Quick Reads

तरुण इकरस, हतबल डेडालस आणि ‘नवी उमेद’

प्राचीन ग्रीसमधलं मिथक, की नव्या भारताचा प्रवास?

Credit : Indie Journal

'द फ्युचर इज यंग', 'डेमोग्राफिक डिव्हीडंड', 'तरुणांचा देश', जगातली सर्वात मोठी रोजगार शक्ती...२०१०-२०२० हे दशक या शक्यतांचा शब्दांचं होतं. हवेत आर्थिक, औद्योगिक तेजीच्या गप्पा होत्या, '६०-'७० च्या दशकांमध्ये जन्म घेतलेल्या, काहीशा विद्रोही, पण बऱ्याच प्रमाणात पारंपरिक समजुती-रूढी-परंपरात रमणाऱ्या, समाजवादी, नियंत्रित अर्थव्यवस्थेची सरलता अनुभवलेल्या पालकांची उपज असलेली '८०-'९० च्या दशकात जन्मलेली ही कार्टी नुकतीच वयात येऊन 'ऍस्पिरेशनल इंडिया' निर्माण करणार होती. पण या पिढ्यांचा इकरस झाला, त्याची कहाणी. 

ही मिथककथा प्राचीन ग्रीसमधली. इकरस हा डेडालस या महान संशोधकाचा मुलगा. या संशोधकाने एका राजाला एका हिंस्त्र जीवाला कैद करण्यासाठी एक भूलभुलैया बाग रचून दिली, ज्यात तो हिंस्त्र प्राणी हरवून गेला. मात्र सनकी राजानं काहीतरी निमित्त काढून डेडालसला त्याचा मुलगा इकरससोबत त्याच बागेत कैद करून टाकलं. मोठा काळ गेला, या रचनेतून निसटायचं कसा असा विचार करत डेडालसनं ते दोघं पाठीला लावून उडू शकतील असे पंख बनवायचं ठरवलं. 

१९९१ साली भारतानं जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरले. सोवियत संघाचा पाडाव झाला होता आणि जगभरात समाजवाद ही पराभूत अर्थनीती घोषित करण्यात आली. जुन्या, जुनाट, टाकाऊ अशा विशेषणांनी समाजवादी रचनेच्या सुरक्षित मात्र संथ स्वभावाला शिंकरून टाकलं. आता वेळ होती भांडवली प्रगतीची, खुल्या अर्थवाय्वस्थेची, नव्या रंगांची, सौंदर्यशास्त्राचा, काचेच्या इमारतींची आणि पॅकेज्ड अन्नाची. नवी स्वप्नं येणाऱ्या पिढयांना कुठल्या उंचीवर घेऊन जाणार, याच्या रंजक कथा सगळीकडून ऐकू येत. झालंही तसंच. 

इंजिनियरिंग-डॉक्टरीच्या पलीकडे फक्त वकिली आणि प्रशासकीय सेवा माहित असलेले पालक आपल्या मुलांना जाहिरातीत सांगितलं, कानावर पडलं, तसं बीबीए, बीसीए, एमबीए, एमसीए, एमटेक, मायक्रोबायोलॉजीला टाकू लागले. नवी पिढी गावांमधून छोट्या शहरात, छोट्या शहरातून मोठ्या शहरात जाऊ लागली. नव्या जगाच्या नव्या परिभाषा समजू लागली. ईमेल अकाउंट उघडून, कधी एमएसएन वर तर कधी ऑर्कुटवर चॅटिंग करू लागली, नेटवर्किंग करू लागली. एका अख्ख्या पिढीचा, तिच्या आधीच्या पिढीच्या कल्पनेपलीकडचा प्रवास सुरु होता, ज्यात एकाच वेळी दिवाळीचा उत्साह होता आणि ९/११ ला दूर अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यांचा थरार होता. एकाच वेळी ह्रितिक रोशनवरचा क्रश होता आणि त्याचवेळी ऍवरील, ऐकॉन, ब्रिटनी आणि बॅकस्ट्रीट बॉईजच्या संगीताचा बोलबाला होता.    

 

एका अख्ख्या पिढीचा, तिच्या आधीच्या पिढीच्या कल्पनेपलीकडचा प्रवास सुरु होता...

 

डेडालसनं पंख निर्माण करण्यासाठी समान आकाराच्या काठ्यांना मेणाचा लेप दिला. अनेक क्लृप्त्या करून अखेर त्यानं त्यांना पक्ष्यांची जमा केलेली पिसं जोडायला सुरुवात केली. हळूहळू पंख भरत गेले, जुळत गेले. एका अख्ख्या माणसाचा भार पेलू शकतील, इतके मोठे पंख झाले. डेडालसला स्वतःवर विश्वास होता. त्यानं आता सर्व तयारी झाली असल्याचं लक्षात आल्यावर लवकरच उड्डाण करण्याचा दिवस ठरवला. त्यानं इकरसला व्यवस्थित प्रशिक्षण दिलं पंख वापरून उडण्याचं, किमान त्याला तसं वाटत तरी होतं. त्यानं उड्डाणाच्या दिवशी इकरसला जवळ घेतलं आणि त्याला म्हणाला, "आपले पंख मेणाचे आणि पिसांचे आहेत. आपण एका विशिष्ट उंचीवरून उडू. जास्त उंच उडालो, तर सुर्याने मेण वितळेल, जास्त खालून उडालो, तर समुद्राचं बाष्प आणि धुळीमुळे पंख जड होऊन निकामी होतील. आणि त्यांनी हवेत झेप घेतली. 

नव्यानं भौतिक सुखांचा लाभ घेणारी पिढी आकाशाला कवेत घेत होती. नवे जॉब्स, लाखांचे मासिक पॅकेजेस, वाढलेली क्रयशक्ती, क्रय करण्यासाठी शेकडो पर्याय, नुसती मोबाईल नेटवर्क १०-१२, टीव्ही चॅनेल्स २५० हुन जास्त, साबणाचे वय-लिंग-हेतू-घटनेनुसार पर्याय, एक नोकरी सोडली तर काय, दुसरी दिमतीला. नव्या वर्कप्लेसमध्ये नवे लोक, वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या धर्मांचे. सर्वाना पुरेपूर प्रगती असल्यावर कोण कुलकर्णी आणि कोण कांबळे, कोण झहीर आणि कोण विकास, काय फरक पडायचा? विकास, प्रगती आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त पुढं पाहायचं, फक्त काचेतून पाहायचं, गाडीच्या, ऑफिसच्या, फ्लॅटच्या, फ्लाईटच्या...काचेवरचे डाग, दुर्लक्ष करायचे, बदनसिब गरीब साले...

 

 

इकरसनं डेडालसच्या मागोमाग आपली गती तशीच ठेवली. जमीन लवकरच मागं सुटली. इकरस आणि त्याचा बाप हवेत मुक्त उडत होते आणि त्यांच्यासमोर अथांग समुद्र होता. बापानं शिकवल्याप्रमाणं इकरस अजिबात आपली दिशा आणि उंची चुकवत नव्हता. ना सूर्याकडे, ना समुद्राकडे...ठीक मधोमध. पण काहीवेळानं इकरसला त्याच त्याच समुद्राच्या दृश्याचा कंटाळा येऊ लागला. तोंडाला समुद्री हवेचा खारटपणा नकोसा झाला. त्वचाही क्षाराने कोरडी पडू लागली. त्याला माळमळु लागलं होतं. बाप त्याच्या बराच पुढं होता. इकरसला हळूहळू थोडं वेगळं काही करून पाहण्याची इच्छा होऊ लागली. बघू तरी, किती उंची गाठता येतीये, वडिलांना काय कळणार आहे मी मागच्या मागं काय करतोय, असं म्हणत इकरसनं झेप घेतली. 

२००८ ला जगाचे बाजार कोसळले, तेव्हा भारतीय बाजार आधीच्या ठेवीदारांच्या जुनाट, बुरसट साठवणुकांवर तरला. खाजगी क्षेत्राची वाढती उत्पादकता कधीच ग्राहकांपासून वंचित राहिली नाही. मात्र हवेत हलकीशी चिंता होती. हळूहळू जगभर आर्थिक मंदीचे वारे वाहू लागले. युरोपात सार्वजनिक खर्चावर सरकारांनी चाप लावायला सुरुवात केली आणि आर्थिक साहाय्याच्या योजना कमी केल्या. निम्न मध्यमवर्गीय कष्टकरी वर्ग असाहाय्यतेकडे ढकलला जाऊ लागला. अमेरिकेत शेअर मार्केट आणि हाऊसिंग मार्केट पडल्यावर हातावर पोट असलेले हेच वर्किंग क्लास लोक आधीच नसलेल्या सार्वजनिक सुरक्षेच्याही पलीकडं फेकले गेले. किचकट आकडेमोड, सबप्राइम क्रायसिस, हेजिंग, स्टॉक शॉर्ट करणं, कोणाला कळणार होतं हे सगळं? मग दोष कोणाचा? नव्यानंच लॅटिन अमेरिकेतून निर्वासित होऊन आलेल्या मिगेलचा कदाचित, किंवा भारतातून आलेल्या 'पाकी' धर्मेंद्रचा. नक्कीच यांचाच दोष असणार. अचानक आजवर जागतिकीकरणाचे गोडवे गाणारे देश अमेरिका फर्स्ट, युरोप फॉर युरोपियन्स, ब्रेक्झिट च्या गोष्टी करू लागले. जगभर उजव्या कट्टरतावादी, वर्चस्ववादी वंशभेदी शक्ती डोकं वर काढू लागल्या. 

 

खिशात पुरेसं नसलं, की माणूस जगण्याला स्पर्धा समजू लागतो आणि दुसऱ्या माणसाला स्पर्धक

 

एकामागून एक संस्थात्मक प्रतिकांवर हल्ला होऊ लागला. आधुनिकतेनं दिलेली फळं नासू लागली होती, मग त्या आधुनिकतेनं दिलेली मूल्यं काय वेगळी. पुरोगामीत्व, विज्ञानवाद, सर्वसमावेशकता, सेक्युलॅरिझम, या सगळ्यांचा दोष होता माझी नोकरी जाण्यात. माझी नोकरी जाऊच कशी शकते, घराचे हप्ते भरायचेत, नुकतीच घेतलेली गाडी विकावी लागेल, लग्नाला ५ मुलींनी नोकरी नसल्यानं नकार दिलाय, घरचे दिवाळीत लग्न उरकायचं म्हणतायत. त्यांना काय माहित काय दिवाळी चालूये माझी. हा सगळा या आरक्षण वाल्यांचा प्रताप आहे. यांना घेतलं नसतं तर आज माझी नोकरी जाण्याऐवजी प्रोमोशन झालं असतं. शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडू आता, साले आरक्षण वाले १ रुपया न भरता डिग्री घेऊन रिकामे झाले...त्यात हा झहीर, याच्या घरातसुद्धा तो टीव्ही वाला सांगतोय तसा बॉम्ब बनत नसेल याची काय खात्री? यांच्यावर कसला आलाय विश्वास? खिशात पुरेसं नसलं, की माणूस जगण्याला स्पर्धा समजू लागतो आणि दुसऱ्या माणसाला स्पर्धक. 

 

 

इकरसनं सुर्याकडं झेप घेतली. तो उंच उडू लागला, उंचच उंच, आणखी उंच...जशी उंची वाढेल तशी त्याची झिंग वाढत होती. डेडालसनं सहज मागं वळून बघितलं तर इकरस त्याला दिसेना. त्याची नजर त्याला शोधता शोधता वर, सूर्याच्या दिशेनं गेली. इकरस सूर्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. इकरसनं त्या उंचीवरून दिसणाऱ्या दृश्याला डोळ्यात साठवून डोळे बंद केले आणि हवेत तरंगण्याची नशा करू लागला. त्याच्या पंखांचं मेण वितळू लागलं होतं. हळूहळू एकएक पीस सुटं होत चाललेलं. 

शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, २०५० पर्यंत पृथ्वीचं तापमान सरासरी २ डिग्री सेल्सियसनं वाढणार आहे. २ डिग्री सेल्सियस सरासरी. जगात जिथं पाणी कमी आहे, तिथं दुष्काळ आणि तापमानात सगळं सुकं पडेल, ध्रुवांवरचा बर्फ वितळेल, समुद्राची सरासरी उंची वाढेल, ओले दुःष्काळ पडतील, पावसाचा मारा होईल, पूर येतील, दरडी कोसळतील, जमीन धसेल, ढगफुटी होईल. शेती पुरेसं अन्न उत्पादित करू शकणार नाही, जागतिक सप्लाय चेन बंद पडतील, इंटरनेट लाईन्स तुटतील. अब्जाधीश म्हणे जमिनीखाली १०० फूट बंकरमध्ये बायकापोरं घेऊन निघून गेलेत, काही म्हणे उंच ठिकाणी सशस्त्र सुरक्षेत राहतायत. कोट्यवधी लोक स्थलांतर करत वणवण भटकतील, पिण्याच्या पाण्यावरून संघर्ष पेटेल, भाकरीच्या तुकड्यासाठी दंगली होतील...आई-बाबांचा फोन आलेला सकाळी, त्यांना म्हणे नातू हवाय, गोरापान...त्यांना काय दिसत नाही का हे सगळं? आम्ही पोरं काढून त्यांना या जगात ढकलू? त्यांच्यासमोर काय आहे हे दिसत असताना?

इकरस हळूहळू पडू लागला होता, पण त्याचे डोळे बंदच होते. त्याला कळत होतं, की नाही, माहित नाही. पण त्याला त्याचं त्या क्षणाचं सुख गमवायचं नव्हतं. काय अनुभव होता तो, त्यानं सूर्य पहिला होता...शक्य असतं तर त्यानं सूर्यच काबीज केला असता. डेडालस हतबल होऊन मागं पाहू लागला. इकरस प्रचंड वेगानं खाली पडत होता. डेडालसला वळायला वेळ लागला. तो वेगानं त्याच्या पोटच्या गोळ्याला वाचवायला झेपावला. पण इकरस डोळे उघडत नव्हता. त्याचा बाप त्याला आवाज देत होता..."इकरस! डोळे उघड! इकडं बघ! पंख हलव!" 

 

भारतातील अर्ध्याहून अधिक तरुणांना पर्यावरण बदल चिंताजनक वाटतोय.

 

नुकत्याच झालेल्या डेलोइट या कंपनीच्या जागतिक मिलेनियल अँड जेन झी सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, भारतातील अर्ध्याहून अधिक तरुणांना पर्यावरण बदल चिंताजनक वाटतोय. त्यांना त्याच्यातून भविष्याबाबत चिंता वाटू लागली आहे. ४९ टक्के तरुणांना आर्थिक आणि सामाजिक असुरक्षितता वाटू लागलीये. त्यांच्या चिंतांचा एक मोठा भाग रोजगार नसणं, वेतन पुरेसं न मिळणं, परिवाराच्या गरजा भागवता न येणं, याभोवती फिरतायत. या सर्व गोष्टींचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. ५० टक्क्यांहून अधिक तरुणांना आपल्यासोबत भेदभाव घडल्याचा अनुभव आला आहे, किंवा तशी त्यांची भावना आहे. मात्र जागतिक तरुणाईच्या विपरीत, भारतीय तरुणांचं अजूनही मत आहे की उद्योगांना चालना दिली तर अनेक प्रश्न सुटतील. जगातली तरुणाई मात्र स्वतःल डिस्टोपियन सोशालिस्ट (निराशावादी समाजवादी) म्हणवून घेऊ लागलीय. 

मात्र या सर्व्हे मधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ध्याहून अधिक तरुणांना कोरोनाची जागतिक महामारी म्हणजे एक रिसेट बटन वाटत आहे. त्यांच्या मते हा बसलेल्या धक्क्यातून आपल्याला जगाचा पुनर्विचार करण्याची संधी मिळाली आहे. आपण वेगळं जगू शकतो का, आपण वेगळा विचार करू शकतो का, जगाची दिशा बदलू शकतो का, याची ही संधी आहे, असं त्यांचं मत आहे. अनेक तत्वज्ञांचं देखील हेच म्हणणं आहे. कोरोनापूर्व काळात मानवी समूह म्हणून केलेल्या चुका सुधारण्यासाठी कोरोनाच्या धक्क्यानं एक संधी देऊ केली आहे. आपण उपभोगाच्या प्रक्रियांना प्रचंड गती दिली आहे, आपण इंधन जाळलं, श्रम वापरले, अन्न उगवलं, पचवलं, नासवलं, पण हे सगळं शाश्वत नाही, ते भौतिकशास्त्राच्या चौकटीतच शक्य नाही. हे बदलावं लागेल, बदलावंच लागेल, आणि हे बदलण्याची तयारी असेल, तरच येत्या काळात कुठलीही 'नवी उमेद' असण्याचा चर्चेला हात घालता येईल... 

 

हा लेख ऑक्टोबर २०२१ च्या मिळून साऱ्या जणी या नियतकालिकात पहिल्यांदा प्रकाशित झाला होता.