Africa
ट्युनिशियन ब्लॉग लेखिकेला कुराणचा अवमान केल्याबद्दल ६ महिने तुरुंगवास
२८ वर्षीय एम्ना चारक्वी असं या लेखिकेचं नाव आहे.
ट्युनिस: उत्तर आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश असलेल्या ट्युनिशियातील एका ब्लॉग लेखिकेला, कुराण मधील आयतसारख्या रचनेतून कोरोनाव्हायरसच्या साथीसंदर्भात जनजागृती करू पाहणाऱ्या व्यंगात्मक रचना सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल ६ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २८ वर्षीय एम्ना चारक्वी असं या लेखिकेचं नाव आहे.
सोशल माध्यमांवर कोरोनाव्हायरसच्या साथीनंतर अनेक प्रकारच्या जनजागृतीसाठी निर्माण केलेल्या पोस्ट्स आणि ग्राफिक्सचा उपयोग केला गेला. मात्र ट्युनिशियातील एका महिला ब्लॉगरला अशीच एक व्यंगात्मक पद्धतीनं कोरोनाबाबत जनजागृती करू पाहणारी एक पोस्ट फक्त शेअर केल्याबद्दल अनेक धमक्या आणि सामाजिक उद्रेकासह आता ६ महिन्यांचा तुरुंगवास भोगायची वेळ आली आहे.
एम्ना चारक्वी ही स्वघोषित नास्तिक आहे. ती एका ब्लॉगच्या माध्यमातून व सोशल मीडियावरून लेखन करत असते. मे महिन्यात मात्र तिनं फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका अल्जेरियन नास्तिक व्यक्तीची पोस्ट शेअर केली. या पोस्टचं स्वरूप कुराणमधील आयतप्रमाणे होतं आणि त्या आयतचा संदेश 'आपले हात स्वच्छ धुवा, सामाजिक अंतर पाळा' यासोबतच असा होता, की 'कोरोना राजा आणि गरीब यांच्यात फरक करत नाही, त्यामुळं विज्ञानावर विश्वास ठेवा पारंपरिक समजुतींवर नाही.'
ही पोस्ट तिनं शेअर करताच तिला काही वेळातच बलात्कारापासून ते खून करण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पवित्र रमजान महिन्यात धार्मिक भावनांना धक्का देऊन कुराणचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. तिला तातडीनं अटकदेखील करण्यात आली व तिच्यावर खटला चालवण्यात आला, ज्याची सुनावणी मंगळवारी करण्यात आली.
ट्युनिसच्या कोर्टानं एम्नाला, 'धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण' केल्याचा आरोप मान्य करून ६ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे. अशात २८ वर्षीय एम्ना चिंतीत असली, तरी वरील कोर्टाकडं अपील करणार असल्याचं सांगते.
"मला ती पोस्ट अशा प्रकारे घेतली जाईल याची कल्पना नव्हती व तसा माझा हेतूच नव्हता. मला खूप भीती वाटत आहे. मला वाटलं नव्हतं त्या पोस्टसाठी मला इतक्या जीवघेण्या धमक्या देण्यात येतील. मी माझं आयुष्य भीतीमध्ये जगत आहे. मला नाही वाटत मला ट्युनिशियामध्ये काही भविष्य उरलं आहे," असं ती एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
अम्नेस्टी इंटरनॅशनल या मानव हक्क संरक्षण संस्थेनं या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवत ट्युनिशिया सरकारला हा खटला मागं घेण्याची विनंती केली आहे.
"एम्नावर होत असलेली कारवाई याचीच प्रचिती देते की ट्युनिशिया हा लोकशाही देश असला तरी इथलं प्रशासन बुरसटलेले व दमणकारी कायदे वापरून अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणत आहेत. अभियक्ती स्वातंत्र्य हे काही लोकांना 'निषेधार्ह' वाटेल अशा अभिव्यक्तीलाही लागू होतं', त्यामुळं आम्ही ट्युनिशियाच्या प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी कायद्यामध्ये सुधार करावा व एम्नावर होणारी कारवाई थांबवावी," असं अम्नेस्टीच्या उत्तर आफ्रिका संचालक आमना ग्वेलाली त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हणाल्या.