Opinion

मुस्लिम ज्ञानविश्वावरील 'ब्राह्मणी दहशत' आणि पुरोगामीत्वाचे भवितव्य

साप्ताहीक विवेकच्या १६-२२ जानेवारीच्या अंकात हा लेख प्रकाशित झाला आहे.

Credit : Indie Journal

सरफराज अहमद | साप्ताहीक विवेकच्या १६-२२ जानेवारीच्या अंकात डॉ. प्रमोद पाठक यांचा ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि त्याची पाळेमुळे’ हा नाशिकात होणाऱ्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनावर चर्चा करणारा लेख प्रकाशित झाला आहे. पुढे हाच लेख दैनिक तरुण भारतच्या मुंबई आवृत्तीने थोडाबहूत बदल करत २१ जानेवारी रोजी पुनर्प्रकाशित केला आहे. या लेखाच्या माध्यमातून प्रमोद पाठक यांनी मुसलमान ‘या सांस्कृतीक दहशतवादावर’ बोलतील का? या सुरात त्यांना हव्या असलेल्या मुद्यांवर मुसलमान मोकळेपणाने चर्चा करणार  नाहीत, अशी भुमिका मांडली आहे. ही चर्चा करताना पाठकांनी धर्म आणि संस्कृती यात भेद न करता धर्माच्या क्षेत्रात घडलेल्या काही हिंसक घटना नोंदवून त्या सांस्कृतीक दहशतीच्या क्षेत्रात मोजण्याचा अवास्तवपणा केला आहे. त्याशिवाय ‘मुस्लिम – प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि ‘साहित्य सांस्कृतीक दहशतवाद’ या दोन विषयावर मतप्रदर्शन करण्यासाठी आयोजकांनी कोणा हिंदू वक्त्याला बोलावले असते, तर ते आधिक समर्पक ठरले असते. अखिल भारतीय म्हणवणाऱ्या संमेलन आयोजकांसाठी ते शोभून दिसले असते.’ असे पाठक यांनी सुचवले आहे.   

पाठकांनी आपल्या वक्तव्याला व ते ज्या मुल्यांवर निष्ठा ठेवतात त्याला शोभेल अशा पध्दतीने त्यांच्या लेखनात संदर्भांची सरमिसळ करुन विश्लेषणाला आधिकाधीक रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतीक दहशतीविषयी बोलणारे पाठक कधी शुक्रवारच्या नमाजनंतर होणाऱ्या आंदोलनांचा उल्लेख करतात, तर कधी आधुनिक काळातून थेट मध्ययुगात जातात. कधी आपल्या लिखाणात ते स्वतः म्हणतात त्याप्रमाणे ‘‘नामूलं लिख्यते किंचित’ म्हणजे सबळ पुराव्याशिवाय आपण काहीच लिहीले नाही हे दाखवण्यासाठी काही उर्दू वाक्ये उधृत करतात. ही वाक्ये उधृत करताना त्याचा साधा अर्थबोध होईल याचीही काळजी ते घेत नाहीत. एकेठिकाणी ते, ‘‘मौलवी लोक मुसलमानांवर ‘बदमिजाजी दिनी बंदे’ म्हणून टिका करतात.’’ असे म्हणतात. पण पाठकांनी लिहीलेल्या या उर्दू वाक्याला उर्दू व्याकरणाच्या दृष्टीने काहीच अर्थ प्राप्ती होत नाही. पण अशी वाक्ये उधृत केल्याने हे महाशय काहीतरी गंभीर लिहीत आहेत, असा उर्दू न जाणणाऱ्या वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आधिक आहे. पाठकांचे सबंध लिखाण अशाच अर्थहीन विधानांवर व परस्परविरोधी संदर्भांवर आधारीत आहे. पण पाठकांना अर्थबोध, संदर्भनिष्ठ तर्क, वास्तवाभिमुख निष्कर्ष अशा कोणत्याच गोष्टींशी काहीच सोयरसुतक नाही. कारण त्यांना आपल्या सांस्कृतीक वर्चस्वाला अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम मराठी साहित्य चळवळीला बदनाम करायचे आहे. 

 

मराठी मुस्लिमांची साहित्य चळवळ ही एकप्रकारची सांस्कृतीक लढाई आहे.

 

मराठी मुस्लिमांची साहित्य चळवळ ही एकप्रकारची सांस्कृतीक लढाई आहे. ही लढाई ज्ञानाच्या निर्मितीची आहे. ज्ञानाच्या पुनर्उभारणीची देखील आहे. आणि ती पाठक आणि त्यांच्या ज्ञानविश्वाच्या छुप्या व उघड समर्थकांविरोधात आहे.  मुस्लिमांकडून ज्ञानाची निर्मिती आणि पुनर्उभारणी ही पाठक ज्या मुल्यविश्वावर निष्ठा ठेवतात. त्याच पक्षाच्या हिताची व्हावी हा पाठकांचा आटापिटा आहे. त्यासाठी ते ‘चर्चा अशी व्हावी, यांना परिसंवादात का बोलावले नाही’ असा सूर लावून धरतात.  त्यामुळे पाठकांच्या विश्लेषणावर आधिक बोलण्याची गरज नाही. पण पाठकांच्या अनुषंगाने मुस्लिमांनी मराठीत अनुभवलेल्या व अनुभवत असलेल्या सांस्कृतीक दहशतीशी संबधीत असलेल्या काही घटना येथे नोंदवल्या तर मुस्लिम मराठी साहित्यविश्व कोणत्या सांस्कृतीक दहशतीकडे निर्देश करतंय ते आधिक स्पष्ट होऊ शकेल.

 

साने गुरुजींची ‘इस्लामी संस्कृती’ आणि कुरुंदकरांचा सांस्कृतीक आकस 

पहिली घटना भारत स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच घडलेली आहे. साने गुरुजींनी इस्लामी संस्कृती या नावाने दोन खंड लिहीले आहेत. त्याचा पहिला खंड महाराष्ट्रातील एका पुरोगामी संस्थेने प्रकाशित केला. हा खंड प्रकाशित होताच नरहर कुरुंदकरांनी प्रचंड आकांड-तांडव करत इस्लामी संस्कृतीवरील पुस्तक प्रकाशित करण्याची गरजच नव्हती, असे सांगायला सुरुवात केली. संबंधीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दबाव वाढवला. त्यामुळे साने गुरुजींनी लिहीलेल्या दोन्ही खंडापैकी दुसरा खंड पुढे प्रकाशित होऊ शकला नाही. हा खंड काही मंडळीनी नष्ट केल्याचे म्हटले जाते. याविषयी आजही महाराष्ट्रभर दबक्या आवाजात चर्चा केली जाते. पण कुरुंदकरप्रेमी सांस्कृतीक गटाच्या दबावापोटी अथवा त्या दडपणात याविषयी आजही कुणी बोलायला तयार नाही. कुरुंदकर आणि त्यांच्या समर्थकांचा वर्चस्वाचा अहंकार इतका तीव्र होता की, ते नथुरामसारख्यांचा राष्ट्रभक्त म्हणून सन्मान करुन आणि मौलाना आझादांसारख्या मुस्लिमांना जहीरीले ठरवूनही पुरोगामी ज्ञानविश्वाचे प्रतिनिधी म्हणून ते मिरवू शकत होते. 

पुढे याच नरहर करुंदकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी काही मुस्लिम विद्यार्थ्यांना विद्यापीठ नामांतराविरोधात मोर्चा काढण्यासाठी भडकावायला सुरुवात केली होती. हे विद्यार्थी त्यांना बळी पडले नाहीत, तेंव्हा काही ओबीसी विद्यार्थ्यांवर त्यांनी हाच प्रयोग करुन पाहिला. असे विषमतेचा व्यवहार करणारे कुरुंदकर समतावादी म्हणून आयुष्यभर मिरवत राहिले. डिकास्ट झाल्याचा कांगावा करत राहिले. प्रत्यक्षात जाणवे घालणारे कुरुंदकर जात सोडल्याचे सोयीने सांगत ती जाणव्याच्या रुपाने जपत सुखाने जगू शकत होते. कारण ते कुरुंदकर होते. त्यांच्याऐवजी इतरांनी यापैकी एकही गुन्हा केला असता, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतीक जीवनात तो कायमचा अस्पृश्य ठरला असता अथवा परिघाबाहेर टाकला गेल्याने विस्मृतीत तरी गाडला गेला असता.

 

असे विषमतेचा व्यवहार करणारे कुरुंदकर समतावादी म्हणून आयुष्यभर मिरवत राहिले.

 

टिपू सुलतान यांचा इतिहास दडपण्यासाठी पगडींचे षडयंत्र

दुसरी घटना कुरुंदकरांच्या परंपरेतूनच उभ्या राहिलेल्या सेतू माधव पगडींसंदर्भातील आहे. कर्नाटक सरकारने स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा आणि वसाहतवादविरोधी संघर्षाचा इतिहास लिहीण्याची योजना आखली. त्यात टिपू सुलतान आणि हैदर अली या पितापुत्रांचा समावेश केला. हा प्रकल्प कसा अयोग्य आहे, हे दाखवताना पगडींनी टिपू सुलतानांच्या बदनामीसाठी अनेक लेख लिहीले. आणि कर्नाटक सरकारला या इतिहासलेखनाच्या प्रकल्पापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पगडींनी लिहीलेले लेख मीर हुसैन अली किरमानी या टिपू सुलतान यांच्या दराबारात राहिलेल्या समकालीन इतिहासकाराच्या ग्रंथावरुन लिहीले आहेत. त्यामुळे या लिखाणाचे ऐतिहासिक महत्व आधिक आहे, असे पगडी म्हणतात. पण पगडी किरमाणीने हा ग्रंथ टिपू सुलतान यांची सत्ता खालसा झाल्यानंतर इंग्रजांची पेन्शन घेऊन त्यांच्याच प्रेरणेने टिपू सुलतान यांची बदनामी करण्यासाठी लिहीला होता, हे मात्र सोयीने लपवून ठेवतात. पगडी व कुरुंदकर या पध्दतीने वागण्यामागे ज्ञानाच्या क्षेत्रातील वर्चस्वाचे राजकारण आहे. ज्ञानक्षेत्रातील आपले वर्चस्व अबाधीत ठेवण्यासाठी ही त्यांची धडपड आहे.   

ज्ञाननिर्मिती ही आपलीच मक्तेदारी आहे. इतरांनी आपण निर्माण केलेल्या ज्ञानाच्या पाट्या वहाव्यात, असे कुरुंदकर, पगडी वगैरेंना सातत्याने वाटत आले आहे. इतरांनी ज्ञानाची निर्मिती केली तर त्यांच्यात आत्मभान जागृत होऊन ते आपल्या वर्चस्वाला धक्के देतील, त्यामुळे त्यांना ज्ञाननिर्मितीपासून परावृत्त करायचे. त्यांच्या पक्षातील ज्ञाननिर्मिती रोखून धरायची हा कुरुंदकर व पगडी वगैरेंचा हेतू आहे. म्हणूनच मुसलमानांच्या पक्षातील ज्ञान विकसित होऊ नये. त्या ज्ञानाच्या बळावर हा समाज उभा राहू नये यासाठी सांस्कृतीक वर्चस्व गाजवणाऱ्या या छुप्या ब्राह्मण्यवाद्यांनी नेहमी दक्षता घेतली आहे. स्वतःच्या पक्षातील अत्यंत खोट्या गोष्टी या लोकांनी सर्वप्रकारच्या शक्तीचा वापर करुन ज्ञानक्षेत्रात प्रस्थापित केल्या आहेत.

 

डॉ. प्रमोद पाठक (सौजन्य- ई-विवेक)

 

      

अरेबीयन नाईट्स मराठीत येऊ नये म्हणून षडयंत्र

कुरुंदकरांनी इस्लामी संस्कृतीवेळी जे उद्योग केले, तेच उद्योग अरेबीयन नाईट्स मराठीत प्रकाशित होऊ नये, यासाठी पुण्यातल्या तथाकथित ‘संस्कृतीरक्षक’ टोळीने केले.  रमेश रघुवंशी यांनी अरेबीयन नाईट्स मराठीत अनुवादीत करुन घेऊन ते आपल्या प्रकाशन संस्थेमार्फत भाषांतरीत करण्याची योजना आखली होती. १९७५ सालची ही घटना आहे. त्यावेळी दुर्गा भागवत यांना रघुवंशी यांनी प्रस्तावना लिहीण्याची विनंती केली. तेंव्हा भागवतांनी कसा अनुभव दिला हे रघुवंशी यांनी अरेबीयन नाईट्सच्या पहिल्या खंडात लिहीलेल्या मनोगतात लिहीले आहे. ते मुळापासून वाचण्यासारखे आहे. दुर्गा भागवतांनी सुरुवातीला प्रस्तावना लिहीण्याचे मान्य केले. नंतर मात्र अरेबीयन नाईट्स मराठीत येऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या दडपशाहीला बळी पडून प्रस्तावना न लिहीण्याची भूमिका घेतली. काहींनी तर रघुवंशींना ‘या ग्रंथासंदर्भात एक ओळही महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात कशी छापून येते ते पाहतो.’, अशा धमक्याही दिल्या. शेवटी रघुवंशी या कशालाच घाबरत नाहीत हे पाहिल्यानंतर या सांस्कृतीक दहशत पसरवणाऱ्या टोळीने महाराष्ट्र राज्य कागद वाटप समितीकडे रघुवंशी यांनी केलेला अर्ज बाद ठरवला. अरेबीयन नाईट्ससाठी रघुवंशी यांना कागद मिळणार नसल्याचे कळवले. पण रघुवंशी या कुणालाच घाबरले नाहीत. त्यांनी अरेबीयन नाईट्सचे सर्व खंड मराठीत आणले. 

या प्रकल्पाच्या पहिल्या खंडाच्या मनोगतात रघुवंशी यांनी ‘अरेबीयन नाईट्स’ चा कर्ता सर रिचर्ड बर्टनच्या नावे एक पत्र लिहीले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘हा ग्रंथ प्रसिध्द केल्याबद्दल मला कोणी गुन्हेगार ठरविलेच – कोणी माझ्याशी दोन हात करायचे योजलेच तर मी माझी छाती खुली करुन कोर्टाला सांगेन ‘महाराज, हा ग्रंथ मी छापला आहे. याची सर्व जबाबदारी मी घेत आहे. हा ग्रंथ प्रकाशित करुन मी माझ्या भाषेची व देशाची सेवाच केली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, मी गुन्हा केला आहे, तर आपण मला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देईपर्यंत हा गुन्हा पुन्हा करीन, पुन्हा करीन, पुन्हा करीन’’

मुसलमानांविषयी मराठी वाचकांची समज ब्राह्मणी ज्ञानविश्वाच्या निकषावरच विकसित व्हावी यासाठी ही सारी धडपड होती. जर अरेबियन नाईट्स ग्रंथ मराठीत आले. अथवा मुस्लिम ज्ञानविश्वाचे स्वयंभू, सार्वभौम अस्तित्व निर्माण झाले तर आपण हिंदू मुस्लिम सहजीवनात विद्वेषाचे बीज पेरु शकणार नाही. आणि त्यातून भारतीय समाजावर प्रभुत्व गाजवता येणार नाही, याची खात्री या सांस्कृतीक दहशत माजवणाऱ्या टोळीला आहे. आपले प्रभुत्व टिकवण्यासाठी ही टोळी वेगवेगळ्या रुपात महाराष्ट्रात कार्यरत आहे. ती कधी पुरोगामित्वाची झुल पांघरते. तर कधी समाजवादी वा मार्क्सवादी होऊन मानवतावादाचा आव आणते. पण आपल्या मुल्यनिष्ठांशी ती कधीच फारकत घेत नाही. असाच अनुभव मला स्वतःलाही हैदराबादच्या इतिहासाविषयी आसिफजाही हे संपादित खंड प्रकाशित केल्यानंतर आला.

 

एका पुस्तकामुळे मला एमआयएमचा एजंट ठरवले 

दखनी मुसलमानांची सांस्कृतीक मुल्ये, त्यांचा इतिहास, भाषा, सामाजिक जीवन, लोकसंस्कृती ही उत्तरेतल्या मुसलमानांपेक्षा निराळी आहे. त्यांचे भारतीयत्व उत्तरेच्या मुसलमानांपेक्षा वेगळ्या मुल्यांवर अधिष्ठीत आहे. त्यामुळे उत्तरेच्या मुस्लिमांसोबत एकजिनसीकरण करुन दखनी मुस्लिमांना एकजिनसी राष्ट्रीय ओळख मिळू नये. म्हणूनच उत्तरी व दखनी मुसलमानांतील प्रादेशिक भेद स्पष्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या इतिहासाची नव्याने मांडणी करावी लागेल. त्यासाठीच मागील काही वर्षांपासून आम्ही दखनी मुस्लिमांच्या साहित्य, संस्कृती व इतिहासाविषयी काही गोष्टी नव्याने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. या उद्देशानेच दखनी मुस्लिमांच्या सामाजिक व सांस्कृतीक जीवनावर मोठा परिणाम करणाऱ्या आसिफजाही या राजवटीसंदर्भात आठ खंडातून त्या इतिहासाची समकालीन साधने मराठीत आणण्याची योजना आखली. 

 

या प्रकल्पाचा पहिला खंड प्रकाशित होताच औरंगाबादेतील एक प्राध्यापक महाशय ‘सरफराज हा एमआएमचा एजंट आहे.’, ‘तो धर्मांध आहे.’ हे सांगत सुटले.

 

या प्रकल्पाचा पहिला खंड प्रकाशित होताच औरंगाबादेतील एक प्राध्यापक महाशय ‘सरफराज हा एमआएमचा एजंट आहे.’, ‘तो धर्मांध आहे.’ हे सांगत सुटले. ‘दिव्य मराठी’ या दैनिकाच्या पुरवणीत मध्यंतरी मी लिखाण करायचो. त्यावेळी या गृहस्थांनी त्या दैनिकाच्या संपादकांना फोन करुन ‘सरफराजवर तुमचे जास्तच प्रेम दिसतेय.’ अशी विचारणा करुन पुन्हा ‘सरफराज एमआयएमचा एजंट’ असल्याचा धोशा लावला. याप्रमाणेच लातुरच्या एका पर्यावरणवादी कार्यकर्त्याने देखील हेच उद्योग केले. उमरगा येथे एका कार्यक्रमात माझ्या जवळच्या स्नेह्याला ‘सरफराज हा एमआयएमचा एजंट’ असल्याचे सांगितले होते. त्यावर त्यांनी खुलासा केल्यानंतर हे महाशय थोडेसे नरमले. पण ‘अमीर खुसरो – दारा शुकोह’ हा माझा लेखसंग्रह आल्यानंतर त्या महाशयांचे पित्त खवळले. पुन्हा त्यांनी कुजबुजीतून बदनामीची जुनीच पध्दत अवलंबली. 

इस्लामी संस्कृती असो वा अरेबियन नाईट्स किंवा आसिफजाही या छुप्या व उघड ब्राह्मणी टोळक्याने आपल्या जातबंधुंचे सांस्कृतीक वर्चस्व धोक्यात येऊ नये म्हणून अवलंबलेली पध्दत एकसारखी आहे. काल परवा इशरत जहांवरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावर पोलीसांनी पुण्यात बंदी घातली. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात बीबीसीची डॉक्युमेंटरी प्रकाशित झाल्यानंतर सरकारने आदेश काढून ती ब्लॉक केली. या डॉक्युमेंटरीवर बंदी घातली गेली. या बंदीविरोधात आसिफजाहीवेळी माझ्या अभिव्यक्तीला मर्यादा घालणारे अनेक जण बोलायला लागले. मोदींना शिव्या घालून आपले पुरोगामित्व सिध्द करण्याची संधी ते कशी सोडतील? अशाप्रकारचे पुरोगामित्व सिध्द करायचे व पुरोगामी चळवळीअंतर्गत कुजबुजीतून सांस्कृतीक दहशत पसरवयाची. असे निराळेच कसब या लोकांनी विकसित करुन ठेवले आहे. 

मुस्लिमांविषयी ज्या गोष्टी संघाने राजकीय आणि सांस्कृतीक मुल्ये म्हणून स्विकारली आहेत, त्याच बाबी पुरोगामी, समाजवादी वर्तुळात प्रचलित करण्यात कुरुंदकर, पगडी व ‘त्या’ प्राध्यापकांसारख्या सोकॉल्ड डिकास्ट ब्राह्मण्यवाद्यांचा हात आहे. आणि पुरोगाम्यांमध्ये मुस्लिम प्रश्नांवर सार्वकालीक गफलत निर्माण करुन या लोकांनी एकप्रकारे संघाचे हात बळकट केले आहेत. मुस्लिमांविषयी भयंकर गफलतीत असणारे पुरोगामी जोपर्यंत मुस्लिमांविषयी स्वतःची ब्राह्मणी ज्ञानविश्वाच्या प्रभावातून मुक्त अशी मते विकसित करत नाहीत, तो पर्यंत ते संघाविरुध्द लढू शकणार नाहीत.