India

मृत्यूशय्येवर असलेल्या वरवरा रावना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवा

मुंबई उच्च न्यायालयाचा तळोजा तुरुंग प्रशासनाला आदेश.

Credit : LiveLaw

मुंबई: तळोजा कारागृहात खितपत पडलेले ८१ वर्षीय मानवाधिकार कार्यकर्ते आणि कवी वरवरा राव यांना तातडीनं नानावटी रुग्णालयात हलवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. राव यांची प्रकृती अतिशय बिघडलेली असूनही, राज्य (स्टेट) त्यांना वैद्यकीय उपचार नाकारु शकतं काय? असा खडा सवाल न्यायालयानं विचारला आहे.  

राव यांच्या प्रकृतीची तुरुंगात हेळसांड होत असल्याचं त्यांची पत्नी हेमलता यांनी म्हणलं होतं, त्यामुळेच त्यांना वैद्यकीय कारणानं जामीन देण्यात यावा, हा त्यांचा अर्ज मागील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा फेटाळला होता.

'तळोजा कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या राव यांची प्रकृती अतिशय गंभीर असून अशा अवस्थेत त्यांना उपचाराविना तुरुंगात ठेवणं त्यांच्या जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा' युक्तिवाद वकील इंदिरा जयसिंग यांनी मागील सुनावणीदरम्यान केला होता. हा युक्तिवाद फेटाळून लावताना न्यायालयानं जामीनाची गरज नसून डॉक्टर त्यांची व्हिडिओ कॉलवरच तपासणी करतील असा निर्णय दिला होता.

त्यावर त्यांच्या तपासणीबाबत डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर न्यायालयानं हा आदेश दिला आहे. राव यांना तातडीनं तळोजा कारागृहातून हलवून विलेपार्लेस्थित नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं आणि पंधरा दिवस हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर उपचार करण्यात यावे, तसंच त्यांच्या सर्व तपासण्या काटेकोरपणे केल्या जाव्यात, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

 

 

यादरम्यान राव यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना भेटण्याची परवानगीही न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्या. माधव जमादार यांनी दिली आहे. दरम्यान या कालावधीत तुरुंग प्रशासनानं कोणत्याही परिस्थितीत न्यायालयाला कळवल्याशिवाय राव यांना हॉस्पिटलमधून परस्पर तुरुंगात हलवू नये, शिवाय त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल न्यायालयाला सादर करावेत अशीही सक्त ताकीद मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे. 

"अखेरीस हा व्यक्ती मृत्यूशय्येवर आहे, त्याला काही वैद्यकीय उपचारांची गरज आहे, तरीही नाही...नाही...आम्ही त्यांच्यावर कारागृहातच उपचार करू, असं स्टेट म्हणू शकतं का?" असा सवाल न्या. शिंदे आणि न्या. जमादार यांनी तुरुंग प्रशासन आणि एनआयएला विचारला आहे. 

८१ वर्षीय वरवरा राव यांच्या मूत्रमार्गात जंतुसंसर्ग झाला असून तो अधिक बळावला आहे, त्यासोबतच त्यांची मानसिक प्रकृतीही कमालीची ढासळली आहे. अशी माहिती मागील सुनावणीत राव यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला दिली होती. 

जानेवारी २०१८ पासून भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव तुरुंगात आहेत. वृद्धापकाळामुळे बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या राव यांना १६ जुलै रोजी तुरुंगात कोरोनाचीही लागण झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूक असून जामीन आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्याचे त्यांचे अर्ज न्यायालय सातत्यानं नाकारत आलंय. आज राव यांना हॉस्पिटलमध्ये तातडीनं हलवण्याचा आदेश दिल्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे.