India

उत्तर प्रदेशच्या बदायूत ५० वर्षीय अंगणवाडी सेविकेची सामूहीक बलात्कारातून हत्या

गुन्हा करून फरार झालेल्या मंदिरातील पुजाऱ्याचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.

Credit : Times Now

५० वर्षीय अंगणवाडी सेविकेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात येऊन महिलांवरील लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात समोर आली आहे. पीडीत महिला सवयीप्रमाणं मंदिरात दर्शनासाठी गेली असता मंदिरातील पुजाऱ्यानं आपल्या दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा घृणास्पद प्रकार केल्याचं वृत्त आहे. पोलीसांनी आत्तापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून गुन्हा करून फरार झालेल्या मंदिरातील पुजाऱ्याचा पोलीसांकडून शोध सुरू आहे. 

उत्तर प्रदेश मधील बदायूमध्ये रविवारी ३ जानेवारी रोजी ही घटना घडली असून पीडित कुटुंबीय आणि स्थानिक माध्यमांच्या प्रयत्नांमुळे तब्ब्ल ३ दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं. वाढत्या दबावामुळे उत्तर प्रदेश सरकारकडून या घृणास्पद कृत्याचा तपास आणि आरोपींवर कारवाई करण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल उघैटी येथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सामूहिक बलात्काराची उत्तरप्रदेशातील ही न थांबणारी मालिका म्हणजे राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेविषयी आणि एकूणंच कायदा आणि सुव्यवस्थेविषयी अनभिज्ञ असल्याचा पुरावा असल्याचं म्हणत सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. 

सदर ५० वर्षीय अंगणवाडी सेविका नेहमीप्रमाणं घराजवळील मंदिरात रविवारी म्हणजे ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता दर्शनासाठी गेली असता तिच्यावर हा बलात्कार करण्यात आला. मंदिरातील पुजारी आणि त्याच्या २ सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची माहिती पीटीआयसह अनेक वृत्तसंस्थांनी दिली आहे. "रात्री ११ वाजता माझ्या आईला हेच आरोपी गंभीर जखमी अवस्थेत घरच्या दाराशी सोडून गेले. मात्र, आम्ही तिला रूग्णालयात येईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता," अशी माहिती पीडित मृत महिलेच्या मुलानं दिली. 

"मंगळवारी हा सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याची माहिती पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून आम्हाला मिळाली. शरीरावरील गंभीर जखमा आणि गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून सिद्ध झालंय. आत्तापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं असून तिसरा आरोपी म्हणजेच पुजाऱ्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आलं आहे," असं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश पोलिसांकडून देण्यात आलंय. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्या या तीन आरोपींनीच जखमी अवस्थेत या महिलेला तिच्या घराच्या दाराशी आणून सोडलं आणि विहीरीत पडल्यानं ती जखमी झाली असल्याचा दावा केला. या पुजाऱ्यानंच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं बलात्कार केला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतरही तात्काळ कारवाई करण्यास स्थानिक पोलिसांकडून दिरंगाई करण्यात आली.

 

 

शवविच्छेदन अहवालानुसार हा बलात्कारच असल्याचं सिद्ध झाल्यानंतर हलगर्जीपणा करणाऱ्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. डॉक्‍टरांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या तीन आरोपींविरूद्ध कलम ३७६ (ड) (सामूहीक बलात्कार) आणि कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान घटना घडलेल्या दुसऱ्या दिवशीच आमची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. करण्याचं गांभीर्य ओळखत राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनीही, "पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी आणि आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी आयोग पावलं उचलेल, अशी भूमिका घेतली. 

अशा प्रकारे बलात्कार आणि त्यावर वेळीच उचित ती कारवाई न होण्याची प्रदेशातील ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच हाथरसमध्ये झालेल्या सामूहीक बलात्काराची आणि पोलिसांनी या प्रकरणाच्या केलेल्या हाताळणीची चर्चा देशभरात झाली होती. बदावमधील या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत उत्तर प्रदेश प्रशासनाच्या हेतूवरंच शंका उपस्थित केली. "हाथरस घटनेनंतरसुद्धा गुन्ह्याचा तपास आणि आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याऐवजी पीडितांच्या कुटुंबीयांनाच उत्तर प्रदेश पोलीसांकडून त्रास देण्यात आला. बदावमध्येसुद्धा हाच पॅटर्न राबवला जात आहे, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.  

सामूहिक बलात्काराच्या घटना थांबवण्यासाठी आणि त्या घडल्यानंतर तत्परतेनं कारवाई करण्याऐवजी पीडितांचाच आवाज दाबल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. हाथरस प्रकरण घडल्यानंतर जवळपास १५ दिवस उत्तर प्रदेश पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. या प्रकरणाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. या कारवाई अंतर्गत मग उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेचंच पार्थिव कुटुंबीयांना न विचारताच दहन करत पुरावेही नष्ट केले होते‌. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिस नेमकं कोणाच्या बाजूनं काम करतंय असा प्रश्नही त्यावेळी विरोधकांसह अनेक माध्यमांनी विचारला होता.

त्याचवेळी उत्तर प्रदेश राज्य सरकार मात्र लव्ह जिहादचा कायदा आणून मुस्लीम तरूणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यासाठी पोलिसांना कामाला लावत असल्याचा विचित्रच विरोधाभास योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत पाहायला मिळतोय. मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात रोज लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लीम तरूणांना तुरुंगात डांबण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत. यातील अनेक दाम्पत्यांनी तर स्वतःच्या मर्जीनं आणि स्वखुशीनन आंतरधर्मीय विवाह केले असल्याचंही समोर आलेलं आहे.