India
पुणे विद्यापीठ मुलींच्या वसतिगृहात रात्री घुसण्याचा प्रयत्न
वसतिगृह आवारात मुलींशी गैरवर्तन, तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन मुलांनी घुसून वसतिगृहातील मुलींना धमक्या दिल्यानंतर विद्यापीठ आवारात गोंधळ सुरु झाला. सुरक्षिततेच्या प्रश्नावर उत्तरं मागण्यासाठी तसंच वसतिगृहात घुसून धोका निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकला होता. शेवटी सोमवारी संध्याकाळी या दोषी मुलांचं निलंबन करण्यात आलं तसंच वसतिगृह प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
आरोपी विद्यार्थी वसतिगृह बंद होणाच्या वेळेनंतरही विद्यार्थिनी बाहेर का फिरत आहे, हा जाब विचारायला वसतिगृहात घुसले असल्याचं विद्यार्थिनी सांगतात.
यासंदर्भात बोलताना विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करणारी सिद्धी सांगते, “आमच्याच वसतिगृहातील एक मुलगी बाहेरच्या कात्रज डेरी या दुकानाजवळ तिच्या मित्रासोबत बसली होती. तिला काहीतरी आरोग्यविषयक समस्या होती, म्हणून ती थांबली होती. तेव्हाच आमच्याच विद्यापीठातील दोन मुलांनी येऊन तिला दमदाटी करत इतक्या उशिरा बाहेर असण्याचं कारण विचारायला सुरुवात केली. यानंतर ते दोघं तिचा पाठलाग करत वसतिगृहाच्या प्रवेशद्वारातुन आले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांना विचारलं की ही मुलगी बाहेर काय करत होती, कुणासोबत होती, लेट पास आहे का, वगैरे. ही चौकशी करण्याचा त्यांना काहीही हक्क नाही. आमच्या आईवडिलांना सुद्धा वसतिगृहात येण्याची परवानगी नाही, मग या मुलांना आत का येऊ दिलं? ”

मात्र या दरम्यान सुरक्षा रक्षकांनी काहीही भूमिका घेतली नसल्याचं या विद्यार्थिनी सांगतात. या विद्यार्थ्यांना आत घुसलेलं बघून वसतिगृहाच्या आवारात असलेल्या मुली एकत्र आल्या, त्यांनी खोल्यांमध्ये असलेल्या मुलींनादेखील बोलवल्याचं सिद्धी म्हणाली.
“आम्ही सगळ्याजणी एकत्र आल्यानंतर आम्ही या मुलांना अडवून ठेवलं आणि त्यांना सर्वांची माफी मागण्यास सांगितलं. त्यावर त्या मुलांनी आम्हाला 'सोडा नाहीतर आम्ही तुमच्या अंगावरून गाड्या चालवू,' अशा धमक्या दिल्या. यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी काहीही भूमिका घेतली नाही. त्यांनी त्या मुलांना सुद्धा थांबवलं नाही. उलट त्यांनी आमच्या गेटला कुलूप लावून आम्हालाच आत कोंडलं. आम्ही रात्री साडेदहा वाजल्यापासून घोषणा देत होतो. आम्ही अतिरिक्त मुख्य वसतिगृह प्रमुख तलत प्रवीण यांना फोन केला आणि सांगितलं की त्या मुलांना आमची माफी मागायला लावा आणि पुन्हा असं काही होणार नाही याची शाश्वती द्या. यासाठी पण त्यांनी खूप वेळ घेतला. रात्री १ -२ वाजताच्या सुमारास ती मुलं आली आहेत, असं आम्हाला सांगितलं पण त्यांना माफी मागायला सांगितलं गेलं नाही. मग आम्ही चतुःशृंगी पोलीस स्थानकात गेलो. मात्र तिथंही आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आज पहाटे सकाळी साडेपाच पावणे सहाला आम्ही वसतिगृहात परत आलो आणि दुपारी साडे बारा वाजल्यापासून कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर बसून राहिलो," सिद्धी सांगते.
कुलगुरूंनी विद्यार्थिनींना भेटून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या, मात्र या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतला.
.jpeg)
राज्यशास्त्राचा अभ्यास करणारी तनिष्का सांगते, “आम्ही ४ मुख्य मागण्या कुलगुरूंकडे ठेवल्या होत्या. अतिरिक्त मुख्य आणि मुख्य वसतिगृह प्रमुखांचा राजीनामा, ज्या मुलांनी त्रास दिला त्यांचं निलंबन, वसतिगृह प्रमुख, कुलगुरू यांना हे प्रकरण कळूनसुद्धा ते त्यावेळी वसतिगृहात का उपस्थित राहू शकले नाहीत, याचं जबाबदारी पत्रं लिहून द्यावं आणि त्याच बरोबर जर मुलींना वसतिगृहात जाण्याची वेळ ही रात्री साडे दहा पर्यंत आहे, तर मुलांनादेखील अशी बंधन घालणारी वेळ ठरवून द्यावी. वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाइटिंगची सोय करावी.”
सिद्धी म्हणाली की वसतिगृह प्रमुख सोनल नगराळे यांच्याकडे राजीनामा मागण्यास कुलगुरू आधी तयार नव्हते. मात्र विद्यार्थिनींनी मागणी लावून धरल्यानंतर शेवटी नगराळे यांनी पदावरून राजीनामा दिला.
“आम्ही सकाळी साडे बारा वाजल्यापासून इथे कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर बसून होतो. पावणेपाच वाजता कुलगुरूंनी आमच्याशी व्यवस्थित चर्चा केली. आता चौकशी समिती स्थापन करून आमच्या प्रश्नांचं निवारण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सुरवातीला राजीनामा आणि सुरक्षेची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नव्हतं. सगळे याचा दोष एकमेकांवर ढकलत होते. सुरक्षा रक्षकांवर अजूनही काही कारवाई केली गेली नाहीये.” तनिष्कानं सांगितलं.
याबद्दल विचारण्यासाठी इंडी जर्नलनं विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांची प्रमुख सुरेश भोसले यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

राज्यशास्त्राचा अभ्यास करणारी स्वाती पाटील सांगते, “आमचं बायोमेट्रिक झालं नाही तरीही आम्हाला स्वतःला वसतिगृहात येताना अडचण येते. मग ही मुलं आत येऊन हुज्जत घालत कशी काय उभी राहिली? व्हिडीओ बनवण्यापासून त्यांची नावं विचारण्यापर्यंत सगळी काम आम्हा मुलींनाच करावी लागली. सुरक्षा रक्षकांनी तेवढीही जबाबदारी घेतली नाही. ती मुलं माफी मागायलाही तयार नव्हती. यावर आमची साथ देण्याऐवजी आमच्या वसतिगृहाच्या अतिरिक्त प्रमुख तलत मॅडम आम्हालाच सांगत होत्या की ती मुलं तयार होत नाहीयेत, तुम्ही असं करू नका, मुलीच्या करियरचा प्रश्न आहे. त्या मुलांचीच बाजू घेत होत्या."
स्वाती पुढं म्हणाली, "आम्ही गेटवरून उड्या मारून गेटचं कुलूप तोडून रात्री पोलीस स्थानकात गेलो. तिथेही ज्या मुलीसोबत हे घडलं, तिच्यावर दबाव टाकला जात होता. पोलीस तक्रार लिहून घेत नव्हते म्हणून आम्ही तिथे एकत्र येऊन घोषणा द्यायला सुरवात केली. तरी काहीही कायदे सांगून आमच्यावरच तक्रार केली जाईल, असं पोलीस आम्हाला म्हणाले. शेवटी त्यांच्या दबावाला बळी पडून तिनं तक्रार दिली नाही. पण पोलीस प्रशासन आरोपींची बाजू घेत असल्यासारखं आम्हाला जाणवत होतं. नंतर पोलीस आम्हाला म्हणाले की विद्यापीठाकडून एखाद पत्र घेऊन या मग आम्ही तुमचा जबाब लिहून घेतो."
“एवढं सगळं झाल्यानंतरपण पोलीस तक्रार करणाऱ्या मुलीच्या कपड्यांवरदेखील बोलत होते. पोलीस स्थानकात असे कपडे चालत नाही वगैरे सांगत होते. हे प्रचंड दयनीय आहे,” स्वाती सांगते.
याबद्दल पोलिसांचं म्हणणं जाणून घ्यायचा इंडी जर्नलनं प्रयत्न केला. मात्र चतुश्रुंगी पोलीस स्थानकात फोन केला असता वसतिगृह प्रमुखांचा जबाब नोंदवला आहे असं सांगत तेथील अधिकाऱ्यांनी आणखी कुठल्याही प्रश्नांना उत्तरं देण्यास नकार दिला.

दुसरी विद्यार्थिनी तनुजा हुंडे सांगते, “या अशा घटना सतत घडत राहतात, मग त्या सुरक्षेच्या असो किंवा अंतर्गत वसतिगृहातील असो. आम्ही वसतिगृह प्रमुखांकडे इतर तक्रारीसाठी गेलो तर त्या डोळे वर करून बघतसुद्धा नाहीत. कसलंच लक्ष देत नाहीत. मला इथं राहायला येऊन तीन महिने झाले, पण अजूनही मला बेड आणि कपाट देण्यात आलेलं नाहीये. वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणीही ऐकत नाही. आम्ही एका खोलीत ५ जणी झोपतो. इथं साधं पेस्ट कंट्रोल झालेलं नाही. विद्यापीठातील प्रशासनपण फक्त उडवाउडवीची उत्तर देतं. जेव्हा आम्ही त्यांच्याकडे कुठल्याही तक्रारीसाठी जातो. वसतिगृह प्रमुख तर गेटच्या आतमध्येसुद्धा येत नाहीत. स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात.”
तनिष्का सांगते, “मुलींना रात्री परत येण्यासाठी बंधन घालणारी वेळ ठरवणे पण मुलांना कुठलाही वेळ नसणे हा लिंगभेद करणारा नियम आहे. याआधी माझ्यासोबतही माझा पाठलाग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मी स्वतःसुद्धा तक्रार दाखल करायला गेले होते. पण चतुःशृंगी पोलीस स्थानकातील महिला पोलिसांनी त्यावेळीही मला तुला खरंच तक्रार दाखल करायची आहे का? असा प्रश्न विचारला होता. मग आम्ही नेमकं जायचं कुणाकडं आणि कुणाला जबाबदार धरायचं? आमची वसतिगृहातील मेस सुरु नाहीये आम्हाला त्यामुळे जेवणासाठी बाहेर जावं लागत. मग परत येताना उशीर होतो. इथं रस्त्यावर लाईट्स नाही, सीसीटीव्ही नाहीत. असंच अंधारात आम्हाला परत यावं लागतं. आमच्या सुरक्षेचा नेहमी भंग होताना दिसतो.”
दरम्यान विद्यापीठानं याबाबतीत एक सार्वजनिक पत्रक प्रसिद्ध करत आरोपी विद्यार्थ्यांचं निलंबन केल्याचं जाहीर केलं आहे, तसंच विद्यापीठातर्फे पोलीस स्थानकात तक्रार करण्याची ग्वाही दिली आहे.
