Opinion
आवटेंची शर्वरी आणि ब्राम्हण्यग्रस्त पुरोगामी
यामध्ये संजय आवटेंची पोस्ट हे फक्त एक निमित्त आहे.

वैचारिक गोंधळ आणि गोधळलेली वैचारिकता ही प्रस्थापित परिस्थतीती असणाऱ्या काळात, मूळ धारणा, उद्देश आणि व्याख्यांकडं परत गेलं की माणसाला पुन्हा आत्मभान गवसतं. म्हणजे मार्क्सवाद, वर्ग, जात, नेणीव, जाणीव, पुरोगामीत्व किंवा प्रतिगामित्व...काहीही संकल्पनात्मक मांडायचं असेल, तर आपल्याला परत परत, याची सुरुवात कुठं झाली, याकडं जावंच लागेल.
दैनिक दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे, यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, जिच्यात शर्वरी दीक्षित नावाचं कथित काल्पनिक पात्र त्यांनी उभं करून, एका ब्राम्हण 'असूनही' पुरोगामी असणाऱ्या तरुणीचं 'गाऱ्हाणं' त्यांनी मांडली. पुढील लेखन हे ना त्या पोस्टचं समर्थन किंवा स्पष्टीकरण आहे, ना खंडन. पुढं मांडलेल्या गोष्टी, या वैचारिक वादांच्या भाऊगर्दीतून पुन्हा मूळ उद्दिष्ठाकडं जाऊन पुरोगामी वर्तुळाला आपलं आत्मभान सापडू शकतं का, याची चाचपणी मात्र आहे. यामध्ये आवटेंची पोस्ट हे फक्त एक निमित्त आहे.
तर मुळात चर्चेचा अवकाश, किंवा प्रिमाईस पाहूया. आवटे ज्या शर्वरी दीक्षितला उभं करतात, ती मुळातच स्वतःचं सामाजिक-जातीय-वर्गीय आणि राजकीय भान नसलेली किंवा असलं तरी अत्यंत तोकडं असलेली तरुणी आहे. तिला हे दिसतं, वाईट वाटतं की तिला लहानपणापासून आवडणारं 'जयोस्तुते' हे गाणं गायल्याबद्दल तिला रोष झेलावा लागतो, मात्र तिला हे दिसत नाही की त्या गाण्याचे गीतकार, त्या गाण्याची पार्श्वभूमी ही नक्की बहुसंख्य पीडित समाजाच्या दृष्टीनं काय आहे? त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विचारातील हिंसेचा, तेही द्वेषआधारित हिंसेचा परिणाम काय, त्याचे असंख्य लोकांच्या जगण्यावरचे परिणाम काय? आपली आवड आहे हे बरोबर आहे, मात्र आपली आवड इतरांवर काय परिणाम करणारी आहे, याचं भानच नसेल, तर स्वतःला पुरोगामी कोणत्या तोंडानं म्हणता येईल?
एखाद्याला जातीवाचक शिव्या देण्यात मज्जा येते, त्याची ती लहानपणापासून 'आवड' असेल, तर मग त्याचे कान पिळले किंवा त्याला विरोध केला, तर तो काही उलट केलेला अन्याय नसतो. आपण आपल्या जातीच्या सामाजिक स्थानावरून जे करतो, त्याचे इतर स्थानांवर असणाऱ्या लोकांच्या, जातींच्या, जातिसमूहांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात, त्यातून त्यांची जगण्याची अनुभूती काय प्रभावित होते, याचं शर्वरीला भानच नाही, मात्र तरीही शर्वरीला पुरोगामी वर्तुळात 'सर्टिफाईड पुरोगामी' असण्याचं प्रमाणपत्र देखील गमवायचं नाही. या तीव्र विरोधाभासामुळं शर्वरी टीकेस पात्र तर तर ठरतेच मात्र आवटेंच्या 'चर्चेच्या उद्देशा'ला पुढं नेणारं पात्र म्हणूनही कुचकामी ठरते.
पण मग
पण मग, ब्राह्मणत्व, ब्राम्हण, सवर्ण, चळवळीतली समावेशकता, वैचारिक वैतुष्ट्य, या गोष्टी, हे प्रश्न, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींसमोर नाहीच आहेत का? तर याचा उहापोह व्हायला हवा, हा मूळ मुद्दा. तो आवटेंचा उद्देश असो किंवा नसो, मात्र त्यानिमित्तानं यावर चर्चा व्हायला हवी, की आपण सुरुवात कुठून केली, का केली आणि त्या प्रवासात आज आपण कुठं आहोत?
तर जाऊया मूलभूत व्याख्यांकडं. भारतीय समाजासमोरचा सर्वात मोठा, गंभीर आणि जुना प्रश्न, ती म्हणजे जात आणि तिची वर्तनव्यवहार व्यवस्था. जातीबाबत शेकडो वर्षांपासून भारतीय उपखंडात अनेक विद्रोह झाले, चळवळी झाल्या, विचार झाले. शोषण अनेक प्रकारचं असतं. वर्गीय, धार्मिक, वांशिक किंवा अगदी भाषिकही. मात्र त्यातलं सर्वात किचकट संरचनेवर आधारित शोषण म्हणजे जातीय शोषण. पुरोगामी किंवा प्रागतिक किंवा सुधारणावादी चळवळींचा उद्देश असतो, हे वरील सर्व प्रकारचं शोषण थांबवणं, त्याचं निर्मूलन करणं, त्याचा विध्वंस करणं.
मग जातीय शोषण नष्ट करणं जर आपलं उद्दिष्ट असेल, तर त्याची प्रमुख लक्षणं आपल्याला अधोरेखित करावी लागतील. जात जन्माधारित असते. ती कोणीही निवडू शकत नाही. तुम्ही ज्या परिवारात ज्या पालकांच्या पोटी जन्माला आला, त्यांची तुम्हाला मिळणारी सर्वात पहिली भेटवस्तू म्हणजे जात. भारतीय माणसाला जन्मल्या बरोबर नाव मिळत नाही मात्र जात नक्की मिळते. म्हणजे या अर्थानं जात ही कुठल्याही व्यक्तीकडून त्याच्या निवडीचा अधिकार किंवा 'एजन्सी' काढून घेते. त्यानंतर जात काय करत असेल तर 'आपण' आणि 'ते' याची व्याख्या करण्याचं काम करते. 'आपले' लोक आणि 'ते लोक' यांच्यात फरक करून त्या त्या लोकांचे विशिष्ट व्यवहार, मान्यता, धारणा आणि त्यांचं स्थान ती निश्चित करते आणि त्यानंतर जातीव्यवस्था, जिचं सारथ्य 'ब्राह्मण्य' आणि ब्राम्हण्यग्रस्त ब्राम्हण व इतर उच्च्वर्णीय लोक करतात, ती त्यातील उतरंडीवरच्या कथित खालच्या समूहांकडून संसाधनं काढून घेते, राजकीय अभिव्यक्ती काढून घेते आणि त्या अर्थानं त्यांच्याकडून त्यांची स्वायत्तता काढून घेते.
आता यात 'ब्राह्मण्य' ही जी संकल्पना आहे, ती पाहूया. ब्राह्मण्यावर ब्राम्हण जातीचं पारंपरिक अधिष्ठान आहे, तो त्यांच्या सर्वात मोठा 'प्रिव्हिलेज' आहे. तर ब्राह्मण्यासोबत काय येतं? हिंदू देवी देवता आणि त्यांच्या पूजापाठ इत्यादी कर्मकांडाचा अधिकार ही पहिली गोष्ट. त्यामुळं इतर कोणालाही देवापर्यंत पोहोचायचं तर या पौरोहित्य करणाऱ्या वर्गामार्फतच ते करता येणार. त्यातून हा समूह थेट देवावर आपला अधिकार सांगणार. दुसरी येणारी गोष्ट म्हणजे, ज्ञान आणि विद्वत्तेवर मक्तेदारी ठेवण्याचा अधिकार. यातून पुन्हा सामाजिक स्तरावर इतर समूहांवर वर्चस्व गाजवता येण्याची क्षमता निर्माण होते. आणि तिसरं म्हणजे, वरच्या गोष्टींनी जे अधिकार प्राप्त झाले आहेत, त्यांचा वापर किंवा गैरवापर करून उतरंडीवरच्या इतर जातींतील माणसांच्या आयुष्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवणं, त्यांचे श्रम उपभोगणं, त्यांची संसाधनं हडप करणं, त्यांचं उत्पन्न हडप करणं आणि त्यांना हलाखीचं आणि अपमानजनक जीवन जगायला भाग पडणं.
जातीव्यवस्था इतकी सुटसुटीत नाही. तिच्यातली उतरंड ही स्पष्ट नाही, तिचे नियम स्पष्ट नाहीत आणि जेव्हा ही व्यवस्था व्यवहारात उतरते, त्यातील होणारे बदलही स्पष्ट राहत नाहीत.
हे झालं ब्राम्हण्याचं मूळ स्वरूप. मात्र जातीव्यवस्था इतकी सुटसुटीत नाही. तिच्यातली उतरंड ही स्पष्ट नाही, तिचे नियम स्पष्ट नाहीत आणि जेव्हा ही व्यवस्था व्यवहारात उतरते, त्यातील होणारे बदलही स्पष्ट राहत नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर, जातींचा सर्वनाश या त्यांच्या क्रांतिकारी भाषणात म्हणतात, "हिंदू समाज हे एक मिथक आहे, ही गोष्ट अग्रगण्य असल्याचं मानलं पाहिजे. हिंदू हे नावच खुद्द परकीय नाव आहे. ते मुसलमानांनी एतद्देशीयांना, त्यांच्यापासून स्वतःला वेगळं दर्शवण्यासाठी दिलं होतं. मुसलमानी आक्रमणाच्या आधी कोणत्याही संस्कृत ग्रंथामध्ये ते दिसून येत नाही. हिंदूंना कधी सामूहिक नावाची आवश्यकताच भासली नाही, कारण त्यांनी त्यांचा एक समाज स्थापन केला आहे, याची त्यांना कल्पनाच नव्हती. वास्तविक हिंदू समाज अशी गोष्टच अस्तित्वात नाही. तो केवळ जातींचा एक संग्रह आहे. प्रत्येक जातीला तिच्या अस्तित्वाचे भान आहे. ती जिवंत राहणे, यातच तिच्या अस्तित्वाचे सारसर्वस्व आहे. जातींनी एखादा संघदेखील तयार केला नाही. हिंदू-मुस्लिम दंगा सोडल्यास, एका जातील ती दुसऱ्या जातीशी संबंधित असल्याची भावना नाही. इतर सर्व प्रसंगी प्रत्येक जात इतर जातींपासून स्वतःला वेगळे करण्याचा व स्वतःला वेगळे दर्शविण्याचा प्रयत्न करते."
म्हणजेच, जात ही ब्राह्मण-पुरोहित वर्गानं निर्मित आणि त्यानंतरच्या जातींनी आपापल्या हितसंबंधांसाठी विकसित व संचालित केलेली असते. जातिव्यवस्थेची किचकट जटिलता यात आहे की प्रत्येक जात ही तिच्या वरच्या जातीकडून पीडित आणि शोषित मात्र त्याचवेळी तिच्या खालच्या जातीची शोषक किंवा पीडक असते. म्हणजे जातीचं निर्मूलन करायचं असेल तर जात जशी शोषकाच्या मनातून आणि वर्तनातून जावी लागेल, तशीच ती शोषितांच्या मनातूनही जावी लागेल आणि तरच पूर्ण जातीअंत शक्य आहे. जात ही व्यवस्था भौतिक तर आहेच, तिचं अस्तित्व संसाधनांच्या विषम वितरणातून अधोरेखित करताच येतं, म्हणजे तिला वर्गीय आधार तर आहेच, मात्र त्याचसोबत तिला मानसिक, काल्पनिक आणि त्या अर्थानं सांस्कृतिक अस्तित्वही आहे.
त्याचसोबत ब्राह्मण्याचा एक वेगळा अर्थही लागतो, तो म्हणजे सौंदर्यशास्त्र आणि वर्तनव्यवहाराच्या दृष्टिकोनातून. 'ब्राम्हण्यग्रस्त' असणं म्हणजे काय? तर कोणाच्याही जन्मामुळं त्यांच्या 'रक्तातच' काहीतरी गुणधर्म आहे अशी मान्यता ठेवणं, सोवळं-ओवळं पाळणं, माणसामाणसांमध्ये अन्यायकारक भेद करणं आणि मुळातच शुचिता, पावित्र्य आणि संकल्पनात्मक कट्टरता पाळणं. वर्तनव्यवहारात जर बहुजन वर्तनाला ब्राह्मण्यापासून काही वेगळं करत असेल तर वर्तनातील लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, समावेशकता म्हणजे इन्क्लुझिव्हिटी आणि कोणत्याही शुद्धतेचा किंवा पावित्र्याचा दंभ न ठेवणं.
मग आता
मग आता जर परिवर्तनाच्या चळवळीसमोर जातीअंताचा प्रश्न आ वासून उभा असेल, तर मग आपल्याला पुन्हा तिच्या मूळ उद्देशांकडं पाहावं लागेल, त्यामागच्या धारणांकडं पाहावं लागेल, आणि ढोबळ मानानं त्या म्हणजे
१. कोणत्याही विचाराला मध्यस्ती आणि नियंत्रण करणारं पौरोहित्य नसावं.
२. कोणत्याही विचाराच्या पावित्र्यापेक्षा किंवा शुध्दतेपेक्षा त्याच्या उपयुक्ततेवर प्राधान्य असावं.
३. माणसं बदलतात, ती बदलू शकतात, व ती बदलली तर समाज बदलेल यावर विश्वास असणं, कोणाच्याही 'रक्तात' काहीतरी गुणधर्म आहेत हे न माननं.
४. परिवर्तनाची उद्दिष्टं ही बहुसंख्यांना लाभदायक तरीही विवेकी दृष्टीनं कालातीत असावीत.
जर असं असेल, तर आवटेंची शर्वरी हे अतिशय उथळ पात्र असलं, तरी अशी पात्रं आपल्या अवती-भोवती अस्तित्वात असणारच आहेत. त्यातील ग्रेडेशन्सही वेगवेगळी असणार आहेत. त्यांच्यातील ब्राम्हण्यग्रस्तता, वैचारिक मागासलेपणा ही वेगवेगळ्या प्रमाणात असणार आहे. वर्चस्ववादी समूहातून थोडं फार आत्मभान बाळगून बाहेर पडल्याबद्दल कौतुकच व्हावं लगेच असं म्हणणं नाही, या मुलामुलींना खरंच परिवर्तनाची आस लागली असेल, स्वतःला पुरोगामी म्हणवून घ्यायचं असेल, तर नक्कीच त्यांना आपल्या विचारांचा विस्तार आणि आत्मभान वाढवावं लागेल. मात्र त्याचवेळी जिथं संवाद असायला हवा तिथं आपल्या जातीवरून वारंवार अविश्वासाचा अनुभवदेखील अशा अवस्थेत त्रासदायक, एकाकी किंवा भीतीदायक वाटू शकतो. मग अशावेळी, जर कोण कुठल्या जातीत जन्मला यावर त्या व्यक्तीचं नियंत्रण नसेल आणि त्या व्यक्तीचं पूर्णतः प्रागतिक विचारांमध्ये कोणत्याही विरोधाभासाचं निर्मूलन करून परिवर्तन झालं नसेल, तर अशा व्यक्तींचं करायचं काय, हा प्रश्नदेखील महत्त्वाचा ठरू लागला आहे.
ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या 'सवर्ण' जातींची जातिव्यवस्थेवरील पकड ढिली होत आहे. हे घडण्यामागं अपरिहार्य आधुनिकतेचा प्रवास, भांडवली उत्पादन संबंधांची आगेकूच, पारंपरिक शेती, जमीन मालकी, शिक्षण इत्यादी गोष्टींमध्ये झालेला बदल आणि अर्थातच घटनात्मक न्यायाचा व तत्वांचा उदय या गोष्टी आहेत. अशावेळी, काटेकोर पारंपरिक जातिविभाजन पाळणं हे किमान पुरोगामी चळवळींनी तरी पाळणं अपेक्षित नाही. बदलाच्या आणि परिवर्तनाच्या वाटा चालायला खडतर करणं हे कधीच चळवळीचं उद्दिष्ट नव्हतं कारण ते जितकं अवघड केलं जाईल तितकं परिवर्तन घडवून आणणं अवघड होत जाणार आहे. आजवर अनेक शोषित जातींनी जे सहन केलं, ते सहन करणं किंवा करायला भाग पाडणं आणि त्या परीक्षेनंतर जातिमुक्ततेची पुष्टी होणं, हे चळवळीचं उद्दिष्ट असू शकत नाही.
जातीअंताचा प्रवास हा जितका शोषितांच्या मुक्तीचा प्रवास आहे, तितकाच तो शोषकाच्या मुक्तीचाही प्रवास आहे.
जातीअंताचा प्रवास हा जितका शोषितांच्या मुक्तीचा प्रवास आहे, तितकाच तो शोषकाच्या मुक्तीचाही प्रवास आहे, किंवा असायला हवा. परिवर्तनाचा हा प्रवास हा दोन टोकांच्या विभाजनाचा प्रवास होऊ शकत नाही कारण ती दोन टोकं एकत्र येऊनच समस्याही निर्माण करतात आणि समाधानही. जातीचं आकलन, तिच्याबाबतची आत्मटीका एका दिवसात एखाद्या सवर्ण व्यक्तीमध्ये निर्माण होणार नसतेच, त्या जाणिवेचा एक प्रवास करावाच लागतो, मग अशा प्रवासाची सुरुवात करणाऱ्यांचं आणि आत्मटीकेला सुरुवात करणाऱ्यांचं काय करायचं, हा प्रश्न पुरोगामी चळवळींसमोर असणारच आहे. याचा अर्थ फक्त प्रवासाला सुरुवात करून कोणी त्याबाबत कौतुकाची अपेक्षा ठेवावी असाही होत नाही, त्याचसोबत या प्रवासाची निश्चिती व्हायच्या आधीच त्यांच्या अंगावर जाऊन त्यांच्या प्रवासाला अविश्वास आणि आक्रमक टीकेचा तगादा लावणंही उद्देशपूर्तीच्या दृष्टीनं ठीक नाही. यातून कोणाचंच काही साध्य होणार नाही.
परिवर्तनाच्या चळवळीचं उद्देश हे असायला हवं की प्रगतिकतेची वाट ही शोषणाच्या वाटेपेक्षा किती सुकर, फायद्याची, भविष्योन्मुख आणि मुक्तिदायी आहे, याची जाणीव करून जनमत आपल्याकडे ओढून एक मोठी सामाजिक क्रांती घडवून आणणं. असं झालं नाही, तर मग राजकीय-सामाजिक संघटनाच्या शक्तीला बहिष्काराचे मार्ग, वितंडाचे मार्ग शोधणाऱ्या वाटेवर नेण्याचं काम हे ब्राम्हण्यवाद ठरणार नसलं, तरी ब्राह्मण्याला सुपिकच ठरेल. आवटेंच्या शर्वरीला पुरोगामीत्व जमलं नसलं तरी तिच्यापर्यंत ते पोहोचावं याची तजवीज करावीच लागेल. तिच्या जातीत ती जन्मली हा तिचा दोष नसला तरी तिच्या जातीचे प्रिव्हिलेजेस उपभोगत ती इथवर कशी आली हे तिला सांगावं लागेल. आणि आता इथवर आलीच आहे, तर इथून पुढं तिला काय करता येईल, तिच्या स्थानाचा काय वापर करता येईल, हे सांगावं लागेल...असं न करता फक्त फरकाच्या जागा दाखवत राहिलो, तर मग पुरोगामी चळवळीही ब्राह्मण्याचा वाहक मात्र होऊन राहतील आणि जातीअंताच्या उद्देशापासून समाजाला कोसो दूर नेतील, असंच खेदानं म्हणावं लागेल.
(लेखाला आणि लेखकाला अवकाशाची मर्यादा आहे हे गृहीत धरावं. हा विषय याहूनही किचकट, अनेकांगी आहे याचं लेखकाला भान आहे. तरीही मर्यादा व कमतरता समजून घेतल्या जातील अशी अपेक्षा.)