India
पूल गोदावरीच्या पाण्याखाली गेल्यानं मृतदेह गावी न्यायला सोनपेठकरांची धावपळ
रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी परभणीच्या सोनपेठ मधील वाडी पिंपळगाव येथील ग्रामस्थ माणिक विश्वनाथ धानोरकर (४५) यांचा न्यूमोनिया झाल्यानं परळी येथील दवाखान्यात मृत्यू झाला.
परभणी। रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी परभणीच्या सोनपेठ मधील वाडी पिंपळगाव येथील ग्रामस्थ माणिक विश्वनाथ धानोरकर (४५) यांचा न्यूमोनिया झाल्यानं परळी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अँब्युलन्सनं गावी आणत असताना गंगापिंपरी ते शेळगाव रस्त्यावर नदीचं पाणी आल्यानं अँब्युलन्सनं त्या पुढं येण्यास नकार दिला आणि त्यांचा मृतदेह एका दुसऱ्या गाडीला बोलावून पुढं नेण्याची वेळ शोकाकुल परिवारावर आली व पुन्हा एकदा गोदाकाठच्या रस्त्यांबाबत परभणी प्रशासनाची उदासीनता अधोरेखित झाली.
"धानोरकर यांचं पार्थिव शरीर अँब्युलन्सनं पुढं न्यायला नकार दिल्यानं गावातील इतर लोकांनी गावातून दुसरी गाडी आणली आणि कमरे इतक्या पाण्यातून मृत्यूदेह गावात आणला. हे सर्व होई पर्यत संध्याकाळचे ४ वाजले होते," असं गावकरी अनिल रोडे यांनी इंडी जर्नलला सांगितलं. स्मशान उपलब्ध नसल्यानं गावाजवळच्या एका ठिकाणी संध्याकाळी मृतदेहाला अग्नी दिला गेला. त्यानंतर रात्रीपर्यंत सोनपेठमध्ये मोठा पाऊस पडला. परिणामी गोदावरीची पाणी पातळीदेखील वाढली होती आणि मृतदेह जाळलेल्या ठिकाणी माणसाच्या उंची एवढं पुराचं पाणी साचलं होत. त्यामुळं धानोरकर कुटुंबियांना अस्तिविसर्जनदेखील करता आलं नाही कारण पुरातील पाण्यात अस्थीदेखील वाहून गेल्या.
गेल्या वर्षी थडी उकडगावच्या एका महिलेला प्रसूतीवेदना होत असल्यानं दवाखाण्यात घेऊन जात असताना खराब रास्ता असल्यानं त्या महिलेला गाडीतच रक्त स्राव झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. या आणि अशा अनेक घटना वारंवार या भागात रस्ता नसल्यानं होत असतात. सोनपेठ तालुक्यातील हा रस्ता १७ किलोमीटरचा आहे. हा रास्ता बनवून घायची मागणी या गावातील गावकरी २००६ पासून करत आहेत. रस्त्याच्या प्रश्नकडे लक्ष जाण्यासाठी केंद्रशासित प्रदेशाच्या मागणी पासून निवडणुकीवर बहिष्कारदेखील टाकला होता. अनेक आंदोलनेही केली आहेत.
अनिल रोडे यांच्या वडिलांचा मृत्यू २०१३ ला झाला होता. रोडे औरंगाबाद वरून अँब्युलन्स करून सोनपेठ पर्यंत आले होते. मात्र सोनपेठ तालुक्यात आल्यावर अँब्युलन्सनं रस्ते खराब असल्यानं आणि गोदावरीच्या पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं अँब्युलन्स पुढे येण्यास नकार दिला. रोडेंना वडिलांचा शव खांद्यावर घेऊन गावात जावं लागलं होत. २०२१ आलं सरकार बदललं, अधिकारी बदलेले पण अजूनही सोनपेठची परिस्तिथी बदलली नाही. दरम्यानच्या काळात अनेक राजकारण्यांनी आश्वासनदेखील दिली की हा रस्ता लवकरात लवकर बनवून घेऊ. मात्र अजूनही रस्त्याचं काम पुढं सरकलेलं नाही.
या रस्त्याबाबत इंडी जर्नलने या आधी डॉक्युमेंटरी ची व्हिडिओ सिरीज केली होती आणि परभणीतील रस्त्यांचा आढावा घेणारा एक लेखदेखील प्रकाशित केला आहे. या संदर्भात इंडी जर्नलने स्थानिक आमदार व काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दाद दिली नाही. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी या भागात २ महिन्यांपूर्वी इंडी जर्नलनं केलेल्यानं रिपोर्टनंतर तीन महिन्यात रस्त्याचं काम सुरु करू असं आश्वासन दिल होत. मात्र त्यांनीदेखील संपर्काच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यास बातमी सुधारित करण्यात येईल.
अपडेट: इंडी जर्नलचा राजेश विटेकर यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांनी पाऊस थांबल्यावर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस रस्त्याचं काम सुरु होणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.