Quick Reads

धाग्यांपासून कलाकृती साकारणारा अवलिया

'स्ट्रिंग आर्ट' ही कला भारतामध्ये तशी अतिशय विरळ. रंगबिरंगी धागे, खिळे आणि प्लायवूड यांच्यापासून बनवली जाणारी ही कला मूळची 'रोमानिया' या देशातील.

Credit : Shubham Patil

- चंद्रकांत बोरुडे

 

पुणे विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालय हे महाराष्ट्रात आणि खासकरून ग्रामीण भागात प्रचंड प्रसिद्ध आहे, ते तिथल्या स्पर्धापरीक्षकांच्या यशस्वी कहाण्यांमुळे. विश्वास नांगरे पाटील, आनंद पाटील, भरत आंधळे ही त्यापैकी काही प्रसिद्ध नावं. यातील भरत आंधळे यांची पुणे विद्यापीठात येऊन यूपीएससी पास करण्यापर्यंतचा संघर्ष सांगणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रचंड प्रसिद्ध आहे. हीच कथा ऐकून हजारो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ग्रामीण युवकांचे पाय पुण्याकडे वळतात.

असाच सुकडी, या गोंदिया जिल्ह्यातील छोट्याश्या गावातील एक युवक ही चित्रफीत पाहतो अन स्पर्धा परीक्षा करायची असे ठरवून पुण्यात येतो. राहुल ठाकरे असे त्याचं नाव. पुण्यात आल्यावर घरची परिस्थिती बेताची म्हणून पुणे विद्यापीठातील कमवा आणि शिकवा या योजनेत त्यानं काम करण्यास सुरुवात केली केली खरी, मात्र तेथे करण्यात येणाऱ्या काम मध्ये काही त्याचं मन रमत नव्हतं म्हणून त्याच्या काकूंनी मागे कधीतरी खिळे अन दोरा यांच्या मदतीनं बनवलेल्या प्रतिकृतीतून प्रेरणा घेऊन तसाच एक प्रयत्न करून पाहण्याचं त्यानं ठरवलं. प्रतिकृती साकारल्यानंतर ती त्यानं त्याच्या मित्रांना दाखवली. तर त्यांना ती प्रचंड आवडली. यातूनच प्रोत्साहित होऊन ही संकल्पना त्यानं कमवा आणि शिका योजनेत राबवण्याचं ठरवलं. प्रकल्प संचालकांनीही होकार दर्शवल्यानंतर त्यानं या कामाला सुरुवात केली. आणि इथूनच 'स्ट्रिंग आर्ट' या कलेत त्याचा प्रवास सुरु झाला. आजमितीस त्याच्या या कलेनं दोन इंडिया बुक रेकॉर्ड आणि एक आशिया बुक रेकॉर्ड मिळवून दिला आहे.

'स्ट्रिंग आर्ट' ही कला भारतामध्ये तशी अतिशय विरळ. आजमितीस खूप कमी लोक ही कला साकारतात. यासाठी अतिशय बारकाव्यात काम करण्याची शैली अन प्रचंड संयम असावा लागतो. परंतु प्रयत्नाअंती साकारली जाणारी प्रतिकृती अतिशय सुबक आणि रेखीव असते.

रंगबिरंगी धागे, खिळे आणि प्लायवूड यांच्यापासून बनवली जाणारी ही कला मूळची 'रोमानिया' या देशातील. कलाकाराच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या या कलेत, अगदी छोटी प्रतिकृती बनवण्यासाठी कमीतकमी पाच ते सहा दिवस लागतात.

इंडी जर्नलशी बोलताना राहुल म्हणाला, "मनातील एखादी प्रतिकृती सत्यात उतरविण्यासाठी मला तीन पायऱ्यांमधून जावं लागतं. प्लायवूडवर चित्र काढणं, नंतर त्या काढलेल्या चित्रावर काळजीपूर्वक खिळे ठोकणं, मग त्या ठोकलेल्या खिळ्यांवर धागा ओढून प्रतिकृतील मूर्त स्वरूप देणं. ही प्रक्रिया अतिशय किचकट आणि कलाकाराचा संयम पाहणारी असते. यात कुठल्याही चुकीला माफी अथवा दुरुस्ती नसते. काही चुकलं तर पहिल्यापासून नवीन प्लायवूडवर सुरुवात करावी लागते."

राहुलने आता स्पर्धापरिक्षांचं मायाजाळ सोडुन या कलेवरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरवलं आहे. आणि इथेच न थांबता ही कला तो अनेकांना शिकविणार आहे.

मागील वर्षी मुंबई येथील एका कलाप्रदर्शनात त्यानं, आठ फूट रुंद प्लायवूडवर तब्बल ४२,२१० खिळे वापरून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या प्रतिकृतीला, दोन इंडिया बुक आणि एक आशिया बुक रेकोर्ड मिळाले आहेत. राहुलनं आजवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, गिरीश बापट, स्व. दादा कोंडके आदींच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत.

मात्र जरी ही कला भारतात अतिशय विरळ असली तरी ही कला साकारण्यासाठी लागणारे प्रचंड कष्ट आणि त्याबदल्यात लोकांकडून त्याला मिळणारी अतिशय कमी किंमत यामुळे, फक्त यावरच उदरनिर्वाह भागवणे अतिशय कठीण असतं.

याबाबद राहुल सांगतो, "पुणे तसंच मुंबईत अनेक कलाप्रेमी ही कला पाहिल्यानंतर त्याची खूप स्तुती करतात. मात्र विकत घेण्याच्या वेळेस अतिशय कमी किंमत देतात. भारताच्या तुलनेनं विदेशात या कलेच्या प्रतिकृतीला खूप चांगले पैसे मिळतात, त्यामुळंच आता ही कला विदेशातही पोहचवण्याचा माझा मानस आहे. तसंच याबद्दल ग्रामीण भागात जास्त माहिती नसल्यानं गावाकडील लोकांचा तसंच नातलगांचा मी या कलेत पूर्णवेळ काम करण्यास विरोध आहे."

त्यामुळे हे स्ट्रिंग आर्ट लोकांना प्रचंड आवडत असलं तरी जोपर्यंत या कलेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत नाही तोवर अश्या ह्या आधीच विरळ असणाऱ्या कला काळानुरूप लोप पावण्याची भीती असते. राहुल लवकरच त्याची ही कला 'दुबई एक्स्पोत' सादर करणार असून त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तो सध्या जुळवाजुळव करत आहे.