India
नगरमध्ये २२ वर्षीय तरुणाची प्रस्थापितांवर मात
अहमदनगर जिल्ह्यातील माळी बाभुळगाव या पाथर्डी तालुक्यातील गावामध्ये एका बावीस वर्षाच्या युवकानं विद्यमान सरपंचाचा केलेला पराभव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

- चंद्रकांत बोरुडे
अहमदनगर जिल्ह्यातील माळी बाभुळगाव या पाथर्डी तालुक्यातील गावामध्ये एका बावीस वर्षाच्या युवकानं विद्यमान सरपंचाचा केलेला पराभव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदवीका नुकतीच संपवलेला एक युवक समाजसेवेच्या आवडीपायी तो रहात असलेल्या शिक्षक कॉलनी या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करतो, व तब्बल १०० मतांनी गावच्या विद्यमान सरपंचाचा पराभव करतो. आकाश वारे असं या युवकाचं नाव.
अहमदनगर जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७८८ सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदान झालं. सोमवारी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी नवख्या व तरुण उमेदवारांनी प्रस्थापित उमेदवारांना धक्का देत विजय मिळवला. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये गावातील युवकांनी एकत्र येऊन पॅनल उभे केले होते. त्याला गावकऱ्यांनी ही मतदान रुपी आशीर्वाद दिल्याचं जाणवलं. तर बहुतांश ठिकाणी तरुण उमेदवारांनी अनुभवी अशा प्रस्थापित राजकारण्यांच्या तोंडचं पाणी पळविल्याचं चित्र होतं, जिल्हाभर दिसलं.
लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या आकाशचे ज्याचे आई वडील दोघंही प्राथमिक शिक्षक. त्यामुळं घरात राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण करून टाळेबंदी मुळे गावी आलेला आकाश मित्रांच्या आग्रहाखातर निवडणुकीच्या रिंगणात उतरला. आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. याच प्रमाणे आकाशच्याही पालकांनीही प्रथमदर्शनी त्याच्या या निर्णयाला विरोध दर्शविला. पण त्याचा ठामपणा पाहून तेही नरमले. घरातून परवानगी मिळाल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज भरून, प्रभागात चुकीच्या पद्धतीने झालेली कामं, कामांच्या नावावर फक्त झालेलं राजकारण आणि निवडणुकीच्या काळात झालेलं दारूचं वाटप आणि संपत्ती दर्शन, इत्यादी मुद्द्यांना हात घालत प्रभागात प्रभावीपणे केलेला प्रचार, व प्रभागाचा विकास हा एकमेव मुद्दा प्रचाराच्या अग्रस्थानी ठेवून निवडणूक लढवल्यानं लोकांनीही त्याच्यावर विश्वास दाखवला.
"प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न आणि विद्यमान सरपंचांकडून विकास करताना होणारा दुजाभाव, यासारखे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरा गेलो, आणि प्रभागातील जनतेनंही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं आता अभियांत्रिकीची पदवी पूर्ण न करता पूर्णवेळ लोकांच्या कामांसाठी स्वतः झोकून देणार असून भविष्यात याच क्षेत्रात कारकीर्द घडवणार आहे," आकाश म्हणाला.
गावपातळीवरील राजकारण हे अतिशय क्लिष्ट व कमी मतदानामुळे अत्यंत चुरशीचं असतं. अगदी एक-दोन मतांवरून अनेक ठिकाणी निकाल फिरताना आपण पाहतो. अशा परिस्थितीत आकाश सारखा युवक १०० पेक्षा जास्त मतांनी विद्यमान सरपंचाचा पराभव करतो ही नक्कीच राजकारणातील नवबदलाची नांदी ठरते. व हा विजय आकाश सारख्या अनेक राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो. याबद्दल बोलताना आकाश म्हणतो, "आपल्यासारख्या युवकांनी राजकारणात आल्यानं राजकारणाची जी प्रतिमा मलिन झालेली आहे.ती उजळून निघण्यास फायदा होणार आहे. त्यामुळे युवकांनी निश्चितच राजकारणात यायला हवं."