India

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या 'थकीत कर्जाचा' खोटा व्हॉट्सऍप मेसेज पसरवल्याबाबत गुन्हा दाखल

भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानीची दावा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Credit : फाईल

पुणे: पीएनजी ज्वेलर्स कंपनीबद्दल बनावट व्हॉट्सअ‍ॅप संदेश प्रसारित केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूद्ध (एनसी) पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदेशांमध्ये गुंतवणूकदारांना कंपनीकडून त्यांचे पैसे काढून घेण्यास सांगितले होते. पीएनजी ज्वेलर्सचे डीजीएम (जनसंपर्क) नीलेश कोलपकर यांच्या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानीची दावा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (डीएचएफएल) १७ सप्टेंबर २०२० रोजी जारी केलेल्या मागणी नोटीसनंतर पुणे येथील काही वर्तमानपत्रांमधून पीएनजी ज्वेलर्सचे लँडस्केप रियल्टीने घेतलेल्या कर्जासाठी “गॅरंटर” असे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे नाव बातम्यांमधून जाहीर केले.

यासंदर्भात, पीएनजी ज्वेलर्स यांनी निवेदन जारी केले की, “पीएनजी ज्वेलर्स या कंपनीचे लँडस्केप रिअल्टी किंवा दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) चे कर्जदार किंवा गुंतवणूकदार किंवा भागीदार नाहीत. डिमांड नोटिसमध्ये सौरभ गाडगीळ आणि राधिका गाडगीळ यांचा लँडस्केप रियल्टीने घेतलेल्या कर्जाची हमी म्हणून नव्हे तर स्वत: कर्जदार म्हणून उल्लेख केला आहे. पीएनजी ज्वेलर्सकडे बँकर्स, ऑडिटर्स, संचालक आणि व्यवस्थापन यांचा पूर्णपणे स्वतंत्र गट आहे आणि लँडस्केप रियल्टीच्या कोणत्याही ऑपरेशनशी ते संबधित नाहीत. जे रिअल इस्टेट व्यवसायात स्वतंत्र संस्था असून स्वतंत्र संघ आणि कार्यालये आहेत. "

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, “या अफवा पसरवून आपले नाव या प्रकरणात खेचणे हे दुर्दैवी हेतूने केले गेले आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. या अफवा आमच्या प्रतिष्ठा खराब करण्यासाठी तसेच व्यवसायाला हानी पोहचविण्याच्या उद्देशाने पसरल्या आहेत. सांगितलेल्या कर्जाचे आम्ही (पीएनजी) कर्जदारही नाही. लोकांनी यावर विश्वास ठेवू नये आणि पूर्ण पडताळणी केल्याशिवाय संदेश पुढे पाठवू नयेत." 

व्हाट्सऍप वर फिरणारा मॅसेज अथवा बातमी पूर्णपणे खोटी असल्याचा पीएनजी ने दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस विभाग तसेच सायबर सेलकडे पीएनजीने तक्रार दाखल केली आहे. "जे बनावट बातम्यांचा प्रसार करीत आहेत त्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पीएनजी ज्वेलर्स जवळपास दोन शतकांपर्यंत आपल्या ग्राहकांची समान मूल्यांसह सेवा करीत राहणार आहे. या प्रकरणात आपले नाव साफ करण्यासाठी आम्हाला उपलब्ध असलेल्या कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू, " असेही सौरभ गाडगीळ म्हणाले.