India

पुण्यात 'उत्तररामचरित' आणि 'मार्क्स इन सोहो' पाहण्याची संधी

शनिवार-रविवार प्रत्यायची नाट्य मेजवानी.

Credit : Indie Journal

पुणे: शनिवार दि‌.८ व रविवार दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी कोल्हापूरच्या प्रत्यय नाट्यसंस्थेकडून निर्मित दोन वेगळ्या धाटणीची नाटकं पाहण्याची संधी पुण्यातील नागरिकांना लाभणार आहे. नाटकघर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांनी या प्रयोगांचं आयोजन केलं आहे.

या आयोजनाअंतर्गत उद्या शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी यांच्या 'रामायण' या महाकाव्याच्या अनुषंगाने अलिकडच्या भारतीय सामाजिक व राजकीय इतिहासावर भाष्य करणारं दिलीप धोंडो कुलकर्णी लिखित व डॉ. आदित्य खेबुडकर दिग्दर्शित 'उत्तररामचरित' हे नाटक पाहायला मिळेल. त्यानंतर परवा रविवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा आणि सिद्धांतांचा वेध घेणारं 'मार्क्स इन सोहो' हे साहिल कल्लोळी रूपांतरीत व डॉ. शरद भुथाडिया दिग्दर्शीत नाटक आयोजित करण्यात आले आहे.

'उत्तररामचरित ' हे भारतातील सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण बनलेल्या महर्षी वाल्मिकी रचित रामायणावर आधारित कलाकृती आहे. अलीकडील काळात अनेक सामाजिक राजकीय बदल होत आहेत व त्यामुळे हा समाज गोंधळात सापडला आहे. परंतु या महाकाव्यातील प्रतिमांचं, पात्रांचं पुढं काय झालं आणि त्याचं महत्त्व आज काय आहे? याचा उलगडा उत्तररामचरित या कहाणी मार्फत होताना दिसेल.

'मार्क्स इन सोहो' हे नाटक प्रामुख्याने मार्क्सच्या विचारांवर व जीवनावर आधारित आहे. 'पृथ्वीवरील अमाप संपत्तीला सर्व मानवांच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे' असं सांगणाऱ्या मार्क्सनं सामाजिक एकता व मानवी मूल्य जपणं किती गरजेचं आहे या गोष्टीला या नाटकात अधोरेखित केलं आहे. त्याचप्रमाणे मार्क्सचं कौटुंबिक जीवन, त्याचं सहकाऱ्यांसोबत असणारं नातं हे नाटक सांगताना दिसतं. थोडक्यात, बिकट परिस्थितीशी सामना करत व कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळून स्वतःचे विचार लिखित स्वरूपात कसे आणले व त्यामागचा उद्देश या नाटकामध्ये प्रस्तुत होताना दिसेल.

अशी ही २ नाटकं 'प्रत्यय' आपल्या भेटीस घेऊन येत आहे. नाटकांच्या माध्यमातून एक सामाजिक संवाद साधला जातो, प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊन त्यावर विचार करायला भाग पाडण्याचं काम नाटकाच्या माध्यमांतून होते. गेली ४० वर्षे प्रेक्षकांच्या नाट्यानुभवाला एक वेगळी दिशा दाखवणारी ही प्रायोगिक नाट्यक्षेत्रात काम करणारी संस्था सामाजिक व सास्कृतिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे. या संस्थेची स्थापना कोल्हापूर मध्ये झाली आणि आतापर्यंत प्रत्ययनं जागतिक रंगभूमवरील महत्त्वाच्या नाटकांच्या भाषांतरापासून भारतीय परंपरेतील आधुनिक नाटकं आणि विविध भाषांतील नाटकं मराठी रंगभूमीवर प्रस्तुत केली आहेत. परदेशी भाषांमधील राशोमोन, क्राइम अडँ पनिशमेंट, दुशिंगराव आणि त्याचा माणूस इ. तर इतर भारतीय भाषांमधील भाषांतरित नाटकांमध्ये चरणदास चोर, कबीर, कर्फ्यु अशी अनेक नाटकं प्रत्ययनं रंगमंचावर आणली.

 

या दोन्ही नाटकांसाठी देणगी मुल्य रुपये दोनशे (रु. २००) ठेवण्यात आलं आहे. 

यासाठी अधिक माहिती / संपर्क  ओंकार: 9420123091 आणि गुलराज: 9552572885 येथे साधावा.