India

फुकाची चर्चा: राष्ट्रपतींनी अनावरण केलेली प्रतिमा सुभाष बाबुंचीच!

ट्रेंडचा दावा होता की ती प्रतिमा सुभाष बाबूंची भूमिका बजावलेला बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी ह्याची होती.

Credit : राष्ट्रपती भवन

- प्रेरणा देशमुख

भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २४ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या प्रतिमेचे राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आले. राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंट वर देखील या कार्यक्रमातील फोटो पोस्ट करण्यात आले.

 

 

मात्र थोड्याच वेळात अनावरण करण्यात आलेली प्रतिमा ही सुभाषचंद्र बोस ह्यांची नाहीच!, असा दावा करणाऱ्या ट्वीट्सचा ट्रेंड सुरु झाला. त्यांचा दावा होता की ती प्रतिमा सुभाष बाबूंची भूमिका बजावलेला बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी ह्याची. प्रोसेनजीत ह्याने २०१९ साली नेताजींच्या आयुष्यावर आधारित 'गुमनामी ' ह्या चित्रपटात त्यांची भूमिका साकारली होती. 

 

 

या प्रकारानंतर ट्विटरवर राष्ट्रपतींची यथेच्छ खिल्ली उडवली गेली. खुद्द देशाच्या राष्ट्रपतींकडून असला प्रकार अपेक्षित नसल्याची टीका केली जात होती. याउपर सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या स्मरणार्थ वर्षभर चालणार्‍या कार्यक्रमातील हे प्रतिमा अनावरण म्हणजे पहिली पायरी असल्याचं राष्ट्रपती भवनाकडून आलेल्या विधानात म्हटलंय. 

काही पत्रकार व फॅक्ट चेकर्सकडून याची पडताळणी केली गेल्यावर हे लक्षात आलं की ती प्रतिमा सुभाषचंद्र बोसांच्या एका मूळ फोटोवरूनच चित्रित करण्यात आलेली असून प्रोसेनजित यांचा चेहरा हा सुभाष बोसांच्या भूमिकेतही तसा दिसतच नाही. यानंतर अनेकांकडून अशा कांड्या पिकवणाऱ्यांवर टीकेचा सूर ऐकू येत आहे.