India

शाहीन बागेत गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजपात अधिकृत प्रवेश

गुर्जरची २४ तासात भाजपातून हकालपट्टी.

Credit : File Photo

दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जर या दहशतवाद्यानं आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं समोर आलंय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पक्षकार्यालयात त्यानं आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. "हिंदुत्वासाठी काम करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्यानंच आपण हा निर्णय घेत आहोत," असं मतंही त्यानं आज यावेळी व्यक्त केलं.

मागच्या वर्षी १ फ्रेब्रुवारी रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात गोळीबार केल्यानं कपिल गुर्जर चर्चेत आला होता. 'भारतात फक्त हिदूंनाच राहण्याचाच अधिकार आहे', अशा घोषणा देत त्यानं हा गोळीबार केला होता. यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटकही केली होती. पोलीस तपासात त्यानं त्यावेळी आपण आम आदमी पक्षाचे समर्थक असल्याचा दावा केला होता. आजच्या घटनेनं त्यानं आपला राजकीय कल स्पष्ट केला असून नागरिकत्व कायद्याविरोधातील आपल्या आक्रमक कृतीला साजेशीच अशी राजकीय भूमिका त्यानं आज घेतली.

 

 

शाहीनबाग हे मुस्लीमांसोबत भेदभाव करणाऱ्या या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाचं केंद्र बनलं होतं‌. मुस्लीम महिला कित्येक महिने सरकारच्या विरोधात शाहीन बागेत ठाण मांडून बसल्या होत्या. या आंदोलनाला देशभरातील धर्मनिरपेक्ष पक्षांचा आणि जनतेचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचं वातावरणंही शाहीन बागमधल्या याचं आंदोलनामुळे तापलं होतं. या निवडणूक प्रचारादरम्यान शाहीन बागमधील आंदोलकांवर निशाणा साधात भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारों को, गोली मारों सालो को' अशा घोषणा देत आपलीही विचारधारा कपिल गुर्जरशीचं संलग्न असल्याचं दाखवून दिलं होतं. कपिल गुर्जरच्या आजच्या भाजप प्रवेशानं अखेर यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालं आहे.

पक्षप्रवेश करून चोवीस तासही होत नाहीत, तोवरच कपिल गुर्जरची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज (बुधवारी) संध्याकाळी भाजपच्या उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद युनिटनं याबाबत खुलासा केला की, कपिल गुर्जरनं शाहीनबाग इथं केलेल्या गोळीबाराची, आज सकाळी पक्षप्रवेशाच्या वेळी आम्हाला कल्पना नव्हती. पण आम्हाला त्याबद्दल कळलं तसं लगेचच आम्ही त्याला पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. भाजपचे गाझियाबाद युनिटचे प्रमुख संजीव शर्मा यांनी असा खुलासा देणारं पत्रकही काढलं आहे.

बातमी नंतरच्या घडामोडींनुसार अपडेट करण्यात आली आहे (१९:३४)