Quick Reads

स्मरण: रत्नाकर मतकरी आणि नर्मदेची चित्रकथी

ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचं नुकतंच निधन झालं.

Credit : सिरत सातपुते

- सिरत सातपुते

 

रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्य विश्वातलं एक मोठ्ठं नाव. अनेकविध साहित्यप्रकार लिलया हाताळणारे मराठीतील एक जेष्ठ लेखक. विचारांवर ठाम असणारा, दमनकारी सत्तेविरुध्द भूमिका घेणारा आजच्या काळातला महत्वाचा साहित्यिक. मतकरींचं अचानक जाणं ही रंगमंचावरील अपघाती एक्झीटच. कॅनव्हासवरील चित्र अर्धवट टाकून मतकरी अचानक निघून गेले. त्यांचं जाणं चटका लावणारंच आहे. शब्दांशी लीलया खेळणारा हा शब्दप्रभू कॅनव्हासवरही रंग चितारत होता, हे सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच.

रत्नाकर मतकरी चित्रं काढायचे, हे फारच थोड्यांना माहीत असेल. त्यांची मुलगी कलाविद्यालयाची विद्यार्थिनी. हा गुण तिच्याकडे मतकरींच्या जीन्समधूनच आला असणार. तिचे रंग आणि कॅनव्हास वापरुन मतकरी लिखाणातून आलेल्या जडत्वाला मोकळं करत असणार, सृजनाचा एक वेगळा आविष्कार त्यातून घडत असेल. साहित्यिकाचं घर हे पुस्तकांचं घर असतंच. त्यांच्या घरातील पुस्तकांचं गच्च भरलेलं कपाट, त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या बुकशेल्फबरोबर तादात्म्य पावतं आणि इथे चौसष्ट कलांपैकी एक कला लेखनाबरोबर नांदते याची खात्री पटते.

मी मतकरींची चित्र बघितली ती अगदी अलीकडे. यावर्षी जानेवारी महिन्यात. नर्मदा बचाव आंदोलन आणि रत्नाकर मतकरी हे समीकरण तसं जुनंच. ते पुन्हा समोर आलं रायगड एक्टिव्हिस्टाच्या निमित्ताने. रायगड एक्टिव्हिस्टा म्हणजे जानेवारी महिन्यात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार राजू सुतार यांनी क्युरेट केलेला लोकलढ्यांचा कलाविष्कार! महिनाभर चालू असलेल्या रायगड एक्टिव्हिस्टा-२०२० या कलाप्रदर्शनात नर्मदा बचाव आंदोलन आणि गिरणी कामगार संघर्ष समितीच्या कामावर आधारित समकालीन कलाकारांनी साकारलेल्या कलाकृती मांडलेल्या होत्या. या कलाप्रदर्शनात एक दालन होतं, रत्नाकर मतकरींच्या चित्रांचं.

 

 

नव्वदीच्या दशकाच्या सुरवातीला मतकरी नर्मदा घाटीत नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांबरोबर गेले होते. कोणताही संवेदनशील लेखक तिथे जाऊन आंदोलन बघून, समजून अभिव्यक्त होईल अशा वातावरणात मतकरी चार दिवस राहिले. आणि त्यांचा कुंचला चितारत गेला घाटीतलं जगणं. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मदतीसाठी त्या चित्रांचा लिलाव केला गेला व आंदोलनासाठी निधी म्हणून मोठी रक्कम उभी राहिली. उरलेली चित्र मतकरींच्या माळ्यावर ठेवलेली होती. रायगड एक्टिविस्टासाठी ही चित्रं मतकरींनी सहजपणे उपलब्ध करुन दिली. रायगड एक्टिव्हिस्टात मतकरींची पेंटींग्ज मांडली आहेत, हे ऐकलं तेव्हाच ऋजू स्वभावाचे पण विचारधारेवर ठाम असलेले मतकरी डोळ्यासमोर आले. नर्मदेच्या घाटीत जाऊन मतकरींनी काढलेली चित्र बघणं ही मेजवानीच असेल असं वाटत होतं. प्रदर्शन बघायला स्मारकात पोहोचलेली मी त्या चित्रांचं दालन शोधत होते आणि एका दालनात मतकरींच्या कुंचल्यातून उतरलेली मेधाताई (मेधा पाटकर) समोर दिसली. नर्मदेच्या घाटीतील माणसांबरोबर एकरुप झालेली मेधाताईची विविध रुपं समोर आली आणि मी मनानं नर्मदा बचाव आंदोलनाच्या ऐन उमेदीच्या काळात अलगद पोहोचले.

मतकरींची ती चित्र बघून चित्रांची मेजवानी हा शब्दच विसरुन जावा इतकी अस्वस्थ करणारी ती चित्रं होती सारी. खुशहाल जीवन जगणारा घाटीतला माणूस अचानक विस्थापनाची भिती घेऊन कसा जगायला लागतो आणि आंदोलन करता करता जगण्याचा संघर्ष कसा करतो याचा मोठा आलेखच मांडलाय या पेंटिंग्जमधून. ही नुसती कलाकाराची कलाकृती नाही तर एका चळवळीतल्या संवेदनशील लेखकाने रेखाटलेली शब्दचित्रं आहेत. ही चित्रं बोलतात आपल्याशी आणि सांगतात आपल्याला घाटीतल्या माणसांची कहाणी. ही चित्रं आहेत एक चित्रमालिका जी अवगत करते आपल्याला त्या माणसाच्या संघर्षाशी. आत्मसन्मानाच्या त्या लढाईत आपण आपोआपच त्यांच्याशी एकरुप होतो आणि चित्रांतून दिसायला लागते ती वेदना विस्थापित होण्याच्या भितीची. दिसते ती आगतिगता जमीन गमावण्याची. आपण जोडले जातो त्या वेदनेशी, डोळे पाणावतात त्या सरणावरच्या प्रेताला बघून. आत्तापर्यंत शब्दांतून भेटत राहिलेले मतकरी चित्रांतून भेटत राहतात, साद घालतात. चळवळीची अपरिहार्यता आणि आंदोलनाची भेदकता चित्रांतून आपल्यापर्यंत परिणामकारकपणे पोहचवत राहतात.

 

 

या चित्रांतून मतकरी जणू समाजाच्या निष्क्रियतेचा लेखाजोखाच मांडत होते आणि साद घालत होते त्या निर्दिस्त समाजाला जो या आंदोलनाचा एक हिस्सा बनू शकत होता. मी, तीन मध्यमवर्गीयांचं तोंडावर पट्ट्या बांधून आणि कानात बोळे घालून नर्मदा प्रश्नावर सोयीस्कर डोळेझाक करणारं चित्र बघत होते आणि अचानक या शहरी मुर्दाडपणाला सरावलेल्या मनावरची खपली काढणारं एक चित्र समोर आलं. जगायला निघालेल्या त्या दोन तरुणांचं ते चित्र. या तरुणांचं अख्ख आयुष्य व्यापून टाकणारी, विकासाच्या विळख्यात गमावलेल्या गावाची ताटातूट मतकरी इतक्या भावूकपणे रंगवतात की या तरुणांच्या भविष्यासाठीतरी आपण तिथे आंदोलनात असायला हवं असं वाटायला लागतं, इतकी ती चित्रं जिवंत वाटतात. तर अजून एका चित्रात काल परवापर्यंत संपन्न जीवन जगणारे आदिवासी असे कसे विस्थापित होऊ शकतात याचे उत्तर देतेय, मतकरींनी रंगवलेली, आंदोलकांच्या मागण्या मांडायला गेलेल्यांसमोर वास्तवाची जाणीव करुन देणारी, खुर्चीतली मोठ्ठी होत जाणारी थैली!!

 

 

स्वत:ला कायम चळवळीशी जोडून घेतलेला लेखक व्यवस्थेविरुध्द, दमनकारी सत्तेविरुध्द जेव्हा ठाम भूमिका घेऊन उभा राहतो तेव्हा एक अशी कलाकृती साकारते, संघर्षाला आणि अनेक पिढ्यांना बळ देते. मतकरींच्या या कलाप्रदर्शनात एका कलाकृतीसमोर मी राहून राहून घुटमळत होते. ती कलाकृती होती एक शब्दचित्र, एका निर्भय महिलेचं! डूब येणार म्हणून घरातून बाहेर काढून टाकायला आलेल्या पोलिसांना निर्भयपणे सामोरं जाणारी, काडीकाडी करुन बांधलेल्या घरट्याला हात लावू देणार नाही व ते बुडूही देणार नाही, या निर्धाराने निर्भयपणे पोलिसांच्या दंडुक्यासमोर उभी राहणारी ही घाटीतली तरुणी मतकरींनी अत्यंत ताकदीनं चितारली आहे. ही कुंता नावाची तरुणी त्या सर्वच महिलांचं प्रतिनिधित्व करते, ज्यांच्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाला धार आली आणि विस्थापितांचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागला. आंदोलनात ही कुंता अजरामर झालीच पण मतकरींनी रेखाटलेलं कुंताचं हे चित्र हे नुसतं चित्र नसुन एक उदाहरण आहे निर्भयतेचं! सत्याग्रहाचं! मणीबेलीतील कुंतावर लेख लिहून, साहित्यात तिला अजरामर करणं सहज शक्य होतं मतकरींसारख्या लेखकाला. पण कुंताचं हे चित्र काढून मतकरींनी एक अनमोल दृश्य ठेवा आपल्यासाठी मागे ठेवलाय. हे चित्र पिढ्यानपिढ्यांना सांगणार आहे इथल्या संघर्षाचा, नर्मदेचा, तिथल्या विस्थापितांचा इतिहास.

मतकरी आज आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार, चळवळी आंदोलनांबरोबर त्यांचं असणं, त्या आठवणी, त्यांचे शब्द, अन्यायी व्यवस्थेविरुध्दचा त्यांचा हुंकार आणि त्यांनी जाणीवपूर्वक काढलेली चित्रं बळ देत राहतील या समतेच्या वाटेवर चाललेल्या प्रत्येक वाटसरुला. या संवेदनशील साहित्यिक कलाकार ‘माणसाला’ अखेरचा सलाम!

 

लेखिका राष्ट्र सेवा दलाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त आहेत.