India

एमपीएससी विद्यार्थ्यांचं पुन्हा पुण्यात उत्स्फूर्त आंदोलन

आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.

Credit : इंडी जर्नल

 

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) पेपरफुटी प्रकरणासंदर्भात विद्यार्थी शिष्टमंडळाची ३० सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर २ ऑकटोबरचं पुण्यातील आंदोलन रद्द करण्यात आलं होतं. मात्र आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं गुरुवारी रात्रीपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी पुण्याच्या नवी पेठेतील एस एम जोशी मार्गावर आंदोलन करत आहे.

“ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी आंदोलन करणं साहजिक आहे. पण त्याची जबाबदारी करून आणि नैतिकता जपून सरकार कारवाई करायला तयार नाही. पेपरफुटीचं एवढं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे, याची जबाबदारी आयोगाच्या अध्यक्षांची आणि सचिवांची आहे. आयोग संविधानिक आहे असं सरकार सांगतं. सरकार स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. त्यांनी अध्यक्षांना हटवलंच पाहिजे,” पुण्यात एमपीएसीची तयारी करणारा मूळचा धाराशिवचा रहिवासी असणारा विद्यार्थी सांगतो.

“जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं मान्य केलं होतं की आम्ही तुमच्या मागण्या ऐकून घेऊ. पण अध्यक्षांचा राजीनामा सोडून बाकी सगळ्या मागण्या मान्य करायला ते तयार आहेत,” दुसरा विद्यार्थी सांगतो.

 

 

२२ मार्च रोजी राज्यसेवा आयोगाची औषध निरीक्षक पदाची परीक्षा झाली होती. पुढे १२ जूनला निकाल लागल्यानंतर १ ते २२ जुलै दरम्यान मुलाखत प्रक्रिया पार पडली. जुलै अखेरला पेपरफुटीचं प्रकरण समोर आलं आणि मग एमपीएससीने भरती रद्द केली. १ सप्टेंबर पासून रोहित पवार सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

“मी शिक्षक आहे. क्लासेस घेतो. जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण बाहेर आलं, तर आम्हाला विश्वासच बसला नाही. आम्हाला मुलं विचारतात कि सर जर मी प्रामाणिक अभ्यास केला तर मी पास होईन का? यावर आम्ही काय उत्तर द्यायचं? आतासुद्धा गरीबाची मुलं अभ्यास सोडून इथं आंदोलनाला बसली आहेत. पण अध्यक्ष पण स्वतः जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला तयार नाहीत. अध्यक्षांसहित संपूर्ण समितीचा राजीनामा घेऊन नवीन लोकांना तिथे नेमणूक करायला हवी. म्हणजे आम्हाला पुन्हा एमपीएससीवर विश्वास बसेल आणि मुलं पण अभ्यासाला मोकळी होतील. इथं मुलांकडे पैसे नाहीयेत एकदाच आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा म्हणजे आम्हाला परत-परत आंदोलनाला बसायला पडणार नाही,” पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेणारे शिक्षक सांगतात.

 

 

७ सप्टेंबर रोजी एमपीएससीचे विद्यार्थी आणि शिक्षांनी पुण्यात आक्रोश मोर्चा काढून याच मागण्या समोर ठेवल्या होत्या.

धाराशिववरुन पुण्यात परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं, “पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी आधीदेखील असं केलं नसेल कशावरून? ७ सप्टेंबरला पुण्यात झालेल्या आक्रोश मोर्च्यात आम्ही उपस्थित होतो त्यानंतर सरकारकडून विशेष तपास पथक नेमण्यात आलं. ३० सप्टेंबरला विद्यार्थी शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला गेलं होत. सचिवांची बदली आणि चौकशी मान्य झाली पण भीमनरावांच्या राजीनाम्याबद्दल ते काहीच बोलले नाही. त्यांचं म्हणणं होत की हे संवैधानिक पद असल्या कारणानं राष्ट्रपती त्यांच्या राजीनाम्यासाठी जबाबदार आहेत, ते नाही. मग विद्यार्थ्यांनी त्यांना भीमनराव यांना अहवाल लिहून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या, असं कळवायला लावलं. पण ते त्या गोष्टीवरदेखील राजी झाले नाही. आता यामागचं कारण आम्हाला माहित नाही.”

दरम्यान काल रात्रीपासून सुरु असणाऱ्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना येऊन जागा खाली करण्यास सांगितल्याचं विद्यार्थी सांगतात. “तुमच्यावर गुन्हे दाखल करू, जागा खाली करा नाहीतर तुमच्या भविष्यावर याचे परिणाम होतील,” असं पोलीस म्हणाले असल्याचं ते सांगतात. यामुळंच भीतीपोटी विद्यार्थ्यांनी इंडी जर्नलशी बोलताना आपली नावं सांगितली नाहीत.