India

'आंदोलनात महिला नसतील' म्हटल्यावर सरन्यायाधीशांनी केलं स्वागत, महिला नेत्यांकडून निषेध

एड.ए.पी सिंह हे भारत किसान युनियनचे वकील आहेत.

Credit : Moneycontrol

"कृषी कायदेविरोधी आंदोलनात आम्ही स्त्रिया, लहान मुलं व वयोवृद्ध व्यक्तींना सहभागी होण्यापासून रोखू. आंदोलनस्थळी स्त्रिया, लहान मुलं नसतील,’’ असं एड.ए.पी.सिंग यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. न्यायालयात कृषी कायद्यांवरील सुनावणीदरम्यान भारत किसान युनियनच्या वतीनं एड.ए.पी सिंह यांनी असं वक्तव्य केल्यावर सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी सिंह यांच्या या म्हणण्याचं स्वागत करत त्यांचे आभारही मानले. 

सरन्यायाधीशांनी सिंह यांच्या या वक्तव्याला पाठिंबा दिल्याने, त्यांच्यावर सर्व स्तरांतून यावर टीका होत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी- लेनिनवादी) नेत्या कविता कृष्णन यांनी एड ए.पी सिंह यांच्यासह सरन्यायाधीशांचाही निषेध केला आहे. १८ जानेवारीला महिला शेतकरीदिनी देशभरातील सर्व महिला शेतकऱ्यांनी दिल्ली सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना पाठिंबा देण्यासाठी यावं. असं आवाहन कृष्णन यांनी केलं आहे. "महिला शेतकऱ्यांच्या वतीनं, मोर्चाबाबत सुप्रीम कोर्टाला प्रतिज्ञापत्र देण्याचा अधिकार कोणाही पुरुषाला नाही," असं त्यांनी ठणकावून सांगितलं.    

 

 

एड.ए.पी सिंह हे भारत किसान युनियनचे वकील असून कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या अनेक शेतकरी संघटनांपैकी ही एक संघटना आहे. दरम्यान या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी असं स्पष्ट केलं आहे की, ए.पी.सिंह सर्वोच्च न्यायालयात जे म्हणालेत, त्याच्याशी संघटना सहमत नाही. ए.पी.सिंह हे निर्भया प्रकरणातील आरोपींचे वकील होते आणि त्यांनी त्यावेळी, "माझी मुलगी जर अशी रात्री अपरात्री घराबाहेर पडून स्वत:चा चारित्र्यभंग करत असती, तर मी सर्व कुटूंबासमोर तिला पेट्रोल टाकून जाळलं असतं,’’ असं वक्तव्य केलं होतं.