Opinion

शहरी इव्हेंटची हौस भागवण्यासाठी ग्रामीण भाग किंमत मोजणार

शहरी भागातील त्यांच्या भक्तांच्या अति उत्साहाचा भार ग्रामीण जनता सोसणार.

Credit : the week

आजच्या ९ मिनिटांच्या नाट्यामुळे करोना महामारी च्या लढाईत कसलीच मदत होणार नाही आणि दुसरं म्हणजे या ९ मिनिटांच्या ड्रामा साठी देशाला काही कोटींची किंमत मोजावी लागणार आहे. कसे हे जरा थोडक्यात पाहू. 

आपल्या विजेचे ग्रीड हे जरी भरोशाचे आणि मजबूत असले तरी देखील एकाच वेळी ९ वाजता  इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी विजेचे दिवे बंद करणे आणि परत ९ मिनिटांनी ते सुरू करणे ही घटना पहिल्यांदाच घडणार आहे. त्यामुळे अशा कमी वेळाच्या वीज भारातील चढ-उताराला कसे नियंत्रित करायला हवे, याचा आपल्या विजेच्या ग्रीडचे व्यवस्थापन करणाऱ्या (लोड डिसपॅच सेंटर) विभागांना अनुभव नाही. गेले दोन दिवस ते हा ९ मिनिटांचा खेळ कसा विजेच्या ग्रीडला धोका न पोचवता खेळता येईल यासाठी अहोरात्र झटत आहे.  

आता जेव्हा संपूर्ण देश करोनाच्या संकटातून जात आहे तेव्हा देशात त्यासाठी पहिल्या फळीत लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर अत्यावश्यक सेवांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वर्गाला जी आवश्यक मदत लागेल ती पोचवणे, देशात लाखोंच्या संख्येने जे विस्थापित कामगार मजूर आहेत त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे किंवा घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थिती वर लक्ष केंद्रित करणे इ. अनेक कामं खरंतर सरकार पुढे आ वासून उभी आहेत. पण आपल्या प्रधान सेवकांनी काय ठरवलं तर ५ एप्रिल रोजी ९ वाजता ९ मिनिटांचा हा प्रकाशाचा खेळ. हे मध्यम वर्गाला फक्त डोळ्यासमोर ठेवून बिग बॉस च्या अविर्भावात वेगवेगळे टास्क (मनोरंजनाचे कार्यक्रम) देण्यापालिकडं काही नाही. 

असो, पण आपल्या या प्रधान सेवकांच्या हौसेखातर आता लाखो वीज कर्मचारी हा खेळ सुखरूप होण्यासाठी डोळ्यात तेल घालून ग्रीड सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणार. आता तुम्ही म्हणाल हे आवश्यक होतं का , आता याच काय आहे बघा की मराठीत एक जुनी म्हण आहे, आले देवाजीच्या मना त्याच्यापुढे कोणाचे चालेना. तर असो. आपण एक वेळ असं म्हणून चालू की देशातील जनता कळत नकळत याकडं दुर्लक्ष करेल आणि मोठ्या प्रमाणात प्रधानसेवकांचं हे आवाहन अंमलात नाही आणणार. जर असं झालं तर खरच आपण ग्रीड संतुलन बिघडून पूर्ण देश किव्वा देशाचा काही भाग ब्लॅक आऊट (संपूर्ण काळोख) सारख्या संकटातून सुखरूप सुटेल. दुसरीकडं वीज व्यवस्थापन करणाऱ्या विभागांनी काल पासूनच काळजीने जनतेला आवाहन करायला सुरुवात केली आहे की कृपया फक्त लाईट्स बंद करा, कोणीही पंखे , घरातील उतार विजेची उपकरणे बंद नका करू. 

याचा अर्थ एकच आहे की वीज विभागाला आज ९ वाजता वीज भारामध्ये किती तफावत होणार आहे याचा अंदाज नाही आहे आणि शक्यतो ती कमीत कमी व्हावी म्हणून अशा स्पष्टीकरणाचा संदेश ते वीज ग्राहकांना देऊ पाहत आहे. हे सगळं का तर साधारण जर फक्त विजेचे दिवे बंद केले गेले तर विज भाराच्या चढ उतार हा तुलनेने कमी होईल. पण हे सगळं लोकांच्या वर्तणुकीवर आहे म्हणून त्यांना कोणत्याही टोकाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी लागेल. 

आपल्या देशात अगोदरच करोनामुळे व्यवसाय आणि दुकाने बंद आहेत आणि आपली विजेची मागणी २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली आहे.  देश पातळीवर १६० GW वीज भाराच्या ऐवजी आपण गेले काही दिवस फक्त १२० GW वीज भार वर आलो आहोत. याचाच अर्थ कोळश्यावर चालणारे आपले वीज संच बरेचसे बंद तरी आहेत किंवा त्यांच्या तांत्रिक किमान पातळीवर ते चालत आहेत. आपला देश हा अशा कोळशावर चालणाऱ्या वीज संचातूनच मोठ्याप्रमाणावर आपली वीज उत्पन्न करत आहे. आता अशा वीज संचाची एक तांत्रिक मर्यादा असते ती म्हणजे अशी कोळशावर चालणारी वीज निर्मिती संच (कोल प्लांट) वीज भारातील काही मिनिटांमध्ये होणाऱ्या वीज भारातील ताफवातील तत्पर प्रतिसाद देऊ शकत नाही. 

वीज भारातील लक्षणीय ताफवातील प्रतिसाद देण्यासाठी त्यांना किमान अर्ध्या तासापासून ते तीन तासापर्यंतचा कालावधी लागतो. त्यामुळे जर ९ मिनिटांसाठी देशातील वीज ग्राहक दिवे बंद आणि चालू करणार असतील तर त्यासाठी लागणारी तत्पर प्रतिसादाची क्षमता कोल प्लांट मध्ये नसल्यामुळे आपल्याला इतर वीज निर्मिती संच म्हणजेच जलविद्युत संच आणि गॅस संच उपयोगात आणावे लागतील आणि तेदेखील ९ मिनिटांसाठी नाही तर त्या अगोदर सुमारे चार ते पाच तास अगोदर त्यांना सुरू करून कमी क्षमतेवर तयार ठेवावे लागतील. अशी सूचना पोसोको, जो देशपातळीवर वीज व्यवस्थापन सांभाळतो, यांनी सर्व राज्यातील संबधित विभागांना पाठवली आहे. जर ही सूचना नीट पहिली तर वर म्हणलेल माझं म्हणणं तुम्हाला पटेल ज्यात त्यांनी देखील जल विद्युत वीज निर्मिती संच आणि गॅस वीज निर्मिती संचास आजच्या नाट्यासाठी तयार होण्यास सांगितले आहे. आता याचा आर्थिक बोजा वीज ग्राहकांवर पडणार आहे की जो करोडोंमध्ये आहे. 

याचे साधे कारण की हे अतिरिक्त वीज निर्मिती संच महाग असतात आणि गेले कित्येक दिवस ते विजेची मागणी कमी असल्याने बंद आहेत. म्हणजेच आता ही महागडी वीज आज खरेदी करावी लागणार आणि तिचा भार वीज ग्राहकांवर पडणार. वर ही फक्त ९ मिनिटांसाठी आणून नाही चालणार तर काही तास अगोदरच ती कमी क्षमतेवर चालू ठेवावी लागणार. हा भुर्दंड का सहन करावा तर आपल्या पब्लिकमध्ये इमेज मेकिंग करण्यासाठी. म्हणतात ना होऊ द्या खर्च, तशीच काही तरी ही गोष्ट आहे. 

अजून एक दुसरी गोष्ट , ग्रीड बॅलन्स ही अशी गोष्ट आहे की ज्याद्वारे तुम्हाला प्रत्येक क्षणाला वीज निर्मिती आणि त्याचा वापर यांचा मेळ घालावा लागतो ज्याद्वारे तुम्ही ग्रीड फ्रीक्वेनसी (ग्रीड वारंवारता ) ५० हर्ट्झ (50Hz) ठेवायचा प्रयत्न करता. या ९ मिनिटांच्या नाट्यामुळे त्यामध्ये तफावत येऊन ती तिच्या सहनशील श्रेणीच्या  आवश्यक मर्यादेपेक्षा बाहेर जाऊन ग्रीड संतुलन धोक्यात येण्याची शक्यता आहे. हेदेखील वीज व्यवस्थापन करणाऱ्या विभागाला माहीत आहे. म्हणूनच पोसोको ने दिलेल्या सूचनेनुसार यावर उपाय काय केलाय तर आपण ही वीज वारंवारताची सहनशील श्रेणीची आवश्यक मर्यादा खास आजच्या दिवसासाठी  साठी सैल करणार आहोत. म्हणजेच आपले वीज ग्रीड जर ५०.०५ Hz ते ४९.५ Hz मध्ये चालवण्याऐवजी आज आपण ते ५०.२० ते ४८.० या मर्यादांमध्ये चालवणार, जेणेकरून ९ वाजता च्या नाट्या मुळे येणाऱ्या ताफवतीला मॅनेज करण्यासाठी जास्त मोठी श्रेणी वापरता येईल. 

याचा अर्थ की मागील कित्येक वर्षे ही सहनशील श्रेणी कमी कमी करत जाण्याच्या आपल्या प्रयत्नांच्या विरोधात आज आपण ती जास्त सैल करणार. तुम्ही म्हणाल यात काय विशेष ठीकच आहे की मग एका दिवसासाठी केली सैल तर काय विशेष. त्यावर उत्तर एकच आहे की या अगोदर जेव्हा इतर नैसर्गिक आपत्ती देशावर आल्या तेव्हा देखील ज्या ग्रीड वारंवारता च्या मर्यादेला आपण सैल करण्यास नकार दिला, या आपल्या शिस्तशीर वागण्याच्या वर्तणुकीला आपण आज प्रधान सेवकांच्या पी. आर. स्टंट साठी तिलांजली लावणार. ठीकच आहे मग. मी म्हणलोच आहे अगोदर होऊ द्या खर्च. बरं याचा परिणाम काही तास तरी तुमच्या घरातील व्होल्टेज चा दबाव कमी असण्यातून तुम्हाला कळेल, मी आशा करतो की या कामी दाबा मुळे तुमच्या घरातील इतर उपकरणांना काही इजा होऊ नये.  

दुसरी ग्रीड संतुलनाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या भागातील (माझ्यामते शहती भागत हे जास्त होईल ) वीज भार जेव्हा झपाट्याने कमी आणि जास्त होईल तेव्हा आपले ग्रीड हे सलग जोडलेले असल्याने, दुसऱ्या एखाद्या भागात ( माझ्या मते  ग्रामीण भागात)  त्याच्यामुळे सर्ज किंवा लाट तयार होऊन ग्रीड संतुलन बिघडू शकते. आता याची शक्यतादेखील लक्षात घेऊन पोसोको ने विविध भागातील आवश्यक रिले, कॅपेसीटर्स आणि इतर आवश्यक उपकरणांद्वारे असे भाग त्वरित वेगळे करून त्याचा परिणाम ग्रीड कोलमडून जाऊ नये म्हणून काळजी घेण्याची काळजीवाहू सल्ला सर्व राज्यातील ग्रीड संतुलन विभागांना दिला आहे. म्हणजेच काय जर काही अत्यावश्यक उपाय करावे लागल्यास ग्रामीण भागातील वीज  काही काळासाठी प्रथम बंद केली जाणार आणि हळू हळू मग त्यांना परत सिस्टीम मध्ये आणलं जाणार. म्हणजे हौसेखातर आणि शहरी भागातील त्यांच्या भक्तांच्या अति उत्साहाचा भार ग्रामीण जनता सोसणार. 

वीज क्षेत्र सध्या ज्या काही आर्थिक आणि तांत्रिक अडचणीतून जात आहे त्यात त्यांना या अकस्मिकतेला का समोर जावं लागतंय , तर आपल्या प्रधान सेवकांनी एक आण्याची जी काही घोषणा केली आहे तिच्यासाठी हा बारा आण्याचा मसाला पडद्यामागे बसून वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बनवावा लागणार. असो एका डॅनिश लेखकाने लिहून ठेवलेल्या गोष्टी प्रमाणे कोण सांगणार राजाला त्याच्या नवीन पोशाखाबद्दल हा खरा प्रश्न आहे .कारण जर हे लवकर लक्षात नाही आले तर जनतेचे कधी कपडे कधी उतरवले जाणार नाहीत याची शाश्वती कोणीही देणार नाही.