India

शिवसेनेचा 'जय बांगला', लढणार बंगाल निवडणुकीत

संजय राऊत यांच्याकडून ट्वीट करून घोषणा.

Credit : Indie Journal

यावर्षीच्या शेवटी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या मैदानात आता शिवसेनाही उतरणार असल्याची घोषणा, संजय राऊत यांनी केलीये. ममता बॅनर्जीचा तृणमूल आणि डाव्यांचा गड असलेल्या बंगालमध्ये आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी भाजपनं आतापासूनंच कंबर कसली आहे. या अटीतटीच्या राजकीय लढाईत आता शिवसेनाही उडी टाकणार आहे.

"पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर पश्चिम बंगालमधीलही निवडणूकही लढवण्याचं शिवसेनेनं ठरवलंय. लवकरंच कोलकात्याला पोहोचतोय," या आशयाचं ट्वीट करून करून जेष्ठ नेते पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्वीटरवर ही घोषणा केली. 

 

 

तब्बल ३ दशकांपर्यंत बंगालमधील डाव्यांच्या वर्चस्वाला छेद देत २०११ साली ममता बॅनर्जींचा तृणमूल कॉंग्रेस पहिल्यांदाच सत्तेत आला. कम्युनिस्ट आणि तृणमूलच्या या बंगालमधील लढाईत यावेळेस भाजपनंही पूर्ण तयारीनिशी उतरण्याचं ठरवलंय. त्यामुळे बंगालची आगामी अटीतटीची निवडणूक त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. 

२०१४ च्या लोकसभेतील विक्रमी बहुमतानंतर ज्या ज्या राज्यात भाजपचं राजकीय अस्तित्व नाममात्र आहे त्या राज्यातंही आपला प्रभाव वाढवण्याची आपली महत्वकांक्षा भाजपनं मागच्या सहा वर्षांत स्पष्टपणे दाखवून दिलेली आहे. याच राजकीय तणावातून तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक वाद आणि मारामारीही झाल्याच्या घटना समोर येत आहेत. एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या पण आता कॉंग्रेससोबत महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या बंगालप्रवेशानंतरही भाजपच्या संभाव्य व्होट बॅंकेवर परिमाण होण्याची शक्यता कमीच आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीतंही शिवसेनेनं काही जागा लढवल्या होत्या. मात्र, त्याचा त्याचा फारसा परिणाम निकालावर पडलेला दिसला नाही.