Quick Reads

प्रवास 'निर्माण'चा: शोध अर्थपूर्णतेचा

२००६ साली ‘निर्माण’ ह्या शिक्षणप्रक्रियेचा जन्म झाला.

Credit : सतीश गिरसावळे

-सतीश गिरसावळे

 

मी नेमका आहे तरी कोण? मी कसा आहे? मी नक्की काय हेतु घेऊन जन्माला आलो असेन? आयुष्यात ‘सेटल’ होण्याची माझी व्याख्या काय आहे? जन्म, बाजारात जास्त किंमत मिळवून देणारं शिक्षण, बड्या पगाराची सुरक्षित नोकरी, सावलीतला संसार, सुखासुखी पेन्शन, आत्मसंतुष्ट किंवा असंतुष्ट मरण.. असं सर्वांनी एक सारखंच का जगावं? त्या पेक्षा आयुष्यात काही ‘वेगळं’ करावंस वाटतं, पण कसं करायचं मी घेतलेलं शिक्षण, माझी कौशल्ये समाजातील आव्हानं, प्रश्न सोडवण्यासाठी वापरता येऊ शकतात का? या सारखे अनेक प्रश्न भारतातील युवांना नेहमी सतावत असतात.

युनायटेड नेशन २०१५च्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतात आहे. सध्यस्थिती भारताची अर्धी लोकसंख्या २५ वर्षाखालील आहे. २०२० साली भारतातील लोकांचे सरासरी वय हे २९ वर्षे असेल जेव्हा की जपान मध्ये ते ४८ वर्षे असेल हा अनुमान खरा ठरतोय. अर्थातच युवा हा भारताचा चेहरा, ताकद व भविष्य आहे. उद्याचा भारत कसा असेल हे आजच्या युवांच्या कामगिरीवर ठरेल. त्यामुळे एक सक्षम आणि सर्व समाजघटकांना न्याय्य असलेला भारत घडवण्यासाठी समाजातील जटिल आणि ज्वलंत अशा विविध समस्यांवर उपाय शोधणे हे आव्हान युवा पिढीसमोर आहे. सोबतचं आपण एके काळी तरुण होतो, याचं म्हातारपणी दुःख वाटू नये, असे उन्नत, समृद्ध व अर्थपूर्ण तारुण्य जगण्याची संधी मिळेन, स्वत:च्या जीवनासाठी आनंददायी प्रयोजन मिळणे व सुयोग्य करियर निवडता येणे हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

शिक्षण हे केवळ पोट भरण्यासाठीचे माध्यम नसून अर्थपूर्ण जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याचे साधन आहे. त्यामुळे जे शिक्षण पोट भरायचं ज्ञान देतं पण उत्तम नागरिक होण्याची समज देत नाही, त्या शिक्षणाला अनेक मर्यादा असतात. भारतातील सध्याचे शिक्षण हे माहिती देतं, क्वचित काही कौशल्य देतं पण अर्थपूर्ण हेतू मात्र देत नाही, तर युवांना केवळ आर्थिक शर्यतीत धावणारा घोडा बनवतं. निव्वळ परीक्षार्थी शिक्षणाने तरुणांचा ‘करियर आणि पैसा’ या चढाओढीतला अभिमन्यू झाला आहे. याहून अधिक समृध्द, समाधानी व उद्देश्यपूर्ण अशा जीवनापासून ते वंचित होत आहेत. जर असे व्हायचे नसेल तर मग जीवनात अर्थपूर्ण आव्हाने शोधणाऱ्या युवापिढीची व समाजातील प्रश्नांची सांगड घालता येईल का, ह्या विचारातून प्रेरित होऊन २००६ साली ‘निर्माण’ ह्या शिक्षणप्रक्रियेचा जन्म झाला. आजच्या युवापिढीकडे असलेली कौशल्ये व ज्ञान वापरून समाजातील प्रश्न सोडवण्याकरिता कृतीसाठी त्यांना प्रेरित व सक्षम करणे, हा ‘निर्माण’ प्रक्रियेचा पाया आहे.

 

 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासूनचा इतिहास बघता अनेक टप्प्यावरती युवांनी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडलेली दिसते. स्वातंत्र्यलढ्याचे लोण संपूर्ण भारतात पसरवण्यासाठी पूर्ण देशभरात युवांची मोठी फौज कार्यरत होती. अगदी महात्मा गांधीच्या आंदोलनात अनेक युवांनी अदृश्य इंजिनांची भूमिका बजावल्याचे उदाहरण दिसतात. म्हणून की काय महात्मा गांधी युवांना ‘Agent For Social Transformation’ म्हणायचे.

पुढे जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात युवांचे योगदान सर्वपरिचित आहे. जेपीच्या मार्गदर्शनात युवांनी ‘राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक व आध्यात्मिक’ अशा सात क्रांतीचा विचार करून जेपींच्या ‘संपूर्ण क्रांती’ या नाऱ्याला प्रतिसाद देत संपूर्ण समाजजीवन ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. ‘मै धुनी युवकोंके तलाश मै हु’ असं म्हणणाऱ्या जयप्रकाश नारायण यांच्या या आंदोलनाची विशेषता म्हणजे युवांचा सहभाग फक्त आंदोलना पुरता मर्यादित नव्हता तर आंदोलनात सहभागी युवांपैकी अनेकांनी रचनात्मक कामाद्वारे समाजपरिवर्तनाचा वसा पुढे चालू ठेवला आहे. 

सत्तर – ऎंशीच्या या दशकात अनेक तरुण-तरुणींनी सामाजिक कार्यात उडी घेतलेली आपल्याला माहित आहे. त्यावेळचे वातावरण देखील अशा प्रकारच्या निर्णयाला पोषक असे होते. दरम्यानच्या काळात झालेल्या भांडवलशाहीच्या प्रसारामुळे मात्र आपल्या जीवनाकडे बघण्याचा आजच्या आमच्या युवा पीढीचा दृष्टीकोन खूप बदलला आहे आणि “अधिकाधिक पैसा कमावणं हेच जणू जगण्याचे एकमेव ध्येय आहे” असा विचार अनेकांच्या मनावर बिंबलेला दिसतो. आणि म्हणून सामाजिक कृती तर दूर पण साध्या संवेदनशीलतेचा देखील अभाव अनेक ठिकाणी जाणवतो. विविध सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न सोडविण्याचे आव्हान घ्यायला इच्छूक व सक्षम असे युवा ‘चेंज मेकर्स’ फारसे नाहीत ही एक मोठीच अडचण आहे. 

सध्या भारताताकडे बघितलं शेती, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, गरिबी, विषमता, धार्मिक आणि जातीय तेढ यासारख्या क्षेत्रामध्ये अनेक गुंतागुतीचे हिमालयाएवढे मोठे आव्हाने आहेत आणि दुसरीकडे युवांसमोर ते आव्हान सोडवण्याची संधीपण. भारताला राष्ट्र म्हणून समृद्ध होण्यासाठी आणि तळागाळातील लोकांच्या न्याय्य विकासासाठी बऱ्याच आव्हानांना सामोर जाण्याची आणि आव्हानांवर ‘टिकून’ काम करू शकेल अशा युवांची फळी “निर्माण” करण्याची आज खरी गरज आहे. 

भारतातील आव्हाने मोठी असली तरी यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक कार्यकर्ते देशभरात वेगवेगळ्या जागी करतांना दिसतात ही आनंदाची बाब आहे. अशा अनेक सामाजिक समस्यांना बघून युवांना हताश होवू न देत, सामाजिक समस्यांविषयी युवांना सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने “निर्माण” ही सामाजिक क्षेत्रात युवां नेतृत्व घडवण्याची शिक्षणप्रक्रिया जून २००६ मध्ये सुरू झाली आहे. महात्मा गांधींच्या नई तालिम या शिक्षण प्रयोगाला मार्गदर्शक मानून आकार घेत असलेली निर्माण प्रक्रिया युवांच्या आयुष्याला समाजाभिमुख प्रयोजन लाभावे यासाठी प्रयत्नशील आहे.

 

 

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तीन शिबिरांची एक मालिका विकसित करण्यात आली आहे. ही शिबिरे हा निर्माण शिक्षण प्रक्रियेचा गाभा आहेत. १८ ते २८ ह्या वयोगटातील युवांची दर सहा महिन्यातून एकदा अशा प्रत्येकी ८ दिवसांच्या तीन निवासी शिबिरांची एक मालिका दर वर्षी सर्च, गडचिरोली येथे होते. या शिबिरांदरम्यान स्वतःची ओळख, स्वत:च्या भावनांची व शरीराची ओळख, माझ्या आजूबाजूच्या समाजाची व निसर्गाची ओळख, समाजातील विविध प्रश्न व त्या सोडवण्याच्या वेगवेगळया पद्धती, प्रत्यक्ष सामाजिक काम करणाऱ्या विविध लोकांसोबत संवाद अशा टप्प्यांमधून जात जात ‘मी जीवनात आता काय करू’ या निर्णयापर्यंत शिबिरार्थी येतात

२००६ ते २०२० या काळातल्या निर्माणच्या १०बॅचेस मध्ये देशभरातील १४००हून अधिक युवक-युवती सहभागी झाले असून त्यापैकी आज ३५० युवां देशभरात कुठला ना कुठला सामाजिक प्रश्न घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. विविध स्वयंसेवी संस्था, दुर्गम भागात शासकीय सेवा, सोशल एंत्रप्रुनरशिप, फेलोशिप्स, इ. च्या माध्यमातून हे युवा कार्यरत आहेत. सोबतच शंभराहून अधिक विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, मार्गदर्शक यांचे एक नेटवर्क उभे राहिले आहे. निर्माण मधील अनेक युवांनी विविध नामवंत विद्यापीठातून शिक्षण घेतले असुनही, जसे की, जॉन्स हॉपकिन्स, हारवर्ड व पेनसिल्वेनिया विद्यापीठ, आय.आय.टी. मुंबई, आय.आय.टी. दिल्ली, आय.आय.टी. कानपूर, यु. डी. सी. टी. मुंबई, इत्यादी, आज त्यातील अनेक जण करिअरच्या नेहमीच्या चौकटीच्या बाहेर पडून सामाजिक प्रश्नांवर काम करताहेत. अजून बरीच मजल मारायची बाकी आहे पण आज अनेक लुकलुकते दिवे जागोजागी प्रकाशमान होत आहेत ही आम्हाला अत्यंत सकारात्मक बाब वाटते. 

इतर प्राण्यांपासून मनुष्याला वेगळे करणारी एक बाब म्हणजे आपले जीवन हे केवळ प्रकृतीवर (Nature) नाही तर संस्कृतीवर (Culture) देखील आधारलेले असणे. आणि ह्याच संस्कृतीचा, त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विज्ञान – तंत्रज्ञानाचा, त्यामुळे झालेल्या भौतिक प्रगतीचा (!), बदललेल्या जीवन ध्येयांचा परामर्श घेऊन युवा पिढी आज काय विचार करते हे प्रथम समजून घ्यायला हवे. पण सोबतच ही भौतिक प्रगतीची प्रक्रिया जास्तीत जास्त सर्वसमावेशक होणे व पर्यावरणीयदृष्ट्या समतोल राहणे अत्यावश्यक आहे. आणि आपली संस्कृती ही अधिकाधिक माणसांना अर्थपूर्ण जीवनाची अनुभूती मिळण्यासाठी व ‘निव्वळ ग्राहक’ न बनता ‘जागरूक नागरिक’ बनण्यासाठी प्रवृत्त करणारी असणे गरजेचे आहे. ‘निर्माण’ हे त्या दृष्टीने टाकलेले एक पाउल आहे. 

निर्माणच्या अकराव्या बॅचसाठीची निवड प्रक्रिया सुरु झाली असून यावर्षी प्रथमच निर्माणच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये पर्पज प्रश्नावली (questionnaire) चा समावेश करण्यात आलेला आहे. १८ ते २८ या वयोगतील युवकांना एकूणच त्यांच्या आयुष्याबद्दल खूप प्रश्न पडतात. त्यामधील 'माझा जीवनाचा पर्पज (हेतू किंवा उद्देश) काय?' हा सर्वांत महत्त्वाचा आहे. हे युवा त्यांच्या पर्पज मिळवण्याच्या प्रवासात सद्यास्थितीत कुठे आहेत हे कळण्यास मदत व्हावी या हेतूने ही प्रश्नावली  बनवण्यात आलेली आहे. पर्पजचा शोध, ते पूर्ण करण्यासाठीचे गोल्स, वैयक्तीक अर्थपूर्णता, समाजासाठी काम करण्याची प्रवृत्ती(प्रो-सोशल ओरिएंटेशन) आणि पर्पज बद्दल आत्ता असणारी स्पष्टता यांबद्दलचे प्रश्न या संचयामध्ये (विचारलेले) आहेत. याचा उद्देश कोण सर्वांत वरती आहे हे पाहणे नसून अशा प्रश्नांमुळे हा फॉर्म भरणाऱ्या प्रत्येकाच्या विचारांना चालना मिळावी आणि त्यांची ठोस विचारप्रक्रिया सुरू व्हावी अशी आशा आहे.  आपल्या पर्पजच्या वाटचालीतले पाहिले पाऊल म्हणून या प्रश्नांकडे पाहता येईल. पूर्ण प्रश्नावली भरल्यानंतर त्या व्यक्तीला ई-मेल द्वारे त्याचा स्कोर कळवण्यात येईल, त्यासोबतच तो आत्ता कुठल्या पातळीवर आहे त्यानुसार काही उपयोगी संदर्भही (पुस्तके, व्हिडीओज, प्रेरणादायी लाईफ स्टोरीज, महत्त्वाचे प्रश्न इ.) देण्यात आलेले आहेत. हे संदर्भ त्या व्यक्तीला त्याच्या पुढच्या प्रवासात नक्कीच उपयोगी ठरतील. ही प्रश्नावली भरण्यासाठी आणि निर्माण शिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी http://nirman.mkcl.org या संकेत स्थळावरील उपलब्ध अर्ज भरून त्वरित पाठवावा.

निर्माण विषयी अधिक माहितीसाठी:

Website

Facebook

Instagram

Youtube

 

संदर्भसूची:

www.unpopulation.org/

www.actionagainsthunger.org/

www.niti.gov.in/

गांधी, विनोबा,जयप्रकाश: मिलिंद बोकील

अनर्थ: अच्युत गोडबोले

 

लेखक निर्माण संस्थेसाठी प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम पाहतात.

लेखातील मत लेखकाचं वैयक्तिक मत आहे.