India

चळवळीतील कार्यकर्त्या शमिभा देत आहेत आर्थिक निकडीशी झुंज

एक गंभीर वैद्यकीय संकट ओढवल्यानं शमिभा पाटील यांनी समाजमाध्यमांद्वारे आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.

Credit : Graphic: Shubham Patil, Image: Wikimedia

शमिभा पाटील हे नाव राज्यातील बहुजन आणि हिजडा समाजाच्या चळवळींमध्ये एक सुशिक्षित आणि बेधडक कार्यकर्त्या म्हणून लोकप्रिय आहे. पारलिंगी किंवा हिजडा ही आयडेंटिटी त्यांनी आपल्या शिक्षण किंवा कामात कधीही अडचण म्हणून येऊ दिली नाही. त्यांनी मराठी साहित्यात पी. एच. डी. केली आहे. त्या वंचित बहुजन आघाडीच्या युवा तसंच महिला राज्य कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जेव्हा तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांचा अर्ज फेटाळला गेला तेव्हा त्यांच्या मदतीला त्या धावून गेल्या होत्या. नंतर अंजली यांनी त्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या यशातही शमिभा यांचा मोलाचा वाटा होता. पण त्यांचं कार्य हे सभा-मिटींग्स-निवडणुकींपुरता मर्यादित नाही. त्या अशा वर्गाचं, समाजाचं प्रतिनिधित्व करतात ज्याचं वर्षानुवर्षं आर्थिक आणि सामाजिक शोषण होत आलंय. त्या ज्यांच्या हितासाठी काम करतात, त्यांचंच आयुष्य त्यांच्याच जीवनशैलीत जगतात. असं असताना एक कार्यकर्ती म्हणून येणाऱ्या अडचणी मात्र दुप्पट, तिप्पट होत राहतात. अशातच एक गंभीर वैद्यकीय संकट ओढवल्यानं शमिभा पाटील यांनी समाजमाध्यमांद्वारे आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या एका अपघातानंतर पाटील यांना किंचित दुखापत झाली होती. त्यातून उद्भवलेला आजार अधूनमधून डोकं वर काढतो, ज्याकारणानं त्यांचं दैनंदिन कामकाजच थांबतं. सततची वेदना, उपचारांसाठी जाणारा वेळ यांमुळे मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. तरीही शमिभा थांबत नाहीत, त्यांनी त्यांचं कार्य सुरूच ठेवलेलं आहे. कुठल्याही डाव्या-बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यासाठी उदरनिर्वाहाची काळजी ही तशी दुय्यमच राहिलेली आहे. “कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है” असं शमिभाताई इंडी जर्नलला सांगतात. “उजव्या विचारसरणीच्या संस्था किंवा मोठ्या पक्षांकडे अर्थार्जनाची वेगवेगळी साधनं आहेत, जसं की व्यापार, कारखाने, मोठमोठ्या उघड किंवा छुप्या देणग्या वगैरे. आंबेडकरी, समाजवादी किंवा पुरोगामी चळवळ मुळातच भांडवली नसल्यानं तिच्यात संसाधनं जमा करण्याची, कार्यकर्त्यांमध्ये वितरित करण्याची कुठलीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत तळागाळातून आलेल्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना उदरनिर्वाहाची अडचण वारंवार जाणवते. माझ्याकडे स्वतःचं अर्थार्जनाचं काहीही साधन नसल्यामुळे गेल्या १०-१५ वर्षांपासून मी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून पैसे उभे करते. मित्र-मैत्रिणी, चळवळीतील ओळखीचे कार्यकर्ते जमेल तशी छोटी-मोठी मदत करतात. माझा दिवसभरातील प्रवासखर्च, जेवणाचा खर्च भागेल एवढ्याच मदतीची मला अपेक्षा असते.”

मात्र, आता उद्भवलेल्या वैद्यकीय अडचणीनं शमिभा यांना कोंडीत पकडलंय. डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचारासाठी पुढील महिन्यापासून त्यांना दर तीन महिन्यांनी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांची गरज भासणार आहे. संपूर्ण उपचारासाठी ही रक्कम जवळपास दीड लाखापर्यंत जाते. ‘मैत्री’ या सेवाभावी संस्थेच्या साहाय्यानं हा एकूण खर्च साठ हजारांपर्यंत खाली आला. आता ही रक्कम उभी करण्याचं शमिभा यांच्यासमोर आव्हान आहे. “माझा उदरनिर्वाह भिक्षुकीतून चालत नाही. चळवळीचा प्रत्यक्ष भाग नसलेले तरी माझ्या विचारांशी बांधिलकी ठेवणारे जे सर्वसामान्य, intellectually honest लोक आहेत, अशांच्या आर्थिक मदतीवर मी उभी आहे” असं त्या सांगतात. आपल्या समाजातील लोकांचा आवाज पोहोचवण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच स्वतःची शारीरिक व मानसिक सुदृढता अबाधित ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न सुरु आहे.

 

शमिभा पाटील यांना मदत करण्यासाठी तुम्ही 7021840591 या क्रमांकावर गूगल पे / फोन पे करू शकता.

(तुम्ही केलेली आर्थिक मदत ही थेट लाभार्थींना जाणार असून इंडी जर्नलला यामधून कुठल्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळणार नाही.)