India

पुनीत बालन समूहाला 'विद्रुपीकरणासाठी' महानगरपालिकेचा ३.२ कोटींचा दंड

दहीहंडी उत्सवाच्या काळात ठिकठिकाणी विनापरवानगी जाहिरातींचे फलक लावल्यानं कारवाई.

Credit : इंडी जर्नल

 

पुणे शहरात दहीहंडी उत्सवाच्या काळात जाहिरातींचे अनाधिकृत फलक, बोर्ड, बॅनर आणि फ्लेक्स इत्यादी लावून सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेनं पुनीत बालन या पुणेस्थित व्यावसायिकांना सुमारे ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे. पुण्यात यावर्षी साजरा झालेल्या दहीहंडी उत्सवाच्या काळात ठिकठिकाणी विनापरवानगी जाहिरातींचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला असल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं.

पुण्यात यावर्षी गणेशोत्सवादरम्यान तसंच त्याआधी दहीहंडी उत्सवादरम्यान शहरभर पुनीत बालन समूह आणि त्यांच्या ऑक्सिरिचचे जाहिरातींचे फलक शहरभर रस्त्यांच्या कडेला आणि चौकाचौकात दिसत होते. संपूर्ण शहरात दिसणारे हे फलक आणि आकाशचिन्हं गेले अनेक दिवस समाज माध्यमांवरील पोस्ट्स तसंच विनोद आणि मिम्सचा विषय बनलेले होते. अशाप्रकारे प्रत्येक सणादरम्यान प्रायोजक म्हणून पुनीत बालन समूहाचे हे फलक बघावे लागणार आहेत का, असा प्रश्न अनेक नागरिकांनी विचारला. त्यांच्या सौजन्यानं पुण्यातील अनेक मंडळांचे गणेशोत्सव पार पडल्यानंतर आता महापालिकेकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.

"पुनीत बालन समूहानं परवानगी न घेता तसंच महानगरपालिकेनं ठरवून दिलेलं शुल्क न भरता हे जाहिरातींचे फलक लावले," असं परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी याविषयी बोलताना म्हटलं.

 

 

महानगपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागानं दिलेल्या नोटिशीनुसार '७ सप्टेंबर २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३च्या काळात म्हणजेचं दहीहंडी उत्सवादरम्यान बालन समूहानं अंदाजे २,५०० ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक पालिकेची पूर्व परवानगी न घेता लावले'.

"महानगरपालिकेच्या नियमानुसार अशा प्रकारचे फलक लावण्यासाठी ४० रुपये प्रति चौरस फूट प्रति फलक प्रति दिन असं शुल्क भरणं आवश्यक आहे. मात्र पुनीत बाळं समूहानं दहीहंडी उत्सवादरम्यान तसं न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे," जगताप म्हणाले.

पुनीत बालन समूहानं लावलेल्या ऐंशी हजार चौरस फूट फलकांवर १० दिवसांसाठी ४० रुपये प्रति चौरस फूट प्रति दिन यानुसार सुमारे तीन कोटी वीस लाख रुपयांचा दंड महापालिकेनं ठोठावला आहे. हा दंड नोटीस मिळाल्याच्या २ दिवसांच्या आत भरणं बंधनकारक असून असं न केल्यास कारवाई करण्याचा इशारा महानगर पालिकेनं दिला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम २४४ आणि २४५ आणि त्यांच्या नुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हं व जाहिरात प्रदर्शित करण्याच्या नियम व नियंत्रण २०२२ अनुसार पुणे महानगर पालिका क्षेत्रात फलक लावण्यासाठी महानगरपालिकेची पूर्व परवानगी आवश्यक आहे. महापालिकेच्या धोरणानुसार फक्त गणेशोत्सवाच्या काळात अशा प्रकारचे फलक लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही, किंवा शुल्क भरावं लागत नाही.