Europe

बोलायचं होतं शेतकरी आंदोलनावर, बोलले भारत-पाकिस्तान संघर्षावर

प्रधानमंत्री जॉन्सन हे येत्या २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

Credit : फायनान्शियल टाइम्स

ब्रिटनचे उजव्या विचारांचे पंत्रप्रधान बोरिस जॉन्सन, यांनी बुधवारी ब्रिटिश संसदेत भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनात आणि भारत-पाकिस्तान संघर्षात गफलत करत विधान केलं. त्यांना शेतकरी आंदोलनावरच्या दडपशाहीचा निषेध मोदींना कळवावा असा विरोधी खासदारानं प्रस्ताव मांडला असता, त्यावर, 'आम्ही भारत-पाकिस्तान संघर्ष शांततापूर्वक आणि समन्वयानं सोडवण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत' असं नेहमीचं ब्रिटिश धोरण पुन्हा उद्घृत केलं. 

ब्रिटिश शीख असलेले लेबर पक्षाचे खासदार तनमनजीत सिंघ धेशी यांनी ब्रिटिश संसदेत प्रस्ताव मांडला व त्या प्रस्तावात म्हटलं, "आमच्या मतदारसंघातील बऱ्याच नागरिकांना भारतात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर भारत सरकारकडून करण्यात येणाऱ्या दडपशाहीबाबत चिंता वाटत आहे. तेच शेतकरी त्यांना मारणाऱ्या पोलिसांना अन्न देत होते. असं करणाऱ्या माणसांची नैतिकता यातून स्पष्ट होते," व पुढं म्हटलं, "त्यामुळंच, प्रधानमंत्री जॉन्सन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमच्या चिंता कळवतील काय? आमची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न जलदगतीनं आणि आंदोलकांच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन न होता सोडवले जावेत." 

यावर प्रतिक्रिया देताना प्रधानमंत्री जॉन्सन अचानक भारत-पाकिस्तान संघर्षावर मत व्यक्त करू लागले. ते म्हणाले, "आमची भूमिका अशो आहे की जे भारत-पाकिस्तान दरम्यान सुरु आहे, ते गंभीर आहे मात्र हे प्रश्न जुने आहेत आणि त्या-त्या देशांच्या सरकारांनी सोडवण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे त्यांना (मोदींना) याच्याशी पूर्ण सहमती आहे." 

 

 

यावर ट्विट करून प्रधानमंत्री जॉन्सन यांच्या गोंधळावर खोचक टिप्पणी करत धेशी यांनी जॉन्सन यांचा व्हिडियो शेअर करत, "आपल्या प्रधानमंत्र्यांना ते कशाबाबत बोलत आहेत ते किमान तपासून बोलण्याची गरज आहे," असं म्हटलं आहे. आत्तापर्यंत काही निवडक राजकारणी सोडता ब्रिटिश सरकारनं भारतातल्या या प्रचंड आंदोलनावर कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही. प्रधानमंत्री जॉन्सन हे येत्या २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. मागच्या वर्षी हा मान ब्राझीलचे उजव्या विचारांचे राष्ट्रपती हैर बॉल्सनारो यांना मिळाला होता.