Quick Reads

गोष्ट सांगणारे ताई दादा...

गावांत, आदिवासी पाड्यांवर जाऊन गोष्टीच्या माध्यमातून लहान मुलांचं भावविश्व उलगडण्याचं काम प्रतीक्षा खासनीस, कल्पेश समेळ आणि त्यांचे काही सहकारी टायनी टेल्सच्या माध्यमातून करत आहेत.

Credit : Indie Journal

सौरभ झुंजार | पुणे: गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावांत, आदिवासी पाड्यांवर जाऊन गोष्टीच्या माध्यमातून लहान मुलांचं भावविश्व उलगडण्याचं काम प्रतीक्षा खासनीस, कल्पेश समेळ आणि त्यांचे काही सहकारी टायनी टेल्स (Tiny Tales) च्या माध्यमातून करत आहेत. २०१८ साली स्थापना केलेल्या टायनी टेल्स या संस्थेचा उद्देशाच त्यांनी हा ठेवला की जी लहान मुलं नाट्यगृहात जाऊन नाटक बघू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत आपण नाटक घेऊन जायचं. त्यांच्या जागेत जाऊन, वेगवेगळ्या कथा, पुस्तकं आणि विशेषतः त्यांच्यासाठी केलेल्या सादारीकरणांतून त्यांना आपलंसं करायचं. आणि गेले तीन वर्षं त्यांचा हा प्रवास चालू आहे. नाटकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथा लहान मुलांपर्यंत पोहोचवून त्याचं भावविश्व फुलवण्याचं काम ही मंडळी करतायत.

संस्थेच्या स्थापनेबद्दल माहिती देताना प्रतीक्षा खासनीस हिनं इंडी जर्नलला सांगितलं की, “मुंबई मध्ये जाऊन काम काम करावं हा पर्याय समोर होता. पण पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात वेगळ्या प्रकारचं नाटक शिकायला मिळालं आणि एका सादरीकरणावेळी असं जाणवलं की कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये जे अंतर आहे ते काढून टाकलं तर ह्या माध्यमात एक वेगळीच ताकद आहे.  लोकांसोबत आपण जोडले जातो. आणि हा विचार डोक्यात चालू असतानाच गोष्टरंगबद्दल समजलं."

कल्पेश हा मुळचा डोंबिवलीचा आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नाटकाची आवड निर्माण झाली आणि त्याने 'ललित कला केंद्र, पुणे' येथे नाट्यशाखेत प्रवेश घेऊन पदवी संपादन केली. प्रतीक्षा हीदेखील ललित मधील पदवीधर असून ती कोल्हापूरची आहे. पदवीधर झाल्यानंतर गोष्टरंग च्या माध्यमातून फेलोशिप करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. गोष्टरंग हा क्वेस्ट या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचा अभिनव उपक्रम आहे, ज्यात नाटक या माध्यमाचा वापर वाचन-लेखनाच्या समृद्धी साठी केला जातो. प्रशिक्षित नाट्यकर्मी बालसाहित्याचे सादरीकरण करतात आणि त्या गोष्टींवर आधारित मुलांसोबत वाचन-लेखनाचे उपक्रम घेतात. नाट्य / रंगभूमी या विषयाची पदवी / पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेल्यांसाठी किंवा रंगभूमीचा अनुभव असणाऱ्यांसाठी फेलोशिप त्यांच्याकडून दिली जाते.

या फेलोशिपच्या निमित्तानं प्रतीक्षा आणि कल्पेशला लहान मुलांसोबत काम करायला मिळालं. पालघर जिल्ह्यातील सोनाळे गावातल्या आश्रमशाळेत लहान मुलांसोबत काम करायला त्यांनी सुरुवात केली. हे काम करत असताना, लहान मुलांना या गोष्टींमध्ये रमताना पाहून त्यांना असं वाटलं की हे ठराविक मुलांसाठी मर्यादित न ठेवता जेवढ्या लहानग्यांना हा अनुभव आपल्याला देता येईल तेवढा द्यायचा.  

"९ महिने लहान मुलांबरोबर काम केल्यावर हाच विचार लहान मुलांच्या अनुषंगानं चालू झाला आणि हे लक्षात आलं की त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या जगात काम करू शकणारी फार कमी माध्यमं आपल्याकडे किंवा आपल्या शिक्षणव्यवस्थेत उपलब्ध आहेत आणि नाटकाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काम करण्याच्या विचारावर आम्ही ठाम झालो,” प्रतीक्षा म्हणाली.

आणि यातूनच टायनी टेल्स या त्यांच्या संस्थेचा प्रवास सुरु झाला. संतोष गायकवाड ह्याच्याबरोबर त्यांनी कामाची सुरुवात केली. संतोष हा मुळचा बीड जिल्ह्यातल्या धोंडराई गावातला. औरंगाबाद विद्यापीठातून नाट्यशास्त्राची बी.ए. आणि एम.ए. ची पदवी त्याने घेतली आहे.

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शिलींब या गावी टायनी टेल्सचा पहिला प्रयोग त्यांनी केला. त्यानंतर या तिघांनी थोडं धाडस करून, या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळेल याचा अंदाज नसतानाही १५ जून २०१८ ला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये, तसंच गोव्यात टायनी टेल्सच्या दौऱ्याची सुरुवात करून शक्य तितक्या लहान मुलांपर्यंत पोहोचण्याचं ठरवलं. दौऱ्याची सूरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या अब्दुललाट गावातील बालोद्यान - अनाथ,वंचित व भटक्या मुलासाठींचे निवासी वसतिगृह इथल्या संस्थेच्या प्रयोगानं झाली. भाषेचं बंधन असतानाही गोव्यातील मुलांना गोष्टी सांगितल्या आणि या प्रवासात ते जवळजवळ ८,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. गोष्टींचा वार, गोष्टींची शाळा असे अनेक उपक्रम त्यांनी मधल्या काळात अनेक संस्थाच्या मदतीनं केले. गोष्टींची शाळा हा उपक्रम खास शाळांसाठी तयार करण्यात आलाय. हा उपक्रम शाळांमध्ये वर्षभर राबवला जातो. दर महिन्यातील २ दिवस शाळेत जाऊन मुलांसोबत हा उपक्रम घेतला जातो. 'नाटकाचा धडा आणि धड्यातलं नाटक' ही कार्यशाळादेखील ते खास शिक्षकांसाठी आयोजित करतात.

 

 

मुलांसोबत कशाप्रकारे काम करतो हे सांगत असताना प्रतीक्षा म्हणाली की, “तीन गटांमध्ये आम्ही मुलांसोबत काम करतो. पहिली आणि दुसरीचा एक गट ज्यांना शब्दांपेक्षा चित्रांमधून जास्त सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तिसरी आणि चौथीच्या गटामध्ये थोडा शब्दांचा वापर अधिक करतो. जिथं त्यांना प्रश्न पडायला सुरुवात झालेली असते. स्वप्नांचे अर्थ शोधायचा प्रयत्न ही मुलं करत असतात. आणि पाचवी ते सातवी या गटासोबत काम करत असताना त्या वयात त्यांच्या शरीरात, विचारात होणारे बदल आणि नव्यानं तयार होऊ लागलेली चिकित्सक वृत्ती हे मुद्दे डोळ्यासमोर ठेऊन काम करतो.”

आपल्याकडे या मुलांसाठी जे साहित्य आहे ते मुळात कमी आहे आणि जे उपलब्ध आहे ते बऱ्याचदा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. किंवा योग्य पद्धतीनं पोहोचत नाही. प्रत्येक कथेतून बोध घ्यायला लावण्यापेक्षा त्यांना काय वाटतं याबद्दल प्रयत्नशील असल्याचं प्रतीक्षानं सांगितलं.

“बोध काय मिळतोय यापेक्षा आम्ही सादरीकरणाच्या आधी आणि नंतर काही उपक्रम घेतो. त्यांना वाटलेल्या गोष्टी ते आम्हाला सांगतात, पत्रं लिहितात, चित्रातून समजलेल्या गोष्टी कागदावर रंगवण्याचा प्रयत्न करतात. सादरीकरण कसं झालं किंवा गोष्ट आवडली की नाही हे प्रत्येक वेळेला त्यांच्या डोळ्यांमधून आम्हाला समजतं. मुख्य उद्देश एवढाच आहे की मुलांनी वाचनाकडे यावं आणि विचार करायला शिकावं. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या वयाचं व्हावं लागतं.”

शहरामध्ये त्यामानानी सुविधा उपलब्ध आहेत पण अशीही गावं महाराष्ट्रात आहेत ज्या गावात साधी वीज किंवा रस्ते या सुविधाही अजून पोहोचलेल्या नाहीयेत. अशा मुलांबरोबर जास्तीत जास्त काम करण्याचा ही लोकं प्रयत्न करतात. पारावर, मैदानात, गावातल्या मंदिरात जिथे जागा मिळेल तिथे सादरीकरण करतात. बऱ्याचदा गावातील लहानग्यांबरोबर मोठी माणसंही त्यांच्या गोष्टी ऐकायला येतात. आत्ता शिकणारी पहिली किंवा दुसरी पिढी आहे अशीही गावं या प्रवासात त्यांना पाहायला मिळालीयेत. 

भाषेची बंधनं कधी आलीच तर ती कशी दूर केली जातात याबद्दल बोलताना प्रतीक्षा म्हणाली की, “शहरांतील मुलांसाठी आम्ही काम करतोच पण ज्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत त्यांच्यापर्यंत आधी ह्या पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. दुर्गम वस्त्यांवर, आदिवासी पाड्यांवर, आश्रम शाळांमध्ये जी मुलं राहतात,शिकतात त्यांच्याकडे आम्ही जातो. त्यांच्यासोबत राहतो, वेगवेगळे प्रयोग करतो. त्यांच्यापर्यंत कधीच न पोहोचलेल्या त्या गोष्टींमध्ये ही पोरं अक्षरशः हरवून जातात. आणि त्याचं समाधान आम्हालाही मिळतं. वाड्या वस्त्यांमधल्या ह्या लहानग्यांना अभ्यासक्रमात असणारी प्रमाण भाषा समजून घ्यायला अवघड जाते. त्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याची शक्यता असते. आम्ही त्यांना या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रमाण भाषा आणि त्यांची भाषा यांच्यामध्ये पूल बांधण्याचा प्रयत्न आमच्या सादरीकरणातून करतो. काही वेळेला खूप वेगळी भाषा असेल तर सादरीकरणाआधी त्यांना काही चित्रं दाखवून त्यांच्या बोलीभाषेतले शब्द त्यांच्याकडून काढून घेतो. मग त्या शब्दांचा वापर गोष्टी सादर करत असताना करतो. त्यामुळे ते अजूनच त्या गोष्टींसोबत जोडले जातात. आणि आपल्याला जो आनंद मिळतोय तो पुस्तकातल्या गोष्टीतून मिळतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा आपोआप ही मुलं पुस्तकांमध्ये रमू लागतात.”

कल्पेश आणि प्रतिक्षा यांच्याबरोबरच बाळासाहेब लिंबिकाई, महेंद्र वाळूंज, नेहा नानीवडेकर, जयदीप कोडोलीकर, सुशांत मधाळे, शुभम कुंभार, नेहा महाजन, प्रतीक्षा लाटकर, प्रदीप मोरे आणि मल्हार दंडगे हे संस्थेचं काम सध्या पाहतायत. लहान मुलांना सांभाळणं अनेक शिक्षकांच्या, पालकांच्या नाकीनऊ येतं. त्यांना काय आवडेल आणि काय नाही हे सांगणं थोडं कठीणच.

“अनेकदा तालमी करून नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करणं आणि या मुलांना नाटकामधून गोष्ट सांगणं यात खूप फरक आहे. प्रत्येक ठिकाणची मुलं, त्यांच्या आवडीनिवडी सगळंच वेगळं असतं. जे चाललंय ते आवडलं नाही तर हमखास ही मुलं बोलायला, उड्या मारायला लागतात. त्यांना सोबत घेऊन आम्हाला सादरीकरण पुढे न्यावं लागतं. काही आश्रमशाळांमधली मुलं हि महिनोंमहिने तिथेच राहत असतात. त्यांचे आईबाबा वीटभट्टी कामगार असतात किंवा कामासाठी इतर ठिकाणी असतात. त्याच खोल्यांमध्ये या मुलांचा पूर्ण दिवस जात असतो. आम्ही तिकडे जाऊन पडदे वैगेरे लावून जेव्हा हे सगळं रंगीबेरंगी करतो तेव्हा ही मुलं सगळं काही विसरून गोष्टींमध्ये हरवून जातात. गोष्टींचा विचार करतात, हसतात, रडतात, त्यांच्या भावना अशा पद्धतीनी बाहेर पडत असतानाही आम्हाला पाहायला मिळतं,” प्रतीक्षा सांगते.

ऑनलाइन पद्धतीनं कार्यशाळा घेणं हे सध्या त्यांच्यापुढील मोठं आव्हान आहे. कारण प्रत्यक्ष  सादरीकरण करून मुलांपर्यंत पोहोचणं आणि स्क्रीनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं यात फरक आहे. तरीही न थांबता काही ना काही करण्याचा प्रयत्न टायनी टेल्सच्या माध्यमातून चालू आहे. आत्ताच त्यांनी लातूरमधील ज्ञानप्रकाश शिक्षणसंस्थेमार्फत पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.

कवैय्या नावाचा एक नवीन उपक्रम राबवण्याचा विचार सध्या प्रतीक्षा आणि तिचे सहकारी करतायत. ज्यामध्ये पुस्तकांची गाडी घेऊन वेगवेगळ्या गावात जाण्याचा आणि तिथल्या मुलांसोबत राहून प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अशी एक जागा त्यांना तयार करायची आहे, जिथे लहान मुलांसाठी आणि नाटकासाठी काम करता येईल. लहान मुलं ही कलेच्या बाबतीत काही प्रमाणात दुर्लक्षित राहिली आहेत असं म्हटलं तरी चूक ठरणार नाही. परंतु या मुलांचा पुरेपूर विचार करून त्यांच्यासाठी एवढी भटकंतीकरत, त्यांच्यापर्यंत साहित्य, नाटक पोहोचावं आणि एक वेगळा दृष्टीकोन त्यांना मिळावा यासाठी टायनी टेल्सचे हे तरुण काम करत आहेत.