Quick Reads
कुंभलंगी नाईट्स: पुरुषाच्या अमानवीकरणावर घातलेली हळुवार फुंकर
'कुंभलंगी नाईट्स' हा आवर्जून अनुभवण्यासारखा चित्रपट आहे.

आपण आसपास बघतो तेव्हा 'पुरुष' नावाचा एक प्राणी दिसतो आपल्याला. त्याच्यात वैविध्य नसतं किंवा नसावं असं पुरुषाचं पारंपरिक व्यवस्थेतील चित्रण आहे. म्हणजे पुरुष म्हटलं, की बलदंड शरीर, त्याच्या शक्तीचं किंवा शारीरिक क्षमतेचं कुठल्यातरी प्रकारचं चित्रण किंवा मिशीवर ताव, शर्ट दोन बटनं उघडा, प्रेयसीचा गाडीवर पाठलाग वगैरे वगैरे वगैरे. अनेक पुरुष ही चिन्हं एखाद्या निसर्गनियमाप्रमाणे पाळण्यात आयुष्यभर डोळ्यातून पाण्याचा थेंबही ओघळू देत नाही आणि ओघळलाच तर त्याची लाज बाळगतात. त्यांना वाटतं त्यांचं हे सदैव कठोर, निर्मम असणं हे निसर्गाने त्यांना दिलेलं अवघ्या सृष्टीचं प्रभुत्व आहे, पण 'कुंभलंगी नाईट्स' 'पुरुषा'च्या असल्या अमानवीकरणाला झुगारून त्याला माणूस म्हणून ढसाढसा रडायचा पूर्ण अधिकार मिळवून देतो.
'कुंभलंगी नाईट्स', एर्नाकुलमजवळच असलेल्या कुंभलंगी नावाच्या बेटांच्या प्रदेशात घडतो. सिनेमात यातल्याच एका बेटावर राहणाऱ्या चार भावांची कथा केंद्रस्थानी आहे, साजी, बॉनी, बॉबी आणि फ्रँकी. साजी यातला सर्वात मोठा भाऊ, त्याचे वडील विधुर असतात आणि बॉनीची आई विधवा. त्यांच्या लग्नानंतर त्यांना बॉबी आणि फ्रँकी होतात. म्हणजे साजी आणि बॉनी सावत्र भाऊ, तर बॉबी आणि फ्रँकी एकमेकांचे सख्खे आणि बाकी दोघांचे एका अर्थानं सावत्रच. वाचायला किचकट वाटत असलं तरी संपूर्ण सिनेमात त्यांच्या वैयक्तिक स्वभावाला सोडून या अशा प्रकारच्या किचकट नात्यावर ना कोणतं पात्र, ना दिग्दर्शक कसल्याही प्रकारचा बागुलबुवा करतो. ती नाती आहेत, जशी इतर अनेक असतात. इतकंच.
चौघा भावातला साजी (सुबीन शाहीर) सर्वात मोठा, पण आयुष्याचा रास्ता भटकलेला. बाप मेल्यावर आईसुद्धा सोडून गेली, त्यानंतर घरात आणि व्यवहारात निकामी ठरलेला साजी, उधारी आणि व्यसनं करून दिवस काढत असतो. वयानं मोठा असला तरी स्वभावानं अगदीच बालिश. त्याच्या खालोखाल असलेला बॉनी (श्रीनाथ भासी) मूक आहे. तो बाकी तिघांपासून अंतर ठेवत, आपल्या डान्स क्लासेस आणि मित्रांमध्ये मन रमवून जगतोय. त्याचं आणि सावत्र भाऊ साजीचं पटत नाही आणि त्याला घरातली भावांची सारखी भांडणं आणि बालिशपणा सहन होत नाही. बॉबी (शेन निगम) त्याच्या विशिला आणि मिशीला सुरुवात झालेला तरुण आहे, नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला आणि हातात माश्याचं जाळं तरबेजपणे फेकायची कला असलेला. सर्वात लहानगा फ्रँकी (मॅथ्यूझ) स्कॉलरशिप मिळवून बोर्डिंग स्कुल मध्ये शाळेला आहे. तो सुट्टीला घरी येतो, त्या काळात सिनेमाची गोष्ट घडते.
बॉबी त्याच्या शाळेतल्या बेबी (ऍना बेन) नावाच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतो. तो पडतो म्हणण्यापेक्षा तीच पुढाकार घेऊन त्यांच्या नात्याला आकार देते. तिच्या घरी तिची बहीण (ग्रेस अँटनी) आणि आई आहेत. वडील वारले आहेत. केरळमध्ये मातृसत्ता किंवा मातृवांशिकता आहे. म्हणजे पालकांची प्रॉपर्टी मुलीला जाते आणि नवरा मुलगा त्याच्या सासरी म्हणजे मुलीच्या घरी राहतो. पण जग बदलत आहे, मल्याळी पुरुष आपल्या इतर भारतीय समकालीन पुरुषांसारखेच 'अपडेट' होताहेत आणि त्यातच शम्मीचं (फहाद फाझील) बेबीच्या मोठ्या बहिणीशी लग्न झालेलं आहे आणि तो तिच्या घरी येऊन राहायला आला आहे.
शमी हा मल्याळी किंवा पर्यायानं भारतीय 'पुरुषीपणाचं' व्यंगात्मक रूपक आहे, कॅरिकेचर आहे. सिनेमाच्या सुरुवातीच्याच सीन मध्ये तो दाढी करताना आरशात स्वतःची स्वच्छ दाढी आणि मापातली मिशी न्याहाळत स्वतःच्या रूपावर भाळून गेलेला दिसतो. त्याला त्याच्या पौरुषाचा 'सासरी राहणारा पुरुष' म्हणून टोकलं गेल्यानं किंवा तसा गंड मनात असल्यानं वारंवार उल्लेख करावा वाटतो. तो त्याच्या पुरुषत्वाची स्पष्टता इतक्या प्रमाणावर ठेवतो की दाढी करत असताना आरशाला लागलेली त्याच्या बायकोची टिकली चुकून त्याच्या चेहऱ्यावर असल्यासारखी दिसते आणि तो लगेच ती खरवडून काढतो आणि स्वतःलाच मोठ्यानं म्हणतो, "शम्मी, द हिरो..."
तो इतका रुक्ष आणि वर्चस्ववादी आहे, की जवळपास सगळेच त्याला घाबरून आहेत किंवा त्याच्यातल्या विक्षिप्तपणाला ओळखून आहेत. फहाद फाझीलनं शम्मीचं पात्र फक्त एका विचित्र हास्यानं आणि बॉडी लँग्वेजमधून अगदी सक्षमपणे निभावलंय. तो स्क्रीनवर येतो तेव्हा आजूबाजूच्या पात्रांवर आपसूकच दडपण येतं आणि पाहणाऱ्यावरही. बॉबी जेव्हा बेबीच्या प्रेमात पडतो, तेव्हा त्याच्याकडेही नोकरी नाहीयेच. बरं तोही दिसायला नाजूक, ठोकळेबाज पुरुषी नसला तरी पौरुषाच्या चित्रणाच्या प्रभावातून सुटलेला नाहीये. बेबीसोबत नव्यानंच निर्माण झालेल्या प्रेमात, आपली प्रेयसी ही आपली मालकी असते, हे आपसूकच समजू लागतो आणि सिनेमा पाहता पाहता, तिच्याकडे किस करण्याची इच्छा व्यक्त करतो. अनेकदा प्रयत्न करूनही बेबी त्याला भाव देत नाही आणि साहेब रागावून तमाशा करून निघून जातात. हे घडतं तेव्हा योगायोगानं(?) ते 'अर्जुन रेड्डी' पाहायला आलेले असतात.
बेबी जेव्हा तिच्या बहिणीला किचनमध्ये बॉबी बद्दल सांगत असते, तेव्हा शम्मी तिथं ते बोलणं ऐकून येतो आणि तिथून पुढं कथानक वेग धरतं. बेबीने अनेकवेळा 'मला नाही सांगायचं ती माझी वैयक्तिक गोष्ट आहे' असं सांगूनही शम्मी तिला विचारत राहतो की तुम्ही काय बोलत होता. शम्मीला संमती आणि वैयक्तिक अवकाश, निजता कळत नाहीत. तो जेवण करताना हळूच आपली खुर्ची टेबलच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवतो आणि या परिवाराचा मुख्य मीच हे अधोरेखित करतो आणि संपूर्ण सिनेमात त्या घरातल्या स्त्रियांच्या आयुष्याचा मालक असल्याप्रमाणं वावरत राहतो.
त्याउलट हे चारही भाऊ पुरुषत्वाचा छटांनी बनलेले आहेत. यातला प्रत्येक एक वेगळं पण भावनिक माणूसपण टिकवून आहे. लहान भावावर एक दिवस साजी हात उचलतो आणि बॉनी त्याला चोपून काढतो. रागावून निघून गेल्यावर इतके दिवस पैसे उधार देणारा मित्रही त्याला पैशाबाबत बोलून दाखवतो आणि हे सगळं सहन न होऊन साजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा मित्र त्याला वाचवतो पण त्या प्रयत्नात जीव गमावून बसतो. या धक्क्यानं हादरलेला साजी एका सीन मध्ये खिडकीत बसून लहानभावाला म्हणतो, 'मला दवाखान्यात घेऊन चल, मला रडता येत नाहीये, मला मदत हवीये...'
'कुंभलंगी नाईट्स', वाऱ्याच्या एखाद्या हळुवार झुळुकीसारखा पुरुषत्वानं लाखो पुरुषांच्या मनांवर केलेल्या आघातांवर फुंकर मारत जातो. सिनेमा अगदी सटीकतेनं दोष पुरुष किंवा व्यक्तींचा नाही तर विषारी पितृसत्तेचा आहे हे दर्शवतो. दिग्दर्शक मधू सी. नारायण कुठंही कसलंही उदात्तीकरण किंवा प्रबोधन करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. छायाचित्रण हाताळणारे सुशील स्याम, कॅमेराच्या एका एका फ्रेममधून कुंभलंगीचं सौंदर्य उभं करतात. त्यांचा कॅमेरा स्थिर, शांत आहे. दिग्दर्शक नारायणही काही तार्किक किंवा वैचारिक मांडणी करण्यापेक्षा एक अलगद अध्यात्मिक अनुभव देण्यावर भर देणं पसंद करतात. रामायणात वाल्याचा वाल्मिकी होतो तर जगात सर्व लोक बदलू शकतात, तर येशू ख्रिस्ताची करुणा आयुष्याला सुंदर करू शकते अशा चिंतनातून पुरुषाला क्रौर्याचा शापातून मुक्त करणारा कुंभलंगी नाईट्स हा सध्याच्या काळातलं सिनेमाचं एक महत्त्वाचं तत्वचिंतन आहे.
या सर्व तुटलेल्या, मोडलेल्या पुरुषांना 'मार्गावर आणायला', 'सुधरवायला', सहन करून त्यांच्या मातृत्वभावातून त्याग करणाऱ्या स्त्रिया या सिनेमात नाहीत. या सिनेमातली स्त्री तिच्या त्रासांनी व्यापली आहे, थकून गेलीये. तिचं आयुष्य खुंटीला बांधलेलं होतं तरी आपली मुलं त्यांची विस्कटलेली आयूष्य सरळ करून देण्यासाठी काही दिवस परत ये म्हणून बोलवायला आली तरी त्यांना 'मी येऊ शकणार नाही' असं सांगणारी ख्रिस्ती नन बनलेली आई आहे आणि 'तुला प्रेम करायचं असेल तर मी जशी आहे तशी मान्य कर' म्हणत आपल्या प्रियकरासाठी स्वतःचं अस्तित्व त्यागून ओवाळायला नकार देणारी प्रेयसी आहे. या सिनेमातल्या स्त्रिया पुरुषांच्या आयुष्य जगण्याचं साधन नाहीत तर त्यांच्यासारख्याच चुकणाऱ्या, स्वभाव असणाऱ्या आणि स्वायत्त असणाऱ्या आहेत.
अर्जुन रेड्डी नावाच्या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक, कबीर सिंघ, काही दिवसांपर्यंत 'पॉप-कल्चर'च्या चर्चेच्या केंद्रस्थानी येऊन बसला होता. अर्जुन रेड्डीच्या एकूण-एक फ्रेम मध्ये, किंवा साधारण दाक्षिणात्य सिनेमाच्या कॅमेऱ्यात, पुरुषाचं पुरुषत्व पुरेसं शाश्वती नसल्यासारखं वारंवार अधोरेखित केलं जातं. अर्जुन रेड्डी किंवा कबीर सिंघच्या निमित्तानं 'टॉक्सिक मॅस्क्युलिनीटी' म्हणजे विखारी पुरुषीपणा ही संकल्पना अनेकांपर्यंत पोहोचली. पण कबीर सिंघनं जितके पैसे कमावले, ते बघता क्वचितच काही लोकांना या विखाराबाबत विशेष काही आक्षेप असतील असं दिसून आलं नाही. आणि अशा गल्लोगल्ली कबीर सिंघ असण्याच्या काळात, फहाद फाझील या मल्याळम सुपरस्टारनं 'कुंभलंगी नाईट्स' सारखा सिनेमा बनवावा आणि त्यात स्वतः खलनायकाची भूमिका करावी, हे अतिशय धाडसाचंच म्हणावं लागेल. एकूणच, 'कुंभलंगी नाईट्स' हा आवर्जून अनुभवण्यासारखा चित्रपट आहे.
'कुंभलंगी नाईट्स' ऍमेझॉन प्राईमवर पाहता येऊ शकतो. त्यासाठी इथं क्लिक करा.