Quick Reads

समाजशास्त्राची गरज नक्की कशासाठी?

एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उदय हा अठराव्या शतकात युरोपात प्रबोधन काळात झाला.

Credit : Prathmesh Patil

मधुरा जोशी

 

दहावीला चांगले गुण मिळाले की विज्ञान शाखा निवडायची आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं हे आपल्या समाजातील सर्वसामान्य चित्र आहे. करिअर करण्यासाठीचा सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून सामाजिक शास्त्रांकडे बघितलं जातं. सामाजिक शास्त्रातही राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे महत्वाचे विषय मानले जातात, तर समाजशास्त्राला ह्या उतरंडीत शेवटचं स्थान असतं. समाजशास्त्र आणि त्याचं महत्व ह्याविषयी अनभिज्ञ असणाऱ्या जनमानसात मग साहजिकच समाजशास्त्रज्ञ नक्की काय काम करतात ह्याविषयी फार जागरूकता असलेली दिसत नाही, आणि ह्या उदासीनतेची कारणं आपल्याला समाजशास्त्र ह्या विद्याशाखेच्या स्वरुप आणि जडणघडण ह्यामध्ये सापडतात. प्रस्तुत लेखात मी समाजशास्त्रज्ञांच्या कार्याचं महत्त्व आणि त्यातील जटिलता यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.

समाजशास्त्रज्ञ काय काम करतात हे समजून घेण्याआधी समाजशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. समाजशास्त्र ह्या विद्याशाखेविषयी अनेक समज आणि गृहितकं रूढ आहेत. समाजशास्त्राला सामान्यज्ञानाशी जोडणं हे त्यातील एक प्रमुख गृहीतक आहे. समाजशास्त्र म्हणजे इतिहास किंवा सामाजिक शस्त्रं असाही समज आपल्या समाजात रूढ आहे. समाजशास्त्र आणि सामान्यज्ञान ह्यावर अनेक अभ्यासकांनी विस्तृत मांडणी केली आहे (पहा - आंद्रे बेते:१९९६, सतीश देशपांडे: २००३, मैत्रेयी चौधरी:२०१९). समाजशास्त्रासाठी काही विशेष प्रशिक्षण आवश्यक नसतं ह्या गैरसमजातून समाजशास्त्राला एक सोप्पी (soft) विद्याशाखा मानले जाते. समाजशास्त्रातील संकल्पना दैनंदिन वापरात असल्यामुळे सामान्यतः ह्या संज्ञा सर्वाना ज्ञात असतात, त्याचबरोबर माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे आपल्याला समाजाविषयीची काही एक माहिती असते, ज्यातून समाजाच्या अभ्यासासाठी वेगळ्या विषयाची आणि प्रशिक्षणाची काय गरज अशी एक मानसिकता तयार होते. 

आंद्रे बेते म्हणतात, समाजशास्त्र सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील विविध अंगांच्या अनुभवाशी जोडलं गेलेलं असल्यामुळे समाजशास्त्र हे एक सौम्य/ढिलं ज्ञानाचं क्षेत्र मानलं जातं आणि त्याला सामान्यज्ञानाबरोबर जोडलं जातं.  म्हणूनच, समाजशास्त्राच्या शैक्षणिक अभ्यासाद्वारे प्राप्त ज्ञान आणि सामान्यज्ञान ह्यामधील फरक स्पष्ट करणं आवश्यक आहे. समाजशास्त्रामध्ये संकल्पना, पद्धती आणि तथ्य असतं, याउलट सामान्य ज्ञान हे चिकित्सक परीक्षण करून मिळवलेलं ज्ञान नसतं. ते स्वतःच्या उत्पत्तीवर प्रश्न विचारत नाही. खरं तर सामान्यज्ञान कश्याप्रकारे तयार होतं हा समाजशास्त्रीय विश्लेषणाचा विषय राहिलेला आहे. समाजशास्त्रीय ज्ञान उपयोजित करून एखादी व्यक्ती सामान्य समजुतींची उकल करू शकते. परंतु, जिथे समाजशास्त्राला सामान्यज्ञानाबरोबर जोडले जाते तिथे समाजशास्त्रज्ञ जे कार्य करतात ते देखील तज्ञांचे कार्य मानले जात नाही.

 

बदलांमुळे अस्थिर झालेल्या समाजाच्या बिघडलेल्या व्यवस्थेची घडी नीट बसवण्यासाठी काम करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, असं समाजशास्त्राचं वर्णन समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कोम्त करतात.

 

एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उदय हा अठराव्या शतकात युरोपात प्रबोधन काळात झाला. प्रबोधन काळात युरोपात सामाजिक व बौद्धिक पातळीवर अनेक क्रांतिकारी बदल घडून आले. जुन्या मूल्यव्यवस्थेला, धर्माच्या अधिष्ठानाला धक्के पोहोचू लागले. अर्थातच याचे सामाजिक पातळीवर मूलगामी परिणाम झाले. ह्या बदलांमुळे अस्थिर झालेल्या समाजाच्या बिघडलेल्या व्यवस्थेची घडी नीट बसवण्यासाठी काम करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, असं समाजशास्त्राचं वर्णन समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कोम्त करतात. कोम्त पुढे जाऊन असंही म्हणतात की रोग्याला जसे डॉक्टर बरे करतात त्याप्रमाणे समाजशास्त्रज्ञांचं काम हे समाजाला बरं करणं, सामाजिक व्यवस्था आणि स्थैर्य टिकवून ठेवणं, हे आहे. त्यामुळे समाजशास्त्रज्ञांचं काम काय हे समजून घेताना आधी या शास्त्राचा उदय कश्याप्रकारे झाला हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. 

समाजशास्त्र हे त्याकाळातील बदलावरील/ परिवर्तनावरील एक पारंपारिक (conservative) प्रतिउत्तर म्ह्णून उदयास आलं. या अश्या समाजशास्त्राला आव्हान देऊन विस्तृत करण्याचं काम मॅक्स वेबर ह्या विचारवंतानं केलं. मुळात हे शास्त्र असलं तरी त्याचा अभ्यासविषय समाज आणि माणसं असल्यामुळे नैसर्गिक शास्त्राच्या पद्धती वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे समाजशास्त्रज्ञाला समाजाचा डॉक्टर म्हणणं उचित ठरणार नाही. याविषयी वेबर असं म्हणतात, की सामाजिक क्रिया त्यामागे असलेलं कर्त्याचं उद्देश समजून घेणं हा कळीचा मुद्दा आणि समाजशात्राच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे.

समाजशास्त्राच्या कामाचं महत्व आणि व्यामिश्रता समजून घेण्यासाठी तीन मुद्दे महत्वाचे ठरतात. पहिला मुद्दा म्हणजे समाजशास्त्र आणि समाजशास्त्रज्ञांचं काम याविषयी समाजशास्त्रात विविध मतप्रवाह आहेत. कोम्तवादी संरचनावादी प्रवाह हा समाजशात्रज्ञांचं काम तटस्थ राहून सामाजिक व्यवस्थेचं स्थैर्य टिकवणं आहे असं मानतो तर संघर्षात्मक समाजशास्त्र समाजशास्त्रज्ञांनी केवळ सामाजिक स्वास्थ्यावर लक्ष न देता समाजातील संघर्षाचं मूळ आणि त्यातून होणारे बदल यावर लक्ष केंद्रित करावं, असंही मानतो. 

समाजशास्त्रज्ञ हे त्यांच्या ज्ञानाचा वापर हितसंबंध जपायला सुद्धा करतात आणि प्रस्थापित सत्त्तेत सहभागी होऊन कोम्त म्हणतात त्याप्रमाणे असमान विषम व्यवस्था टिकावी ह्यासाठी ही काम करतात आढळतात. सी. राईट. मिल्स त्यांच्या ‘समाजशास्त्रीय कल्पकता’ (sociological imagination) ह्या पुस्तकात समाजशास्त्रज्ञांचे दोन प्रकार विशद करतात. एक अशाप्रकारचे समाजशास्त्रज्ञ जे समाजशास्त्राचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेतात आणि दुसरे असे समाजशास्त्रज्ञ जे समाजशास्त्रासाठी वैयक्तिक स्वार्थाचा बळी देतात. एखादा समाजशास्त्राचा अभ्यासक ह्यातील कोणता मतप्रवाह स्वीकारतो त्यावर ती व्यक्ती करत असलेलं समाजशास्त्रातील काम अवलंबून आहे. आणि त्यामुळेच केवळ एकप्रकारचं काम सर्व समाजशास्त्रज्ञ करतात, असं मानणं चुकीचं ठरेल.

 

समाजशास्त्रावर इतर अनेक क्षेत्रातील विचारांचा प्रभाव आहे आणि त्यांनी समाजशास्त्रीय ज्ञानामध्ये मौलिक भर घातली आहे.

 

दुसरं म्हणजे, वेगवेगळ्या काळात समाजशास्त्रातील वेगवेगळ्या धारणा आणि मतप्रवाह प्रबळ होते. दुसर्‍या महायुद्धानंतर १९६०-७० पर्यंत ‘संरंचनात्मक प्रकार्यावाद’ ह्या विचारप्रवाहाचं वर्चस्व होतं, असं दिसून येतं. सामाजिक बदल आणि संघर्ष सिद्धांत तसंच स्त्रीवादी सिद्धांत हे परीघावर होते, जे नंतर मुख्य प्रवाहातील सामाजिक सिद्धांतामध्ये समाविष्ट केले गेले. म्हणूनच, जे महत्त्वाचे सामाजशास्त्रीय ज्ञान समजलं जातं, ते देखील विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भात अंतर्भूत असतं, हे लक्षात घेणं अत्यंत जरुरी आहे.

शेवटी, भारतीय समाजशास्त्राच्या संदर्भात मैत्रेयी चौधरी (२०१९) म्हणतात त्याप्रमाणे समाजशास्त्राच्या अभ्यासक आणि प्राध्यापकांमध्येच स्वतःच्या विषयासंबंधी एक पराभूत मानसिकता दिसून येते. त्या असंही म्हणतात की समाजशास्त्रावर इतर अनेक क्षेत्रातील विचारांचा प्रभाव आहे आणि त्यांनी समाजशास्त्रीय ज्ञानामध्ये मौलिक भर घातली आहे. परंतु, ह्या गोष्टीला समाजशास्त्राची ताकद आणि वैशिष्ट्य समजण्याऐवजी ते अनेकदा कमकुवतपणाचे लक्षण म्हणून पाहिलं जातं (चौधरी: २०१९). ह्या सर्वाचा परिणाम म्हणूनच अभ्यासकांमध्ये आपल्या विद्याशाखेसंबंधी संभ्रम अधिक आणि आत्मविश्वास कमी दिसून येतो. आज समाजशास्त्राचे अभ्यासक भांबावलेले आणि आपल्या विषयाप्रती आत्मविश्वास गमावलेले दिसतात, ज्यामुळे विषयाचे महत्व वाढण्याऐवजी कमी होण्याचा धोका संभवतो. खरे तर, आत्ताच्या नवउदारमतवादी काळात 'काम' कशाला म्हणायचं आणि कशाला नाही? विकास कशाला म्हणायचं, ते तसं का? ह्या सगळ्याचं विश्लेषण करणं आणि त्याबाबतीत सजग होणं गरजचं आहे. असं असताना समाजशास्त्रज्ञांनी आपल्या विषयाच्या आणि कामाच्या कक्षा आकादमिक क्षेत्रापुरत्या मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार करणं आवश्यक आहे. 

आजच्या काळात दैनंदिन आयुष्यातील प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट होत असताना त्यांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र अत्यंत महत्वाचं साधन आहे. परंतु, अशावेळी विषयाचं सामान्यकीकरण न करता त्याला स्वस्त आणि ‘सोप्पा’ न बनवता त्याची चिकित्सक आणि परीक्षणाची धार कायम ठेऊन, त्याचं महत्व समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी आपल्या अभ्यासातून, संशोधनातून अधोरेखित करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ – बेरोजगारी ही वैयक्तिक समस्या नसून तिचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संरचानांशी असलेलं नातं उलगडून दाखवण्यासाठी समाजशास्त्रीय चौकट उपयोगी ठरते. राज्यसंस्था आणि तिची धोरणं ह्याचे समाजातील वेगवेगळ्या घटकांवर कसे वेगवेगळे परिणाम होत असतात आणि त्यासाठी राज्यसंस्थेला अचूक प्रश्न विचारण्याची चिकित्सक दृष्टी समाजशास्त्र देतं. 

सामाजिक शास्त्रातील सिद्धांत आणि जागतिक समाजशास्त्रातील मांडणी प्रादेशिक भाषांमध्ये आणण्याचे काम ही अत्यंत महत्वाचं आहे. समाजशास्त्राची दिशा ही समाजशास्त्रज्ञांच्या कामावर अवलंबून आहे. विषयाचं महत्व उद्धृत करत असतानाच विषयाचं गांभीर्य अबाधित ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे समाजशास्त्राचं आंतरविद्याशाखीय स्वरूप लक्षात घेऊन समाजशास्त्राला केवळ आकादामिक क्षेत्रात मर्यादित न करता त्याचं उपयोजन (application) इतर क्षेत्रात केलं पाहिजे. सी. राईट. मिल्स म्हणतात त्याप्रमाणे समाजशास्त्रासाठी जगणाऱ्या समाजशास्त्रज्ञांच्या अशा मूलभूत आणि विधायक कार्यानेच समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीचा विस्तार आणि उपयोग करून आपण चांगल्या समाजाच्या निर्मितीची आशा बाळगू शकतो.

 

मधुरा जोशी ह्या समाजशास्त्राच्या स्वतंत्र अभ्यासक असून त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथून समाजशास्त्रात एम.फील केलं आहे.

 

References:

Beteille, Andre. 1996. Sociology and Common sense. Economic and Political Weekly. Political Weekly. Vol 31. No 35/37.

Chaudhari, Maitrayee. 2019. Doing Sociology: Some persistent questions. Sociological Bulletin.

C.W. Mills. 1959. Sociological Imagination. Oxford University Press.

Satish Deshpande. 2003. Contemporary India: a sociological view. Penguin Books.

Ritzer, Gorge. 2011.  Sociological theory. Tata Mcgrow-hill. Rawat Publication.

Haralambos, M and R. M. Heald. 2012 Sociology themes and perspectives. Oxford University Press.