India

सोशल मीडिया आणि ऑनलाईन पेटीशन मधून मोदींच्या राजीनाम्याची मागणी करतायत लाखो युझर्स

फेसबुक तसंच ट्वीटरवर कालपासून #resignmodi हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता.

Credit : इंडी जर्नल

Change.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याबद्दल एक याचिका सादर केली आहे जिला समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मृणाल मथुरिया यांनी हि याचिका दाखल केली असून सदर याचिका ही पत्र स्वरुपात आहे. भारतीय सामान्य नागरिक आणि विरोधी पक्ष प्रमुखांच्या नावे ही याचिका लिहिली गेली असून लोक त्यावर ऑनलाईन 'सही' करून आपली या याचिकेला सहमती दर्शवत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी पदउतार होण्यासाठी सध्या विविध माध्यमातून चळवळ चालू झाली आहे. जगभरातून मोदींवर टीका होत असताना ह्या याचिकेच्या माध्यमातून त्यामध्ये भर पडली आहे. कोरोनाची दुसरी लाट हाताळताना भारतीय प्रशासन कशाप्रकारे हतबल ठरत आहे हे आपण आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीच्या माध्यमातून बघतच आहोत. ऑक्सिजन आणि व्हेन्टीलेटर ची कमतरता, लसींचा अभाव यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण झालेला आहे. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे सर्व स्तरांतून केंद्र सरकारवर टीका होत आहे.मथुरिया यांनी दाखल केलेल्या ह्या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पतंजलीचे कोरोनील हे कोरोनावर उपयोगी औषध आहे असं सांगण्यापासून ते हरिद्वार येथे कुंभमेळ्यासाठी झालेली गर्दी टाळू न शकलेलं सरकार यांचा उल्लेख केलेला आहे.

पश्चिम बंगाल मधील निवडणूक रॅली साठी झालेल्या गर्दीला पंतप्रधान आणि केंद्रातील इतर मंत्र्यांनी किती महत्व दिलंय त्यावरूनच सरकार कशाला प्राधान्य देतंय हे समजत असल्याचं त्यांनी लिहिलंय. कोरोनाच्या पहिल्या लाटेमधून धडा घेतलेला असताना आणि दुसर्‍या लाटेची कल्पना असताना वर्षभरात कोणत्या उपाययोजना केंद्रांनी केल्या असा प्रश्सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. आत्तापर्यंत एक लाख अठरा हजारपेक्षा जास्त लोकांनी यावर सही केलेली असून ही संख्या वाढतच आहे. 

 

 

सोशल मीडियावर #resignmodi चा ट्रेंड 

वेगवेगळ्या टीकात्मक टिप्पण्यांसोबतच फेसबुक तसंच ट्वीटरवर कालपासून #resignmodi हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. या हॅशटॅगला फेसबुकनं काही काळासाठी 'कम्युनिटी गाईडलाईन्स' विरोधात गेल्याबद्दल बॅन केलं होतं मात्र हजारो तक्रारी फेसबुककडे आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदवल्या गेल्यानंतर फेसबुकनं हे सर्व 'नजरचुकीनं' झाल्याचं सांगत हा हॅशटॅग पुनर्स्थापित केला. या हॅशटॅग वापरून फेसबुकवर आत्तापर्यंत जवळपास ६७ हजार पोस्ट्स आलेल्या आहेत, त्याचसोबत ट्विटरवर #ResignPMModi #ExitModi #ModiResign या हॅशटॅग्सचे मिळून एकूण ७० ते ८० हजार ट्वीट्स आलेले आहेत.