Americas

चिलेच्या वणव्यांमध्ये २६ जणांचा मृत्यू; ३००० चौरस किमी जंगल नष्ट

वणव्यानं आतापर्यंत २६ जणांचा बळी घेतला आहे

Credit : Indie Journal

राकेश नेवसे । मध्य आणि दक्षिण चिले इथं गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या वणव्यानं आतापर्यंत २६ जणांचा बळी घेतला आहे, तर किमान एक हजार नागरिक या वणव्यामुळं जखमी झाले आहेत. तसंच शेकडो घरंही या आगीत जळाली आहेत, त्यामूळं ५५०० लोकं बेघर झाली आहेत. या वणाव्यासंदर्भात चिले सरकारनं आतापर्यंत १७ जणांची अटक केली आहे. 

चिलेचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिच यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली असून देशाला संबोधित करताना ते म्हणाले, "(सर्वसामन्यांच्या) कुटुंबांचे संरक्षण हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही मॉले, न्यूबल, बियोबियो आणि ला अराऊकेनिया प्रदेशांना प्रभावित करणार्‍या जंगलातील आगीशी लढण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करत आहोत." शिवाय, चिले सरकारनं वणवा सुरु असलेल्या तीन प्रदेशात संचारबंदी जाहीर केली आहे. 

या आगीमुळं चिलेची राजधानी असलेल्या सान्तियागो शहरात हवेचा दर्जा खालवला आहे. सरकारनं जाणूनबुजून आग पेटवल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत १७ जणांची अटक केली असून त्यांना ५ ते २० वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती चिलेच्या गृहमंत्रालयानं दिली आहे.

 

 

चिलेच्या राष्ट्रीय वन संघटनेनं (CONAF) बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, “आगीमुळे प्रभावित झालेलं क्षेत्र आता ३००,००० हेक्टर (७,४१,३१५ एकर किंवा ३००० चौरस किमी) पेक्षा जास्त पसरलं आहे, हे क्षेत्र ग्रेटर लंडनच्या जवळपास दुप्पट आहे.” चिलेची लगदा आणि कागद निर्मिती कंपनी ‘सीएमपीसी’च्या (CMPC) २४७०० एकर (१०००० हेक्टर) पेक्षा जास्त क्षेत्रातील वृक्षारोपण आगीमुळे बाधित झालं आहे, त्यांच्या काही प्रक्रिया प्रकल्पांचं कामकाज थांबवण्यात आलं आहे.

अग्निशामक दलाचे जवान आणि नागरी स्वयंसेवक मिळून सध्या सुमारे ५६०० लोकं ३०० जागी सुरू असलेली आग विझवण्याचं काम करत आहेत. चिलेच्या राष्ट्रपतींनी मित्र राष्ट्रांकडं मदतीची मागणी केली होती, ज्यानंतर दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांसह इतर देशांनी चिलेच्या मदतीसाठी त्यांच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाठवलं आहे. यात ब्राझील, अर्जेंटिना, क्यूबा, व्हेनेजुएला, एक्वाडोर, मेक्सिको, परू, कोलंबिया, स्पेन आणि अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेनं त्यांच डीसी-१० नावाचं ३६००० लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेलं एक विमान वणवा विझवण्याच्या कामात मदतीसाठी पाठवलं आहे.  

 

 

अनेक प्राणी आणि पक्षांचा जीव या आगीमध्ये गेला आहे. चिलेच्या वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापक व्हॅलेंटीना अरावेना म्हणाल्या, “आम्ही आग लागलेल्या जंगलांची आणि आमच्या प्राण्यांची, महत्त्वाच्या जीवांची काळजी घेण्यास सक्षम असलेल्या प्रत्येकाला मदतीचं सध्या आवाहन करतोय." न्यूबल प्रदेशाची राजधानी चिल्यान येथील पुनर्वसन केंद्रात पशुवैद्य जंगलातील आगीत होरपळलेल्या प्राण्यांवर उपचार करत आहेत. या प्राण्यांमध्ये ‘पुडस’ (Pudus) या जातीच्या जगातील सर्वात लहान हरिण आणि ‘मोनिटो डेल मॉन्टे’ (monito del monte) या निशाचर, कांगारू सारख्या पोटाला पिशवी असणाऱ्या प्राण्याचा समावेश आहे.

चिलेच्या जंगलांमध्ये २०१७ साली झालेल्या वणव्यानंतर लागलेली हे दुसरी सर्वात मोठी आग आहे. २०१७ साली पेटलेल्या आगीमध्ये ५७०० चौरस किमी जंगल क्षेत्र जळून नष्ट झालं होत. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा तीव्र झाल्यानंतर चिलेमध्ये बहुतांशी वणवे सुरु होतात. २०१० पासून चिलेमध्ये ‘महादुष्काळ’ सुरु असून या महादुष्काळामुळं वणव्याची तीव्रता वाढली आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

ऐतिहासिकदृष्ट्या चिलेमध्ये सातत्यानं दुष्काळ पडतो, मात्र २०१० पासून चिलेमध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान २० ते ४५ टक्के एवढचं राहिलं आहे. एप्रिल २०२२ पासून चिलेत पाणी रेशन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. चिलेच्या दक्षिण टोकाकडं परिस्थिती इतकी गंभीर आहे की तिथं गवताची काडीसुद्धा उगवणं अवघड झालं आहे. याची कारणं नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन्ही आहेत.

जागतिक तापमान वाढीमुळं येत्या शतकांमध्ये अशा महादुष्काळांची तीव्रता आणि वारंवारीता वाढणार असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. या महादुष्काळांमुळं या वणव्यांची तीव्रता आणि प्रमाण वाढेल असं अनेक अहवाल व अभ्यास दर्शवत आहेत.