India
पुण्यात स्टेशन प्रबंधकांचं आंदोलन
रिक्त जागा, वाढलेलं काम, सुविधांचा अभाव, इ. प्रश्नांसाठी आंदोलन.
शुक्रवारी सकाळी ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनमार्फत पुण्यातील मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सहभागी स्टेशन प्रबंधकांनी (स्टेशन मास्टर्सनी) दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा भरणं, चार्जशीटमध्ये सुधारणा करणं, महिला कर्मचाऱ्यांसाठी सुविधा, यासारख्या अनेक मागण्या केल्या.
“आम्हाला गेली २ वर्षं त्रास भोगावा लागत आहे. आणि याला कंटाळून आता आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. स्थानक प्रबंधकांच्या जवळपास २८ ते ३० टक्के जागा रिक्त आहेत. कामाचा ताण एवढा वाढला आहे की स्थानक मास्तरांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या उद्भवायला लागल्या आहेत . ज्या स्थानकांवर आधी दोन दोन प्रबंधक काम करायचे, तिथं आता एकच स्टेशन मास्तर सगळं भार सांभाळत आहेत,” धनंजय चंद्रात्रे आईस्माचे अध्यक्ष आणि पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सांगतात.
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वरून २० ते ३० आंदोलक घोषणा देत विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाबाहेर जमले. मात्र संबंधित अधिकारी आज कार्यालयात उपलब्ध नसल्यानं ते आंदोलकांना भेटले नाहीत.

निवृत्त स्थानक प्रबंधक विजय काशीद सांगतात, “गेली दोन वर्षं स्थानक प्रबंधकांची अनेक पदं रिक्त आहेत. कधीही व्यवस्थापन कार्यालयात याबद्दल विचारलं, की ते सांगतात की भरती प्रक्रिया सुरु आहे. २०१८ ला शेवटची भरती झाली होती त्यानंतर अजूनही भरती झालेली नाही. आणि या सगळ्याचा मानसिक आणि शारीरिक परिणाम आता कामगारांवर होतोय."
पुणे रेल्वे स्थानकाच्या एक स्थानक प्रबंधक स्वीटू कुमारी सांगतात, “पुरेसे स्थानक प्रबंधक नसल्यानं आम्हाला अतिरिक्त कामं करावी लागतात आणि हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. कधी कधी मी रात्रपाळी करून आल्यानंतर मला लगेच परत सकाळी दुसरी पाळी करायला जावं लागतं. दिलेलं अतिरिक्त काम सक्तीनं करावंच लागतं, नाही म्हणता येत नाही. कारण मनुष्यबळच नसल्यानं कुणालातरी ते काम करावंच लागतं.”
आणि या सगळ्यात स्थानक प्रबंधकांसाठी, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी, व्यवस्थित सुविधा स्थानकांवर उपलब्ध नसल्याचं स्वीटू कुमारी सांगतात.
.jpeg)
“महिलांसाठी वेगळं प्रसाधनगृह नाहीये. आम्ही तेच वापरतो जे पुरुषदेखील वापरतात. वारंवार सांगूनदेखील यात बदल करण्यात येत नाही. काही स्थानकांवर तर पाण्याची सोय नाही, व्यवस्थित फर्निचर नाही. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही, तिथं आम्हाला पाणी घेऊन जावं लागत. कधीकधी रात्रपाळीनंतर सकाळी फ्रेश व्हायला टाकीत पाणीसुद्धा नसतं,” स्वीटू सांगतात.
एका बाजूला या समस्या असताना दुसरीकडे स्थानक प्रबंधकांवर छोट्या छोट्या चुकांसाठीही कठोर आरोपपत्रं लावली जात असल्याचं चंद्रात्रे सांगतात.
"आमच्याकडून छोट्या चुका झाल्या तरी आमच्यावर आरोपपत्र ठोकलं जातं, त्यात आमची पगारवाढ थांबवली जाते, आमची पदोन्नती केली जात नाही, कुणाचे पास ६ महिन्यांसाठी बंद केले जातात. प्रत्येकवेळेस वेळेचं पालन होईलच असं नाही. थोडा जरी उशीर झाला, तरी लगेच आरोपपत्र लावलं जातं. रेल्वे वेळापत्रकात जरी काही वेळेचा फरक जाणवला तरीही आरोपपत्र लावलं जातं," स्वीटू कुमारी म्हणाल्या.
यापुढं काशीद म्हणाले, "आरोपपत्रांमुळे गेल्या दोन वर्षात आमचं भरपूर नुकसान झालं आहे. मनमानी पद्धतीने कामगारांच्या बदल्या केल्या जात आहेत. समान बदली धोरण वापरले जात नाही. एका स्थानकावर कामगारांना कमीतकमी ४ ते ५ वर्ष ठेवायला हवं. काहींना ५ ते ७ वर्षात तर काहींना अगदी ५ ते ६ महिन्यात बदली केली जातंय.”

स्थानक प्रबंधकांनी आजच्या आंदोलनात रिक्त पदांवर लगेच भरती झाली पाहिजे, आरोपपत्रांमध्ये सुधारणा झाली पाहिजे, दोन स्टेशन मास्टर असले पाहिजे, कामाची वेळ ६ तास असायला हवी, महिला कर्मचाऱ्यांसाठी सुविधा देण्यात याव्या आणि अनियमित बदल्या बंद झाल्या पाहिजे, अशा मागण्या केल्या.
“आम्ही यावर नियमित तक्रार करत आहोत, लेखी पत्रही दिले ते फक्त पत्र जमा करून घेण्याचं काम करतात पण त्यावर उत्तर देत नाहीत. गेली अनेक दिवस आम्ही यावर आवाज उठवत आहोत पण ऐकून घेतले जात नाही,” काशीद म्हणाले.
दरम्यान आज जनसंपर्क अधिकारी हेमंत बेहरा तसंच विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा आज सुट्टीवर असल्यानं त्यांच्याशी यासंदर्भात बोलणं बोलणं होऊ शकलं नाही.
