Opinion

तुम्हाला हवं ते करा!

मेरठमध्ये टोपी घातलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची बातमी समोर आल्यापासून मनात एक विचित्र दुःख पसरले आहे.

Credit : इंडी जर्नल

 

शकील रशीद । दोन दिवसांपासून घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालतोय. मेरठमध्ये टोपी घातलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची बातमी समोर आल्यापासून मनात एक विचित्र दुःख पसरले आहे. मला या दुःखावर मात करण्याचा एकमेव मार्ग सापडला, तो म्हणजे मारहाण झालेल्या व्यक्तीशी सहवेदना व्यक्त करणे. त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी स्वतः टोपी घातली पाहिजे.

मला चांगले आठवते की, बाबरी मशिदीच्या हौतात्म्यानंतर मुंबई शहरात सलग दोन दंगली झाल्या, तेव्हा काही तरुणांनी आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली, ते कुर्ता पायजमा घालून बाहेर पडायचे. आम्ही या देशाचे आहोत, आम्हाला न घाबरता वाटेल ते परिधान करून जीवन जगण्याचा अधिकार आहे, असा संदेश हा बदमाशांना दिला होता.

 

मुंबईतील दुहेरी दंगलीपेक्षा आजची परिस्थिती वाईट आहे.

 

मुंबईतील दुहेरी दंगलीपेक्षा आजची परिस्थिती वाईट आहे. दिल्लीची बातमीच घ्या, मानसिक आजारी व अर्धवेडा असलेला असरार नावाच्या मुस्लिम तरुण, त्याचा दोष एवढाच होता की, त्याने गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या फळातून एक केळी उचलून खाल्ली होती म्हणून त्याला चोर म्हणत दोरीने बांधून बेदम मारहाण करण्यात आली ज्यात तो मरण पावला, 

हा जीव घेण्या एवढा मोठा गुन्हा होता का?

हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीला हे मॉब लिंचिंग आवडले असेल का?

या प्रश्नांची उत्तरे विचारली तर माझे उत्तर असे असेल की, केळी उचलून मूर्ती समोर खाणे हा एवढा मोठा गुन्हा नाही की त्यासाठी कुणाचा जीव घ्यावा, भुकेल्यांचे पोट देव भरतो, जर एका भुकेल्या माणसाचे पोट गणपती समोर ठेवलेल्या केळ्याने भरत असेल तर गणपती देवाला आनंदच झाला असेल.

त्या तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या नराधमांना गणपती माफ करणार नाही, त्यांना शिक्षा होईलच, याची मला खात्री आहे. 

 

त्या तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या नराधमांना गणपती माफ करणार नाही!

 

हे सर्व करणारे लोक कोण आहेत? त्यांना हिंसाचारासाठी कोणी प्रोत्साहन दिले? त्यांच्या मागे कोण आहे? कोणाच्या सांगण्यावरून ते आग आणि रक्ताचा खेळ खेळत आहेत? या प्रश्नांसाठी फार दूर जाण्याची गरज नाही; आपल्या प्रधान सेवकाने 'कपड्यांवरून ओळखण्याचे" सोपे सूत्र दिलेले आठवत नाही का? 

टोपी घातलेली व्यक्ती, पायजमा घातलेली व्यक्ती, प्रधान सेवकांनी  दिलेल्या सूत्रांच्या आधारे "शिकार" मानली जाईल हे उघड आहे!  आणि तुम्हाला आठवत नाही का की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी इव्हीएम बटण इतक्या जोरात दाबण्याची विनंती केली होती की त्याचा झटका शाहीनबागपर्यंत पोहोचला पाहिजे! 

 

 

हे नक्कीच लक्षात असेल, हे शिकवलं गेले आणि ही शिकवण आता वेगळ्या पद्धतीने आचरणात आणली जात आहे. या देशात कित्येक लोकांनी 'हत्या' करायला प्रवृत्त केले आहे. 

लोक त्या धर्म संसदांना विसरले नाहीत ज्यात मुस्लिमांचे वध करण्याचे खुले आव्हान करण्यात आले. हे सर्व असरारच्या माब लिंचिंग आणि मेरठ घटनेचे दोषी आहेत. उलट मॉब लिंचिंग, हत्या आणि लुटमारीच्या ज्या घटना या देशात घडत आहेत, आणि या सरकारच्या काळात घडल्या आहेत, त्या सर्वा घटनांचे दोषी हेच लोक आहेत.  

एक संपूर्ण नवी पिढी हिंसक जमावात रूपांतरित झाली आहे. तरुण पिढी मारेकरी बनली आहे, आणि  लोकांना टार्गेट करत फिरत आहेत, त्यांना जाब विचारणारा आणि त्यांच्यावर खटला चालवणारा कोणीही नाही.

पण त्यांना घाबरण्याची गरज नाही, कुर्ता, पायजमा आणि डोक्यावर टोपी घालून बाहेर पडा, आणि त्यांना सांगा की त्यांनी काहीही केले तरी मुसलमान या देशावरील त्यांचे हक्क सोडायला तयार नाहीत. 

 

शकील रशीद उर्दू दैनिक 'मुंबई उर्दू न्युज'चे संपादक आहेत.

 

अनुवाद: सुफियान मनियार