India

राम मंदिरासाठी निधी उभारताना चिथावणीखोर वक्तव्यं

उत्तर प्रदेशात दोन तरुणांना अटक.

Credit : Deccan Herald (Representational Picture)

राम मंदिर बांधण्यासाठी भाजपनं, लोकांकडून निधी गोळा करण्याची सुरुवात केली आहे. उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरात काल काही तरुणांनी निधी गोळा करण्यासाठी रॅली काढली होती. बाईकवरून या रॅलीत सहभागी झालेल्या दोन तरुणांनी अल्पसंख्यांक समूहाबाबत गरळ ओकण्यास सुरुवात केली. चिथावणीखोर भाषा वापरत त्यांनी अल्पसंख्यांक समूहाला टार्गेट केलं, याचा व्हिडिओ बनवूनही समाजमाध्यमांवर टाकला. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर आणि लोकांनी याबाबत ट्विटरवरून उत्तर प्रदेश पोलिसांना विचारल्यानंतर अखेर आज संध्याकाळी पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे.

आज बुलंदशहर पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं, “एका समूहाविरोधात चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्या दोन आरोपींना आम्ही अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे, अशा प्रकारची वक्तव्यं करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही.’’ दरम्यान उत्तर प्रदेशातील एका स्थानिक वार्ताहरानं, अशा प्रकारच्या काही घटना मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात घडत असल्याची माहिती इंडी जर्नलशी बोलताना दिली. “उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी काही अतिउजव्या संघटनांचे कार्यकर्ते राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी फिरत आहेत. या रॅलींदरम्यान हे कार्यकर्ते अल्पसंख्याक समूहाला भीती वाटेल, असं प्रक्षोभक बोलत फिरत आहेत. राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचं निमित्त आहे, मात्र हा एका समूहाला कॉर्नर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे,’’ असं या स्थानिक वार्ताहरानं सांगितलं आहे. दरम्यान बुलंदशहर पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींबाबतची कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.