Americas
'असह्य तापमानामुळं' येत्या ५० वर्षात १ ते ३.५ अब्ज लोकांचे जीव जाण्याची शक्यता
या तापमानवाढीत सर्वात जास्त गरीब व वंचित माणसांचा प्रथम बळी जाईल.
सोमवार ०४ मे रोजी प्रकाशित झालेल्या एका शास्त्रीय अभ्यासानुसार, येत्या फक्त ५० वर्षांच्या कालावधीमध्ये जगभरातील १ ते ३.५ अब्ज लोकांचे जीव 'असह्य तापमानवाढीमुळं' जाऊ शकतात. प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस (PNAS) या अमेरिकन सरकारच्या एका विभागाद्वारे प्रकाशित होणाऱ्या अकादमीक नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं.
मानवी उत्कर्षाचा अरुंद अवकाश
PNAS हे नियतकालिक अनेक शास्त्रीय विषयात होणारे अभ्यास प्रकाशित करतं. सोमवारच्या अंकात ची क्षु, टिमथी कोहलर, टिमथी लेंटन, जेन आणि मार्टेन शेफर या वैज्ञानिक-संशोधकांनी केलेला हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासात या संशोधकांनी म्हटलं आहे की पृथ्वीवर मानवी समूह एका विशिष्ट तापमानात, ज्याला ते 'एन्व्हायर्नमेंटल निश' म्हणतात, त्यात समृद्ध जगणं जगू शकले आहेत. याचा अर्थ एका विशिष्ट तापमानाच्या सरासरीत मानवी समूह लोकसंख्या वाढवू शकले कारण त्या तापमानाला त्यांचं शरीर साजेसं आहे व त्यांचं अन्न पुरवणारी पिकं व इतर असे पैलू याच वातावरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. हे तापमान या वैज्ञानिकांच्या मते वार्षिक ११ डिग्री सेल्सियस ते १५ डिग्री सेल्सियस दरम्यानची सरासरी असणारं आहे. हा तापमानाचा अरुंद पट्टा गेल्या ६००० वर्षांपासून मानवी जीवनाला साजेसा ठरला आहे.
मात्र गेल्या २०० वर्षात औद्योगिक क्रांती व त्यानंतरच्या सामाजिक व्यवहार रचनेमुळं माणसाच्या वावरातून पर्यावरणात होणारा हस्तक्षेप वाढत गेला आहे व त्याची परिणती वातावरणात उष्णता धरून ठेवणाऱ्या वायूंच्या प्रचंड वाढलेल्या प्रमाणात झाली आहे. कार्बन वायूंच्या या उत्सर्जनाचं प्रमाण जर जगभर असंच राहिलं, तर येत्या ५० वर्षात होणाऱ्या तापमानाच्या एक अंश वाढीसोबत १ अब्ज लोकांचं आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आज पृथ्वीचा २ कोटी लोकसंख्या असलेला फक्त ०.८ टक्के भाग हा वार्षिक सरासरी २९ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाच्या पट्ट्यात येतो. मात्र सण २०७० पर्यंत जवळपास ३.५ अब्ज लोकसंख्या असलेला भाग २९ डिग्री सेल्सियसहुन अधिक वार्षिक सरासरी तापमानाच्या पट्ट्यात येईल.
सर्वात जास्त फटका गरीब, वंचितांना
या संशोधकांच्या मते, या तापमानवाढीत सर्वात जास्त गरीब व वंचित माणसांचा प्रथम बळी जाईल. "तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही पुढच्या दशकांमध्ये चंद्रावरही जाऊन राहू शकाल," संशोधक शेफर न्यू यॉर्क टाइम्सशी बोलताना म्हणतात आणि पुढं सांगतात, "मात्र जे दारिद्र्यात राहत आहेत, किंवा सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यासाठी ही परिस्थिती असह्य असणार आहे." त्यांचेच सहकारी लेंटन म्हणतात, "नायजेरियासारखे देश, जिथं येत्या काही दशकांमध्ये लोकसंख्या तिप्पट होण्याची शक्यता आहे, ते या संकटाचा सामनाच करू शकणार नाहीत.
मोठ्या प्रमाणात विस्थापनाची शक्यता
या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, जर अशा प्रकारची तापमानवाढ झाली, तर अर्थातच जगण्याची असह्य परिस्थिती व त्याचसोबत पिकांचं नुकसान व अनुपलब्ध सोयींमुळं मोठ्या प्रमाणात उष्ण भागाकडून तुलनेनं थंड असलेल्या प्रदेशांकडं विस्थापन होऊ शकतं. या अभ्यासातील निष्कर्षांचा तो एक शक्य परिणाम असला तरी त्याबाबतचा निश्चित अंदाज आम्ही देऊ शकत नाही असं या संशोधकांचं म्हणणं आहे. मात्र अशा प्रकारे विस्थापन झाल्यास अर्थातच जगभर प्रचंड कोलाहल आणि अभूतपूर्व संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल असा सामाजिक अभ्यासकांचा अनेक वर्षांपासून अंदाज आहे.