India

भीमा कोरेगाव मानवाधिकार कार्यकर्त्यांवर कोरोनाचं सावट, सुटकेची मागणी

तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भीमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असणार्‍या बऱ्याच जणांना शारीरिक व्याधी असून खूप जणांचं वयदेखील जास्त आहे.

Credit : Indie Journal

सौरभ झुंजार । पुणे: भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये अटकेत असणार्‍या सोळा मानवाधिकार कार्यकर्ते आणि बुद्धिजीवींची ताबडतोब सुटका करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेमधून करण्यात आली. भीमा कोरेगाव प्रकरणातील कथित आरोपींना अटक करण्याच्या घटनेला या जून मध्ये तीन वर्षे पूर्ण होतील. ज्या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे ते पुरावे खोटे असल्याचं आर्सेनल फोरेन्सिक कडून मिळालेल्या अहवालातून स्पष्ट झालंय. माओवाद्यांशी पत्रव्यवहार आणि मोदींना मारण्याचा कट असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेत. जे पुरावे पोलिसांना सापडलेत ते हॅकर व्यक्तींनी माल्वेर्सचा वापर करून आरोपींच्या फोन आणि लॅपटॉप मध्ये टाकले असल्याची माहिती त्या अहवालातून समजली होती.

तळोजा आणि भायखळा तुरुंगातील (जिथे या प्रकरणातील जास्तीत जास्त जण कैदेत आहेत) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. सध्या तळोजामधल्या पॉजिटीव्ह असणार्‍या रुग्णांची संख्या साठ पेक्षा जास्त असून अशा परिस्थितीत तुरुंगात राहणं म्हणजे मृत्युच्या दारात उभं राहण्यासारखं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी म्हणून अटकेत असणार्‍या जास्तीत जास्त जणांना शारीरिक व्याधी असून खूप जणांचे वयदेखील जास्त आहे. त्यात तुरुंगात पुरवली जाणारी वैद्यकीय सेवा अत्यंत वाईट दर्जाची असून प्रशासनाने गांभीर्याने याकडे पाहून लवकरात लवकर सर्व आरोपींना जामीन द्यावा अशी मागणी आरोपींच्या कुटुंबांकडून केली जातीये.

कोरोनाच्या काळात सर्व आरोपींना जी वागणूक दिली जातीये ती अमानवी असल्याची तक्रार ऑनलाइन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर हनीबाबू यांच्या पत्नी डॉक्टर जेनी रोवेना, रीपब्लिकन पँथर्स जातीय अंताची चळवळीच्या कार्यकर्त्या हर्षाली पोतदार, स्टॅन स्वामी यांचे मित्र जो झेवियर, वकील सुधा भारद्वाज यांची मैत्रीण स्मिता गुप्ता, वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या पत्नी मीनल गडलिंग आणि आरोपींच्या संबंधित मित्र व नातेवाईक उपस्थित होते. डॉक्टर जेनी रोवेना म्हणाल्या की खरंतर कायद्याप्रमाणे प्रत्येक कारागृहात हॉस्पिटल आणि डॉक्टर व इतर वैद्यकीय स्टाफ असणं सक्तीचं आहे. पण तळोजा कारागृहात अत्यंत भयावह परिस्थिती आहे. फक्त खोल्या आहेत ज्यांना हॉस्पिटल म्हटलं जातं.

 

३ मे पासून हनीबाबू यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. वारंवार सांगूनही कुठलेच उपचार झाले नाहीत. शेवटी १२ मे ला अनेक विनंत्या करून त्यांना जे.जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं.

 

३ मे पासून हनीबाबू यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. वारंवार सांगूनही कुठलेच उपचार झाले नाहीत. शेवटी १२ मे ला अनेक विनंत्या करून त्यांना जे.जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं तेव्हा त्यांना नीट दिसतही नव्हतं. जिथे डोळ्यांच्या इन्फेक्शन बरोबर ते कोविड पॉजिटीव्ह असल्याचंही समजलं. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय तळोजा कारागृहात नसल्याची आणि संपर्क नीट होत नसल्याची तक्रार यावेळेला प्रत्येकाने केली. जेलमधून पाठवलेली पत्रं सुद्धा महिन्याभरानी मिळतायेत. सुधा भारद्वाज यांच्या मैत्रीण स्मिता गुप्ता यांनी हे देखील सांगितलं की आधीपासून अनेक आजारांनी ग्रस्त असणाऱ्या सुधा यांना अजून वेगळ्या आजारांनी ग्रासलंय. त्याकडे जेल मधील कुठलेच अधिकारी लक्ष देत नाहीयेत.

फादर जो म्हणाले की, स्टॅन स्वामी कधी त्यांच्या प्रकृतीबद्द स्वतः खूप सांगत नाहीत, पण काल बोलणं झालं तेव्हा खूप थकवा जाणवत असल्याचं त्यांच्याकडून समजलं. आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना वॅक्सिन सुद्धा जेल प्रशासनाकडून मिळालेलं नाहिये.

सुरेंद्र गडलिंग यांच्या पत्नी मीनल गडलिंग म्हणाल्या की सुरेंद्र यांना डायबेटीस, दमा, रक्तदाब असे अनेक त्रास आहेत. आणि तीन आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त कुठलीही वैद्यकीय सुविधा तुरुंगात नाहीये. नेटवर्कचा प्रचंड त्रास असल्यामुळे थोडा वेळदेखील नीट बोलत येत नाही. जेल प्रशासनाकडे तक्रार केल्यावर सुविधा काढून घेण्याची धमकी मिळते. त्यांचा चष्मा तुटला होता तर तो सुद्धा त्यांना वेळेत मिळाला नाही. माणूस या नात्याने त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. कोरोनाच्या काळात भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी सध्या तुरुंगात स्वतःचा जीव धोक्यात घालुन राहतायेत. प्रचंड अमानवी पद्धतीने सर्व गोष्टी कारागृहात घडतायेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

मागच्या वर्षी सुरेंद्र गडलिंग यांच्या आईचं निधन झाल्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. पण एनआयएचे वकील, ते नाटक आहे असं म्हणाले होते. आता आईच्या निधनाबद्दल नाटक कोण करू शकतं? असा प्रश्न गडलिंग यांच्या पत्नी मीनल गडलिंग यांनी यावेळी उपस्थित केला.

हर्षली पोतदार यांनी माहिती देताना सांगितलं की तळोजा तुरुंगातील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या जवळजवळ साठ झाली असून पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. जे आजारी आहेत त्याचं टेस्टिंग केलं जात नाहीये तसंच आधार कार्ड नसल्यामुळे सुधीर ढवळे यांनाही वॅक्सीन दिलं गेलं नाहीये.

अटकेत असणारे सर्व आरोपी हे वकील, कलाकार, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार आणि बुद्धिजीवी आहेत. अशा पुराव्यांच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आलीये जे सिद्धही नाही झालेत, त्याचबरोबर ते चुकीचे असल्याचीही माहिती समोर आलीये. त्यामुळे कोरोना काळातील तळोजा आणि भायखळा कारागृहातील ही परिस्थिती तसेच या सर्व आरोपींना दिली जाणारी वागणूक अमानवी असून लवकरात लवकर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर करावा अशी मागणी यावेळेला सर्वांनी केली.