India
लोकप्रतिनिधींचं रिपोर्ट कार्ड - नागरिकायनचा अनोखा उपक्रम
आतापर्यंत ३६ नगरसेवकांची या उपक्रमा अंतर्गत प्रगती पुस्तकं बनवली आहेत.
आनंद भंडारे
महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या आणि पायाभूत सुविधा या प्रमुख घटकांचा प्रत्यक्षदर्शी व संशोधनात्मक पद्धतीनं अभ्यास करणं, वस्तुनिष्ठ माहिती व मूल्यभान देऊन नागरिकांचं सक्षमीकरण करणं आणि व्यवस्थेचं निरंतर मूल्यांकन करत अधिकाधिक पारदर्शी व उत्तरदायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणं, या उद्देशानं १ मे २०१९ रोजी नागरीकायन या मराठी अभ्यास केंद्राच्या नवसंशोधन केंद्राची स्थपना करण्यात आलेली आहे. शहरांमधील सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरं, मातृभाषेतील शिक्षणाचा प्रसार आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचं मूल्यमापन या प्रमुख पाच विषयांवर नागरिकायन काम करत आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांची, जाणकारांची मदत घेण्यात येते, त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या कामांचं मूल्यमापन नागरिकायनतर्फे केलं जात आहे. 'माझा प्रभाग, माझा नगरसेवक' हे या उपक्रमाचं शीर्षक आहे. याद्वारे नगरसेवकांच्या कामाचं प्रगती पुस्तक बनवलं जातं. आतापर्यंत ३६ नगरसेवकांची प्रगती पुस्तकं बनवली आहेत. आताही काही नगरसेवकांची प्रगती पुस्तकं बनवण्याचचं काम सुरु आहे.
माहिती अधिकाराचा वापर करून नगरसेवकांचं प्रगतीपुस्तक बनवलं जातं. त्यामुळं त्यातून मिळालेली माहिती ही अधिकृत आणि महापालिकेच्याच विभागातून मिळवलेली असते. बैठका आणि निधी या दोन निकषांवर नगरसेवकांचं प्रगतीपुस्तक बनवलं जातं. बैठकांमधून नगरसेवकांची उपस्थिती, त्यांनी मांडलेले प्रश्न, समस्या, ठराव, हरकतींचे मुद्दे यांची माहिती मिळते. यामधून नगरसेवकांचा आपल्या प्रभागाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्रभागातली त्यांना किती माहिती आहे हे कळतं. तसंच निधीच्या माहितीमधून संबंधित नगरसेवकाला किती निधी मिळाला, किती खर्च झाला याची माहिती मिळते. तसंच कोणत्या कंत्राटदारावर, प्रभागातील कोणत्या कामांवर आणि प्रभागातील कोणकोणत्या ठिकाणी किती निधी खर्च झालेला आहे याची माहिती मिळते. यामधून नगरसेवक आणि कंत्राटदारांचे संबंध ताडून पाहता येतात. प्रभागामध्ये एकाच प्रकारची कामं पुन्हा पुन्हा झालेली आहेत का हे कळतं. तसंच प्रभागातील विशिष्ठ ठिकाणीच कामं झालेली आहेत का, हे ही पाहता येतं.
या उपक्रमामध्ये आपण फक्त माहिती जमा करणं आणि त्याचं विश्लेषण करणं एवढंच काम करत नाही. मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या कामांची प्रत्यक्ष प्रभागामध्ये ठिकठिकाणी जाऊन तपासणीही केली जाते. माहिती अधिकाराचे केवळ पाच अर्ज, बाराशे ते पंधराशे रूपयांचा खर्च आणि तीन महिन्यांचा कालावधी एवढ्या गुंतवणुकीवर नगरसेवकांचं प्रगतीपुस्तक बनवलं जातं. यासाठी नुकतंच आम्ही एक अॅप आणलं आहे. अॅपचं नाव माझा नगरसेवक my corporator असून ते ॲण्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. राज्यभरातील महापालिकांच्या नगरसेवकांच्या कामांची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी हा याचा हेतू आहे. हे ऑनलाईन माध्यम असल्यानं ते सहज हाताळता येतं.
या अॅपमध्ये आजवर आम्ही केलेल्या ३६ नगरसेवकांचं प्रगती पुस्तक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून दिलेलं आहे. ही प्रगतीपुस्तकं मोफत डाऊनलोड करता येतात. यामध्ये मराठीसह काही प्रगती पुस्तकं इंग्रजी भाषेतदेखील उपलब्ध आहेत. शिवाय ज्यांना आपल्या नगरसेवकाचं प्रगती पुस्तक बनवायचं आहे त्या व्यक्तीला सदर अॅपची मदत होणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर आणि शहर याची माहिती त्याला अॅपवर द्यावी लागते. ती माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला प्रगती पुस्तक बनवण्यातले पुढील टप्पे कळविण्यात येतात.
कोरोना काळात, कठीण काळात आपला नगरसेवक कसा वागतो आहे? याचं मूल्यमापन देखील नागरिकांना करता यायला पाहिजे. यासाठी नागरिकांमध्ये जागृती व्हावी म्हणून या अॅपच्या माध्यमातून आम्ही सर्वेक्षण सुरु केलं आहे. एव्हाना नगरसेवकांना देखील आपल्याला मिळणा-या निधीद्वारे कोणती कामं करायची हे माहिती नाही. यासाठी आम्ही उमेदवारांसाठी नगरसेवक कसा असावा? यासाठी कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेतील तीन उमेदवार पुढे नगरसेवक म्हणून निवडून आले. याचवेळी नगरसेवक कसा असावा? अशी पुस्तिका तयार केली. ही पुस्तिकाही अॅपवर मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
हे अॅप इंग्रजी आणि मराठी भाषेत आहे. ज्याला आपल्या नगरसेवकाचं प्रगती पुस्तक बनावयचं आहे; अशी कोणतीही व्यक्ती या मोहीमेत सहभागी होऊ शकते. पुढच्या वर्षी मुंबई, ठाणे, पुणे अशा मेट्रो शहरांच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळं हे वर्ष नागरिकांनी आपापल्या नगरसेवकांचं प्रगती पुस्तक करण्यासाठी वापरलं, तर आपल्याला अपेक्षित असलेला नगरसेवकांमधील बदल होण्यास सुरुवात होऊ शकेल.
आनंद भंडारे हे नागरिकायनचे समन्वयक आहेत.