India

विदर्भात लॉकडाऊन: महाराष्ट्राची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल?

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळली, बुलढाणा व अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन लागू

Credit : इंडी जर्नल

विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या रातोरात वाढू लागल्यानं पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे. राज्याची दुसऱ्या लाटेकडं वाटचाल होत असल्याचं हाती आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतंय. महाराष्ट्रानं कोरोना रुग्णांच्या बाबतीत केरळचा आकडा पार केला असून विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे. अमरावतीमध्ये रात्रीची संचारबंदी लावली गेली असून इतर जिल्ह्यांतही संचारबंदी सुरू केली गेली आहे. अमरावतीमध्ये एकाच दिवसात ४४९ केसेस नोंदवल्या गेल्या असून एकूण रूग्णांची संख्या १५ हजारांवर गेली आहे. राज्यात तीन फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान एकूण ४१ हजारांहून जास्त रुग्ण सापडले आहेत. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल ३६६३ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६६% एवढं झालं असलं तरी वाढत्या रुग्णसंख्येनं सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळली. 'सुरुवातीला सोयीसुविधा कमी असल्यानं लॉकडाऊन लावण्यात आलं होतं मात्र आता सर्व सामग्री आणि लसीकरणाच्या सोयी असल्यानं लॉकडाऊन लावला जाणार नाही. त्यामुळं आता फक्त बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी लावण्यात येणार आहे. याचा अर्थ दुकानं आणि बाजार बंद करता येतील असा नाही," असं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.  

बुलढाणा जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात आज राज्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल १९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत असल्यानं जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या आदेशाने शाळा तसेच महाविद्यालये २८ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. शहरातील शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याचं स्थानिकांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं. राजेश टोपे यांच्या मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशांनुसार लग्न समारंभाला ५० व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातही ही संचारबंदी लावली जाणार आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा केली असून तेथेही मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. संचारबंदी लागू झाल्याने शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.  

शिवव्याख्याते परिषदेच्या वतीने शिवजयंतीवरील निर्बंध उठवण्याची मागणी केलीय. "सरकारने व्याख्यान आणि पोवाड्यांच्या कार्यक्रमावरील बंदी उठवली नाही तर राज्यभरातील ५००० शिवव्याख्याते येणाऱ्या काळात सरकारच्या विरोधात भूमिका घेतील" असा इशारा  इंडी जर्नलशी बोलताना शिवव्याख्याते परिषदेचे प्रमुख निलेश जगताप यांनी प्रशासनाला दिला.