India
दीर्घकालीन आजाराने ग्रस्त रुग्णांचा उपचारासाठीचा न संपणारा प्रवास
दीर्घकालीन आजारावरील उपचाराकडे केवळ एका व्यक्तीचा वैयक्तिक प्रवास आणि वैद्यकीय क्षेत्रातील बाब म्हणून पाहणे चुकीचे ठरेल.
मधुरा जोशी, सुमित काणे । चिकित्सक सामाजिक शास्त्रे असे प्रतिपादन करतात की, उपचार घेणे ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. आजाराचे समाजशास्त्र असे सांगते की कोणता आजार उपचार घेण्याला पात्र आहे, कोणता आजार दुर्लक्षित केला जाऊ शकतो हे अनेक आर्थिक, सामाजिक घटकांवर अवलंबून असते. म्हणजेच घरातील कर्त्या पुरुषाला श्वसनाचा त्रास झाला किंवा लहान मुलाला झाला तर अनेकदा खाजगी रुग्णालयात त्वरित उपचार केले जातात. परंतु, म्हाताऱ्या व्यक्तीला, स्त्रीला त्रास झाला तर अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणजेच उपचार घेणे ह्यामध्ये कुटुंबाची आर्थिक स्थिती, आजारी व्यक्तीचे वय, लिंग आणि इतर सामाजिक घटक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून दीर्घकालीन आजारावरील उपचाराकडे केवळ एका व्यक्तीचा वैयक्तिक प्रवास आणि वैद्यकीय क्षेत्रातील बाब म्हणून पाहणे चुकीचे ठरेल.
ग्रामीण भारतातील दमा, धाप लागणे इत्यादी दीर्घकालीन श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या प्रौढ लोकांवर २०१९ ते २०२१ ह्या दरम्यान संशोधन करण्यात आले. हे संशोधन गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स अँड इकॉनॉमिक्स, नोझल इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ, मेलबर्न विद्यापीठ, पॉप्युलेशन कौन्सिल इंडिया आणि नॅशनल कौन्सिल फॉर एप्लाइड इकोनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) यांच्याद्वारे केले गेले. खोकला, धाप लागणे, श्वास अडकणे, दम्याचा झटका येणे ह्यापैकी कोणतीही लक्षणे सहा महिन्यांपेक्षा जास्ती काळ असणाऱ्या रुग्णांचा ह्या संधोधनात समावेश करण्यात आला. ह्या संशोधनातील गुणात्मक अभ्यासाचा भाग म्हणून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यातील २० खेड्यांमधील दीर्घकालीन श्वसनाच्या आजाराने ग्रस्त लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
भारतातील एकूण आरोग्यसेवेचा विचार केला तर असे लक्षात येते की जवळ जवळ ७५ टक्के आरोग्य सेवा ही खाजगी आरोग्य सेवा या श्रेणीत मोडते. एवढेच नाही तर या खाजगी आरोग्य सेवा देणाऱ्यांमध्ये केवळ वैद्यकीय डॉक्टरांचा समावेश होत नाही तर अनौपचारिक पद्धतीने उपचारकरणाऱ्या तसेच अपात्र अशा प्रदात्यांचादेखील (health service providers) समावेश होतो. उदाहरणार्थ वैदू, बाबा, बुवा इत्यादी. पात्र वैद्यकीय डॉक्टरांकडून मिळणाऱ्या आरोग्य सेवा या प्रामुख्याने शहरी भागात केंद्रित आहेत.
आरोग्यव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला असता, भारतातील आरोग्यव्यवस्था नियमन आणि गुणवत्ता ह्याबाबत जगातील एक अत्यंत सुमार आरोग्यव्यवस्था आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे - अपात्र प्रदात्यांद्वारे आधुनिक औषधांचे सर्रासहोणारे वितरण होय. औषधांच्या दुकानातील फार्मासिस्ट कडून डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय परस्पर औषधे घेण्याचे प्रकार आपल्याकडे सर्रास होताना दिसतात. ह्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन श्वसनाच्या आजाराने ग्रस्त लोकांच्या उपचारासाठीच्या शोधावरील संशोधनातून काही निष्कर्ष समोर आले आहेत.
Photo: IndiaSpend/Swagata Yadavar
दीर्घकालीन आजारावर उपचार घेताना सुरुवातीच्या काळात लोक अत्यंत अगतिक होऊन शक्य त्या सर्व प्रदात्यांकडे जातात. आमच्या अभ्यासातील बहुसंख्य सहभागी दम्याचा त्रास सुरु झाल्यावर डॉक्टरकडे गेले असल्याचे आढळून आले. मात्र, कोणत्याही ठोस निदानाअभावी ते एका डॉक्टरकडून दुसऱ्याकडे असे भटकत असल्याचे निदर्शनास आले. ह्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण पातळीवर अतिशय ढिसाळ आरोग्ययंत्रणा, किमान विश्वासार्ह आणि चांगल्या दर्जाच्या प्राथमिक सेवांचा अभाव, आरोग्यविमा सारख्या सामाजिक संरक्षण योजनांचा अभाव ह्यामुळे उपचार घेण्याची प्रक्रियाही वैयक्तिक बाब नसून कौटुंबिक बाब बनते. आणि आपल्या प्रियजनांसाठी आपण कोणतीही कसर सोडली नाही हे ‘दाखवणे’ ही एकप्रकारे कुटुंबाची नैतिक सामाजिक जबाबदारी बनते. परंतु, आम्ही आमच्या घरच्यांसाठी काहीही करू शकतो ह्यामध्ये एक भाग समाजाला दाखवून, देण्याचा आणि समाजातील आपली पत राखण्याचा असला तरी अनेक लोकांच्या बाबतीत ती निव्वळ अपरिहार्यता असते असे दिसून आले.
सक्षम, सर्वांना परवडेल अश्या आरोग्यसेवेअभावी अनेक कुटुंबाना उपचाराची आर्थिक जबाबदारी घेण्यावाचून काही पर्याय उरत नाही. ह्याचा परिणाम म्हणजे अनेक कुटुंबे खूप मोठ्या आर्थिक संकटात अडकतात. आरोग्यासेवांसाठी खिशाला परवडेल त्यापेक्षा अधिक खर्च करणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप जास्ती आहे. आमच्या सहभागीपैकी अनेकांना मालमत्ता विकून, जनावरे विकून उपचार घ्यावे लागले आहेत.
दीर्घकालीन श्वसनाच्या आजारावर उपाय शोधताना आमच्या अभ्यासातील एका ५० वर्षाच्या बाईने १५ हून अधिक डॉक्टर केले आहेत. ह्या उपचाराच्या प्रवासात लोक पात्र, अपात्र डॉक्टर इतर आयुर्वेदिक, होमेओपथी असे उपचार समांतरपणे घेत असल्याचेही आढळून आले. लोकांच्या ह्या अनेक प्रकारच्या उपचार घेण्यामागे आजाराला मुळापासून नष्ट करायचे हे एक महत्वाचे कारण होते. आजार मुळापासून गेला पाहिजे ह्यावर विशेष भर असल्याचे लक्षात आले. आजाराविषयीच्या विश्वासार्ह माहितीचा अभाव, आजाराच्या स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि वेळेवर योग्य वैद्यकीय सल्ला न मिळणे ह्यामुळे रुग्ण उपचारासाठी भटकत राहतात आणि अनेकदा फसवले जातात.
उत्तरांच्या शोधात आणि वैयक्तिक, सामाजिक आणि नैतिक दबावाखाली उपचारात कोणतीही कसर सोडली नाही हे दाखवण्याच्या प्रयत्नात रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय अनेक चुकीच्या आरोग्यासेवांना भुलतात आणि बळी पडतात, असे आमच्या संशोधनातून समोर आले आहे. आमच्या अभ्यासातील अनेक सहभागी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी योग्य उपचारांबद्दल विश्वसनीय माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव, ह्यामुळे त्यांच्या उपचार मिळवण्याच्या प्रवासात अनेक चुकीची वळणे घेतलेली दिसून आले. लोकांच्या चुकलेल्या मार्गांचे स्वरूप आणि परिणाम भिन्न असले तरी विश्वसनीय माहितीची कमतरता आणि ढिसाळ आरोग्यव्यवस्था ह्याला कारणीभूत आहेत असाच निकष यातून निघतो. अनेकदा रुग्णांना ह्या चुकीच्या उपचाराची आर्थिक तसेच शारीरिक किंमत चुकवावी लागली आहे. अपात्र औषधांचे परिणाम म्हणून अंगावर अलर्जी येणे इत्यादी.
TW : India is home to 38 million asthma patients, only 10% of patients receive inhalers: ...second leading cause of death and disability in India. Out of the chronic respiratory disease burden in India, COPD accounts for over 50 per cent of the disease… https://t.co/wr1CJqe67G pic.twitter.com/43zkMpC0nG
— Stigmabase | UNITWO (@StigmabaseU) September 28, 2022
ह्या उपचारासाठीच्या प्रवासात आपल्या आजाराला 'मुळापासून' बरे करण्यासाठीच्या उपचारांचा शोध, उपचारात कोणतीही कसर न सोडण्याची सामाजिक अनिवार्यता आणि या चुकीच्या उपचारांना बळी पडणे, हा बहुसंख्य लोकांसाठी निराशाजनक आणि हताश करणारा अनुभव ठरतो. विशेषतः जर रुग्ण कुटुंबातील मुख्य कमावणारी व्यक्ती असेल तर ह्या उपचार घेण्याच्या प्रवासात संपूर्ण कुटुंब दारिद्र्यात ढकलले जाते. ‘या आजाराने मला सर्व प्रकारे संपवले आहे’, 'मी या आजाराला बळी पडलो आहे‘, ‘ह्या आजाराने माझ्यावर विजय मिळवला आहे...', 'या आजाराने मला पुरते संपवले आहे’, अशाप्रकारचे सहभागींचे उदगार आर्थिक आणि सामाजिक संरक्षणाअभावी आरोग्यव्यवस्थेत सामान्य लोकांच्या होणाऱ्या परिस्थितीवरील आणि दुबळ्या आरोग्यव्यवस्थेवरील परखड भाष्य आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
लोकांचा दीर्घकालीन आजाराच्या आरोग्यप्राप्तीचा प्रवास शेवटी आर्थिक संकटे, निराशा, विफलता आणि आजाराचा स्वीकार इथे येऊन थांबतो. शेवटी कोणत्याही ठोस निदान आणि उपचाराशिवाय आपापल्या विशिष्ट पद्धतीने,आपल्या आजाराचे स्वरूप समजून घेऊन रुग्णांनी परिस्थितीशी जुळवून घेतलेले आहे आणि काही तात्पुरते लागू पडलेले उपचार चालू ठेवले आहेत, असे दिसून येते. आजाराचा स्वीकार करण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय ह्या आरोग्यव्यवस्थेत रुग्णांसमोर राहत नाही.
आजार मुळापासून बरा होणार नाही "ये दम तो दम के साथ जायेगा" हे रुग्णांना शेवटी कळून चुकते. आमचे निष्कर्ष असे सांगतात की लोकांचा हा आरोग्यप्राप्तीचा न संपणारा प्रवास हा आरोग्यव्यवस्थेच्या करूण अयशस्वी होण्याची करूण कहाणीआहे. गरजेच्या वेळी विश्वासार्ह, सर्वाना परवडणाऱ्या प्राथमिक सेवांच्या अभावामुळे उपचाराशी संबंधित निर्णय घेण्याची सामाजिक, नैतिक आणि आर्थिक संपूर्ण जबाबदारी रुग्णाच्या कुटुंबाला घ्यावी लागणे हा आमच्या संशोधनातील एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे.
ग्रामीण भारतातील आजारांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर चांगल्या दर्जाच्या, विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवांची दीर्घकाळापासूनची गरज ह्या संशोधनातून अधिक ठळकपणे समोर येते. आरोग्यप्राप्तीच्या प्रवासात रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबाला कसे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते हे दाखवून हे संशोधन त्यांचेआर्थिक संकटापासून संरक्षण करण्यासाठीच्या सार्वजनिक पातळीवरील यंत्रणांचे महत्व अधोरेखित करते.
आरोग्यविषयक धोरणांच्या बाबतीत ह्या संशोधनातून समोर आलेल्या काही बाबी म्हणजे ग्रामीण पातळीवर चुकीच्या, फसव्या आरोग्यसेवांपासून अनेक लोकांची दिशाभूल होत आहे. ती रोखण्यासाठी आणि आजाराच्या भयंकर परिणामांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी आजारपणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आरोग्यप्राप्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सार्वजनिक सेवांमध्ये सहज उपलब्ध, योग्य, विश्वसार्ह सल्ला आणि उपचार मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम असतील तर लोक त्यांचा वापर नक्कीच करतील असा विश्वास ह्या संशोधनातील सहभागींनी नोंदवला आहे.
शेवटी भारतातील खाजगी आरोग्य क्षेत्राचे थेट, सक्षम नियमन करणे आवश्यक आहे. भारतातील ग्रामीण भागात प्राथमिक काळजी घेण्यासाठी, सार्वजनिक सेवा मजबूत करणे आणि सुधारणे हा अपात्र आरोग्यदात्यांना बाहेर काढण्यासाठीचा एक व्यवहार्य मार्ग अवलंबला गेला पाहिजे. अन्यथा आरोग्यासारख्या मुलभूत सुविधेपासून बहुसंख्य लोक उपेक्षित राहतील आणि दारिद्र्यात ढकलेले जातील.
हे संशोधन ‘सोशल सायन्स आणि मेडिसीन’ ह्या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याविषयी अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.