Quick Reads
सईद मिर्झा यांना ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल’ चा जीवनगौरव पुरस्कार
१७ ते ३१ जानेवारी दरम्यान होणारा हा फिल्म फेस्टिवल यावर्षी कोव्हीडमुळे ऑनलाईनंच भरवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट विजेते आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सईद मिर्झा यांना 'इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल' (आयसीए) कडून जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. १७ ते ३१ जानेवारी दरम्यान होणारा हा फिल्म फेस्टिवल यावर्षी कोव्हीडमुळे ऑनलाईनंच भरवण्यात येणार आहे. या वर्षी ४५ देशांमधून ३१० चित्रपट या महोत्सवात आले आहेत. 'नुक्कड' या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिकेसोबतंच 'अरविंद देसाई की अजीब दास्तान', 'मोहन जोशी हाजिर हो', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'सलीम लंगडे पे मत रो' व 'नसीम' अशा सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या आशयघन चित्रपटांचं दिग्दर्शन मिर्झा यांनी केलं आहे.
मिर्झा यांनी १९७८ साली पुण्याच्या फिल्म इंस्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेऊन ८० च्या दशकातील समांतर चित्रपट निर्मितीत मोठं योगदान दिलं. शाम बेनेगल, गोविंद निहलानी यांसारख्या दिग्दर्शकांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या १९९५ साली आलेल्या ‘नसीम’ या चित्रपटात कैफी आझमी यांनी भूमिका केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
याशिवाय इंतजार या टीव्ही सिरियलसह अनेक वृतचित्रं व माहितीपटांचीही त्यांनी निर्मिती केली. चित्रपटनिर्मितीव्यतिरिक्त सामाजिक कार्यातील त्यांचं योगदानही उल्लेखनीय आहे. सामाजिक सलोख्यासाठी काम करणार्या 'अनहद' या संस्थेचे ते विश्वस्त असून त्यांचं 'अम्मी: लेटर टू डेमोक्रेटिक मदर' हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या दिवंगत आईशी पत्रांद्वारे संवाद साधला होता. त्यातून बदलत्या भारतातील लोकशाही मूल्य जपणार्या स्त्रीचं सुंदर चित्रण करण्यात आलंय.
सामाजिक संदेश देणारा उद्देशपूर्ण सिनेमा बनवलेल्या पण आज सिनेरसिकांच्या विस्मृतीत गेलेल्या प्रतिभावान सिनेकलाकारांना या इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. स्मृतिचिन्ह, शाल व दहा हजार रुपये रोख असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार सागर सरहदी यांना असगर वजाहत यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला होता. यावर्षी हा पुरस्कार सईद मिर्जा यांच्या निवासस्थानी आयोजन समितीचे सदस्य प्रत्यक्ष जाऊन प्रदान करतील.
सूचना: इंडी जर्नल आयसीए फिल्म फेस्टिव्हलचे ऑफिशियल मीडिया पार्टनर आहे.