Opinion
प्रिय बाबा... । एका वीज कर्मचाऱ्याच्या मुलाचं आपल्या वडिलांना पत्र
एका वीज कर्मचाऱ्याच्या मुलाचं आपल्या वडिलांना पत्र

खाजगीकरणाविरुद्ध सध्या संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या वीजकर्मचाऱ्यांचा संपाचं निमित्त मानून एका वीज कर्मचाऱ्याच्या मुलाचं आपल्या वडिलांना पत्र...
प्रिय बाबा,
आज सकाळीच तुमचे डोळे लालेलाल दिसले. कदाचित रात्रीची झोप झाली नसावी. रात्रभराची झोप सर्व दिवस मात्र खराब करते. रात्रभर जागल्याचा खरंतर तो पूरावा असतो! तसंही तुम्ही महान काम करता...कारण, जसं सैनिक सीमेवर आपल्या जिवाची पर्वा न करता जागतो आणि त्यामुळे आम्ही देशवासीय सुरक्षित असतो, जसं पोलीस रात्री-बेरात्री आपल्या संरक्षनार्थ पळत असतात, तसं तुम्हीही लोकांना रात्रीची झोप व्यवस्थित यावी, यासाठी डोळ्यात तेल घालून जागत असता. खरंतर तुम्ही आमच्या नजरेतील हीरो आहात. खरे देशसेवक आहात. फक्त तुम्ही किती मोठं देशकार्य करता हे तुम्हाला येऊन कुणी सांगितलेलं नाहीये.
एका समाजसेवकाच्या तोडीचं काम तुम्ही करता. कारण, रात्रीची वीज किती महत्वाची असते ते १०वी-१२वीच नाही तर कुठल्याही विद्यार्थ्याला कळेल. गर्मीमुळं त्रस्त होऊन रडणाऱ्या तान्ह्या मुलांच्या आईला कळेल...क्रिकेट अन् मालिकांच्या चाहत्यांना कळेल...विहरीत पाणी असूनही पीक सुकलेल्या बळीराजाला कळेल त्या विजेचं खरं महत्त्व! विहिरीत आहे पण पोहऱ्यात नाही अशी गत झाल्यासारखं! विजेचं महत्त्व तसं प्रत्येक क्षेत्रातल्या विजेत्याला माहिती असत. त्यात काकुळतीला येऊन ऑपरेशन करणाऱ्या आणि वीज गेली म्हणून जीव गेलेल्या कुटुंबीयांना तर नक्कीच कळेल विजेच महत्त्व!
विजेचा वापर करण्यासाठी विविध शोध लावणाऱ्या त्या टेस्ला-एडिसन-फ्रँकलिन आणि असंख्य वैज्ञानिकांना खरंतर सलाम! पण पत्र लिहून उपयोग नाही ते पोहोचवणाऱ्या पोस्टमनलाही खूप महत्त्व असत. त्यामुळं फक्त वीज असूनही उपयोग नाही ती पोहचवण्यासाठी कष्ट उपसणाऱ्या तुमच्यासारख्या हजारो कर्मचाऱ्यांना खरंच मनापासून सलाम!
रात्रीची झोप जर चांगली झाली तर कुणी येऊन तुम्हाला बक्षीस देणं तर सोडाच, आभार बोलायलाही तयार नसतं. अन् जर वीज गेली तर मात्र त्यांना तुमची नक्कीच आठवण होते...पण येरवी ते सर्वजण विसरलेले असतात तुम्हाला! तुम्ही तसे वर्दीतलेच...पण गर्दीत लगेच मिसळनारे! आपल्या डोळ्यांचा दिवा करून जगाला प्रकाश देणारे! खरे तर कुठंही तुमचा उल्लेख मात्र नसतो एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यासारखा! आतापर्यंत अपघतात कितीतरी कर्मचारी गेले असतील, खरंतर तेही या देशासाठीच शहीदच झालेले आहेत...फक्त ते पडद्यामागे राहिलेले आहेत...कारण जगाला प्रकाश देणाऱ्या खांबाखाली मात्र नेहमीच अंधार असतो आणि सोबतीला कुणीही नसतं. वनवासात पाठवल्यासारखं त्यांना ड्यूटीला जावं लागतं. दोन-दोन दिवसाचे डब्बे अन् दुधवाल्यांसारख्या पाण्याच्या कॅनस् घेऊन! या खाजगीकरणाच्या जगात तुमची कोणतीही जागा नसेल. तुम्हाला एका झटक्यात बेदखल केलं जाईल कदाचित. तुम्हाला हक्कानं बोलावणार वीज ग्राहक तेव्हा कुठं जातील? खाजगी झालेली वीज कोणाला परवडेल?
आता ज्याचं त्याला आपलं दुःख माहित. तुम्हाला मात्र या वादळात दिवा तेवत ठेवायचा आहे. आपण एक महान कार्य करत आहोत या चिरकालीन समाधानासाठी!
तुमचाच मुलगा,
करणकुमार जयवंत पोले
polekaran@gmail.com
रा. वाळकी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली.
लेखात व्यक्त मतं लेखकाची वैयक्तिक असून त्यांच्याशी इंडी जर्नलची सहमती असेलच असं नाही.