India
चंद्राबाबूंच्या २०२४ मधील विजयामधे निवडणूक आयोगानं संध्याकाळी ६ नंतर अशक्यप्राय आकडेवारी नोंदवली; मात्र त्याची चौकशीच केली नाही
'इलेक्शन ऑडिट' मालिका : निवडणूक आयोगाच्या अंतर्गत नोंदी
वार्तांकन: सुमेधा मित्तल, वेंकटेश नायर
संपादन: फुर्कान अमीन
हे इन्व्हेस्टीगेशन 'द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह'कडून करण्यात आलं आणि मूळस्वरूपात ते इंग्रजीत इथं प्रकाशित झालं.
या बातमीचा मराठी अनुवाद अधिकृतरीत्या इंडी जर्नल प्रकाशित करत आहे.
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील चित्तूरमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला एका दिवसाच्या अंतरानं पाठवलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालांमध्ये संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मतदान करणाऱ्या मतदारांच्या दोन वेगवेगळ्या संख्या असल्याचं ‘द रिपोर्ट्स कलेक्टिव्ह’च्या तपासात समोर आलं आहे.
एका अहवालात अधिकाऱ्यांनी संध्याकाळनंतर ५६,०६७ मतदारांनी मतदान केल्याचं लिहिलं आहे. तर दुसऱ्या अहवालात फक्त २४,५९६ मतदारांनी रात्री उशिरापर्यंत थांबून मतदान केलं असल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं.
मतदारांच्या संख्येतील या ३१ हजारांहून अधिकच्या फरकामुळं निवडणूक आयोगात धोक्याची घंटा वाजणं अपेक्षित होतं. आंध्र प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केलं की इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएममधील) बिघाड आणि हिंसाचारामुळं रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. एका ठिकाणी तर पहाटे २ वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. विरोधी पक्षांनी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेलं हे असामान्य मतदान म्हणजे मतांची व्यवस्थात्मक फेरफार झाल्याची स्पष्ट चिन्हं असल्याचा आरोप केला होता.
तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपीचे) एन. चंद्राबाबू नायडू यांनी चित्तूरमधील कुप्पम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून नंतर मुख्यमंत्रिपद मिळवल्यामुळं या गायब मतदारांचा मुद्दा अधिकच महत्त्वाचा ठरतो. कुप्पम हा चित्तूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २०२४ मध्ये जेव्हा आंध्र प्रदेशमधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या, तेव्हा टीडीपीनं लोकसभेची जागा तसंच या सातही विधानसभा जागांवर विजय मिळवला.

मात्र, मतदानातील संभाव्य हेराफेरी निदर्शनास आणून देण्यासाठी तयार केलेले हे अहवाल निवडणूक आयोगात कुठेतरी गायब झाले, असं आम्हाला आमच्या तपासात आढळलं. हे अहवाल सार्वजनिक केले जात नाहीत. ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’नं हे अहवाल मिळवून त्यांचं विश्लेषण केलं. हा आमच्या 'इलेक्शन ऑडिट' मालिकेचा तिसरा भाग आहे.
आतापर्यंत आम्ही फक्त एका लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अहवालांची तपासणी केली आहे. इतर मतदारसंघांमध्ये नेमकं काय घडलं, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

निवडणूक आयोगाच्या चित्तूरमधील दोन अहवालांमध्ये संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मतदान करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. क्रेडिट: निदा फातिमा मोमीन
अशाच प्रकारे मतदारांच्या संख्येतील तफावत असणाऱ्या कोणत्याही मतदारसंघात संध्याकाळी ६ वाजल्यानंतर झालेल्या मतदानाच्या विश्वासार्हतेची हमी निवडणूक आयोग देऊ शकत नाही.
आम्ही निवडणूक आयोग आणि आंध्र प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे या आकडेवारीतील तफावतीबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. निवडणूक आयोगानं यावर काहीही उत्तर दिलं नाही. मात्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. यापैकी कोणाकडूनही उत्तर मिळाल्यास या बातमीत त्यानुसार सुधारणा केली जाईल.
निवडणूक आयोग मतदारांच्या स्लिप्सची नोंद कशा प्रकारे ठेवतो?
जेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात, तेव्हा निवडणूक आयोग प्रत्येक मतदान केंद्रावर नेहमीपेक्षा मोठं पथक तैनात करतो. या पथकात एका प्रिसायडिंग अधिकाऱ्यासह सर्वसाधारणपणे असणाऱ्या तीन मतदान अधिकाऱ्यांऐवजी पाच मतदान अधिकारी असतात.
पहिला मतदान अधिकारी मतदार यादीतील नोंदींशी मतदाराची ओळख पडताळून घेतो. दुसरा मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावतो आणि त्याची मतदार नोंदवहीत स्वाक्षरी घेतो. या नोंदवहीला फॉर्म १७-अ म्हणतात आणि त्यात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात आलेल्या सर्व मतदारांची नोंद ठेवली जाते.
तिसरा मतदान अधिकारी मतदारासाठी दोन एकसारख्या स्लिप्स तयार करतो, ज्यातील एक पांढऱ्या रंगाची तर दुसरी गुलाबी रंगाची असते. या दोन्ही स्लिप्स मतदाराला दिल्या जातात.
त्यानंतर मतदार चौथ्या मतदान अधिकाऱ्याकडे जातो, ज्याच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटची जबाबदारी असते. मतदार त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची स्लिप जमा करतो आणि आपलं मत नोंदवतो.
यानंतर मतदार पाचव्या मतदान अधिकाऱ्याकडे जातो, ज्याच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटची जबाबदारी असते. मतदार त्याच्याकडे गुलाबी रंगाची स्लिप जमा करतो. त्यानंतर मतदाराला दुसरं मत नोंदवण्याची परवानगी दिली जाते.
वरील मतदार स्लिप्सव्यतिरिक्त, वेगळ्या पूर्वक्रमांकित स्लिप्स प्रिसायडिंग अधिकारी मतदान संपण्याच्या अधिकृत वेळेला, साधारणपणे संध्याकाळी ६ वाजता, त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना देतो. मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर फक्त या स्लिप्स हातात असलेल्या मतदारांनाच मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान करता येतं.
रांगेत सर्वात शेवटी उभ्या असलेल्या व्यक्तीला क्रमांक १ ची स्लिप दिली जाते, आणि त्यानंतरच्या पुढील क्रमांकांच्या स्लिप रांगेत पुढं उभ्या असलेल्या मतदारांना दिल्या जातात. प्रिसायडिंग अधिकारी त्यांच्या डायरीत वितरित केलेल्या एकूण स्लिप्सची संख्याही नोंदवतो.

मतदान संपल्यानंतर प्रिसायडिंग अधिकारी त्यांची डायरी आणि मतदार नोंदवही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सुपूर्द करतात. निवडणूक निर्णय अधिकारी दुसऱ्या दिवशी या नोंदींची पडताळणी करतात आणि त्यांना काही अनियमितता किंवा संशयास्पद बाब आढळल्यास ते संबंधित मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करतात.
जर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकाच मतदान केंद्रावर झाल्या असतील आणि संध्याकाळी ६ वाजता एकाच प्रिसायडिंग अधिकाऱ्यानं एकाच रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना स्लिप्स वितरित केल्या असतील, तर मतदारांच्या दोन वेगवेगळ्या संख्या कशा असू शकतात?
पत्रकार:
सुमेधा मित्तल या नवी दिल्लीस्थित स्वतंत्र पत्रकार आहेत. भारतीय निवडणुका आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भातील बातम्या आणि घडामोडींमध्ये त्यांना विशेष रस आहे. मोकळ्या वेळेतही त्या बातम्यांचा मागोवा घेताना दिसतात.
वेंकटेश नायक हे नागरी समाज क्षेत्रातील संशोधक, पारदर्शकतेचे समर्थक आणि स्तंभलेखक आहेत. त्यांनी देशभरातील हजारो सरकारी अधिकारी आणि नागरिकांसाठी माहिती अधिकार विषयक प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी करून ते कार्यक्रम घेतले आहेत. निवडणूक प्रक्रिया, प्रशासन आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांची माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध व्हावी, यासाठी ते माहिती अधिकाराचा धोरणात्मक वापर करतात.
योगदानकर्ते:
सुभाष कुमार पात्रा (माहिती नोंदणी आणि पडताळणी) यांनी स्वयंसेवी संस्थांच्या क्षेत्रात जवळपास तीन दशके काम केले आहे.
पी. अजय बाबू (माहिती नोंदणी आणि पडताळणी) यांनी दिल्लीत स्वयंसेवी संस्थांच्या क्षेत्रात अडीच दशकांहून अधिक काळ काम केले आहे.