Quick Reads
क्लिक्सने मारलेला पत्रकार बघायचाय का?
तीन लहान पोरांचा बाप असलेला दलबीर किमान चार वर्षांपासून पत्रकारितेत होता.
दिल्लीमध्ये १७ फेब्रुवारीला रात्री उशिरा काही अज्ञात लोकांनी गोळी मारून दलबीर वाल्मिकी या पत्रकाराची हत्या केली. त्याचा रक्ताळलेले मृतदेह सकाळी शेजाऱ्यांनी ओळखला. दलबीर गरीब होता, दलित होता आणि पत्रकारही होता. त्याला ओळखताना शेजारी माणूस म्हणाला, "अरे ये तो वो पत्रकार लडका हैं ना ..." तीन लहान पोरांचा बाप असलेला दलबीर किमान चार वर्षांपासून पत्रकारितेत होता. बायकोसोबत दिल्लीमधल्या एका साध्या उपनगरामध्ये, द्वारकानगर भागाच्या झुग्गी झोपडी कॉलनीत राहून तो आपली उपजीविका चालवत होता. पत्रकारितेच्या कामांमधून पैसे पुरत नाहीत म्हणून त्याने साफसफाईचं कामही सुरू केलं होतं. तो रस्त्यांवर झाडू मारणे, नालेसफाई, घरं साफ करणे अशी कामेही करायचा. घरची परिस्थिती खूप हलाखीची होती म्हणून दलबीर जमेल तिथे काम करायचा.
आज तीन दिवस उलटून गेल्यानंतरही दलबीर नेमका कुठल्या गावचा होता, तो कुठे गेला, त्याला कुणी का मारलं, नेमक्या कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, या सगळ्या गोष्टी पडद्याआडच आहेत. त्याच्या बायकोने दिल्ली कधीच सोडली आहे. आपलं सगळं घर आवरून परागंदा होऊन ती गावी निघून गेली आहे पोरांनाही सोबत घेतला आहे ते नेमके कोणत्या गावाला गेलेत याचा पत्ता कोणालाच नाही. त्यांच्याजवळ मोबाईल फोनही नाही ज्याने कळू शकेल की नेमकं काय घडलं.
ही बातमी मुख्य माध्यमांमध्ये आली नाहीच, परंतु अनेक आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी व त्यासोबत आपापल्या गटाची मक्तेदारी म्हणून ओळखल्या गेलेल्या माध्यमांनीही याकडे विशेष लक्ष दिले नाही. राजधानीमध्ये पत्रकार मारले जाणं ही फार मोठी घटना नव्हे. भारतात तर ती अतिशय किरकोळ घटनाच म्हणावी लागेल. अनेक वृत्तपत्रांच्या पत्रावळीमध्ये, न्यूज चॅनेल सुपर बुलेटिन्स चालवणाऱ्या यादीमध्ये त्याला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणजे कामासाठी तर मिळाली नाहीच पण तो मेल्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी म्हणूनही मिळाली नाही. आजपर्यंत होऊन गेलेल्या मोठमोठ्या पत्रकारांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या समाजाने हा माणूस कोण होता त्याच्याकडे लक्ष देणेही टाळलेच. आपल्या एकूण पत्रकारितेचा आवाका आणि गांभीर्य बघता हे ठीकच आहे.
मूकनायक नावाच्या एका ऑनलाईन पोर्टलची पत्रकार कशीबशी दलबीर यांच्या सासुपर्यंत जाऊन पोचली. मीना कोतवाल स्वतः हे पोर्टल चालवतात. आज पर्यंत वायर, नॅशनल दस्तक, शूद्र, द प्रिंट बीबीसी अशा अनेक अग्रगण्य वृत्तपत्र संस्थांसाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्यामार्फत कळालं की दलबीर हे वेकप दिल्ली न्यूज या ऑनलाइन पोर्टल साठी काम करायचे. त्यांनी दलबीरच्या पत्नीसोबत आपली बातचीत झाली असल्याचा दावा केला.
दलबीरच्या मुलांनी बोलताना सांगितलं की "रात्री अचानक पप्पांना एक फोन आला त्यांना कोणीतरी महत्त्वाच्या कामासाठी मेट्रो स्टेशन वर बोलावलं होतं त्यांना भेटण्यासाठी म्हणून पप्पा निघून गेले त्यानंतर ते परत आलेच नाहीत. त्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे."
प्रत्येक माणसामध्ये पत्रकार असतो असं एक काही तरी रटाळ वाक्य नेहमी ऐकलेलं. कदाचित दलबीरचा त्या गोष्टीवर जास्त विश्वास असावा. दलबीरने याआधीही ऑनलाइन पोर्टल्ससाठी पत्रकारिता केली होती. कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही पण माणूस कुत्र्याला चावला की बातमी आहे असं म्हणून बातमीमूल्य शिकवणाऱ्या पत्रकारितेमध्ये दलबीरला रोज कुत्र्याला चावणारा माणूस शोधता आला नसावा. वाल्मिकी समाजातला असल्याने कदाचित जातीवर वाटून दिलेली काम करायचं समाजाचं लोढणंही त्याच्याच गळ्यात येऊन पडलं असावं. अशा क्लिकबेट पोर्टल साठी फ्रीलान्स पत्रकारिता करता करता दलबीर मेला. त्याच्या नावानं तो काम करत असलेल्या चॅनेलनही व्हिडिओ टाकला. त्यात फुलांचे आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचे वेगवेगळे फोटो ग्राफिक्स आणि फिरत येणारा गोल गिरक्या खात येऊन मध्यभागी जाणारा दलबीर चा फोटो आकर्षकपणे रोवला. आणखी काही लोकांनी त्यावर उत्तम उत्तम ग्राफिक्स लावून काही व्हिडिओ बनवले. आपल्या या व्हिडिओला चांगले व्युज मिळतील असा चॅनेलचा अंदाज आहे. किमान दलबीरच्या मृत्यूमुळे क्लिकबेट वधारून पर क्लिक अजून चांगले पैसे उकळता येतील यासाठी तो काम करत असलेल्या मीडिया प्रयत्नशील आहे. जाता जाता त्यांना श्रद्धांजली पर म्हणून बनवलेला हा व्हिडिओ नक्की पाहून जा.
किंवा 'हा' व्हिडिओ पाहिलात का? जाणून घ्या, कसा मरून पडलेला पत्रकार सापडला शेजाऱ्यांना!
करण सिंग नावाचे सद्गृहस्थ वेक अप दिल्ली म्हणून हे पोर्टल चालवतात. त्यांच्याशी संपर्क केला. तुमच्या पत्रकारा विषयी कळालं वाईट वाटलं मला त्यांच्याशी सहानुभूती आहे असं म्हणून काही बोलणार तेवढ्यात त्यांनी दलबीर काही पूर्णवेळ आमच्यासाठी काम करत नव्हता ते फ्रीलान्सिंग करायचे अधून मधून तो स्टोरीज द्यायचा मात्र तो काही आमचा पूर्णवेळ पत्रकार नव्हता उत्तर अनपेक्षितपणे ऐकायला मिळालं.
"पण ते तुमच्यासाठी स्टोरीज करायचे त्यांनी आधी तुमच्यासाठी काही स्टोरीज केल्या होत्या ना?" त्यांना विचारलं.
हो ते आमच्यासाठी काम करायचे पण आपलं कसा आहे आपण फक्त सामाजिक क्षेत्रातील जास्त स्टोरेज करतो ना तर सोशल सेक्टर मध्ये असतात एवढेच दाखवतो. त्यामुळे स्टोरी वगैरे आम्ही काय करत नाही एवढं. त्यामुळे हाय प्रोफाईल असं काही काम आपण करतच नाही. काही क्राईम किंवा इकडच्या तिकडच्या मोठ्या बातम्या आपण केल्याच नाहीत. म्हणजे आता स्टोरी करायचे बाबा मग आपण रामलीलाची स्टोरी केली. हो की नाही? तर अशाच स्टोरी त्या टाईपच्या. आणि ते काही इतके ऍक्टिव्ह नव्हते. म्हणजे पत्रकार कसा असतो की एखाद्या स्टोरी चा मागे लागला की हात देऊन त्याचा पाठलाग करुन त्याच्या मागे राहायचं आणि त्यावरच अजून रिसर्च करायचा असतं. तसं त्यांचं काही नव्हतं. आणि ते जर तसं काही करत असते तर लोकांना माहिती पडलं असतं नाही का? तुम्ही सांगा अजून काय मग.
"तुमचं त्यांच्या घरच्यांशी कोणाशी बोलणं झालं का?"
नाही ते तर त्या दिवशीच गावाला गेले ना म्हणजे झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ते गावातच निघून गेले आणि माझा कॉन्टॅक्ट फक्त त्यांच्याशीच होता. घरच्यांचा कॉंटॅक्ट तो इमर्जन्सी वगैरे कॉन्टॅक्ट होता तो त्यांच्याकडेच होता. म्हणजे त्यांच्याकडे काही बातमी असेल तर ते मला मोबाईल वर पाठवायचे आणि मी तिकडूनच घ्यायचो. त्यामुळे असेल नसेल आमचा कॉन्टॅक्ट तो फक्त त्यांच्याशीच होता. घरच्यांचे वगैरे फोन नंबर ठेवतच नाही आम्ही रिपोर्टर लोकांच्या.
"बरं, पण तुमच्याकडे पत्ता तर असेल त्यांचा ते कुठे राहायचे?"पत्ता असं नाही पण ते दिल्लीच्या द्वारकानगर भागांमध्ये राहायचे. आता पूर्ण पत्ता तर नाही कारण आपल्या ऑफिस वगैरे नाहीये ना. आपले हे पोर्टल ए, ते आपला घरूनच चालवतो आपण.
"पोलिसांनी अद्याप तुमच्याशी काही विचारपूस केली नाहीये का?"विचारपूस करण्याचा संबंध कुठे येतो! ते आमच्यासाठी असे काम करतच नव्हते ना पूर्णवेळ. आमचा आहेच नाही संबंध करत नाही. आलं का लक्षात? त्यांचं कसं होतं, आता समजा मी पत्रकार आहे. मला त्यांनी व्हिडीओ आणि बातमी काय पाठवली तर मी काय करणार? मी ती पाहणार कशी आहे काय. जर चांगली वाटली त्यावर क्लिक पडणार असतील असं वाटलं तर मी ते टाकणार, नाही तर नाही टाकणार. स्टोरी चालणारे असं वाटलं तर तेच टाकायच, ते करताना चालेल कि नाही चालेल ते... त्यांचं ते तसं होतं मुक्त पत्रकार टाईप. कळलं का? म्हणजे आता इथे आमदाराचं काय प्रोग्राम आहे पत्रकार परिषदे, तर तिकडे जायचे आणि रिपोर्ट व्हिडिओ काही काढून त्यांच्याशी बोलून आम्हाला पाठवायचे. आता कुणी लावलं ते लावलं, नाही लावलं तर नाही लावलं... असं. अशी गोष्ट होती.
"पण मग तुम्ही पगार द्यायचा नाहीत का त्यांना?"पगाराचा फुल टाईम नव्हतं काय असं. ते तसं करतच नव्हते ना म्हणजे जास्त. म्हणजे या कार्यक्रमाला गेलेत तिकडे काय चाललं ते स्टोरी तर द्यायचे लिफाफा वगैरे काहीतरी असं. पण पूर्णवेळ पगार असं काहीच नाही. त्यामुळे ते सफाईचे वगैरे काम करायचे ना. त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता असा. पेमेंट वेमेंट काही गोष्ट नव्हती. आणि आता काय द्वारका नगर मध्ये राहायचे म्हणजे दिल्लीत कित्येक पोर्टल चालू असणार. त्यामुळे ते कुठे ना कुठे तरी देतच असतील.
"इतके पोर्टल्स आहेत का?"
इकडे खूप जास्त पोर्टल टाकून दिलेल्या आहेत लोकांनी... आता जर कोणी एखाद्या जागी काम करत असेल तर तो त्याचा त्याचं स्वतःचं वेगळं पोर्टल तयार करायचा. त्यामुळे इथे पोर्टल या गोष्टीला सुमारच राहिला नाही. सगळ्यांचे पोर्टल आहेत आपलं आहे तसं. आपला वेगळं काय तर आपलं युट्युब पण आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओ वर जास्त चालू आहे. त्यात पैसा पण आहे. आपले व्हिडिओ टाकला एखादा वायरल होतो जास्त लोकांनी पाहिला त्यावर आपले अपडेट टाकायचे. तेवढा कंटेंट मिळतो. चालला तर चालला... नाही चालला, तर एखाद्या चालतच असतो मध्ये. आता आपल्या बघा सुरू झालं होतं 2018 मध्ये. सुरु करायचा म्हणजे असं काही पब्लिक एजंट असतील सामाजिक काम असतील त्याच्या वरच्या अपडेट देण्यासाठी सुरू केला होता. बातम्या द्यायच्या असं काही नव्हतं. म्हणजे सुरुवातीला कसा या बाकीच्या गोष्टी मोठी माणसं यांच्या लफड्यात पडलो तर अवघडच असतं. म्हणजे या नेत्याला मोठा दाखवायचे आहे, त्या नेत्याला छोटा दाखवायचे असं काही केलं नाही... राजकीय आपण काही करतच नव्हतो कधी. आणि त्यांचं काय आठवड्यातून चार स्टोर्या वगैरे द्यायचे. माझा पण म्हणजे असा बिझनेस बाकीचा पणे. त्यामुळे या पोर्टल सोबतच चालू असतं बाकीचं पण. मला तर वाटते यांना चुकूनच गोळी लागली असणार म्हणजे दुसर्या कुणाला तरी मारायला गेले असेल कोणी आणि चुकूनच यांना लागली असं वाटतय मला. म्हणजे काय बातम्याच द्यायचा हा माणूस व्हाट्सअप वर-
कॉल कट झाला. परत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दिल्लीतला बर्याच लोकांकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण संपर्क झाला नाही. दलबीर वाल्मिकी आपल्या क्लिक पडून पडून मेला असं वाटतं. हा व्हिडिओ पाहिलात का? थंबनेल बघून नक्की क्लिक करत राहा... पाहायला विसरू नका, अजून एक पत्रकार.. झुप्प्प!