Quick Reads

घटनाक्रम आत्तापर्यंत: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांची जातीय छळातून आत्महत्या

दर्शननं आत्महत्या त्याच्याबरोबर जातीय भेदभाव झाल्यामुळं केल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केला आहे.

Credit : इंडी जर्नल

राकेश नेवसेइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमधील जातीयवादी भेदभावाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. दर्शननं आत्महत्या त्याच्याबरोबर जातीय भेदभाव झाल्यामुळं केल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केला आहे. मात्र दर्शनच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी आयआयटीनं सोमवारी एका संस्थार्गत समितीची स्थापना केली असून, दर्शनच्या आत्महत्येचं कारण जातीयभेदभाव असण्याशी शक्यता संस्थेनं नाकारली आहे. "माझ्या भावानं आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला आहे," असा आरोप दर्शन सोलंकीची बहिण जान्हवी सोलंकी यांनी केला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज आयआयटी मुंबईला भेट  देऊन, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच पुन्हा विद्यार्थ्यांची आत्महत्या होऊ नये याची खबरदारी आयआयटी प्रशासनानं घ्यावी, असा निर्देशही त्यांनी दिला आहे.

रविवार, १२ फेब्रुवारी रोजी आयआयटी मुंबईतील दर्शन सोलंकी या केमिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं त्याच्या हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मूळचा अहमदाबादचा दर्शन बीटेकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्यानं तीन महिन्यांपूर्वीच संस्थेत प्रवेश घेतला होता.

पवई पोलीसांनी या घटनेसंदर्भात तक्रार नोंदवली असून घटनेची चौकशी सुरु केली आहे. दर्शननं आत्महत्येपूर्वी कोणतीही चिट्ठी लिहिली नसल्यानं त्यांनी अपघाती मृत्यूची तक्रार नोंदवली आहे.

या घटनेनंतर सोमवारी आयआयटी मुंबईतील 'आंबेडकर, पेरियार, फुले स्टडी सर्कल' (एपीपीएससी) नावाच्या विद्यार्थी समुहानं आयआयटीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केला आहेत. ही घटना म्हणजे, संस्थेच्या परिसरात सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यात आलेलं व्यवस्थापनात्मक अपयश आहे, असा त्यांनी आरोप केला आहे. या विद्यार्थ्यांनी सोलंकी याच्या मृत्यूला संस्थात्मक हत्या म्हणून संबोधलं आहे आणि या घटनेकडे अपवादात्मक म्हणून पाहिलं जाऊ नये, अशी मागणीदेखील केली आहे. तसंच एपीपीएससीनं आयआयटीचे संचालक सुभाषिस चौधरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

 

संस्थेत अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी जातीयवादाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आहे. "बऱ्याच वेळा बाकीच्या विद्यार्थ्यांकडून अनुसूचित जाती/जमातींतील विद्यार्थ्याला त्याची ओळख विचारण्यापूर्वी किंवा मित्र बनवण्याआधीच त्याचा जेईईचा स्कोअर विचारला जातो. यातून विद्यार्थ्याची सर्व माहिती मिळते, जसं की विद्यार्थ्याचं शिक्षण, जात, त्यांची सामाजिक परिस्थिती वगैरे. पुढं त्या विद्यार्थ्याला 'कोटा विद्यार्थी' म्हणून नाकारलं जात," एका विद्यार्थ्यांनं एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

आयआयटी मुंबईची आधीपासूनच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाद्वारे अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांच्या कमतरतेसंदर्भात चौकशी केली जात आहे. एपीपीएससीकडून याबद्दल तक्रार करण्यात आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. संस्था तिच्या परिसरात विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी विद्यार्थी कल्याण केंद्र चालवते. मात्र हे केंद्र उघडपणे आरक्षण विरोधी असलेल्या व्यक्तीद्वारे चालवलं जातंय, असा या  एपीपीएससीचा आरोप आहे.

दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं याबद्दल दिलेल्या माहितीनुसार, "सर्वच आयआयटीमध्ये जात, वर्ग, भाषा किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार गट तयार होतात. उच्चभ्रू, उच्च जातीच्या, शहरी आणि इंग्रजी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे गट असतात. या गटातून ग्रामीण, गरीब, इंग्रजी भाषा न बोलणारे किंवा मागास जातीचे विद्यार्थी वगळले जातात. शिवाय आयआयटीमध्ये रॅंक ही संकल्पना खूप प्रबळ आहे. इथे जेईईचा स्कोअर किंवा रॅंक विचारणं हासुद्धा जातीयवादाचाच प्रकार आहे. जर तुम्हाला काही समजलं नाही, तरी तुम्हाला तुमचा रँक विचारला जातो. नंतर तुमची खिल्ली उडवली जाते. तुम्ही आरक्षणातूनइथं आला आहात, तुम्ही इथं येण्याच्या लायकीचे नाहीत, असं दर्शवलं जात. आयआयटीमध्ये आरक्षणविरोधी मतप्रवाह खूप मजबूत आहे, ही आत्महत्या त्याचाच परिणाम आहे," ते पुढं म्हणाले.

'द हिंदू'नं केलेल्या बातमीनुसार आयआयटी मुंबईच्या एससी/एसटी सेलतर्फे काही महिन्यांपूर्वीच संस्थेत दोन सर्वेक्षणं घेण्यात आली होती, ज्यामध्ये संस्थेतील जातीयवादी भेदभाव आणि अनुसूचित जाती/जमातींतील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा आढावा घेण्यात आला होता. या सर्वेक्षणांमधून दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव मांडले असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

 

 

आत्तापर्यंत उपलब्ध माहितीनुसार दर्शननं रविवारी त्याच्या घरी फोन केला होता. फोनवर बोलताना त्यांनं त्याच्या दिवसभराच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. मात्र फोन ठेवल्याच्या एका तासाच्या आत त्यानं आत्महत्या केली. त्याची बहीण जान्हवी सोलंकीनं एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, मागच्या महिन्यात दर्शन घरी आला होता तेव्हा संस्थेत त्याच्याबरोबर होणाऱ्या जातीभेदाबद्दल सांगितलं होतं. जान्हवी सांगतात, "जेव्हापासून त्याच्या मित्रांना तो अनुसूचित जातीचा आहे, हे कळलं तेव्हापासून त्यांचं वागणं बदललं, त्याच्या मित्रांनी त्याच्याशी बोलणे, सोबत फिरणं बंद केलं."

मात्र आयआयटी मुंबईनं या प्रकरणाची चौकशी पोलिस करत असताना जातीय भेदभावाचा आरोप करणं चुकीचं  असल्याचं म्हटलं आहे. "वैभवच्या मित्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याला अशा कोणत्याही भेदभावाचा सामना करावा लागला असं वाटत नाही,"  असंही आयआयटी मुंबईचे अधिकारी म्हणाले.

आयआयटीसारख्या मोठ्या संस्थांमध्ये अशाप्रकारचा भेदभाव सातत्यानं दिसून आला आहे. त्यामुळं याआधीही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. २०१६ मध्ये रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. 'आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन' (एएसए) या विद्यार्थी संघटनेच्या नावाखाली विद्यापिठातील समस्या मांडल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. तत्पूर्वी जुलै २०१५ मध्ये त्याची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली होती. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं, निलंबन झाल्यानंतर त्यानं आत्महत्या केली.

त्यांनतर महाराष्ट्रात पायल तडवी या निवासी डॉक्टरनं तिच्या तीन सिनियर्सकडून होणाऱ्या छळाला कंटाळून २२ मे २०१९ रोजी आत्महत्या केली. पायल टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीव्हायएल नायर हॉस्पिटलमध्ये शिकत होती. पायलच्या तीन माजी सहकारी तिच्या जातीचा आधार घेऊन तिचा छळ करत होत्या.

त्याशिवाय, आयआयटी मद्रासमध्ये सोमवारी एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या विद्यार्थ्यानं गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. २७ वर्षीय स्टीफन सनी मूळचा महाराष्ट्र होता, आणि त्यानं काही वैयक्तिक कारणामुळं आत्महत्या केली, तर बी विवेश नावाच्या २२ वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.