Opinion

भाषण: राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान - सरफराज अहमद

'राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान' या पुस्तकाला भा.ल.भोळे वैचारिक ग्रंथ पुरस्कार मिळाला.

Credit : Indie Journal

 

इतिहासाच्या बहुसंख्यांकवादी समजेतून मुस्लिम समाजाचे चारित्र्यहनन होत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या पक्षात समांतर ज्ञाननिर्मितीला चालना देण्यासाठी आम्ही गाजीउद्दीन अकॅडमी फॉर डेक्कनी कल्चर या संस्थेची स्थापना केली. या प्रसंगी मला दोन महत्वाच्या विचारवंतांची विधाने नोंदवावीशी वाटतात. त्यातील पहिले जमालुद्दीन अफगाणींचे आहे. बहुसंख्यांकवादी संस्कृतीकारणात मुसलमानांच्या वाट्याला आलेल्या अवहेलनेच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले होते, 'आकाशाकडे आशाळभूत नजरेने पाहत बेवारस जीवन जगणाऱ्या भटक्या प्राण्यांसारखी आपल्या समाजाची अवस्था होऊ नये, म्हणून आम्हाला स्वतःचं सांस्कृतीक अवकाश अबाधीत ठेवण्यासठी प्रयत्न करावे लागतील.’ दुसरं विधान सर सय्यद यांचे आहे. ‘मुसलमान समाज नैराश्य स्विकारुन, सांस्कृतीक उपरेपणा मान्य करत, राजकीय पातळीवर वैराग्याच्या वाटेला जाऊ नये, यासाठी आम्हाला आमची संस्कृती, भाषा, ज्ञानक्षेत्रं अबाधीत ठेवण्याचा संघर्ष करावा लागेल.’’

या दोन इतिहासपुरुषांनी केलेली ही विधानं आमच्यासाठी दिशादर्शक आहेत. आम्ही आमचं सांस्कृतीक अवकाश शोधत, राजकीय हक्क अबाधीत ठेवण्यासाठी, एक समांतर ज्ञानपरंपरा मराठीत निर्माण करण्यासाठी झटत आहोत. या झटापटीचा एक भाग म्हणजे या राष्ट्रातील आमचे स्थान शोधण्यासाठी ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ या पुस्तकाची मी केलेली निर्मिती आहे. भारतात राष्ट्रवादाचा जन्म कसा झाला व त्याला भारतीय मुसलमानांनी कसा प्रतिसाद दिला हा प्रश्न सुरुवातीपासून माझ्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. सुरुवातीला सर सय्यद यांनी राष्ट्रवादाला प्रतिसाद देत त्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादाला विरोध करताना त्यांनी राष्ट्रीयत्वाची आपली संकल्पना मांडली. ‘‘हिंदू व मुसलमान या देशाचे दोन सुंदर डोळे आहेत. यातील एक डोळा जरी निकामी झाला तर या देशाचे सौंदर्य लोप पावेल. भारत विकृत दिसू लागेल. त्यामुळे या देशाच्या या दोन्ही डोळ्यांना जपणे गरजेचे आहे,’’ अशी भूमिका घेतली. एका बाजूला इंग्रजी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करताना उर्दू ज्ञानविश्वाचे व उर्दू भाषेचे अस्तित्व किती महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर मांडणी केली.

 

भारतात राष्ट्रवादाचा जन्म कसा झाला व त्याला भारतीय मुसलमानांनी कसा प्रतिसाद दिला हा प्रश्न सुरुवातीपासून माझ्या अभ्यासाचा विषय राहिला आहे.

 

सर सय्यद यांची उर्दू व उर्दू ज्ञानविश्वाविषयीची मांडणी ही पंडीत मदन मोहन मालवीय व अन्य कांग्रेसी उच्चवर्णीय नेत्यांनी सुरु केलेल्या ‘हिंदी, हिंदू, हिंदूस्थानी’ चळवळीच्या पार्श्वभूमीवर होती. उर्दू भाषेला प्रशासनातून व अभ्यासक्रमातून काढून टाकण्यासाठी मालवीय व त्यांचे सहकारी आंदोलन करत होते. त्यामागे सांप्रदायीक दृष्टीकोन होता. त्यातून पहिल्यांदा भारतात द्विराष्ट्रवादाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण बहुसंख्य अभ्यासक द्विराष्ट्रवादासाठी सर सय्यद यांना जबाबदार ठरवतात. सर सय्यद यांची अनेक कागदपत्रे मी स्वतः अभ्यासली आहेत. अनेक पत्रं, भाषणंही वाचली आहेत. त्यात एकाही ठिकाणी सर सय्यद यांनी हिंदू आणि मुसलमानांना दोन राष्ट्रे म्हणून संबोधलेले नाही.

सर सय्यद यांच्यानंतर राष्ट्रवादाविषयी महत्वाचे चिंतन मोहम्मद इकबाल यांनी केले आहे. सुरुवातीला इकबाल यांनी राष्ट्रवादाला उच्चस्तरीय जमातवाद म्हटले. तर कालांतरानेत्यांनी राष्ट्रवाद हे संघटीत जमातवादाचे स्वरुप धारण करेल असे म्हटले होते. राष्ट्रवादाला विरोध केला तरी इकबाल यांनी संमिश्र राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडली होती. राष्ट्राची संकल्पना मांडताना त्यांनी हा देश उभा करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटकांचा धांडोळा घेतला. गौतम बुध्दांपासून, नानक, चार्वाकांपर्यंत सर्वांविषयी त्यांनी कवितांमधून कृतज्ञता व्यक्त केली. पण अभ्यासकांनी त्यांच्या भूमिकांचा बारकाईने अभ्यास न करता त्यांना धर्मांध ठरवले. ज्या इकबाल यांना धर्मांध ठरवले गेले तेच इकबाल ‘जर कोणी जीवनातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन त्यावर तोडगा न काढता जन्नत आणि जहन्नमची स्वप्ने रंगवत असेल तर ती दोन्ही माझ्यासाठी मुर्खांचे प्रदेश आहेत.’ अशी भूमिका घेतली होती. कार्ल मार्क्सला कष्टकऱ्यांचा प्रेषित ठरवताना ‘निस्त पैगंबर दर बगल दारद किताब’ (प्रेषित नसला तरी तुझ्या बगलेत ग्रंथ आहे.) असा त्याचा गौरवही केला. इस्लाममध्ये प्रेषितांना अल्लाहने ग्रंथ दिला अशी मान्यता आहे. त्या धरतीवर इकबालनी मार्क्सचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

इकबाल यांनी ‘रिकंस्ट्रक्शन ऑफ रिलीजीयस थॉट इन इस्लाम’ मध्ये इस्लामी धार्मिक चिंतनाच्या परंपरागत धारणांना छेद दिला आहे. एका बाजूला इकबाल धार्मिक चिंतनाच्या पातळीवर परंपरा, रुढी नाकारुन बुध्दीवादी होतात. दुसऱ्या बाजूला त्यांच्या राजकीय चिंतनाच्या आधारावर त्यांना धर्मांध ठरवले जाते. हा विरोधाभास काही संदर्भ जाणिवपूर्वक दुर्लक्षित केले जातात, त्यावरुन निर्माण होतो. इकबाल यांना पाकिस्तानचा संकल्पक ठरवले जाते. हे तितकेसे खरे नाही. सेतू माधव पगडींनी देखील हे मान्य केले आहे. इकबाल यांनी आपल्या मित्राला लिहीलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटलंय की, ‘मला पाकिस्तानच्या संकल्पनेचा जनक ठरवले जात आहे. ती माझी संकल्पना नाही. ती युरोपात, केम्ब्रिजमध्ये जन्मली आहे. त्या लोकांना असे वाटते की, आम्ही बहुसंख्यांक हिंदूंच्या अटी शर्तीवर भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिमांचा बळी देऊ शकतो.’ त्यामुळे इकबालविषयी मराठी ज्ञानविश्वाने जुनी भूमिका बदलली पाहिजे, जी बहुसंख्यांकवादी राजकीय मुल्यांवर आधारीत आहे.

फाळणीचा अभ्यास करताना मुसलमानांना एका बाजूला ढकलले जाते. एकजात सर्व समाजाला फाळणीसाठी जबाबदार धरले जाते.

फाळणीचा अभ्यास करताना मुसलमानांना एका बाजूला ढकलले जाते. एकजात सर्व समाजाला फाळणीसाठी जबाबदार धरले जाते. हे योग्य नाही. अनेक मुस्लिम नेत्यांनी आणि विशेषतः उलेमांनी फाळणीला विरोध केला होता. माझ्या पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात मी फाळणीविरोधी उलेमांच्या भूमिकांचे मुल्यविश्व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जमात ए इस्लामीचे संस्थापक मौलाना मौदुदी जे राजकीय इस्लामचे व्याख्याकार मानले जातात, त्यांनी पाकिस्ताननिर्मिती ही ‘पैदाईश ए दरिंदे के बराबर होगी’ असे म्हणत त्याला विरोध केला. जिन्नांना त्यांनी समाजद्रोही, गद्दारही म्हटले. पण हेच मौदुदी पाकिस्तान बनल्यानंतर पाकिस्तानची निर्मिती जमात ए इस्लामच्या आग्रहातून झाल्याचे ठणकावून सांगू लागले.

देवबंदमधील अनेक उलेमा ज्यामध्ये मौलाना हुसैन अहमद मदनी, मौलाना सज्जाद वगैरेंचा समावेश होता, त्यांनी पाकिस्तान चळवळीला सुरुवातीपासून विरोध केला. पाकिस्तान ही संकल्पना राजकीय बालिशपणा तर आहेच, तो धर्मद्रोहदेखील आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. मौलाना आझादांनीही थोड्या फार फरकाने हीच भूमिका घेतली. अशा शेकडो उलेमांनी अखंड भारताच्या समर्थनार्थ अखेरपर्यंत आंदोलनं केली. पण त्यात त्यांना यश आले नाही. म्हणून हे मौलवी पाकिस्तानात निघून गेले नाहीत. त्यांनी भारतात राहून या देशासोबत आपल्या भविष्याची स्वप्न रंगवली.

माझ्या पुस्तकातील शेवटचा लेख उर्दू भाषेचा जन्म, त्याची निधर्मी भूमिका व उर्दूसोबत झालेला अन्याय याचा आढावा घेणारा आहे. या लेखात उर्दूचा जन्म कसा झाला, याची मांडणी केली आहे. उर्दू भाषेच्या सुरुवातीच्या शिलालेखांपैकी एक शिलालेख सोलापूरच्या जामा मस्जिदीवर सापडला आहे. उर्दू भाषेचे सुरुवातीचे ग्रंथ कदिम उर्दू (जुनी उर्दू) म्हटल्या जाणाऱ्या दखनीत लिहीले गेले. हे दखनी ग्रंथ महाराष्ट्रातल्या औरंगाबाद परिसरात म्हणजे दौलताबाद, खुलताबाद या भागात आकाराला आले. औरंगाबादनेच दखनीला वली दखनी व सिराज औरंगाबादी हे महत्वाचे कवी दिले. औरंगाबादची स्थापना ही मुळात उत्तरेच्याविरोधातील दखनी आग्रहातून केलेल्या राजकारणातून झाली होती. मलिक अंबर हा काळा गुलाम कालांतराने सत्ताप्रमुख झाला. पुढे इथल्या सावळ्या दखनी मुसलमानांचे नेतृत्वही त्यानेच केले. हा सारा दखनी इतिहासाचा पट औरंगाबाद परिसरात होता, म्हणून आम्ही नामांतराला विरोध करत होतो. पण आमच्या भूमिकांकडे धार्मिक ओळखीच्या आधारे पाहिले गेले.

उर्दू ही भाषा खऱ्या अर्थाने ‘दखनेची कन्या’ आहे.

उर्दू ही भाषा खऱ्या अर्थाने ‘दखनेची कन्या’ आहे. पण तिच्या इतिहासाचा पट दुर्लक्षीत करुन या दखनेतच तिचा अपमान केला गेला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर उर्दू भाषेवर सातत्याने अन्याय झाला. उर्दूच्या संवर्धनासाठी व तिच्या प्रसारासाठी विशेष काहीच केले गेले नाही. स्वातंत्र्य चळवळीत बहुसंख्यांकांच्या नेत्यांनी उर्दूविषयी जी भूमिका घेतली, तीच भूमिका स्वातंत्र्यानंतर राज्यव्यवस्थेतील सनदी आधिकाऱ्यांनी आणि सत्तापक्षांनी सातत्याने घेतली. त्यामुळे उर्दू भाषा भारतातच परकी ठरली. 

राष्ट्रवादाच्या एकूण विकासातील हे टप्पे व त्याला मुसलमानांनी दिलेला प्रतिसाद समजून घेतल्याशिवाय भारतातील जमातवादाचे स्वरुप स्पष्ट होणार नाही. त्यामुळेच जमातवादाच्या उगमाचा आणि जमातवादाच्या माऱ्यात हरवलेल्या अल्पसंख्याकांच्या सांस्कृतीक अस्तित्वाचा शोध घेताना या पुस्तकाची निर्मिती झाली. या प्रसंगी एका व्यक्तीचे मला विशेषत्वाने आभार मानावे लागतील. ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी त्यांच्या ‘बदलता भारत’ या द्विखंडीय प्रकल्पात ‘राष्ट्रवाद आणि मुसलमान’ या विषयावर लिहीण्यास सांगितले. किंबहुना माझा पिच्छा पुरवत त्यांनी हे लिखाण माझ्याकडून करवून घेतले. त्यांचे आभार मानतो. आणि शेवटी हा पुरस्कार देणाऱ्या समितीचे विशेषत्वाने आभार मानतो. कारण ज्याकाळात फकरुद्दीन बेन्नूर, शहाजिंदे, अलीम वकील, ए.के.शेख, अजीज नदाफ वगैरे मंडळी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ उभारत होते, त्याकाळात भा.ल.भोळे, यशवंत सुमंत यांनी त्यांची कृतीशील पाठराखण केली होती. अशा भा.ल. भोळेंच्या नावे पुरस्कार माझ्या पुस्तकाला मिळाल्याने मला आधिक आनंद होत आहे.

धन्यवाद.

सरफराज अहमद,

सोलापूर