India
शरद पवारांच्या मध्यस्तीनंतर राज्यसेवा परीक्षार्थींचं आंदोलन मागे
शरद पवार यांनी रात्री ११ वाजता अचानक उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.

राकेश नेवसे । गेले दोन दिवस सुरू असलेल्या राज्यसेवा परीक्षार्थींच्या आंदोलनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री ११ वाजता अचानक उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनाच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून स्वतः प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली त्यानंतर या परीक्षार्थीनी आपलं उपोषण आणि आंदोलनही मागे घेण्यास तयारी दर्शवली.
या आंदोलनादरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकवल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग करणार आहे, मी स्वतः मिटींगला हजर राहणार आहे आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढू, असं आश्वासन पवारांनी विद्यार्थ्यांना दिलं.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांनी मांडलेल्या मागणी मान्य करण्याचा शब्द दिला. शरद पवारांच्या आश्वासनानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचं उपोषण थांबवलं असलं तरी विद्यार्थ्यांनी मात्र अधिसूचना येईपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचं काही परीक्षार्थींचं म्हणणं होतं. याआधी सुद्धा अशा आश्वासनानंतर आम्ही आमची आंदोलनं थांबवली. मात्र आम्हाला पुन्हा पुन्हा आंदोलन करावं लागतं आहे, त्यामुळं आताचं आंदोलन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतरच थांबेल अशी स्पष्ट भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. मात्र परीक्षार्थींचे प्रतिनिधी आणि परीक्षार्थींमध्ये झालेल्या चर्चेनंतर ते आंदोलन स्थगित करण्यास तयार झाले.
शरद पवारांसह सुषमा अंधारे, रुपाली पाटील, अतुल लोंढे आणि इतर पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनाला उपस्थित होते. तर काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनात उपस्थिती दर्शवून पाठिंबा दिला होता. भाजपतर्फे आमदार अभिमन्यू पवार यांनी आज सकाळी या आंदोलनात उपस्थित होते.