India

एफटीआयआयचा विद्यार्थी राहतोय इन्स्टिट्यूटच्या गेटबाहेर

इन्स्टिट्यूटची शिस्तभंगाची कारवाई

Credit : Priyanka Tupe

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( एफटीआयआय) मधला श्रीनिवास राव हा आर्ट डिरेक्शन विभागाचा विद्यार्थी सध्या इन्सिट्यूटच्या गेटबाहेर आपलं सामान घेऊन बसला आहे. त्याच्यासोबत त्याचे अनेक मित्र गेटजवळ बसले आहेत. आंदोलन करत आहेत. श्रीनिवासला इन्सिट्यूटमधून निलंबित केलं आहे. त्याच्यासह मनोजकुमार या विद्यार्थ्यालाही सस्पेंड केल्याची सूचना देऊन १५ फेब्रुवारीपर्यंत हॉस्टेल सोडून जाण्यास सांगण्यात आलं होतं.


श्रीनिवास आणि त्याच्यासोबतच्या मित्रांनी सांगितलं - श्रीनिवास आणि मनोजकुमारला जाणून बुजून टारगेट केलं जातंय. हे दोघं खरं डिसेंबरमध्ये तर विभागप्रमुख विक्रम वर्मा यांना सेमिस्टरमध्ये जे एक्सरसाईज करायचे असतात, त्याच्या नियमावलीबद्दल विचारण्यासाठी गेले होते. प्रोफेसर वर्मा जे आर्ट डिरेक्शन आणि प्रोडक्शन कोर्सचे विभागप्रमुख आहेत, त्यांनी या दोघांना उडवाउडवीची उत्तरं दिली. व प्रा. प्रसाद थोरात यांच्याकडे नियमावलीची विचारणा करण्यासाठी पाठवलं. थोरात यांच्याकडूनही या दोघांना सेमिस्टरमधली एक्सरसाईज कशी करायची, नव्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार, काय नवीन नियम आहेत याची व्यवस्थित माहिती मिळाली नाही. उत्तम मोंडल या विद्यार्थ्यानं सांगितलं.” आम्ही २०१६ च्या बॅचचे विद्यार्थी. आमचा अभ्यासक्रम बदलला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार काय नवीन नियम आहेत, याची माहिती आमचं सेमिस्टर सुरु होऊन २ महिने झाल्यानंतरही मिळाली नव्हती. अखेर वाट बघून बघून सेमिस्टर संपायला आल्यानंतर जर आमच्यापैकी दोन विद्यार्थी जर आमच्या अकादमिक एक्सरसाईजचे नियम विचारायला गेले, तर तो गुन्हा कसा?”


श्रीनिवास राव आणि मनोजकुमारला प्राध्यापकांनी त्यांच्या शंकांबदद्ल उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर त्यांच्यावरच प्राध्यापकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. विभागप्रमुखांकडे दोघांची तक्रार केली. यावर विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यामध्ये नेमकं काय झालं, याची दोन्ही बाजूने चौकशी न करता विभागप्रमुखांनी २१ डिसेंबरला दोघांनाही अकादमिक सहभागातून संस्पेड केल्याची नोटीस दिली. यावर विद्यार्थ्यांनी विभागप्रमुख विक्रम वर्मा यांच्याकडे जाऊन संस्पेड केल्याबाबतची कारणं विचारली. तसंच आमच्याविरोधात काय आरोप आहेत, कोणत्या प्राध्यापकांची काय तक्रार आहे, आमचं नेमंकं कोणतं कृत्यं गैरवर्तन ठरलं? या बाबी आम्हाला लेखी स्वरुपात देण्यात याव्यात, व आम्ही नेमकं कशा प्रकारे प्राध्यापकांशी गैरवर्तन केलं आहे, याची चौकशी करावी. अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. मात्र यानंतरही चौकशी झाली नाही, असं श्रीनिवाससोबतच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं.


चौकशीशिवाय दोघांना संस्पेड केल्यानंतर मनोज कुमार मानसिक तणावाखाली होता. त्यानंतर तो कॅम्पसमध्ये दिसला नाही. त्यामुळे इन्सिटिट्यूनं पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर मनोज कुमारचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तो वाराणसीला त्याच्या दुरच्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती समोर आली. मनोज सध्या प्रचंड मानसिक तणावात असून मानसोपचारतज्ञांकडून उपचार घेत असल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं. मनोज बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर एफटीआयआयनं या प्रकरणाची चौकशी सुरु केली. जानेवारी अखेरीस चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल आला. या अहवालात दोघांनाही प्राध्यापकांशी गैरवर्तन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे.

या अहवालानंतर दोघांनीही १५ फेब्रुवारीनंतर सेमिस्टर संपेपर्यंत हॉस्टेलला रहायचं नाही, असं सांगणारी नोटीस त्यांना देण्यात आली आहे. त्यापैकी मनोजकुमार सध्या वाराणसीत त्याच्या दुरच्या नातेवाईकांकडे आहे. तर श्रीनिवास कालपासून इन्स्टिट्यूटच्या गेटबाहेर राहतोय.


ज्या चौकशीा समितीकडून प्रकरणाची चौकशी करण्यात आली, त्या ,समितीच्या अहवालावर विद्यार्थी समाधानी नाहीत. या अहवालामध्ये चौकशी करत असताना उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची स्टेटमेंट्स नाहीत, असं एफटीआयआय स्टूडंट्स असोसिएशननं सांगितलं.


उत्तम मोंडल या एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनं सांगितलं ”देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक गरीब विद्यार्थी इथं शिकायला येतात. मनोजकुनार कर्ज काढून शिकत होता. तर श्रीनिवासचे वडील गरीब शेतकरी आहेत. तो आता कुठे जाणार ? विद्यार्थ्यांना अशा प्रकारे टारगेट करणं चुकीचं आहे. प्राध्यापकांशी कोणतंही गैरवर्तन न करुनही चौकशीशिवाय दोघांना चाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ सस्पेंड केलं होतं. एवढी शिक्षा पुरेशी नाही का?

आमच्या सेमिस्टरमधल्या ज्या एक्सरसाईज असतात, त्याच्या शुटिंगसाठी अनेकदा बजेट मिळत नाही. आम्हाला आवश्यक साधनं उपलब्ध नसतात. कधी प्राध्यापकांकडून अभ्यासक्रमाबाबत वेळेवर आणि व्यवस्थित सूचना मिळत नाहीत, मग आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत का याबाबत? की प्रश्न विचारले, त्यावरुन प्राध्यापकांशी वैचारिक वाद झाला तर ते गैरवर्तन ठरते? कुणी प्रश्न विचारुच नयेत, विचारले तर तुमची अवस्था मनोज कुमार, श्रीनिवाससारखीच केली जाईल, असंच त्यांना या उदाहरणातून सांगायचंय.”


“आम्ही मात्र या दोन्ही विद्यार्थ्यांच्या सोबत राहू आणि त्यांचं मनोबल खचू देणार नाही.” उत्तम मोंडलनं सांगितलं.

यावर इन्सिट्यूटचे संचालक भूपेंद्र काईनथोला यांच्याशी संपर्क करुन त्यांचं म्हणणं विचारलं असता, त्यांनी सांगितलं,

“ एफटीआयआयमध्ये कोणत्याही प्राध्यापकाशी विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असं आमचं धोरण आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांविरोधात विभागप्रमुखांनी तक्रार केली होती. दोन्ही विद्यार्थ्यांचं गैरवर्तन आणि या प्रकाराचं गांभीर्य पाहूनही त्यांना आम्ही माफी मागण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. चौकशी होईपर्यंत त्यांना फक्त अकादमिक सहभागातून संस्पेड केलं होतं. चौकशी समितीच्या अहवालानुसार दोन्ही विद्यार्थी दोषी आहेत. या समितीने दोघांनाही गंभीर शिक्षा देण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.” पुढे ते म्हणाले, “त्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांना पूर्णपणे संस्पेड करण्याचा निर्णय घेऊन त्यांना तशी आगावू नोटीस दिली. १५ फेब्रुवारीनंतर तुम्हाला कॅम्पसमध्ये राहता येणार नाही, हे त्यांना पुरेसं आधी कळवलं होतं.”


श्रीनिवास राव आणि मनोजकुमार या दोघांनी नेमकं काय गैरवर्तन केलं होतं, हे मात्र एफटीआयआयच्या संचालकांनी सांगितलं नाही. या प्रकरणातली इन्स्टिट्यूटची बाजू त्यांनी एका लेखी स्टेटमेंटद्वारे इंडी जर्नलला सांगितली, मात्र त्या लेखी स्टेटमेंटमध्येही विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केलं म्हणजे नेमकं काय केलं, याची माहिती दिलेली नाही.

श्रीनिवास राव हा विद्यार्थी काल रात्री ९ वाजल्यापासून इन्स्टिट्यूटच्या गेटबाहेर आपलं सामान घेऊन बसून आहे. त्याचे काही मित्र - जे एफटीआयआयचे विद्यार्थी आहेत, ते त्याच्यासोबत गेटबाहेर बसून आहेत.

श्रीनिवासला प्रचंड मानसिक ताण आहे. “जवळपास पन्नास दिवसांच्या अकादमिक सस्पेंशन आणि कालपासून हॉस्टेलनमधून काढून टाकल्यानंतर माझा मानसिक ताण - तणाव वाढला आहे, मात्र इन्स्टिट्यूटमधून कुणीही प्राध्यापकाने आपल्याशी किमान बोलणंही केलं नाही, की संपूर्ण मानसिक तणावाच्या काळात इन्स्टिट्यूटमधून समुपदेशन, कोणत्याच प्रकारची वैद्यकीय मदत मिळाली नाही.” श्रीनिवासनं सांगितलं.