India

दहावी अंतर्गत मूल्यमापन: शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, सर्वांच्याच परीक्षेचा डोंगर

सरकारने शाळांना दिलेल्या अपुऱ्या सुचनेमुळे मुख्यध्यापक आणि शिक्षकांसमोर अनेक समस्या.

Credit : Indie Journal

राहुल शेळके । पुणे : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोना  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दहावीचा निकाल हा नववीच्या आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापणावर आधारीत जाहीर केला जाईल असं त्यांनी सांगितलं. दहावीच्या निकालाचे मूल्यमापन करताना त्यात नववीतील गुणांचे ५० टक्के, दहावीतील अंतर्गत मूल्यमापनातील गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल असेल. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनात वर्षभरातील लेखी मूल्यमापनाला ३० गुण असतील त्यात गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जावेत, अशा सूचना शिक्षण मंडळाने दिलेल्या आहेत.

कोरोना काळात वर्षभरातील फक्त ४५ दिवस शाळा चालू होत्या. बाकी वर्षभर दहावीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीनं घेतले गेले होते. गेल्या वर्षी नववीची परीक्षा  झाली नाही आणि यावर्षी ही दहावीचे वर्ग बराच काळ ऑनलाईन पद्धतीने चालू होते. विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा,गृहपाठ, स्वाध्याय, प्रात्यक्षिक परीक्षा झाली नसल्याने गुण कशाच्या आधारावर द्यायचे असा प्रश्न आता शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थी मोबाईल आणि इंटरनेटच्या आभावामुळं ऑनलाईन शिक्षण प्रणालीत सहभागी होऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची ग्रामीण भागातील संख्या खूप मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कशाच्या आधारावर करायचं  याबद्दलच्या सूचनाही शिक्षण मंडळानं दिलेल्या नसल्यामुळं या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करताना अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. “सरकारनं अंतर्गत मूल्यमापन करुन निकाल लावावेत असं सांगितलं आहे. पण वर्षभरात सर्वच विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नाही, काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि इंटरनेटच्या समस्या असल्यामुळं त्यांची ऑनलाईन वर्गातील हजेरी कमी होती. त्यामुळं मूल्यमापन करणं अवघड आहे. सरकारनं कमी गुणांच्या आधारे तरी परीक्षा घ्यायला पाहिजे होती,” लोणी काळभोरच्या एंजल हायस्कुलचे शिक्षक महेश परदेशी म्हणाले.

 

दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळं गृहपाठ, स्वाध्याय, प्रात्यक्षिक परीक्षा ते देऊ शकलेले नाहीत.

 

दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळं गृहपाठ, स्वाध्याय, प्रात्यक्षिक परीक्षा ते देऊ शकलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांचं खरं मूल्यमापन होईल का यावर प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच मुलांना खोटे गुण दिले जातील अशी शक्यता अनेक शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. 

“दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे अशा हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. सरकारनं कोरोनाचे नियम पाळून कमी गुणांची तरी परीक्षा घ्यायला पाहिजे होती. कारण त्यातूनच खरं मूल्यमापन झालं असतं. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करा असं सांगितल्यामुळं खाजगी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना जास्त गुण दिले शकतात, म्हणजेच खोटे गुण दिले जाऊ शकतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं मूल्यमापन होणार नाही,” असं मत हडपसरच्या साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांनी व्यक्त केलं.

कोरोना काळात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत या गोष्टींची माहिती शिक्षण मंडळाला आणि सरकारला होती. मात्र त्यावर  उपाययोजना केल्या गेलेल्या दिसल्या नाहीत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित आहेत, आणि त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणं अवघड आहे. तसंच ऑनलाईन शिक्षण पुढं  किती महिने सुरु राहील याबाबतही स्पष्टता नाही. 

 

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित आहेत, आणि त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणं अवघड आहे.

 

“सरकार कोरोना काळात परीक्षा घेऊ शकणार नाहीत याची जाणीव सरकारला होती. परंतु वर्षभर त्यांनी ठोस निर्णय न घेतल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. पूर्वी पासूनच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं नियोजन केलं असतं किंवा पर्यायी व्यवस्थेची तयारी ठेवली असती तर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं नसतं,” आम आदमी पक्षाचे नेते आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते मुकुंद किर्दत म्हणाले.

दहावीच्या विदयार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनामध्ये शाळांकडून चाचणी परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा विद्यार्थ्यांकडून गांभीर्याने सोडवल्या गेलेल्या नसतात. अशा अनेक परीक्षा वर्षभर चालु असतात त्या सर्व परीक्षांना सर्व विद्यार्थी उपस्थित नसतात.

“सरकारनं अकरावी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल असं सांगितलं आहे, मात्र ती कधी घेतली जाईल? कशा प्रकारे घेतली जाईल? हे सांगितलं नसल्यामुळं गोंधळ निर्माण झाला आहे,” दहावीच्या विदयार्थ्याचे पालक राजेंद्र शिंगे म्हणाले. 

अशा अनेक अडचणी अंतर्गत मूल्यमापनात आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांचे खरे मूल्यमापन होईल का? असा प्रश्न आहे. अशा गोंधळाच्या आणि शिक्षण मंडळानं दिलेल्या अपुऱ्या सुचनांमुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.