India
लॉकडाउनच्या पडद्यामागं बंगालच्या तेलीनीपारा मध्ये हिंदू-मुस्लिम हिंसेत उध्वस्त झाले संसार
१२ मे २०२०. भर दुपारी बारा वाजता झालेल्या या नृशंस हल्ल्याने फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला सहजगत्या मागे टाकले.
हॅना एलिस पीटर्सन आणि शेख अझीझुर रहमान
यांनी सोमवार दि. ८ जून २०२० रोजी द गार्डीयन मध्ये दिलेल्या वृत्ताचा अनुवाद.
संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करत असताना, लॉक डाऊन अर्थात संपूर्ण टाळेबंदी चालू असताना ते आले. पेट्रोल बॉम्ब, ऍसिड बॉम्ब, गॅस सिलेंडर्स, आणि अन्य स्फोटकं अशा तयारीनिशी. अंदाजे शंभरेक सशस्त्र लोक. अतिशय सावधपणे ते एका रांगेने छोट्या होड्यांमध्ये चढले, आणि कोणाच्याही नकळत गंगा नदी पार करून पलीकडच्या किनाऱ्यावर उतरले. त्यांचं बेसावध सावज तिथेच एका छोट्या गावात होतं. निर्घृण निर्ममतेने ते त्यांच्या सावजावर तुटून पडले.
१२ मे २०२० ला भर दुपारी बारा वाजता झालेली ही धार्मिक हिंसा, फेब्रुवारी महिन्यात ५० लोकांचा जीव घेणाऱ्या ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतरची सर्वात मोठी धार्मिक कलहाची घटना होती. पश्चिम बंगालमधील तेलिनीपारा (Telinipara) या छोट्याशा खेड्यातील लोकही उर्वरित भारतीयांप्रमाणेच कोरोनाला हरवण्यासाठी स्वतःच्या घरात बसले होते. त्यावेळी हिंदू गुंडांनी पूर्ण तयारीने केलेल्या या निर्घृण हल्ल्यात हे छोटं खेडं तीन दिवस जळत राहिलं. मुस्लिमांची घरं, दुकानं वेचून, निवडून जाळण्यात आली. गार्डीयनला अनेक ठिकाणांहून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मुस्लीम स्त्रीयांना अतिशय हीन, बीभत्स, माणुसकीला काळिमा फासणारी वागणूक दिली. याच्या उत्तरादाखल मग तेथील स्थानिक मुस्लीमही हिंदूंची घरे जाळण्याच्या उद्योगाला लागले. साधारण पंचावन्न घरे जळून संपूर्ण नष्ट झाली. त्यातील मुस्लिमांची घरे पंचेचाळीस होती.
२२ वर्षांची रुबिना खातून त्या दिवशी तिच्या चार वर्षे वयाच्या मुलाबरोबर तिच्या घरातच बसली होती. ती म्हणते, "आम्ही संपलो. उद्ध्वस्त झालो. त्यांनी आमच्या सगळ्या आयुष्याचीच राखरांगोळी केली. त्यांनी आमच्या घरात पेट्रोल बॉम्ब टाकले आणि घराला आग लावली. आमच्या रांगेतील मुस्लिमांच्या सर्व नऊच्या नऊ घरांवर हल्ला करण्यात आला. त्यापैकी माझ्या घरासह चार घरे पेटवण्यात आली आणि संपूर्ण नष्ट करण्यात आली."
"हल्लेखोर माझ्या घराच्या समोरच्या घराच्या छपरावर उभे राहिले आणि मी कधीच विचार किंवा उच्चार करू शकत नाही अशा घाणेरड्या, बीभत्स भाषेत मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. त्यांनी मला विचारलं, 'तू तुझ्या मुलाबरोबर संभोग करते आहेस का? तो तुला समाधान देऊ शकणार नाही. थांब जरा. मी येतो तुझ्याकडे', असं म्हणून एकाने त्याची चड्डी खाली सरकवली. मग दुसराही ओरडला, 'आम्ही सगळ्या मुस्लीम बायकांवर बलात्कार करणार आहोत'," हे सांगताना रुबिना गदगदून रडत होती.
"हिंदू लोक आमच्यावर इतक्या क्रूरपणे का हल्ला करत आहेत? आम्ही मुस्लीम आहोत म्हणजे आम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नाही का?"
भारतात सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अति-उजवा हिंदुत्ववादी भाजप सत्तेवर आला, त्याचा कार्यक्रमच भारताची धर्मनिरपेक्षता मोडीत काढून भारताला हिंदू राष्ट्र बनविणे हा होता. भारताच्या लोकसंख्येत चौदा टक्के हिस्सा असणाऱ्या मुस्लिमांना त्यानंतर वाढत्या प्रमाणात विखारी प्रचाराला बळी पडावे लागत आहे. या अपप्रचाराला सहसा शासकीय पातळीवरील पाठिंबा असतो. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले राहिलेल्या मुस्लिमांना आता भेदभाव, सामाजिक बहिष्कार आणि सामूहिक हिंसा यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच डिसेंबरमध्ये राष्ट्रीयत्व कायद्यात केलेल्या दुरुस्तीने सर्व धर्माच्या आश्रयार्थीना भारतीय राष्ट्रीयत्व देऊ केले आहे-मात्र मुस्लिम धर्मीय वगळून.
मागील वर्षीच्या मे महिन्यातील मोदींच्या प्रचंड विजयानंतर तर या हिंदू राष्ट्रवादी कार्यक्रमाने जोर पकडला आहे. आणि तो कार्यक्रम एकच. तो म्हणजे मुस्लीम विरोध. भाजपचे नेते आणि राजकीय पुढाऱ्यांकडून मुस्लिमांविरोधात भावना भडकावणारी आक्रमक भाषा वापरण्यात आली. भाजप नेत्यांच्या याच भाषेचा परिणाम म्हणूनच फेब्रुवारीत दिल्लीमध्ये धार्मिक दंगली घडल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यात वाढत होता, त्या काळात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे या विषाणूची प्रतिमा जणू जाणीवपूर्वक पसरवला गेलेला मुस्लीम विषाणू अशी करण्यात आली. निष्पाप हिंदूंना कोरोनाची लागण व्हावी यासाठी देशभरच्या मुस्लिमांनी दिलेली हाक-कोरोना जिहाद!
या अपप्रचारानंतर होता मुस्लिमांच्या व्यवसायांवरील सामूहिक बहिष्कार आणि आजारी मुस्लिमांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करून घेण्यास नकार. पण तेलिनीपारा येथे मात्र जणू मुस्लिमांना नष्ट करण्यासाठीच दंगल घडवली गेली. या आठवड्यात पोलिसांनी दोन भाजप खासदारांवर हिंसेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला या गावातील पाच मुस्लिमांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे, अशी बातमी पसरली, तेथून या सगळ्याला सुरुवात झाली. तासाभरातच गावातील हिंदुबहुल भागातील रहिवाशांनी मुस्लिमांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यांवर अडथळे उभारले.
मुस्लिमांना सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरण्यास मनाई करण्यात आली. रेशन दुकानांतून धान्य घेण्यासही बंदी घातली गेली. तेथील नगरसेवक मोहंमद हाशिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या चंदननगर या गावातही काही हिंदूंनी ध्वनिक्षेपकावरून लोकांना सांगितलं की तेलिनीपारा येथील मुस्लिमांना गावात येऊ देऊ नका. हिंदू तरुणांनी तेथील हिंदू दुकानदारांनाही, मुस्लिमांना सामान दिलं तर मारहाणीच्या धमक्या दिल्या.
मे महिन्याच्या दहा तारखेपासून परिस्थितीने हिंसक वळण घेण्यास सुरुवात केली. त्या रात्री काठ्या आणि लोखंडी कांबी घेऊन हिंदू तरुणांच्या टोळक्याने तेथील कामगार वस्तीत राहणाऱ्या मुस्लिमांवर हल्ला केला आणि त्यांना वस्ती सोडून जाण्यास फर्मावलं. प्रत्युत्तरादाखल मुस्लिमांनी तेथील हिंदूंची घरे आणि दुकाने मोडून, जाळून जमीनदोस्त करून टाकली.
अकरा मे. या दिवशी भाजपच्या पश्चिम बंगालमधील खासदार लोकेत चॅटर्जी यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला की तेलिनीपारा येथील मुस्लीम कोरोनाच्या प्रतिबंधास आक्रमकरित्या विरोध करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, मुस्लीम इतके आक्रमक झालेत की त्यांनी हिंदूंच्या घरांना आगी लावल्या आहेत. ज्यांनी हिंदूंवर हल्ला केला ते सगळे मुस्लीम कोरोनाबाधित आहेत. त्यांना विलगीकरणात राहायचं नाहीय. हे लोक हिंदू वस्त्यांमधून सर्वत्र मोकळेपणाने फिरत आहेत. सर्व हिंदूंना कोरोना व्हावा, असा त्यांचा डाव आहे. आणि पोलीस त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई करत नाहीत.
मात्र पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि स्वतः कोरोनाग्रस्त यांनी गार्डीयनला सांगितले की भाजप खासदार संपूर्णपणे खोटं बोलल्या होत्या. कोरोना अहवाल सकारात्मक येताच त्या पाचही व्यक्तींनी पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि त्यांना तेथून स्थानिक विलगीकरण केंद्रात हलवण्यात आलं होतं.
आणखी एक भाजप खासदार अर्जुन सिंग यांनी हिंदूंनी केलेल्या हल्ल्यात रक्त बंबाळ झालेल्या मुस्लीम मजुरांचा फोटो फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर टाकून या वादात उडी घेतली. त्यांनी या फोटोखाली लिहिलं-'बंगालमध्ये हिंदूंचे रक्त आणखी किती काळ वाहत राहणार आहे...जर मुस्लिम सामान्य माणसांवर हल्ले करतच राहिले, तर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आगीशी खेळत आहात. बंगाल यात जळून राख होईल.'
दुसऱ्या दिवशी, अकरा मे या दिवशी सिंग यांनी पुन्हा लिहिलं, 'जर पोलीस आणि प. बंगाल सरकार हिंदूंचे रक्षण करत नसेल तर आमच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही बाहेर पडू, आणि आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू.'
पोलीस आयुक्त हुमायून कबीर यांनी सांगितले की, पूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी सिंग यांच्यावर दोन गुन्हे आणि चॅटर्जी यांच्यावर एक गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर दंगल घडविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
मात्र भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी भाजपचा कोणत्याही प्रकारे दंगलीत हात असल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यांच्या मते, टाळेबंदी तोडून हिंदुबहुल भागात हल्ला करणाऱ्या मुस्लिमांमुळे ही दंगल घडली. पोलीस आयुक्त कबीर यांच्यावर त्यांनी आरोप केला की, कबीर यांनी पक्षपात केला. आणि हिंदूंवरील हल्ल्यास प्रोत्साहन दिले.
'आमचे खासदार तेथे हिंदूंच्या रक्षणासाठी गेले होते. त्यांनी ते सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला पण उलट त्यांच्यावरच दंगलीला जबाबदार धरून गुन्हे दाखल केले आहेत,' असं म्हणून विजयवर्गीय यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
पण दरम्यान चॅटर्जी आणि सिंग यांच्या वक्तव्याने समाजावर सर्वदूर परिणाम केला होता. आसपासच्या परिसरातील हिंदूंमध्ये उन्माद पसरायला सुरुवात झाली होती-अर्जुन सिंग, पुढे चला. तुमच्या या कार्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत - अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शंभर सशस्त्र लोक होड्यांत बसून पलीकडच्या किनाऱ्यावर गेले, आणि त्यांनी जीवघेणा हल्ला केला.
बावीस वर्षीय मोहंमद साजिद याने या लोकांना होड्यांतून उतरताना पहिले होते. सर्व हल्लेखोर बाहेरचे होते. स्थानिक कोणीच नव्हते. आणि बहुतेकांकडे बंदूक होती.
साजिदच्या सांगण्यानुसार ते शंभरेक लोक होते. चेहरा दिसू नये म्हणून त्यांनी तोंडावर गमछा गुंडाळला होता. त्यांच्यापैकी काहींकडे लोखंडी गज होते, तर कोणाकडे हातोडा. काही लोकांकडे बॉम्ब होते. ते जसे मुस्लीम वस्तीच्या जवळ पोचले, तसे त्यांनी वस्तीतील मुस्लिमांच्या घरांवर बॉम्ब फेकणं चालू केलं. मुस्लीम लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. महिला आणि मुलांसह बहुतेक सर्व मुस्लिमांनी घराचे पुढचे दार आतून लावून घेतले आणि मागच्या दारातून बाहेर निसटले.
मदतीसाठी केलेल्या विनवण्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले, असा आरोप केला जात आहे. साजिद पुढे सांगतो की, "दंगलखोरांनी ही बंद दारे त्यांच्याकडील हत्यारांचा वापर करून बळजोरीने उघडली आणि पेट्रोल भरलेले कॅन्स घेऊन घरांत शिरले. बहुसंख्य घरांतील गॅस सिलिंडर्सचा स्फोट घडवण्यात आला आणि क्षणभरात ही घरे आगीच्या ज्वाळांत लपेटली गेली."
दंगल थांबल्यानंतर, मुस्लीम आणि हिंदू, जे छोट्या झोपडीवजा घरांत राहत होते आणि जी आता नष्ट झाली आहेत, तेथे जाऊन दुःख आणि अविश्वासाने त्यांच्या उध्वस्त झालेल्या घराकडे बघत आहेत. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही समाजातील मिळून एकूण १४० लोकांना दंगलीसाठी अटक करण्यात आली आहे.
कांचन चौधरी. फोटो- शेख अझिझुर रहमान
कांचन चौधरी म्हणते, "मुस्लिमांनी सूड म्हणून माझ्या घरावर हल्ला केला. पण आमच्यावर हल्ला करण्याचं काहीच कारण नव्हतं. माझ्या कुटुंबाचा दंगलीत कोणताही सहभाग नव्हता."
४८ वर्षांची झुबेदा खातून तिच्या हातांनी तिच्या घराची राख चाचपडते आहे. तिच्या उद्ध्वस्त झालेल्या घराच्या अवशेषांमध्ये जळून काळा पडलेला एक गॅस सिलेंडर आहे, जो तिच्या घराच्या छताला भोक पाडून वरून आत टाकण्यात आला होता.
झुबेदा म्हणते, "सगळं सगळं जळून खाक झालं आहे. तिने इतकी वर्षे साठवलेल्या पैशांतून मुलीच्या लग्नासाठी नुकतेच आणलेले दागिने ती त्या राखेत शोधते आहे. दागिने खरेदी करून उरलेले पैसे तर जळून गेले. "मी संपलेय…" ती मुसमुसत पुटपुटतेय.
अनुवाद : नीतिन साळुंखे