १२ ते ५० या वयोगटातल्या सर्व महिलांना ब्रम्हचारी देवांच्या दर्शनाची बंदी करायची. या वयोगटातली प्रत्येक स्त्री आज ब्रम्हचारी देव (व्यक्ती नव्हे तर मूर्ती) यांची तपश्चर्या भंग करण्यासाठीच मंदिरात येते का?  मनःशांती, प्रार्थना – भक्ती, मानसिक आधार यासाठी येत नाही का? असा प्रश्न ब्राम्हणी धर्मव्यवस्थेचं नियंत्रण नियमन करणाऱ्यांना पडत नाही, कारण स्त्री म्हणजे शूद्र आणि उपभोग्य वस्तू, जिला कुणीतरी नियंत्रित करायचं असतं, असं कंडिशनिंग जाणीव – नेणीवेत घट्ट बसवलेलं आहे. त्यामुळेच स्त्रियांची कृती ही व्यवस्था नियंत्रित करणार आणि तिच्या प्रत्येक कृतीचा अर्थही सनातनी धर्मव्यवस्थाच लावणार.

या मुद्द्यांमुळे शबरीमला मंदिरातील ठराविक वयोगटातल्या महिलांना मंदिरप्रवेशासाठी केलेला विरोध हा केवळ मासिक पाळीशी जोडलेल्या अपवित्रतेच्या संकल्पनांपुरता मर्यादित नाही. डाव्या स्त्रीवादी विचारांमध्ये शोषणाच्या सर्व व्यवस्थांना आव्हान देण्याचा, उदारमतवादी मानवी मूल्यांसह सर्वच बाबीत समता अंगिकारण्याचा विचार मुळाशी आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या धर्मव्यवस्थेची केलेली सखोल चिकित्सा धर्मव्यवस्था आणि तिचं अविभाज्य अंग जातीव्यवस्थेंमधून केल्या जाणाऱ्या स्त्री शोषणाबद्दल मांडणी केली आहे. त्यामुळेच डाव्या – आंबेडकरवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या पक्ष, संघटना, संस्था यांनी सुस्पष्ट राजकीय भूमिका घेत आपण समतेच्या  महिला अधिकारांच्या बाजूने आहोत, आपण सनातनी विचार – कृतींची वेळोवेळी चिकित्सा करत राहू, त्याला विरोध करत राहू, त्यासाठी व्यापक संघर्ष जारी ठेऊ, हे या मानवी साखळीतून दाखवून दिलं आहे.

जगभरात स्त्रियांच्या प्रश्नांसाठी सुरु असलेल्या संघर्षांमधली ही एक घटना निश्चितच ऐतिहासिक आहे, ज्यात बुरखा घातलेल्या महिला रस्त्यावर आल्या, तान्ह्या लेकरा – बाळांसकट रस्त्यावर आल्या, ट्रान्सजेंडर महिला आल्या, व्हील चेअरचा आधार घेऊन जगणाऱ्या महिला आल्या आणि एकमेकींचे हात हातात घेऊन त्यांनी आपल्या अधिकारांसाठी, समतेच्या मूल्यासाठी एक अभेद्य साखळी उभारली. ही साखळी सनातनी ब्राम्हणी धर्मव्यवस्थेच्या अत्याचारी नियम –धारणांना जेरबंद करणारी आणि स्त्रियांच्या भगिनीभावाचं – ऐक्याचं प्रतिक आहे.