Quick Reads
एक तरल कविता
कविता महाजन: एक आठवण
कवी लेखकाच्या मृत्यूनंतर मृत्यूलेखांचं पीक येतं. लेखकाच्या हयातीत त्याच्या कारकीर्दीबद्दल न लिहिता, मूल्यमापन न करता मृत्यूपश्चात सबंध आयुष्यातलं लेखकाचं लेखन – अनुभवविश्व एका मृत्यूलेखात कोंबणं हा क्रुरपणा होईल. हे टाळण्यासाठी अनेकदा त्या लेखक – लेखिकेच्या लेखनकार्याची उजळणी केली पाहिजे. त्याची चिकित्सा केली पाहिजे.
कार्यकर्ती लेखिका, चित्रकार, अनुवादक आणि आदिवासी संस्कृतीची अभ्यासक - संशोधक कविता महाजन यांचे अकाली निधन झाले. तिच्या अशा अकाली जाण्याने मराठीच नाही तर इतर भाषांतील साहित्य – वर्तृळातूनही हळहळ व्यक्त होत आहे. दूर कुठल्या तरी आदिवासी पाड्यावर बुबुळांच्या खाचा झालेली एखादी म्हातारीही कविताच्या जाण्याने हळहळत असेल, अशी म्हातारी जिला कविता लेखिका, चित्रकार, संशोधक म्हणून माहित नसेल कदाचित..पण ही लिहीणारी बाई आपली कुणी तरी आहे, असं वाटत असेल. एचआयव्ही – एड्सग्रस्त मुला- मुलींना आपल्याला अंगा – खांद्यावर खेळवणारी, चित्रं काढणारी कविता आई अशी कशी आपल्याला सोडून गेली, म्हणून हुंदके अनावर झाले असतील. कारण कविता महाजन एक कार्यकर्ती लेखिका होती. आदिवासी पाड्यांमध्ये – वस्त्यांमध्ये पायाला भिंगरी लावून फिरली. नुसती फिरली नाही तर त्यांच्या जीवनाशी एकरुप झाली.
आदिवासींच्या जीवनातील केवळ तपशील तिने आपल्या लिखाणातून वर्णन केले नाहीत, तर त्यांच्यासोबत बसून उंदीर – घुशीचं कालवण खाऊन त्यांचं भुकेकंगाल अस्तित्व तिने समजून घेऊन मांडलं. आदिवासी स्त्रिया, मुले हा तिच्या आस्थेचा विषय. म्हणूनच १०६ वर्ष वयाच्या अशिक्षित पण पर्यावरण जतन करणाऱ्या तिमाक्काचं चरित्र तिने लिहीलं. आदिवासी, स्त्रिया, उपेक्षित, कष्टकरी समाज, शोषित – वंचित समूह, समाजाने अस्पृश्य ठरवलेला घटक हे सारं तिच्या साहित्याचा आणि चित्रांचा केंद्रबिंदू राहिलं आहे. अलीकडेच प्रकाशित झालेला देवदासींचं आयुष्य स्फोटपणे मांडणाऱ्या वेदिका कुमारस्वामी या कवयित्रीचा गावनवरी हा कवितासंग्रह तिने संपादित केला होता. कार्यकर्त्या आणि त्याच बरोबर अकादमिक शिस्तीत लेखन करण्यासाठीच्या तत्वज्ञानाची चौकट हे तिच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य.
कविता महाजन यांचे स्केच
पुरुषसत्तेला आव्हान देणारी, स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी, स्वतचा शोध घेऊ पाहणारी स्त्री ही त्यांच्या कथा – कादंबऱ्यांमधील नायिका आहे. ब्र, भिन्न, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम या कादंबऱ्या, तत्पुरुष, धुळीचा आवाज हे काव्यसंग्रह, मृगजळीचा मासा ही दीर्घ कविता, याशिवाय ग्राफिटी वॉल, कुहू ही मल्टीमीडिया कादंबरी, जोयानाचे रंग आणि विपुल बालसाहित्य त्यांनी लिहून ठेवले आहे. तिचे अनुवादाचे कामही मोठे आणि महत्वाचे आहे. ईस्मत चुगताई या उर्दू लेखिकेच्या समाज – धारणांना आव्हान देणाऱ्या कथांचा मराठीत अनुवाद तिने केला होता. आपल्या आजीच्या वयाची एक मुस्लीम महिला इतक्या प्रतिगामी आणि प्रतिकूल समाजिक वातावरणात ज्या कथा लिहून गेली आहे, त्या कथांनी मला ब्र लिहीण्याची हिंमत दिली, असे कविताने लिहून ठेवले आहे.
ईस्मतच्या कथांच्या अनुवादाने मी माझ्या गद्य लेखनाचा पाया घातला, असंही तिने म्हणलं आहे. चौकटीबाहेर केवळ लेखन नाही तर आयुष्यही जगायचं असतं हा बंडखोरीचा वारसा ईस्मत चुगताईसारख्या लेखिकेकडून घेण्याच्या बाबतीत ती म्हणते, ईस्मत चुगताईच्या यांची कथा मला भेटेपर्यंत मी अतिशयोक्तीनं नटलेल्या रोमॅंटिक उर्दू गझलमध्येच स्वत:चा मुटका करुन निवांत पहुडलेली होते. तिच्या कथांमुळे जन्म झाल्यासारखी सटकन बाहेर आले. रक्तात संवेदनशीलता, भावूकता वाहती ठेऊन बाहेरच्या वास्तवाचा स्वीकार करण्याची क्षमता मला याच कथांनी दिली.
ईस्मत चुगताईप्रमाणेच निर्मला पुतूल या संथाळी लेखिकेच्या तर प्रतिभा राय या ओडिया लेखिकांच्या कथांचे अनुवाद तिने केले आहेत. मराठीशिवाय इतर भाषांतही लिहील्या जाणाऱ्या आदिवासी साहित्याबद्दल तिला खूप आस्था होती. हांसदा सौवेंद्र शेखर या संथाळी लेखकाच्या आदिवासी विल नॉट डान्स या दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या कथांवर, त्याबाबत कोर्टात चाललेल्या खटल्यांबाबत तिने सविस्तर लेख काही महिन्यांपूर्वी लिहीला होता. याशिवाय तिने ‘माझी जमीन मी वाचवेन’, ‘गहाण पडलेला रघ्घू’, ‘जंगलातला गुप्त देव’ अशा इतर किती तरी भाषांमधल्या आदिवासी कथा मराठीत अनुवादित केल्या आहेत. ज्या समाजशास्त्रीय, सांस्कृतिक अभ्यासासाठी महत्वाच्या आहेत. सराकारी धोरणांमुळे आदिवासींचं होणारं शोषण, आदिवासींचया विकासाची व्याखा स्वत: ठरवून फंडिंगची कुरणं चरणारं एनजीओजचं माजलेलं तण या गोष्टी तिला फार अस्वस्थ करायच्या. तिच्या कादंबऱ्यांमध्ये त्याचे संदर्भ येतात. कादंबरी, कथांप्रमाणेच संशोधन करुन अनेक महत्वाच्या पुस्तकांचे संपादन तिने केले आहे.
विविध भाषांमध्ये लिहीणाऱ्या प्रमुख भारतीय लेखिकांच्या लेखनाच्या अनुवादासह त्यांच्या कारकीर्दीची ओळख करुन देणारी तिची भारतीय लेखिका ही पुस्तकांची मालिका अतिशय महत्वाची आहे. याशिवाय आदिवासी पाड्यांमध्ये फिरुन विशेषत: वारली लोकगीतांचा संग्रह, आदिवासी मौखिक वांड.मयांचं लिखित स्वरुपात जतन करुन ठेवणं..हे महत्वाचं काम तिने केलं आहे. विविध संस्थांची पाठ्यवृत्ती मिळवून आदिवासींवर महत्वाचं संशोधनपर लिखाण तिने केलंय. जमीनीवर प्रत्यक्ष फिरुन, लोकांशी बोलून, लोकसंस्कृतीतल्या घटकांचा बारकाईने अभ्यास करुन त्याची अकादमिक शिस्तीत मांडणी करणं, त्यासाठी कष्ट घेणं हा तिच्या कार्यपद्धतीचा महत्वाचा भाग. मोठा जनसंपर्क आदिवासींमध्ये अगदी एकरुपच झाल्यामुळे तिच्या लिखाणातली पात्रं, तिची चित्रं आपल्याला निव्वळ वर्णन वाटत नाहीत. ज्या सहजतेने ती कथा, कादंबरी कविता लिहीते, त्याच सहजतेने ती एखाद्या आदिवासी महिलेच्या हातून छान फुलांचा गजरा डोक्यात माळून घ्यायची. कुणा आदिवासी महिलेच्या हातचं काही बनवलेलं लहान मुलासारखं निरागसतेनं खायची. कुणा पहिलटकरणीला स्वत: शिवलेलं अंगडं, टोपडं द्यायची.
कविता महाजन यांचे स्केच
आदिवासींसोबतच्या तिच्या जैविक संबंधामुळे तिच्या निसर्ग चित्रांतही तो जिवंतपणा आला असावा. प्राण्या – पक्ष्यांची तिने काढलेली असंख्य चित्रं अत्यंत जिवंत आणि देखणी आहेत. मासेमारी करायला गेलेल्या महिला, भात – लावणी करणारी महिला, जात्यावर दळण दळणारी, कोळशाच्या टोपल्या भरणारी, वीटभट्टीवर काम करणारी, कोयत्याला धार लावणारी अशा कित्येक कष्टकरी महिलांना तिने चित्रबद्ध केले आहे. तिच्या चित्रातली महिलाही कणखर, खंबीरपणे वादळी आव्हानांचा सामना करणारी आहे. मात्र ही चित्रं पाहूनही या महिलांसोबत होत असलेल्या शोषणाची कल्पना येते. आतंरिक करुणेचा गंध या प्रत्येक चित्राप्रती असल्याचं कायम जाणवतं या अर्थाने तिची चित्रं हा शोषित आदिवासींच्या जगण्याचा एक मोठा दृश्यपट आहेत. तर बूटपॉलिश, हमाली कराव्या लागणाऱ्या..मुलांच्या तिने काढलेल्या चित्रांतून त्यांचं हरवलेलं बालपण अंगावर येतं. वारली चित्रं, आदिवासी संस्कृतीचे इतर महत्वाचे घटकही तिने चित्ररुपात जतन केलेत. लहान मुलांसाठी काढलेली चित्रं, प्रासंगिक रेखाटनं, पुस्तकांसाठी केलेली रेखाटनं आणि तिचं लेखन हे तिला कायम निसर्ग, आदिवासींप्रती असलेल्या आदिम ओढीतून निर्माण होत असावं, असं वाटत राहतं.
विविध वृत्तपत्रीय स्तंभ, मासिकं, दिवाळी अंक, वांड.मयीन नियतकालिकं, वेबसाईट्सवर तिने जवळपास पाचशेहून अधिक लेख विविध विषयांवर लिहीले आहेत. याशिवाय स्वतचं नियमित ब्लॉगलेखनही ती करत असे. तिच्या प्रासंगिक लेखांमध्ये अनेक मिथकांचे संदर्भ आहेत. शेकडो लोककथा, लोकगीतं तिला माहीत होती, यावरुन तिने किती खोलवर लोकसाहित्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला होता, हे जाणवतं.
मराठी साहित्यात मल्टीमीडीया कादंबरी, ऑडियो बुक, थ्रीडी मुखपृष्ठ असे काही तांत्रिक प्रयोग तिने जोखीम पत्करुन केले. तंत्रज्ञानाबहदद्ल अनेक लेखकांच्या ठायी असलेला तिटकारा तिला नव्हता. नानाविध प्रयोग करण्याची उर्मी, क्षमता आणि कष्ट घेण्याची तयारी तिने कायम बाळगली. लेखन, चित्रं, अनुवाद, डॉक्यूमेंटेंशन, संशोधन, पुस्तकांबाबत विविध प्रयोग, विविध वृत्तपत्रं, वेबसाईट्ससाठी लेखन इतका मोठा कामाचा आवाका आणि व्याप एकहाती निभावताना तिने अनेक नव्या कवयित्रींच्या लेखनाकडे आवर्जून लक्ष ठेवलं. त्याबददल लिहीलं. वेदिका कुमारस्वामी, संघमित्रा काळेसारख्या अनेकींच्या कुणाला माहित नसलेल्या कविता तिने लोकांसमोर आणून कोवळ्या लेखण्यांना बळ दिलं. उत्तम लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची तिची आंतरिक तळमळ कायम तिच्या अनुवादातून दिसत राहिली.
कविता महाजन यांचे स्केच
लेखक- पत्रकारांच्या हत्या होण्याच्या, पुस्तकांवर खटले भरण्याच्या आजूबाजूच्या वातावारणात ती नेहमी याविरोधात बोलत राहिली. पुरुषसत्ताक सरंजामी विचारांतून लेखिकांवर केल्या जाणाऱ्या शेरेबाजीबद्दल ती बोलली. गलिच्छ पातळीवर ट्रोल करणाऱ्या, लेखिकेच्या यशा – अपय़शाचा संबंध प्रकाशकाबरोबर झोपण्याशी लावणाऱ्या सरंजामी पुरुषी मानसिकतेसमोर ती खंबीरपणे दोन हात करत उभी राहिली. जागतिक पातळीवर मी टू ही मोहीम सुरु असण्याच्या वातावरणात ती इथे स्त्रियांच्या पुरुषसत्ताक मानसिकतेतून केल्या जाणाऱ्या चारित्र्यहननाविरोधात जमेल त्या मार्गाने बोलत होती. समविचारींना सोबत घेत होती. केवळ तिच्या कथेच्या नायिकाच नाही तर तीही तशीच जगली बंडखोर, मनस्वी, कलासक्त, संस्कृतीरक्षणाची बाईच्याच नाकात कायम घातलेली वेसण झुगारुन देत.
आपल्या लेखनातून आदिवासी, महिला, शोषित – कष्टकऱ्यांच्या जगण्याची संहिता मांडणारी ही तितकीच हळवी, तरल कविता आज आपल्यात नाही.. मात्र तिच्या तिमाक्कासारख्या नायिका दीर्घ काळ वेगळ्या विचारांच्या मशाली पेटवत समाज - साहित्याला पुढे नेतील.