India

रक्त हिरवं-भगवं नसतं, ते फक्त लाल असतं

व्हिडियोकॉन कामगारांचे ७२ दिवसांचे आमरण साखळी उपोषण आणि ७४व्या दिवशी मोर्चा

Credit : Harshad Kishor

हिंदू मुस्लिमांची मक्तेदारी आपापसात वाटून घेणार्‍या औरंगाबाद शहरात, "रक्त हिरवं-भगवं नसतं, ते फक्त लाल असतं!’’ अशा घोषणा ऐकू येऊ लागतात.

औरंगाबाद शहर गुलमंडी परिसर सकाळचे अकरा वाजलेत, गुलमंडी परिसराला छावणीचे स्वरूप आलं होतं. तीन पोलिस व्हॅन, दोन दंगल नियंत्रण पथकाच्या व्हॅन, पन्नास एक वर्दीतले, अनेक सिविल ड्रेस मधील पोलीस एकेक करून पोलिस ३००-३५०  जाणांच्या जामावाला पोलिस व्हॅन मध्ये भरत होते, अटक करत होते. पण ही अटक केली जात होती. ना कोणत्या दरोडेखोराला ना कोणत्या गुन्हेगाराला अटक केली गेली कामगारांना व्हिडीओकॉन एम्प्लाइज युनियनच्या कामगारांना, ह्या कामगारांचा दोष हाच त्यांच्या प्रलंबित, दुर्लक्षित, मागण्यांसाठी काढलेला मोर्चा, ज्याची परवानगी पोलिसांकडून नाकरण्यात आली होती.

७२ दिवसांचे आमरण साखळी उपोषण आणि ७४व्या दिवशी मोर्चा

व्हिडियोकॉन कंपनीचे हे कामगार मागच्या ७२ दिवसांपासून औरंगाबाद येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या बाहेर अमरण साखळी उपोषण करत होते. ह्याच ७२ दिवसांमध्ये महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली; पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना कामगार भवनाबाहेर उपोषणाला बसणाऱ्या कामगारांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. कृती तर सोडाच पण त्यांची साधी भेट घेऊन त्यांना संपूर्ण सहकार्याचं आश्वासन द्यावं इतकी सुद्धा तसदी राजकीय नेत्यांनी घेतली नाही. औरंगाबाद शहराचा राजकीय पटल हा काळ्या-पांढर्‍या रकाण्याचा आखला जात नाही तो भगव्या आणि हिरव्या रंगात आखला जातो. हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या मतावर टोकाच राजकारण करणार्‍या औरंगाबादच्या दोन्ही आजी माजी खासदारांनी ह्या प्रकरणातलक्ष घातलेलं नव्हत, माडग्याम सुद्धा दुर्लक्ष करत होती या करणासत्व सर्वांच्यानिदर्शनास हा प्रश्न आणून देण्यासाठी कामगारांनी हा मोर्चा काढला होता.

औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती असणार्‍या गुलमंडी बाजार पेठेतून मोर्च्याला सुरुवात करून धूत बांगल्यावर हा मोर्चा धडकणार होता. ५० बँकांकडून ५८ हजार ७३० कोटी रुपयांचं कर्ज उचलणाऱ्या व कर्ज बुडणाऱ्या वेणुगोपाल धूत याच्या व्हिडिओकॉन कंपनीत काम करणाऱ्या ३४० कामगारांचा एक वर्षाहून अधिकचे वेतन थकीत आहे. त्याच्यामध्ये काही कामगारांचे दोन वर्ष पाच वर्ष तर काही कामगारांचं सुमारे ६ वर्षाचा वेतन थकीत आहे औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी मराठवाड्याची ओळख ही दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यांसाठी होते. इनमिन पन्नास हजाराचा कर्ज उचललं तर शेतककर्‍याच्या कर्ज वसुलीसाठी निराशेच्या भरात त्याला आत्महत्येपर्यंत लोटनारी ही व्यवस्था धूत बंधूंच्या विरोधात कोणतीच कारवाई करायला कशी काय लावत नाही हा प्रश्न कामगारांना पडला आहे.

मोर्चा आणि राजकारण

वेणूगोपाल धूत यांचे बंधू राजकुमार धूत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत. ५८ हजार ७३० कोटी रुपयांचं, ५० वेगवेगळ्या बँकांकडून घेणाऱ्या वेणूगोपाल धूत आणि राजकुमार धूत विरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. न्यायालयाचे कामगारांचे थकीत पगार देण्याचे आदेश असतानासुद्धा त्यांच्याकडून पगार दिला जात नाही. राजकुमार धूत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार असल्यामुळे, शिवसेनेची राज्यात असणारी सत्ता, धूत बंधूंना पाठीशी घालते की काय? कारवाई करण्याचे टाळते की काय असा प्रश्न कामगार नेते विचारतात.

दिवाळी, आंदोलन, पाऊस आणि कामगार

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली कोकण पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात सुद्धा अतिवृष्टी झाली याच पावसाच्या दरम्यान सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर एका कापडी मंडपात हे कामगार उपोषणाला बसले. कामगारांसाठी टाकण्यात आलेल्या मंडपांमध्ये गुडघाभर पाणी होतं. कार्यालयातील गवत, पाण्याची किचकिच याच्यामुळे झालेले डास आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च याची सतावणारी चिंता या सर्वांमध्ये कामगारांचे प्रचंड हाल झाले. दिवाळीच्या दिवसात घरी न जाता उपोषण करणाऱ्या कामगारांनी कामगारांनी आकाशकंदील हे त्याच मंडपाला लावलं आणि पण पणत्या देखील त्याच मंडपाच्या बाजूने प्रज्वलित केल्या.

एक बाप म्हणून लाज वाटते

दिपक वाघमारे या विद्यार्थ्याला सायन्स शाखेमध्ये बारावीत ६५ टक्के मार्क होते. दीपक हुशार आहे त्याला डॉक्टर व्हायचा आहे पण वडिलांची नोकरी गेल्यामुळे आणि पगार थकल्यामुळे घरच भाडं, बहिणीच्या शिक्षणाचा खर्च, वडीलयांच  महिना आजारपण यासाठी त्याला एका कपड्याच्या दुकानात सात हजार पगारावर ती काम करावे लागतात दिपकचे वडील गौतम वाघमारे हे इंडी जर्नलशी बोलताना गहिवरले. "एक बाप म्हणून माझा पराभव झाला एक बाप म्हणून माझी मलाच लाज वाटते की शिकण्याच्या वयात शिकण्याच्या वयात मुलगा काम करतो आहे आणि मुलाच्या जीवावर मी बेरोजगार बाप खातो आहे याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं," असं ते म्हणाले

पोलीस म्हणाले उरलेले घरी जा

सुमारे तीनशे ते साडेतीनशे कामगार त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरले होते पोलिसांना आंदोलनाची तीव्रता दाखवायची नव्हती, जितक्या कमी लोकांना अटक तितकी आंदोलनाची तीव्रता कमी, असा समाज असल्याने अटकेतील कामगारांची एक पोलीस व्हॅन भरून गेल्या नंतर उर्वरित दोन पोलिस व्हॅनमध्ये कामगारांना न भरता, त्यांना 'घरी जा' असं सांगितलं गेलं. तरीसुद्धा कामगार मागे हटले नाहीत. कामगारांनी त्यांच्या घोषणा पण तरीसुद्धा कामगार मागे हटले नाहीत आणि पोलिसांना नाईलाजास्तव उरलेल्या दोन व्हॅनमध्ये कामगारांना ताब्यात घ्यावं लागलं. कामगारांना तीन वाजेपर्यंत क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे ताब्यात ठेवण्यात आलं आणि नंतर दुपारी तीन वाजता सर्व कामगारांची सुटका करण्यात आली.

 करोडपती बनना है तो यहा आओ

गुलमंडीतुन व्हिडिओकॉन एम्प्लाइज युनियनच्या मोर्चाला सुरुवात झाली आणि तो पोहोचला श्री अष्टविनायक लॉटरी सेंटरच्या समोर. कामगार घोषणा देत होते, त्यांच्या मागण्या ओरडून-ओरडून जिवाच्या आकांतानं मांडत होते, बाजूलाच नजर गेली लॉटरी सेंटर वरील लॉटरी सेंटरच्या दुकानाच्या बाहेर एक बोर्ड लटकत होता करोडपती बनना है तो यहा आइये.

lottery

पुढची भूमिका काय?

"भारतीय लोकशाही भारतीय न्यायव्यवस्था याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. दूत बंधूंना राजकीय पाठिंबा असला, सरकार मध्ये ते असले, तरी आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवू आणि कामगारांचा प्रश्न निकाली लागे पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील," असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अभय टाकसाळ यांनी सांगितलं. "कामगारांच्या सर्व मागण्या जोवर मानी होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन शांत होऊ देणार नाही," असं विडिओकोन एम्प्लोयीज युनियनचे अध्यक्ष जी.बी. खंदारे म्हणाले.

 

हर्षद इंडी जर्नलचे औरंगाबादस्थित प्रशिक्षणार्थी पत्रकार आहेत.