Quick Reads

टॅरेंटिनोमय : प्रभावी लेखन, आयकॉनिक पात्रं आणि हिंसेचा उत्सव

क्वेंटीन टॅरेंटिनो लेखमालेतील दुसरा लेख

Credit : desktopbackground.org

tarantinomay

या मालिकेतला पहिला लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा. 

आपल्याकडचे काही ‘दर्दी’ प्रेक्षक आणि ‘दर्दी’ समीक्षक अनुराग कश्यपची तुलना क्वेंटिन टॅरेंटिनोशी करतात. का, तर दोघांच्याही चित्रपटात हिंसाचार, शिव्या आणि बेदरकार पात्रे असतात. अर्थात ही फक्त वरवरची आणि काहीच्या काही ढोबळ तुलना झाली. लोक दोघांचाही फिल्ममेकिंगकडे पाहायचा दृष्टिकोन कसा आहे यावर खोलात जाऊन विचार करायचे कष्ट घेत नाहीत. टॅरेंटिनोचे चित्रपट हे कश्यपसारखे सामाजिकदृष्ट्या हार्डहिटिंग नसतात. ते कश्यपसारखे रॉदेखील नसतात. त्यांना एक विशिष्ट स्टाईल आणि ग्लॅमर असतं, जे निर्माण करणं कश्यपच्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे. टॅरेंटिनोचे चित्रपट हे त्याने पाहिलेले सत्तरच्या दशकातील बी-ग्रेड चित्रपट, आणि एक्सप्लॉयटेशन फिल्म्स (बहुतेक करून ‘ग्राइंडहाऊस फिल्म्स’ ज्या डबल फीचर स्वरूपात रात्री उशिरा थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायच्या. त्याने लिहिलेल्या ‘ट्रू रोमान्स’ या चित्रपटात खास याला वाहिलेलं एक दृश्यही आहे.) यांना दिलेली मानवंदना असते. कारण ह्याच चित्रपटांनी त्याचं बालपण घडवलंय आणि त्याला फिल्ममेकिंगची प्रेरणा दिली आहे. अर्थात कश्यप आणि टॅरेंटिनो  यांचा तुलनात्मक विचार हा या लेखाचा विषय नाही. लोकांची उठसूठ दोन समानधर्मी चित्रपटकर्त्यांची तुलना करणं किती बाष्कळ वाटतं, म्हणून हे सांगितलं.

टॅरेंटिनोचे बहुतेक चित्रपट हे प्रकरणांमध्ये विभागलेले असतात. त्याने एका मुलाखतीत म्हटलंय की तो त्याच्या पटकथा आधी कादंबरी स्वरूपात लिहितो, आणि मग त्यांना पटकथेत रूपांतरित करतो. त्यामुळे त्यांना साहित्याचं स्वरूप येतं. आणि हे सारं अर्थातच पडद्यावरही उतरतं. म्हणूनच पात्रपरिचय, स्थळकाळाचे तपशील, त्या काळातील सांस्कृतिक संदर्भ हे घटक त्याच्या चित्रपटांमध्ये जिवंत स्वरूपात उभे राहतात. बरं, कधी कधी हे संदर्भही खरे नसतात. अनेकदा तर कथानकात मजा आणण्यासाठी तो ते स्वतः तयार करतो, आणि त्यांना इतक्या आत्मविश्वासाने आपल्या चित्रपटातून समोर मांडतो, की ते खरेखरे आहेत ह्यावर आपला विश्वास बसतो. उदाहरणार्थ, ‘अकुना बॉईज टेड-मेक्स फूड’, ‘जी ओ ज्यूस’, ‘रेड अॅपल’ ब्रँडच्या सिगारेट्स, ‘टेंकू’ ब्रँड बीअर, वगैरे. 

टॅरेंटिनो हा एक उत्तम क्राफ्टसमन आहे. सिनेमा या माध्यमाला तो कोळून प्यायलाय. आणि हे अर्थात त्यालाही मान्य आहे, की उत्तम स्क्रिप्टशिवाय चांगल्या सिनेमाची पायाभरणी होऊ शकत नाही. तो स्वतः म्हणतो की तो आधी एक लेखक आहे आणि मग एक चित्रपटकर्ता. दहावा आणि शेवटचा चित्रपट केल्यावर पूर्णवेळ लेखक बनायचा त्याचा मानस आहे. म्हणूनच त्याचे चित्रपट परिपूर्ण कथानकांनी भरलेले असतात. एखाद्या लेखकाने पुस्तकासाठी तयारी करून ते लिहायला घ्यावं इतकं तपशीलवार विवरण त्यामध्ये असतं. तसा तो बऱ्याचदा म्हणतो की त्याला आवडणाऱ्या चित्रपटातील प्रसंग तो आपल्या चित्रपटात जसेच्या तसे कॉपी करतो. ‘किल बिल’ चित्रपट द्वयीमधील (२००३-०४)  ब्राइड (उमा थर्मन) या पात्राचा काळ्या-पिवळ्या रंगाचा पेहराव आणि काही फायटिंग सीन्स हे ब्रूस लीच्या ‘गेम ऑफ डेथ’ (१९७२) या चित्रपटातून घेतलेत. ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’चं (१९९२) मध्यवर्ती कथानक तर ‘सिटी ऑफ फायर’ ह्या हाँगकाँगच्या चित्रपटातून जसाच्या तसा उचललाय. शिवाय, ‘किल बिल’मधील अॅनिमेटेड दृश्यं कमल हासनच्या ‘अभय’ ऊर्फ ‘आलवंदन’पासून (२००१) प्रेरित आहे. पण, आपल्या पटकथालेखनाच्या कौशल्याच्या बळावर तो या प्रसंगांचं आपल्या चित्रपटांमध्ये इतकं चांगलं उपयोजन करतो, की ते त्याचे होऊन जातात. विशिष्ट टॅरेंटिनो ब्रँडचा शिक्का त्यावर बसतो. आणि मग इतका ओळखीचा होतो, की जर टॅरेंटिनोने नाव आणि त्याचे नेहमीचे कलाकार बदलून एखाद्या वेगळ्या जान्रमध्ये चित्रपट केला तरी त्यावरील टॅरेंटिनोची छाप सहज ओळखता येईल. 

resdogs
‘रिझर्व्हॉयर डॉग्ज   Credit-Miramax Films

 

त्याच्या चित्रपटाला आयकॉनिक करणारे बरेच घटक आहेत. पण, त्याचे संवाद हे यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे सगळ्यांना सहजतेने मान्य असेल. काही लोक तक्रार करतील की टॅरेंटिनोच्या चित्रपटांमध्ये अॅक्शन कमी आणि बडबड जास्त असते. त्यातील पात्रं कुठेही (बहुतेकवेळा एखाद्या बारमध्ये) गोळा होतात आणि भरपूर वेळ बडबड करत बसतात. पण ही बडबड कुठेही बोअर होत नाही, हे त्याचं खरं यश. उदाहरणार्थ, ‘पल्प फिक्शन’मध्ये व्हिन्सेंट (जॉन ट्रॅवोल्टा) आणि ज्यूल्स (सॅम्युएल एल. जॅकसन) गाडीमधून ‘बिग कहुना’ बर्गर जॉईंटविषयी बोलतात, किंवा लिफ्टमधून जाताना वनटेक शॉटमध्ये होणारं त्यांचं संभाषण असो, किंवा ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’च्या ओपनिंगला सुरू होणारं दरोड्यातील सगळ्या सदस्यांचं डॉली शॉटमधून घडणारं संभाषण असो, सगळीकडे चित्रपटातील पात्रांनी एकत्र येऊन गप्पा मारणं हा त्याच्या चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याचा अगाथा ख्रिस्तीच्या ‘टेन लिटल इंडियन्स’च्या स्टाईलने बनवलेला ‘द हेटफुल एट’ (२०१५) तर पूर्णपणे एका मोटेलमध्ये गोळा होणाऱ्या सदस्यांमधील संभाषणावर बेतलाय. ह्या त्याच्या चित्रपटातील जागा एक सेकंदही बोअर करत नाहीत. ह्या बडबडी चतुर आणि सर्वात मुख्य म्हणजे तीव्र, तीक्ष्ण विनोदाने भरलेल्या असतात. त्यातला विक्षिप्तपणा आपल्याला कमालीचा भुरळ घालतो. ह्याच बडबडीतून तो पात्रपरिपोष करतो, चित्रपट कुठल्या दिशेने किती वेगात जाणार आहे याचे संकेत देतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो त्यातून बऱ्याचदा तणावाची निर्मिती करत घटनांचा चढता आलेख समोर मांडतो. 

याची दोन उत्तम उदाहरणं म्हणजे त्याच्या ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’मधील (२००९) दोन दृश्यं. चित्रपटाच्या सुरुवातीला कर्नल हान्स लान्डा (क्रिस्टोफ वॉल्ट्झ) एका फ्रेंच शेतकऱ्याकडे येऊन ज्यू फॅमिली, ड्रायफसविषयी काही माहिती आहे का हे विचारतो, हे पहिलं दृश्य. आणि एका अंडरग्राउंड बारमध्ये चित्रपटातील मध्यवर्ती पात्रांची एक तुकडी ‘हू अॅम आय?’ हा खेळ खेळत असतात, हे दुसरं दृश्य. आपल्याला माहित असतं की आता कुठल्याही क्षणी ह्या संभाषणांचा शेवट खुनी उद्रेकात होणार आहे. पण कधी ते माहीत नसल्याने आपल्याला समोरील दृश्यांमध्ये वाढता तणाव जाणवतो. आणि आपोआपच ‘ऑन द एज ऑफ द सीट’ची भावना मनात निर्माण होते. असे तणावपूर्ण प्रसंग रंगवण्यात टॅरेंटिनो फारच वाकबगार आहे. त्याचे चित्रपट प्रभावी बनवण्यात, त्याच्या पात्रांना आयकॉनिक बनवण्यात या संवादांचा मोलाचा वाटा आहे. 

मध्यंतरी एक अशी बातमी ऐकण्यात आली होती की अमेरिकेत एका रेस्टॉरंटमध्ये घडत असलेला एक दरोडा एका माणसाने ‘पल्प फिक्शन’मधले डायलॉग बोलून थांबवला होता. ही बातमी खरी असो अथवा खोटी पण टॅरेंटिनो च्या जादुई संवादांचं सार्वकालिकत्व त्यातून दिसून येतं. ते कधीही कुठेही उद्धृत केले जाऊ शकतात. “English, Motherfucker, do you speak it?” सारखे संवाद तर आद्य म्हणींसारखे वापरले जाऊ शकतात. 

ingbast
‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’   Credit : A Band Apart

त्याच्या पात्रांचा विषयच निघाला आहे तर सांगू इच्छितो की ती त्याच्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे बेदरकार आणि हिंसक वगैरे असतात. पण तो ज्यापद्धतीने स्त्रीपात्रांना उभं करतो ते मला विशेष वाटतं. माझं वैयक्तिक मत असं की स्त्रियांना इतक्या बेदरकार वृत्तीने सादर करणारा तो एकमेव दिग्दर्शक आहे. ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’ हा त्याचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला चित्रपट वगळता त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये स्त्री पात्रांचा भरणा, आणि कथानकाला पुढे नेणारं शक्तिकेंद्र बनण्यातला त्यांचा वाटा लक्षणीय आहे. पैकी ‘जॅकी ब्राऊन’ (१९९६), ‘किल बिल’ आणि ‘डेथ प्रूफ’ (२००७) हे तर स्त्रीवाद आणि स्त्री पात्रांचे सोहळे आहेत. पण टॅरेंटिनोचा स्त्रीवाद हा इतरांसारखा विखारी आणि अतिरेकी नाही. तो स्त्रियांना खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने वागवतो. पुरुष करू शकतात त्या सगळ्या गोष्टी स्त्रियाही करू शकतात यावर त्याचा ठाम विश्वास आहे. तो त्यांना नागिण बनवतो, पण अवेळी फुत्कारणारी नव्हे, तर आपली ऊर्जा राखून योग्यवेळी दबा धरून हल्ला करण्यासाठी. तो ‘किल बिल’मध्ये ब्राइडचा बदला घेण्याचा हक्क मान्य करतो; तो ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’मध्ये शोशानाला (मेलनी लॉरेन्ट) भर थिएटरमध्ये नाझींचा संहार करण्याची प्रेरणा देतो; ‘डेथ प्रूफ’मधल्या मुलींना (यातली एक, झोई बेल, खऱ्याखुऱ्या आयुष्यातील स्टंटवुमन आणि टॅरेंटिनोची फ्रिक्वेंट कोलॅबरेटर आहे.) आपल्याला त्रास देणाऱ्या सायको किलरचा शेवटपर्यंत पाठलाग करून धडा शिकवण्याची हिंमत देतो. ‘द हेटफुल एट’मध्ये डेझी डॉमर्ग्यूला (जेनिफर जेसन ली) इतर सात पुरुष हरामखोरांसमोर उभं करतो, नि ती त्यांना पुरून उरेल इतपत हिंसक आणि दुष्ट दाखवतो. पुरुषप्रधान हॉलिवुडमध्ये ‘किल बिल’द्वारे स्त्रीपात्राला ‘अॅक्शन फिगर’ दाखवून तो तसं करणाऱ्या बोटांवर मोजता येईल इतक्या दिग्दर्शकांमध्ये सामील होतो. ‘जॅकी ब्राऊन’च्या माध्यमातून ६०-७० च्या दशकात बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या, आणि नंतर विस्मरणात गेलेल्या पाम ग्रियर या अभिनेत्रीच्या करीयरला तो पुन्हा उभारी देतो. आणि तो हे सगळं जाणूनबुजून करत नाही. याचं मूळ त्याच्या प्रेरणांमध्ये आहे. त्याला अॅडल्ट फिल्म्स आणि लिटरेचर मुक्तपणे पाहू/वाचू देणाऱ्या त्याच्या आईमध्ये आहे. 

tarwomen
टॅरेंटिनोच्या चित्रपटांतील स्त्री-जॅकी,द ब्राइड,शोशाना,डेझी

बाकी त्याच्या पात्रांचं एक वैशिष्ट्य पाहिलं पाहिजे की ते अनपेक्षित गोष्टी अनपेक्षित वेळी करतात आणि आपल्याला वेळोवेळी चकित होण्याची संधी मिळते. मघाशी सांगितलेलं ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’मधील बार सीन हे त्याचंच उत्तम उदाहरण. त्याची पात्रं ही इतर फिल्म न्वार चित्रपटांहून जरा जास्तच दोषपूर्ण (लिखाणाच्या पातळीवर नव्हे, तर एक माणूस म्हणून) आणि दुर्गुणी असतात. पण म्हणून ते काय आपलं सभ्य असणं सोडत नाहीत. ते एखाद्या सायकोसारखे प्रेमाने आणि आदरभावानेही वागतात (आणि हे दर्शवण्यासाठी शिव्यांहून दुसरी आणखी कुठली चांगली पद्धत असेल ?), आणि मन भरल्यावर ज्यांच्याशी तसं वागलेत त्यांना ठोकायलाही कमी नाही करत. अर्थात टॅरेंटिनोची पात्रं आयकॉनिक वाटतात, कारण ती टोकाची स्टायलाइज्ड असतात. आणि कितीही नकारात्मक असली, तरी ती आपला अंतःस्थ विनोदी स्वभाव राखून असतात. ज्यामुळे ती चित्रपट संपल्यावरही आपल्या मनात घर करून राहतात. आजही चित्रपटांमधील आयकॉनिक दृश्यचौकटींचा विषय निघाला की आपल्या डोळ्यांसमोर समोर बंदूक रोखून उभे असलेले व्हिन्सेंट आणि ज्यूल्स आठवतात यातच सर्वकाही आलं.

टॅरेंटिनोवर सर्वात जास्त टीका त्याच्या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या हिंसाचारावरून होते. ती तशी आपल्या चित्रपटांमध्ये दाखवणाऱ्या कुठल्या दिग्दर्शकांवर होत नाही म्हणा. ताकाशी मिके, एलाय रॉथ, अनुराग कश्यप, वगैरे बऱ्याच दिग्दर्शकांना या टीकेला कमी अधिक प्रमाणात सामोरं जावं लागलंय. पण टॅरेंटिनोने कधीच या टीकेला भीक घातली नाही. हिंसेला जीवनाचा अविभाज्य भाग मानणारा टॅरेंटिनो तिचं समर्थन करत नसला, तरी ती चित्रपटांमधून कमी केली जावी किंवा चित्रपटातील कथानकात समाविष्ट असली तरी प्रत्यक्ष दृश्यचौकटींमध्ये, दृश्यांमध्ये घडताना दाखवू नये (ऑफ-स्क्रीन) अशा मतांवर आक्षेप घेतो. त्याच्या मते, हिंसा करणे आणि हिंसा पाहणे याचं मानवी मनाला प्रचंड आकर्षण असतं, फक्त या आकर्षणाच्या परिमाणात फरक असतो. हिंसेसंबंधित गोष्ट माणसाला पटकन लक्षात राहते. आता हेच बघा. व्हॉट्सअॅपवर फिरणारे ९० टक्के व्हिडीओ हे हिंसेने बरबटलेले असतात. ते चवीने पाहिले जातात आणि वेगाने पसरवलेही जातात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता ज्यात फ्लायओव्हरखाली सिग्नलपाशी एका कारमध्ये हेल्मेट घातलेले काही तरुण कुणावरतरी गोळ्या झाडत असतात. काम झाल्यावर ते आजूबाजूच्या लोकांना धमकावत पळ काढतात. इतका वेळ तो प्रसंग पाहणारे आणि तो व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता जवळपास देहभान हरपल्यासारखी हिंसेचा हा आविष्कार पाहत असतात. टॅरेंटिनोचं हेच म्हणणं आहे की समाजात सार्वत्रिक बोकाळलेली हिंसाच तो आपल्या चित्रपटातून दाखवत असल्याने तो लोकांना हिंसा करायला प्रेरणा देतो यावर तोंड वाजवण्यात काही अर्थ नाही. स्वतः तो त्याच्या चित्रपटातील हिंसा कधीच सिरीयसली घेत नाही. तो इतक्या टोकाची हिंसा दाखवतो की ती एका क्षणी गंभीरतेची सीमा ओलांडते आणि हास्यास्पद वाटू लागते. कार्टूनिश होऊन जाते. ‘टॉम अँड जेरी’, ‘ऑगी अँड द कॉक्रचेस’ पाहणाऱ्या जनतेला मी काय म्हणतोय ते बरोबर कळेल. 

kilbil
‘किल बिल’च्या सेटवर  Credit : A Band Apart

‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’मध्ये वेअरहाऊसमधल्या एका प्रसंगात एका सदस्याला गोळी लागते, आणि लगेच त्यावर उपचार करण्याची काही सोय नसते. आधी त्याला त्या रक्तातळलेल्या अवस्थेत पाहवलं जात नाही. पण मग नंतर जेव्हा तो लिटरली रक्ताच्या थारोळ्यात झोपतो तेव्हा ते फारच कृत्रिम नि अतिरेकी वाटतं. परिणामी विनोदी वाटतं. कमालीच्या गांभीर्यातून (किंवा कमालीच्या हिंसेतून) कमालीचा विनोद करणं टॅरेंटिनोला फारच चांगलं जमतं. तसंच ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’मधील ऑफ-स्क्रीन घडणारा हान्स लान्डाच्या कपाळावर चाकूने स्वस्तिक कोरण्याचा प्रसंग. लान्डाची वाट लागलेली पाहताना आपल्याला आसुरी आनंद होतो, पण जेव्हा आल्डो रेन (ब्रॅड पिट) म्हणतो की ‘धिस इज जस्ट माय मास्टरपीस’, तेव्हा मात्र गालातल्या गालात हसू आल्याशिवाय राहत नाही. 

टॅरेंटिनोच्या चित्रपटातले हिंसेचे प्रसंग हे ऍक्शन सीन्सइतकेच काळजीपूर्वक कोरियोग्राफ केलेले असतात, पण काही सीन इतके सहज आणि अनपेक्षित असतात की ते आपले अत्यंत आवडते बनून जातात. असा माझा सर्वांत आवडतं दृश्य म्हणजे ‘जॅकी ब्राऊन’मध्ये सुपरस्टोअरच्या पार्किंग लॉटमध्ये लुईस (रॉबर्ट डि’निरो) त्याला वैताग आणणाऱ्या मेलनीला (ब्रिजेट फोन्डा) अचानक गोळी घालून ठार करतो तो प्रसंग. असल्या धक्कादायक प्रसंगांची टॅरेंटिनोच्या चित्रपटांमध्ये रेलचेल असते. तो म्हणतो की हिंसेच्या अंतर्भावामुळे कलाकृतीचा प्रभाव आणि तिची सार्वत्रिकता वाढवण्यात मदत होते. टीका करत असले तरी प्रेक्षक हिंसापूर्ण प्रसंगाशी सहज रिलेट होतात. कारण थोड्याफार फरकाने आपण सगळ्यांनीच हिंसा केलेली असते किंवा ते हिंसेचे शिकार झालेले असतात. तो हे ओळखतो आणि जाहीररित्या कुणाची पर्वा न करता बोलून दाखवतो यातच त्याच्या चतुराईची, महानतेची आणि मास्टर फिल्ममेकर असण्याची लक्षणे दडलेली आहेत.